Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबईमध्ये झालेल्या, “मारु भारत सारू भारत”, या जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज लिखीत पुस्तकाच्या प्रकाशनार्थ आयोजित “साहित्य सत्कार समारोह” प्रसंगी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण

मुंबईमध्ये झालेल्या, “मारु भारत सारू भारत”, या जैन आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज लिखीत पुस्तकाच्या प्रकाशनार्थ आयोजित
“साहित्य सत्कार समारोह” प्रसंगी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण


याठिकाणी उपस्थित असलेले सर्व आचार्य भगवंत, सर्व साध्वी महाराज साहेब, सर्व श्रोतेगण,

काही वेळापूर्वी मी प्रयत्न केला होती की, माझे बोलणे तुमच्यापर्यंत पोहचेल. पण तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा आहेत. मध्येच अडथळा आला आणि जसे दूरदर्शनचे लोक म्हणत, मी पण म्हणतो, अडथळ्यासाठी क्षमा (रुकावट के लिए खेद है). मी जेंव्हा पुस्तकाचे लोकार्पण करत होतो, तेंव्हापर्यंत तर तुम्ही मला पाहू शकत होता. सर्वात प्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागतो, कारण मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही. मला तुम्हा सर्व आचार्य भगवंतांच्या पायाशी बसायला मिळाले असते तर ती माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब झाली असती. पण कधी-कधी वेळेची अशी मर्यादा येते. काही जबाबदाऱ्या अशा असतात की काही कामे अतिशय महत्वाची असूनसुद्धा पूर्ण करता येत नाहीत. मी भौगोलिकदृष्ट्या जरी आपणा सर्वांपासून दूर असलो तरी हृदयाने मी पूर्णपणे तुमच्यासमवेत आहे आणि आचार्य भगवंतांच्या पायाशी बसलो आहे.

आज मला हा 300 व्या ग्रंथाचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. काही ठिकाणी म्हटले आहे की, ही साहित्य रचना आहे. माझे याबाबतीत थोडे वेगळे मत आहे, ही साहित्य रचना नाही. एका संताचा तपश्चर्या, आत्मानुभूती, दिव्यत्वाचा हा साक्षात्कार आहे आणि त्यावर गंगेसारखे पवित्र मनोभाव आहेत, त्याला शब्दाचा आकार मिळाला आहे. म्हणून एकप्रकारे ही ती साहित्यकृती नाही जी साहित्यिकांच्या तपश्चर्येचा परिणाम आहे. हा एक वाणीचा प्रकार आहे, ज्यात समाजातील वेदना, संधी आणि समाज जीवनासाठी काही देण्याची दुर्दम्य इच्छा या सर्वांचा समावेश आहे.

50 वर्षाच्या एखाद्या मुनीसारखे सतत भ्रमण आणि सामान्यतः पूज्य महाराज साहेबांना ऐकण्यासाठी हजारो लोकांची गर्दी जमा होते. त्यांचा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी आमच्यासारखे सर्वजण उत्सुक असतात. पण, त्यांचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, ते उत्तम श्रोता आहेत. श्रोत्यांसोबत चर्चा करणे, यात्रेदरम्यान लहान-सहान लोकांकडून विविध बाबी ऐकून घेणे, एकप्रकारे, पूर्ण देशाच्या जीवनाला त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. त्याचा परिणाम म्हणून चांगल्या दिव्यतेचा अंश आम्हा सर्वांना प्राप्त झाला आहे.

सामान्यतः संत महंतासाठी, आचार्य भगवंतानी धार्मिक परंपरांविषयी बोलणे, ईश्वरी साक्षात्काराच्या गोष्टी करणे श्रोत्यांना भावते, पण पूज्य महाराज साहेबांनी यापासून दूर जात आपल्या श्रोत्यांना आवडतील, आपल्या भक्तांना आवडतील अशा गोष्टींपासून दूर जात त्यांनी समाजातील उणीवा, व्यक्तीच्या आयुष्यातील दोष, पारिवारीक आयुष्यातील जे सत्य आहे, त्यावर त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. कधी कधी त्यांच्या वाणीमध्ये चंदनाची शितलता अनुभवायला मिळते. तर, कधी कधी तीक्ष्ण धारेचा अनुभव मिळतो. त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य, कधी आपली द्विधा अवस्था असेल, निराशा परसली असेल तर शीतल छाया देते. पण, समाजात कधी कधी अशा घटना घडतात, एका संताचे मन विचलीत होते. आक्रोश होतो, आतमध्ये संताप धगधगतो आणि तो शब्दाच्या माध्यमातून व्यक्त होतो आणि समाजाला जागृत करण्यासाठी ते स्वतःला झोकून देतात. हा अनुभव मी घेतला आहे. म्हणून त्यांनी जेवढी धार्मिक परंपरांची सेवा केली आहे, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात त्यांनी समाजसुधारणेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात त्यांनी समाजाला या बाबीसाठी प्रेरित केले की, प्रत्येक धर्मापेक्षा मोठा जर कोणता धर्म असेल तर तो राष्ट्रधर्म आहे. त्यांनी नेहमी राष्ट्र धर्म चेतवण्यासाठीच कार्य केले. यानंतरही त्यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेत कधीच कमी जाणवली नाही. आम्ही अभिमानाने सांगू शकू की, देशाची अशी महान परंपरा आहे, असे संत-मुनि आहेत, ऋषी-मुनि आहेत ज्यांनी आपल्या तपश्चर्या, आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाचे भविष्य बदलण्यासाठी, राष्ट्रनिर्मितीसाठी स्वतःचा देह झिजवला आहे.

