पीएम्इंडिया
मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तेलंगण बनल्यानंतरची ही माझी पहिलीच भेट आहे. आणि हिंदुस्थानात तेलंगण वयानं सर्वात लहान असलेलं राज्य आहे. फक्त दोन वर्षे झाली आहेत. परंतु दोन वर्ष इतक्या अल्पशा काळात तेलंगणने जनतेच्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी ,जनसामान्यांच्या आवश्यकतांसाठी ज्याप्रकारे पावलं उचलली आहेत, त्यावरून माझा विश्वास आहे की, ज्या उद्देशाने तेलंगणची निर्मिती झाली, तेलंगणचे लोक, तेलंगणचे सरकार; ती सर्व स्वप्ने पूर्ण करतील, असा माझा विश्वास आहे.
आज मला पंचशक्तीचे दर्शन झाले. या पंचशक्तीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामध्ये पाणी आहे, प्रकाशही आहे. परिवहनही आहे. एकाचवेळी पाच प्रकल्प आणि तेही भारत सरकार आणि तेलंगण सरकार संयुक्तपणे करताहेत. आणि हेच तर सहकारी संघराज्य आहे. एक काळ असा होता की, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सारखा तणाव निर्माण करणाऱ्या भाषेचा उपयोग होत असे. आज असा काळ आला आहे की, केंद्र आणि राज्य मिळून भारताला नवीन उंची प्राप्त करून देण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अलिकडेच संसदेत स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचे काम झाले. त्यामध्ये श्रीमान चंद्रशेखर राव आणि त्यांच्या पक्षाने चांगला पाठिंबा दिला. त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो.
आज मी इथं पाहतोय की, भारत सरकार आणि तेलंगण सरकार विद्युतीकरणाचं काम असो, खतनिर्मिती असो, रेल्वेचं कामा असो, जल प्रकल्प असो; एकत्र येऊन संयुक्तपणे करत आहेत आणि पुढं जाण्याच्या दिशेने पावलं टाकत आहेत. हाच मार्ग देशाला प्रगतीच्या दिशेने नेणार आहे. आणखी एक गोष्ट मी सांगतो , चंद्रशेखर राव मुख्यमंत्री बनल्यापासून माझी आणि त्यांची ज्या ज्यावेळी भेट झाली त्या त्या प्रत्येकवेळी त्यांनी तेलंगणच्या विकासाविषयी चर्चा केली. प्रत्येकवेळी पाण्याचा विषय निघाला की, ते संवेदनशील होत होते. ते ऐकून वाटत होतं. पाणी त्यांच्या जीवनाचे खूप मोठे, महत्वपूर्ण ध्येय बनले आहे. एकदा ते माझ्याकडे आले आणि म्हणाले,‘‘ मोदीजी, मी आमचं एक पथक गुजरातला पाठवलं होतं, कच्छमध्ये आपण कशा पद्धतीने पाणी पोहोचवलं त्याचा अभ्यास करण्यासाठी हे पथक गेलं होतं. आणि जिथं जिथं पाण्याचं चांगलं काम झालं आहे, त्याचा मी अभ्यास करतोय. आणि मी संपूर्ण तेलंगणमध्ये पेयजलासाठी एक दीर्घ मुदतीची योजना बनवणार असून घराघरांमध्ये पाणी पोहोचवणार आहे.
काही लोक असा विचार करतात की, संसाधनामुळे सगळया योजना यशस्वी होतात. आणि ते बरोबर आहे. साधनं तर लागतातच लागतात. परंतु फक्त साधनांनी यश मिळत नाही. त्यासाठी संकल्पही असावा लागतो. आणि ज्यावेळी असा संकल्प जनसामान्यांशी जोडला जातो, त्यावेळी यश प्राप्त होतं. आज कामाचा शुभारंभ झाला आहे. परंतु मला विश्वास आहे की काम पुढे जाईल.
