पीएम्इंडिया
भारतात आता दूरचित्रवाणीवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांना फार मोठे आश्चर्य वाटत असेल. या सभागृहातील निम्मे लोक भारतातून आले आहेत आणि उर्वरित निम्म्या लोकांनी भारत पाहिलेला नसला तरी त्यांचे भारतावर अतिशय प्रेम आहे. इतक्या जास्त रशियन नागरिकांनी भारताप्रती आपले प्रेम व्यक्त करावे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वात जास्त आश्चर्य मला रशियन कलाकारांचे वाटते. ज्या प्रकारे रशियन नागरिकांनी भारताची कला, भारताची संस्कृती आणि भारताचा सांस्कृतिक वारसा या ठिकाणी सादर केला, त्याबद्दल मी खरोखर त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. कार्यक्रम सादर करताना सर्व कलाकार त्यात पूर्णपणे रंगून गेल्याचे दिसत होते. प्रत्येक शब्दाशी ते समरस झाले होते. त्यांच्या केवळ हात आणि पायांची हालचाल होत नव्हती तर त्यांच्या मनांचेही भारताशी मिलन झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मी सतीक काजानोवा यांचा स्वर ऐकला. त्या वेद मंत्र पठण करीत होत्या, गणेश वंदना करीत होत्या आणि पूर्णपणे भावूक होऊन सादरीकरण करीत होत्या. मला सांगण्यात आले की त्या रशियातील सर्वात मोठ्या पॉप गायिका आहेत. त्या पॉप गायिका आहेत आणि अशा प्रकारे वेद मंत्र पठण करीत आहेत, ते सुद्धा हातात कोणताही कागद न घेता. याचा अर्थ आहे की त्यांनी हे एका तपस्येप्रमाणे स्वीकारले आहे. त्या रशियन नागरिक आहेत, हिंदू मंत्र, हिंदू परंपरेनुसार जगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आणि मला सांगण्यात आले आहे की त्यांचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला आहे. मुस्लीम कुटुंब, रशियन नागरिक, पॉप गायिका आणि वेद मंत्रांचा उच्चार. मी येथे येत असताना काही लोकांशी माझी ओळख झाली, त्यांच्याशीही ओळख झाली आणि त्यांनी रशियामध्ये एक भव्य हिंदू मंदिर उभारण्याची इच्छा व्यक्त केली.
कलेची साधना करणाऱ्या आणि भारताला स्वत:मध्ये सामावून घेणाऱ्या सर्व रशियन कलाकारांचे मी पुन्हा एकदा हृदयपूर्वक अभिनंदन करतो, खूप खूप अभिनंदन करतो. गायिका सतीक काजानोवा, आपण ज्या पद्धतीने गणेश वंदना करत आहात, ते पाहता आपले स्वप्न निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास मला वाटतो. आज जगभरात ईद-ए-मिलाद साजरी केली जात आहे. मी सर्वांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देतो. उद्या नाताळच्या पवित्र सणाला प्रारंभ होत आहे. जगभरातील या सणाशी संबंधित सर्वांना मी शुभेच्छा देतो. भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांचाही उद्या वाढदिवस आहे. अटलजींनी लिहिलेल्या ‘मैं गीत नये गाता हूं’…. या कवितेचे सादरीकरण आज रशियन कलाकारांनी केले आणि ‘मैं गीत नये गाता हूं’…. या कवितेतील आत्मविश्वासही व्यक्त केला. त्यांनी अशा प्रकारे अटलजींचे स्मरण केले आणि त्यांचा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. माझा जन्म गुजरातमध्ये झाला आहे, त्यामुळे मला हे विसरता येणार नाही. गुजराती गरबा इतका चैतन्यमय असू शकतो, हे मी आता रशियामध्ये अनुभवले. या गरब्यामध्ये रशियन कलाकारांनी अक्षरश: प्राण ओतले. हे सादरीकरण गुजरातवाल्यांनी पाहिले तर पुढच्या वेळी नवरात्रीत रशियन लोकांकडूनच गरबा शिकून घ्यावा, असे त्यांना वाटेल.