आम्ही ती लोकं आहोत, ज्यांना जगाने ज्या रुपात ओळखायला पाहिजे त्या रुपात आतापर्यंत ओळखले नाही. भारत हा एक असा देश आहे ज्याने जगाला कोणत्या धर्मात बांधण्याचा प्रयत्न केला नाही. भारताने जगाला ना धर्म दिला आहे, ना धार्मिकता दिली आहे. आमच्या ऋषी-मुनिंनी, परंपरांनी जगाला धार्मिकता नाही तर अध्यात्मिकता दिली आहे. कधी-कधी धर्म समस्यांचे कारण ठरतो, तर अध्यात्म समस्यांचे निराकरण करते. आमचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत की, समस्यांचे निराकरण करण्यासाठी मानवजातीचे अध्यात्मिकरण झाले पाहिजे. राष्ट्र धर्माचा जो आलेख पूज्य महाराज साहेबांनी अविरतपणे जागवला आहे, तो आलेख या गोष्टीशी निगडीत आहे.

300 ग्रंथ हे छोटे काम नाही. अनेक विषय ज्यात व्यक्तीपासून परिवार, परिवार ते समाज, समाज ते राज्य, राज्य ते राष्ट्र, राष्ट्र ते पूर्ण जग, पूर्ण ब्रह्मांड, असा कोणता विषय नाही ज्यावर महाराज साहेबांनी आपले विचार व्यक्त केले नाहीत. त्यांनी लिखाणास सुरुवात केली तेंव्हापासून आजपर्यंत पाहिले तर, प्रत्येक महिन्याला त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. तेंव्हा कुठे आज 300 वे पुस्तक प्रकाशित होत आहे. समाजासाठी ही मोठी भेट आहे.

समाजात सामान्यतः साहित्यकृती असतात त्या, समाजाला जाणून घेण्यासाठी, समस्या जाणून घेण्यासाठी. पण महाराज साहेबांनी आम्हाला जे दिले आहे, त्यात जीवन जगण्याची पद्धतीही सांगितली आहे. कुटुंबात संकट असेल तर महाराज साहेबांचे पुस्तक हाती लागले तर कुटुंबाला संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग कुटुंबातील सदस्य काढतात. मुलगा जर चुकीच्या मार्गाने जात असेल, आई-वडिलांसाठी वेगळा विचार करत असेल आणि त्याला जर महाराजसाहेबांचे एक वाक्य जरी वाचायला मिळाले तरी तो आपला मार्ग बदलून पुन्हा एकदा आई-वडिलांना समर्पित होईल. खूप मोठी कमाई केली असेल, पण महाराज साहेबांचा एक जरी विचार ऐकला तरी त्याला वाटते की, मी माझ्या कमाईचा वापर समाजसेवेसाठी करेन. काही ना काही समाजकार्य करेल. एखाद्या दुःखी व्यक्तीची मदत करण्याचा प्रयत्न करेल. हा एक प्रकारे सामाजिक क्रांती करण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आगामी काळात आम्हा सर्वांसाठी प्रेरणा देत राहिल.

मी आज आचार्य भगवंत, रत्नसुंदरसुरीस्वरजी महाराज साहेबांच्या चरणी नमन करतो. ज्या गुरुजनांसमवेत बसून एका खऱ्या शिष्याच्या रुपात त्यांनी आपले आयुष्य दिले, हे गुरु-शिष्य परंपरेचे उत्तम उदाहरण आहे. आता स्वतः गुरुपदावर बसल्यानंतर त्यांनी उत्तम शिष्य परंपरा पुढे नेण्यासाठी आपले कार्य केले आहे. माझे भाग्य आहे की मला त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा, त्यांचे विचार ऐकण्याचा, त्यांनी सुचवलेल्या बाबी ऐकण्यास मिळाल्या. आज माझे भाग्य आहे की, त्यांच्या 300 व्या ग्रंथाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली आणि हासुद्धा भारतभक्तीचा त्यांचा एक प्रयत्न आहे.

भारतमातेसाठी आम्ही कसे काय केले पाहिजे. आमचा देश गरीबीपासून कसा मुक्त होईल, सव्वाशे कोटी भारतीय स्वच्छ भारताचे स्वप्न कसे पूर्ण करतील. 35 वर्षापेक्षा कमी वय असलेली कोटी-कोटी जनता, आमचे युवक भारताचे भाग्य बदलण्यासाठी मोठी शक्ती कशी बनतील. या स्वप्नांना साकार करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून सतत प्रयत्न केले पाहिजेत.

मी आज या शुभ प्रसंगी, या भव्य आयोजनासाठी समितीला शुभेच्छा देतो, पूज्य महाराज साहेबांना वंदन करतो आणि भगवान महावीरांच्या चरणी प्रार्थना करतो की अशा आचार्य भगवंतांना अशी आचार्य शक्ती दे, अशी दिव्यता दे की येणाऱ्या शतकापर्यंत मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांचा मार्ग आमच्या कामी येईल. मी पुन्हा तुम्हा सर्वांना वंदन करतो, पूज्य महाराज साहेबांना वंदन करतो. खूप-खूप धन्यवाद.

***

समरजीत ठाकूर