भारत सरकारनेही एक स्वप्न पाहिले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना. आपल्या देशातील शेतकऱ्याला जर पाणी मिळाले तर मातीतून सोनं निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच संपूर्ण देशभरामध्ये पाणी पोहोचवण्याचे एक मोठे काम जिथं जिथं जलस्रोतआहेत, जिथं जिथं पाणलोट क्षेत्र आणि जलग्रहण क्षेत्र आहे आणि अनेक वर्षे योजना प्रलंबित आहेत. गेल्या काही दिवसांत आम्ही मंत्रिमंडळामध्ये योजनाविषयी निर्णय घेतला आहे. आगामी काही दिवसांमध्ये देशातीली शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण भूमिका सरकार बजावणार आहे. भारतातील खेडी, भारताचे कृषी क्षेत्र आपली आर्थिक ताकद आहे. या ताकदीला अधिक बळ देण्याचे काम आम्ही प्राधान्याने आणि लक्षपूर्वक करीत आहोत. परंतु मी हेही सांगू इच्छितो, तेलंगणच्या भूमीवरून देशवासियांना सांगू इच्छितो. ज्यावेळी पाणी असते त्यावेळी आपल्याला पाण्याचे मूल्य समजत नाही. खूप तहान लागली आणि अगदी दूरवर कुठेही पाणी दृष्टीपथात नाही पडले तर माणसाचे काय हाल होतात. हे पाणी नसतांनाच समजते. परंतु ज्यावेळी पाणी असते, त्यावेळी मात्र आपल्याला त्याची किंमत समजत नाही. त्याच्याबाबतीत उदासीन असतो. आणि म्हणूनच आपला नागरी धर्म आहे की, आपण पाण्याची बचत केली पाहिजे. जर पाणी वाचले तरच पाणी पोहोचेल. आणि पाणी पोहोचले तर एक नवीन जीवन मिळेल. आणि म्हणूनच पावसाचे प्रत्येक थेंब न् थेंब वाचवला पाहिजे.
आपल्यापैकी कोणाला जर पोरबंदर या महात्मा गांधी यांच्या जन्मस्थानी जाण्याचे सौभाग्य मिळाले तर, माझं आपल्याला एक सांगणं आहे की, एकदा जरूर जा, पाहून या, महात्मा गांधी कुठे जन्मले होते तिथे तर आपण वंदन कराल आणि पुष्पही अर्पण कराल. परंतु तिथे 200 वर्षांपूर्वी पावसाचे पाणी वाचविण्यासाठी प्रत्येक घरांमध्ये कशी व्यवस्था होती. जमिनी अंतर्गत पाण्याच्या टाक्या कशा पद्धतीने तयार केल्या होत्या. संपूर्ण वर्षभर पावसाचे साठवलेले पाणी खराब होऊ नये म्हणून कोणते तंत्रज्ञान वापरलं जायचं. 200 वर्षे जुनी- प्राचीन असणारी ती व्यवस्था आजही महात्मा गांधी यांचे जन्मस्थान पाहण्यासाठी आपण गेलो तर पाहायला मिळते. 200 वर्षांपूर्वी पाण्याचे संकट नव्हते. त्याकाळातही आमचे लोक पाण्याचं महत्व जाणत होते. आणि आज तर संपूर्ण दुनियेपुढे जलसंकट निर्माण झाले आहे. अशावेळी आमची जबाबदारी आणखी जास्त वाढतेय. आणि म्हणूनच या योजनांमुळे पाणी मिळणार एवढाच आनंद मिळवून चालणार नाही. पाण्याला प्रसादाप्रमाणे सांभाळले पाहिजे. या जबाबदारीची जाणीव वाढली पाहिजे. त्याचवेळी योजनेचा लाभ होणार आहे.
आज इथे एका विद्युतनिर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास झाला. एका विद्युत प्रकल्पाचा लोकार्पण समारंभ झाला. ज्या राज्यांना कधी वीज अभावाच्या संकटाशी सामना करावा लागत होता, विजेची कमतरता भासत होती, आज मी अभिमानाने सांगू शकतो की, भारत सरकार आणि आमचे पीयूष गोयलजी आणि त्यांच्या मंत्रालयाने दोन वर्षांत अशी स्थिती निर्माण केली आहे की, जी राज्ये वीजे अभावी त्रासले होते अशा राज्यांनाही त्यांनी विद्युत संपन्न राज्ये बनवले आहे. जर उद्देश चांगला असेल, सामान्य मानवी गरजांची पूर्ती करण्याचा उद्देश असेल तर समस्यांवर उत्तरेही मिळतात. आणि आता पीयूषजी मला सांगत होते की, आधी तेलंगणला वीज खरेदी करावी लागत होती त्यावेळी एका युनिटसाठी जवळपास अकरा- साडे अकरा रुपये खर्च करावे लागत होते. युनिटसाठी अकरा- साडे अकरा , बंधू भगिनींनो, आज भारत सरकारने ज्या पद्धतीने वीज क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. वीज उत्पादनात वाढ केली आहे. वीज संक्रमण प्रक्रियेवर खर्च केला आहे. सगळा कारभार संतुलित केलाय. त्याचा परिणाम म्हणजे आज काही काळापूर्वी जी वीज प्रति युनिट अकरा साडे अकरा रुपयांना मिळत होती, ती आज या क्षणी, आजमितीला एक रुपया दहा पैशांना मिळू लागली आहे. राज्यांच्या तिजोरीतील किती पैसा वाचतोय. राज्यांच्या तिजोरीमध्ये पैसा आला तर तो राज्यांतील जनतेच्या भल्यासाठी किती कामी येईल, हे आपण चांगल्या पद्धतीने अंदाज बांधू शकतो. म्हणूनच बंधू भगिनींनो, विजेसाठी आम्ही अणू ऊर्जेवर भर देत आहोत. औष्णिक ऊर्जेवर भर देत आहोत, सौरवर भर देत आहोत. कारण पाणी , प्रकाश यांच्याशिवाय काही होणार नाही. जीवनात या दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत. आणि या दोन्ही गोष्टी परमात्म्याकडून मिळतात. पाणीसुद्धा परमात्म्याच्या कृपेने मिळते आणि प्रकाशही सूर्यदेवतेच्या कृपेने मिळतो. आणि म्हणूनच सौरऊर्जेवर भर दिला आहे.