भारत आणि रशिया यांच्यात गहिरे संबंध आहेत. राजकीय संबंध, परस्परांसोबत व्यापार-रोजगार शतकानुशतके सुरू आहे. मात्र रशियामध्ये भारताची संस्कृती, भारताचा इतिहास, भारताच्या परंपरा जाणून घेण्याचे, समजून घेण्याचे जे अविरत प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील सांस्कृतिक संबंधांना एक अभूतपूर्व शक्ती लाभत आहे. मला सांगण्यात आले की रशिया मध्ये 150 पेक्षा जास्त भारतीय संगीत आणि कला विद्यालये चालवली जातात आणि रशियन नागरिक ती चालवतात. मी आत्ताच भारताबाबत अभ्यास करणाऱ्या काही अध्यापक आणि बुद्धीवंतांची भेट घेतली. इंडॉल़ॉजीचा अभ्यास करणारे आणि इतर सारेच माझ्याशी हिंदी भाषेत बोलत होते. त्यांनी मला सांगितले की आम्ही येथे भारताचा इतिहास शिकवतो, भारतातील वीर पुरूषांच्या गाथा शिकवितो, भारतातील वीर पुरूषांच्या गाथा येथील प्रजेला प्रेरणा देतात. ज्या उत्साहाने ते मला हे सारे सांगत होते की त्यावरून त्यांना भारताबद्दल वाटणारे प्रेम, आपुलकी याची पुरेपूर जाणीव मला झाली. प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा, असे दृश्य मी पाहत होतो.
काही दिवसांपूर्वी संपूर्ण जगाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. आज संपूर्ण जगाला योगाविषयी आपुलकी वाटते. एका रशियन मुलीने योगाबाबत नुकतेच एक पुस्तक लिहिले आहे, ते मला भेट दिले आहे, योगाची राजदूत म्हणूनही तिने गेल्या वर्षी काम केले आहे. योगाच्या प्रसारासाठीही ती खूप प्रयत्न करते आहे. मी त्यांना विचारले की आपण भारतात केव्हा आलात, कोठे शिकलात… त्यावर त्यांनी सांगितले की त्या अजून भारतात गेलेल्या नाहीत. त्यांनी इंटरनेटवर शिकायला सुरूवात केली आणि हळू हळू योग आत्मसात केला. आता योग हेच माझे आयुष्य आहे. रशियामध्ये २१ जून रोजी २०० पेक्षा जास्त ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात आला. मला सांगण्यात आले की या २०० पेक्षा जास्त सार्वजनिक ठिकाणांशिवाय इतर ठिकाणीही सुमारे ४५ ते ५० हजार लोकांनी योग कार्यक्रमात सहभाग घेतला. मी यापूर्वी सुद्धा रशियामध्ये आलो आहे. मला अश्टरकन भागात जाण्याची संधी मिळाली होती. हा रशियामधला एक भाग आहे आणि गुजरातचे सिस्टर स्टेट म्हणून त्याबरोबर एक करार झाला होता. अटलजींच्या सरकारच्या काळात मी येथे आलो होतो. त्यानंतरसुद्धा मी अश्टरकन भागात गेलो होतो आणि मी पाहिले की आजही तेथे इंडिया हाऊस आहे आणि ते ४०० वर्षांपूर्वीचे आहे. १६४०-५० च्या काळात भारतातून व्यापार करण्यासाठी येणारे लोक आपली जहाजे ठेवून या इंडिया हाऊस मध्ये मुक्काम करायचे. त्यांना कधी दोन कधी चार तर कधी सहा महिने थांबावे लागत असे. त्या काळी रशियाबरोबर अशा प्रकारचे व्यापारी संबंध होते. त्या काळी भारत आणि रशिया यांच्यात हिऱ्यांचा व्यापार होत असे. रशियातले बुद्धीवंत ३००-४०० वर्षांपूर्वी भारतात येत असत. हा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. आपण पाहिले असेल की रशियन भाषेवर संस्कृत शब्दांचा मोठा प्रभाव आहे. एक प्रकारे संस्कृत भाषेची जुळी भाषा म्हणून रशियन भाषा जास्त जवळची वाटते. रशियन भाषेबद्दल जास्त आपुलकी वाटते. असे अनेक शब्द आहेत. आम्ही door म्हणालो तर त्यांच्या मनाला प्रश्न पडतो, मात्र द्वार म्हणालो तर त्यांना लगेच समजते. Tea म्हटले तर आश्चर्य वाटते पण चहा म्हटले तर ते योग्य वाटते. मला आठवते आहे की मी एकदा अश्टरकनच्या गव्हर्नरना भेटलो, तेव्हा कलिंगडाबाबत चर्चा सुरू होती. मी watermelon म्हणालो, तर त्यांना समजले नाही, मात्र कलिंगड म्हटले तर ते त्यांना लगेच समजले. म्हणजे बघा की किती सहज आमचे शब्द त्यांच्या भाषेशी साधर्म्य राखतात. आमच्यामध्ये इतकी निकटता आहे. आणि जागतिक स्तरावर पाहिले तर डोळे मिटूनही कोणीही सांगू शकेल की काळ संकटाचा असो वा स्थैर्याचा, एक देश कोणताही विचार न करता भारतासोबत उभा राहिला आहे, तो म्हणजे रशिया.
युद्धाच्या वेळी जेव्हा आम्ही संकटात होतो, तेव्हा याच देशाने आम्हाला मदत केली होती, आमचे शूरवीर सैनिक युद्धात विजय मिळवून परतले होते. रशिया भारतासोबत कायम एका शक्तीप्रमाणे उभा राहिला आहे. ही शक्ती मैत्रीची आहे. ही शक्ती मित्रत्वाची आहे. या नात्यात देवाण-घेवाणीचा व्यापार कमी आहे, पण एकमेकांसाठी कशाप्रकारे उभे राहावे, हे रशियाने दाखवून दिले आहे. जेव्हा जगात महासत्तांचे वर्चस्व होते, महासत्तांच्या इच्छेनुसार जगात बदल होऊ शकत होते, तेव्हा भारत एक गरीब देश होता आणि तरीही रशियाने आपले नाते कायम ठेवले, जे आजही दृढ आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला जेव्हा गरज भासली, त्या प्रत्येक वेळी रशिया कायम भारतासोबत खंबीरपणे उभा राहिला आहे. जगात भारताचे स्थान दृढ करण्यासाठी रशियाचे साहाय्य मोलाचे ठरले आहे. आज मोठ्या प्रमाणावर भारताचे विद्यार्थी रशियामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत आहेत, त्यांना येथे आपुलकी वाटू लागली आहे. मात्र भारतात रशियन नागरिक ज्याप्रकारे पर्यटक म्हणून वावरतात, ती सहजता अजून आलेली नाही. रशियन हे सर्वोत्तम पर्यटक आहेत. पर्यटनासाठी वर्षातून १० दिवस जावे की १५ दिवस जावे, याचा कार्यक्रम ते आधीपासूनच ठरवितात. मी सर्व भारतीयांना आग्रह करेन की आपण येथे आला आहात तर एक काम नक्की करा. प्रत्येक वेळी किमान पाच रशियन कुटुंबे भारतात पर्यटक म्हणून जावी, यासाठी आपण प्रयत्न करावे. आपण पहाल की अशा प्रकारे लाखो रशियन नागरिक भारतात पर्यटक म्हणून जातील. भारताबद्दल त्यांना आकर्षण आहे. एकदा त्यांचे बोट धरून त्यांना भारतात आणणे हे आपले काम आहे. एकदा हा क्रम सुरू झाला की पुढची १० वर्षे, २० वर्षे तो चालत राहील. पर्यटक आपल्या देशात येतात, ते केवळ येथील ठिकाणे पाहून परत जात नाहीत तर येथे आठवणींचे बीज रूजते आणि त्यातून परस्पर संबंधांचे वृक्ष फोफावतात. त्याद्वारे आपल्याला शांती आणि मैत्रीची छाया मिळते. त्यामुळे रशियातून अधिकाधिक पर्यटक भारतात यावेत, यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. ज्या देशाच्या नागरिकांना भारताबद्दल इतकी आत्मियता वाटत असेल, त्यांना भारत दाखविणे, भारताकडे आकर्षित करणे, भारत पाहण्यासाठी प्रेरित करणे, हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. मी खास करून रशियामध्ये राहणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना विशेष आग्रह करेन, की आपण हे काम करू या.