मी आत्ताच मुख्यमंत्रीजींशी बोलत असताना त्यांना सांगत होतो की, सगळीकडे पाणी पोहोचविण्याचा तुमचा प्रयोग आहे, त्यालाच तुम्ही सौरऊर्जेची जोड द्या. म्हणजे पाणी पोहोचवण्यासाठी होणारा वीज खर्च अजिबात करावा लागणार नाही. संपूर्ण प्रयोग वीज खर्चमुक्त होईल. म्हणजे आर्थिकदृष्ट्याही लाभदायक होईल. एकेकाळी देशात एक हजार मेगावॅटपेक्षा कमी सौरऊर्जा निर्माण होत असे. एक हजार मेगावॅटपेक्षाही कमी, आज दोन वर्षांच्या आतच देशात तीन हजार मेगावॅटपेक्षाही जास्त सौरऊर्जा निर्माण होतेय. कामाचा वेग किती जास्त आहे पहा. कामाचा आवाका किती मोठा आहे, याचा आपण अंदाज बांधू शकता.
आज इथे खूप वर्षांपासून ज्या रेल्वे लाईनची मागणी करीत होता, त्या रेल मार्गाचा शिलान्यास आज होत आहे. कितीतरी पंतप्रधान येऊन गेले. आपलेही आले, बाहेरचेही आले. प्रत्येक वेळेस प्रत्येक खासदाराने या रेल मार्गासाठी प्रत्येक सरकारकडे मागणी केली. परंतु कधीही दूरपर्यंत रेल मार्ग दृष्टीस पडला नाही. आजच्या युगात विकासासाठी संपर्क यंत्रणा खूप आवश्यक आहे. पायाभूत सुविधांचे आर्थिक रूप आहे. आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण देशात आर्थिक विकासाला- रेल्वे संपर्क यंत्रणेची जोड देवून भविष्यातील योजनांचे नियोजन करीत आहोत. आधी तर रेल्वेची अशी स्थिती होती की, चार खासदार एकत्र येवून त्यांनी थोडा आवाज वाढवला तर रेल्वे मंत्री म्हणायचे, ठीक आहे, एक डब्बा तुम्हाला देवून टाकतो. आणखी चार खासदार एकत्र आले तर म्हणायचे , ठीक आहे…अमूक ठिकाणी तुमची गाडी थांबवण्याची व्यवस्था करतो. रेल्वे अशीच चालते. देशाच्या आर्थिक विकासाकडे लक्ष देवून, आम्ही यामध्ये आमुलाग्र बदल केला. जनसामान्यांच्या आवश्यकतांचा विचार करून रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करून रेल्वेला आम्ही पुढे नेऊ इच्छितो. आणि आज या योजनेनुसार ज्या रेल्वे प्रकल्पाची, तेलंगणची प्रलंबित मागणी होती, ती आज आम्ही पूर्ण करीत आहोत. आणि माझा विश्वास आहे की, जर कोणताही अडथळा निर्माण झाला नाही, तर हा रेल्वे प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण निश्चित केला जाईल. आणि इथल्या जनसामान्यांच्या दृष्टीने आवश्यकता लक्षात घेवून आज तेलंगणच्या इतिहासामध्ये प्रथमच आणि सर्वात पहिल्या खतनिर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास येथे झाला आहे.