आज संपूर्ण जगात भारताच्या आर्थिक विकासाची चर्चा होत आहे. जागतिक बँक असो, आयएमएफ असो किंवा जागतिक क्रमवारी निश्चित करणाऱ्या संस्था असोत, जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत, याबाबत त्यांच्यात एकमत आहे. २१ वे शतक हे आशियाचे शतक असेल, अशी चर्चा २० व्या शतकाच्या अखेरीस होत असे. २१ वे शतक हे आशियाचे शतक असेल, हे जगानेही मान्य केले होते. मात्र २१ व्या शतकाचे नेतृत्व कोण करणार, हे ठरवता येत नव्हते. आज २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात जग ज्या प्रकारे भारताकडे पाहत आहे, त्यावरून २१ व्या शतकात भारत मोलाची भूमिका पार पाडणार, हे स्पष्ट झाले आहे. आर्थिक स्तरावर भारताने आपले एक निश्चित स्थान निर्माण केले आहे. भारत वेगाने पुढे झेपावत आहे. आजपासून काही वर्षांपूर्वीपर्यंत जगासाठी भारत केवळ एक बाजारपेठ होता. आपण भारतात जाऊ, वस्तू विकू आणि कमाई करू कारण भारतात खूप ग्राहक आहेत, असे जगाला वाटत होते. मात्र आज २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात ही स्थिती बदलत आहे. कालपर्यंत ज्यांना भारत एक बाजारपेठ वाटत होता, आज त्यांना तो उत्पादन निर्मितीचे केंद्र वाटू लागला आहे. जगाच्या गरजा भागविता येतील, अशी ताकद म्हणून भारत आपले स्थान निर्माण करू शकेल, असा विश्वास लोकांना वाटू लागला आहे. जेव्हा आम्ही उत्पादन निर्मितीचे केंद्र असे म्हणतो, तेव्हा ते अधांतरी विधान नसते. भारताकडे ते सामर्थ्य आहे आणि युगांपूर्वीही होते. भारताला सोने की चिडिया म्हटले गेले, ती अतिशयोक्ती नव्हती. आपल्याकडे निश्चितच बरेच काही होते मात्र गुलामगिरीच्या काळात आपण ते सारे गमावले. आता आपला देश पुन्हा एकदा संपूर्ण ताकतीनिशी उभा राहावा, ही आपली जबाबदारी आहे आणि असे होण्याची पुरेपूर शक्यता आहे.
भारत हा शक्यतांचा देश आहे. या देशाकडे ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे ८०० दशलक्ष तरूण आहेत. ज्या देशाची सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, जो देश इतका तरूण असेल, त्याचे विचारही तरूण असतात आणि हवे ते साध्य करण्याचे सामर्थ्यही त्यांच्याकडे असते. भारताच्या स्वप्नांना आता जाग आली आहे. भारताच्या युवा शक्तीला जाग आली आहे. भारताने पुढे जाण्याचा संकल्प केला आहे. सव्वाशे कोटी भारतीयांची ताकद एकवटली आहे. त्यांनी एक पाऊल पुढे टाकायचे मनात आणले तर भारत सव्वाशे कोटी पावले पुढे उचलतो. याच कारणामुळे भारत आज विकासाच्या वाटेवर चालू लागला आहे. भारतामध्ये समस्या नाहीत, असे नाही. जगातल्या सर्वात समृद्ध देशातही समस्या असतात. मात्र काही जण आपल्या समस्या मोजत रडत राहतात तर काही लोक समस्या सोडविण्यासाठीचे मार्ग शोधतात आणि पुढे चालू लागतात. आज भारत समस्या सोडविण्याचे मार्ग शोधत आहे, पुढे जाण्याच्या निर्धाराने मार्गक्रमण करीत आहे आणि त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे.
मागच्या एका वर्षात जगभरातील देशांकडून, उद्योग जगताकडून थेट परकीय गुंतवणुकीत ४० टक्के वाढ झाली आहे. एका वर्षात ४० टक्के वाढ ही लहान गोष्ट नाही. जगाला भारताबद्दल विश्वास वाटत नसता तर इतकी गुंतवणूक कोणी केली असती का… इथे राहणारे आमचे भारतीय सुद्धा विश्वास नसताना पाच रूपयेसुद्धा गमावतील का… गुंतवणुक केल्यावर परताव्याची हमी असली, खात्री असली, पैसे सुरक्षित राहतील असे वाटले तरच लोक पैसे गुंतविण्याचा विचार करतात. आज लोक भारतात पैसे गुंतवित आहेत कारण याच ठिकाणी गुंतवणुक करून आपण पुढे जाऊ शकू, असा विश्वास त्यांना वाटतो आहे. जगभरातील निधी गुंतवणुकीतून आम्ही भारतात आधुनिक पायाभूत सुविधा उभारू इच्छितो. आम्ही रेल्वेमध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणुक खुली केली आहे.