तेलंगणकडे खतनिर्मितीचा एकही कारखाना नाही. शेतकऱ्यांना युरिया पाहिजे. शेतकऱ्यांना खत पाहिजे. जर खताचे उत्पादन झाले नाही, तर खताची वाढती मागणी आपण पूर्ण करू शकत नाही. आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी खतांवर अमूक इतके अनुदान दिले जाईल अशा घोषणा केल्या जात होत्या. वर्तमानपत्रांमध्ये छापल्या जात होत्या. निवडणुका झाल्या की, राजकीय नेत्यांचे काम संपत होतं. परंतु माझा शेतकरी आहे तिथंच रहात होता. अनुदानाची घोषणा का बरं केली जात होती? खतच जर मिळत नव्हते तर अनुदान कुठे मिळणार? असाच कारभार आहे. बंधू भगिनींनो, आम्ही शेतकऱ्यांना खत मिळावे यावर भर दिला आहे. आणि शेतकऱ्याला काळया बाजारातून नाइलाजाने खत विकत घ्यावे लागत होते. नाइलाजाने त्याला यूरिया खरेदी करावे लागत होते. काही राज्यांमध्ये तर खत खरेदीसाठी लोकांना रात्र रात्रभर लांब रांगेत उभे रहावे लागत होते. कधी कधी पोलीस लाठीहल्ला करीत. आणि तरीही शेतकऱ्यांना खते मिळत नव्हती. आणि आता ज्यावेळी मी मुख्यमंत्री बनलो, त्यावेळची परिस्थिती सांगतो. बहुतेक मुख्यमंत्री, साहेब हंगाम सुरू आहे, युरियाची टंचाई आहे, आमच्या राज्याला इतका युरिया पाहिजे, तितका पाहिजे… अशी पत्रे जवळपास सगळेच मुख्यमंत्री पंतप्रधानांना पाठवत होते. आज मी खूप आनंदाने सांगू शकतो. आज माझ्या शेतकरी बंधू भगिनींच्यासमोर सांगू शकतो की, गेल्या दोन वर्षांमध्ये एकाही मुख्यमंत्र्याला युरियाच्या मागणीसाठी पत्र पाठवावे लागले नाही.
आमचे श्रीमान अनंतकुमार यांच्या नेतृत्वाखाली खत क्षेत्रामध्ये आम्ही एक नवी क्रांती आणली आहे. नीमचे आवरण असलेल्या युरियामुळे ते अधिक दमदार बनले आहे. या युरियाचा भूमीला लाभ होणार आहे. नीम आवरणामुळे युरियाची ताकद वाढली आहे. ज्या कारणांमुळे युरियाची चोरी होत होती. आणि तो रासायनिक कारखान्यांमध्ये जात होता. अनुदानाचे बिल मात्र गरीब शेतकऱ्यांच्या नावे फाडले जात होते. आणि काही विशिष्ट लोकांच्या खिशात अनुदान जात होते. आणि युरिया रासायनिक खतांच्या कारखान्यांमध्ये स्वस्तात पोहोचत होते. ते आपले रासायनिक बनवून विकत होते. गरीब शेतकरी आहे तिथेच राहत होता. नीम आवरणामुळे आता एकाही रासायनिक कारखान्याला एक ग्रॅम युरियासुद्धा उपयोगी नाही. भ्रष्टाचार पण थांबला आणि चोरीपण संपली. सरकारी तिजोरीतून लूट होत होती, तीही बंद झाली. आणि शेतकऱ्यांना युरिया विनासायास मिळू लागला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच खतांचे भाव कमी झाले. एक-एक पोत्यावर दोनशे रुपये, अडीचशे रुपये भाव कमी होणं पहिल्यांदाच घडले आहे.
बंधू भगिनींनो, जर समाजाच्या फायद्यासाठी काम केले जात असेल, शेतकऱ्यांच्या गावाच्या भल्यासाठी काम केले जात असेल तर कोणत्या पद्धतीने परिवर्तन आणता येते. यासाठी जर कोणी ‘युरिया’ हा विषय म्हणून अभ्यासला तर त्याच्या लक्षात येईल की एक चांगले सरकार म्हणजे काय असते. आणि जसं आत्ता चंद्रशेखर राव यांनी भारत सरकारच्या सचोटीची भरपूर प्रशंसा केली. ते स्वतःही तर भारत सरकारमध्येच आहेत. त्यांनी भारत सरकारला खूप जवळून पाहिलं आहे. ते भारतीय जनता पार्टीचे नाहीत. तेच आत्ता सांगत आहेत की, खूप वर्षांनी दिल्लीमध्ये एक इमानदार सरकार आले आहे. आणि त्याचा हा परिणाम मिळाला आहे. त्याचा तो परिणाम झाला आहे. परंतु बंधू भगिनींनो, आपल्या कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला खूप बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. हा खत वगैरे त्यापैकीच एक मार्ग आहे. परंतु आपल्या धरती मातेच्या आरोग्याचाही विचार करण्याची गरज आहे. जर का आमची ही धरणीमाय एकदा का आजारी पडली तर मग कितीही नवे नवे संशोधन केले तरी कधी ना कधी ही माता आमच्यावर नाराज होणार आहे. आणि शेतकऱ्यांसाठी तर धरणीमातेपेक्षा कोणती माता मोठी नसते. आणि म्हणूनच आम्ही मृदा आरोग्य पत्राद्वारे या धरणी मातेची चिंता केली आहे. त्यामध्ये काही कमी असेल तर पूर्तता करणे शक्य होणार आहे. त्यावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.
या दिवसांमध्ये गाय या विषयावर खूप चर्चा सुरू आहे. परंतु हिमाचल प्रदेशचे आमचे राज्यपाल आहेत, ते स्वतः कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग करतात. त्यांनी एक मोठी मोहीम सुरू केली आहे. हिमाचलमध्ये ज्या गाईंना लोकांनी सोडून दिले आहे, त्यांना पकडून आणून त्या शेतकऱ्यांना देण्याचे काम ते करतात. ज्या गाई दूध देत नाहीत, त्या गाई ते शेतकऱ्यांना देतात. आणि शेतकऱ्यांना सांगतात की, तुम्ही शेताच्या कामाबरोबरच गाईची मदत घ्या. गाईचे मलमूत्र आपल्या शेतजमिनीला नवीन ताकद, बळ देणार आहे. त्यांनी स्वतः हे प्रयोग केले आहेत. ते यशस्वीही झाले आहेत. आणि म्हणूनच जो कोणी गोभक्तीवर विश्वास ठेवतो, जो कोणी गोसेवेवर विश्वास ठेवतो; त्या सर्वांना माझा आग्रह आहे की, गाईला कृषीशी जोडा. कृषी क्षेत्राशी गाईला जोडले तर गाय कधीही ओझे बनणार नाही. आणि महात्मा गांधी गाईच्यासंबंधी एक खूप चांगली गोष्ट सांगत होते. महात्मा गांधी म्हणते होते की, आमची आई आम्हाला बाळपणी काही काळापर्यंत दूध पाजते. आमचे पालन करते. परंतु गोमाता आपल्याला जीवनभर दूध पाजते आणि पालन पोषण करते. गोमाता पुढे मृत्यूच्या नंतरही माणसाच्या कामी येती. ज्याप्रमाणे रोपं आणि झाडे एकप्रकारची संपत्ती आहेत, त्याचप्रमाणे जनावरेही संपत्ती आहेत, मालमत्ता आहेत. या संपत्तीचे योग्य प्रकारे नियोजन करून राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी त्याची सांगड घालण्याची आवश्यकता आहे. आणि कधी कधी चिंताही त्रास देते. जे लोक समाजाचे ताणे-बाणे तोडण्याचा विचार करतात. जे लोक समाजाचा विद्ध्वंस करण्याचाच विचार करतात. जे लोक हिंदुस्तानच्या एकतेवरून त्रासले जातात. असे काही मुठभर लोक गोरक्षेच्या नावाखाली समाज संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मी सगळया देशवासियांना सांगू इच्छितो की, अशा खोट्या, नकली गोरक्षकांपासून सावध रहा. मी राज्य सरकारांनाही सांगतो की, आमचे कृषी क्षेत्र वाचविण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना रक्षणासाठी, आमची गावे वाचवण्यासाठी आणि जी गोष्ट विनोबा भावे सांगत होते, जी गोष्ट महात्मा गांधी सांगत होते. ज्या गोरक्षकांसाठी विनोबाजींनी आमरण उपोषण केले होते. ज्या गोरक्षकांसाठी भारताच्या घटनेमध्ये निर्देश दिले आहेत. त्या गोरक्षणासाठी या गोष्टी गांधीजींनी मानल्या आहेत, त्या चुकीच्या होऊ शकत नाहीत. परंतु हे जे नकली गोरक्षक आहेत, त्यांना गाईशी काही देणं घेणं नाही. ते समाजामध्ये तणाव निर्माण करू इच्छितात. आणि म्हणूनच आमच्या सरकारांना सांगू इच्छितो की, तुम्हीही अशा नकली गोरक्षकांची चैकशी करावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आणि त्याचबरोबर मी खऱ्या गोभक्तांना प्रार्थना करतो, आणि सांगतो, आपणही सजग असावे. आपण करीत असलेले चांगले काम काही मुठभर स्वार्थी लोकांमुळे वाया जाऊ नये. अशा लोकांना शोधून काढण्यासाठी आपणही पुढे यावे. या लोकांची मानसिकता समाजापुढे एकदा का उघड झाली की, हे लोक पुन्हा असे काम करणार नाहीत.
भारत विविधतेने भरलेला देश आहे. विविध मान्यतांनी भरलेला देश आहे. अनेक संप्रदायांच्या मान्यतांनुसार हा देश चालतो. देशाची एकता, अखंडता राखणं आमची प्राथमिक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच त्याला परिपूर्ण करण्यासाठी आपण सर्व देशवासियांनी सकारात्मक रूपाने गोसेवा करावी, गोभक्ती करावी, गोपूजा करावी, गोसमर्थन करावे. हे कार्य म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीमध्ये वृद्धी करण्यासारखे आहे. असे कार्य राज्या राज्यांसाठी संकट निर्माण करणार नाही. परंतु नकली लोक देशाला आणि समाजाला बुडविण्याचे काम करताहेत. अशावेळी जागरूक होण्याची गरज आहे. अशा लोकांना वेगळे करण्याची- एकटं पाडण्याची गरज आहे. अशा लोकांना उघडे पाडण्याची आवश्यकता आहे. अशा लोकांना शासन करण्याची गरज आहे. तरच आपण सर्वजण मोठ्या सन्मानानं देशाला नवीन उंचीवर नेऊ शकणार आहे.
बंधू भगिनींनो, प्रत्येक समस्येचे उत्तर एकाच गोष्टीमध्ये आहे. आपल्या सगळया आवश्यक गरजा, अपेक्षांची पूर्ती फक्त आणि फक्त विकासाच्या मार्गानेच होणार आहे. आज मला आनंद होतोय की, राज्या- राज्यांमध्ये विकासाची स्पर्धा होत आहे. प्रत्येक राज्याला वाटते की, आपण त्या दुसऱ्या राज्याच्या पुढे गेलं पाहिजे. अशी सुदृढ स्पर्धा देशाला नवीन उंचीवर घेवून जाईल. आणि यासाठी मी सगळया राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, या राज्या-राज्यांमध्ये विकासाची स्पर्धा करूया. राज्ये आणि केंद्रामध्ये विकासाची स्पर्धा व्हावी. प्रत्येक गाव, गल्ली, विभाग यांच्यातही विकासाची स्पर्धा व्हावी.
त्याने इतकं चांगलं काम केलं आहे, मी आता इतकं करून दाखवतो. त्याने इतक्या खर्चात केलं. त्यापेक्षाही कमीमध्ये मी करून दाखवतो. त्याने इतकं छान बनवलं, मी त्याच्याहीपेक्षा खूप चांगलं बनवून दाखवतो. असे वातावरण बनवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. अशामुळे देश पाहता पाहता नवीन उंची गाठू शकणार आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. जितके विषय त्यांनी ठेवले आहेत, मी तेलंगणवासियांना ग्वाही देतो, दिल्ली सरकार विकासाच्या प्रत्येक कामामध्ये खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर वाटचाल करेल. तुमचे हैदराबाद जितके तुमचे आहे, तितकीच दिल्लीही तुमचीच आहे. असा विश्वास मनात बाळगून तुम्ही पुढे चला. खूप खूप धन्यवाद !!
B.Gokhale/S.Bedkar/AK
Kundankulum 1 is an important addition to India's continuing efforts to scale up production of clean energy in India: PM Modi
— PMO India (@PMOIndia) August 10, 2016
Kudankulam 1 also signals our joint commitment to build pathways of partnership for green growth: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 10, 2016
I have always deeply valued our friendship with Russia & it is fitting that we jointly dedicate Kudankulam Nuclear Power Plant Unit 1: PM
— PMO India (@PMOIndia) August 10, 2016