भारताची रेल्वे आधुनिक झाली पाहिजे, तिची गती वाढली पाहिजे, रेल्वेचे रंगरूप बदलले पाहिजे, दूरवर रेल्वे पोहोचली पाहिजे. आमची रेल्वे जुनी झाली आहे, इतका काळ धावते आहे, हे गाणे पुरेसे नाही. संकल्प करून पुढे पाऊल टाकले तर देश प्रगती करतो. आणि म्हणूनच जगभरातील लोक रेल्वेमध्ये गुंतवणुक करण्यासाठी येत आहेत. भारत आणि जपान यांच्यात बुलेट ट्रेन संदर्भात नुकताच करार झाला. जपान खूपच कमी अर्थात केवळ ०.१ टक्के व्याजदरावर सुमारे एक लाख कोटी रूपयांची गुंतवणुक करीत आहे. एक लाख कोटी रूपयांची गुंतवणुक होईल, तेव्हा भारतातल्या नागरिकांनाच त्यातून रोजगार मिळेल. असाच देशही बदलू शकेल.
रशिया आमच्याकडे अणू उर्जेवर काम करीत आहे आणि आगामी काळात अणुउर्जेबाबत आज आम्ही त्यांच्याशी करार केला आहे. आज जग ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येशी लढा देत आहे. भारत आणि रशिया अणुउर्जेद्वारे ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी काळात मानव जातीच्या कल्याणासाठी हे उपयुक्त आहे. आम्ही आधुनिकतेच्या दिशेने विकास घडवू इच्छितो. एका नव्या उंचीवर विकास नेऊ इच्छितो. या विकासाचा लाभ भारतातल्या सर्वात गरीब व्यक्तीपर्यंत पोहोचावा, याची काळजी आम्ही घेऊ इच्छितो. यासाठी एकीकडे आर्थिक विकास व्हावा आणि दुसरीकडे सामाजिक शक्ती वाढावी, जेणेकरून सर्वात गरीब कुटुंबही आर्थिक दृष्ट्या समर्थ होईल. असे होईल, तेव्हाच देशाची मुळे मजबूत होतील. यासाठी भारत दोन्ही दिशांनी विकसित होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. आज जगात कोणताही निर्णय झाला तर त्या निर्णयात भारताची काही निश्चित भूमिका असते. आतापर्यंत आमची काय भूमिका असायची? आम्ही केवळ मूकदर्शक होतो, जग इकडे जात आहे, तिकडे जात आहे. येथे गेले, तरी ठीक, तेथे गेले तरी ठीक, आम्ही केवळ बघ्याच्या भूमिकेत होतो. आज असे होत नाही. आज भारताचा काय विचार आहे, भारत साथ देणार आहे काय, हा विचार जग करू लागले आहे.
भारताने जगात आपले एक स्थान निर्माण केले आहे. या स्थानामुळे दहशतवादाविरूद्ध संपूर्ण जगाचा दृष्टीकोन बदलत आहे. दहशतवाद मानवतेचा शत्रू आहे, मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि एकदिलाने दहशतवादाविरोधात लढले पाहिजे, असे भारत गेल्या ३० वर्षांपासून वारंवार सांगत आहे. मात्र तेव्हा जगाने आमच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ती केवळ आमच्या देशाची समस्या आहे, असे त्यांना वाटत होते. दहशतवादाला सीमा नाही, काळाचे बंधन नाही, निश्चित ध्येय नाही, हे आम्ही जगाला वारंवार सांगत राहिलो. दहशतवाद कोठेही धडकू शकतो, तो निर्दोषांना मारतो. ३० वर्षे जगाला आमच्या सांगण्याकडे लक्ष देता आले नाही. आज दहशतवाद्यांनी आपल्या क्रौर्याने संपूर्ण जगाला हादरविले आहे आणि आज जगाला भारताचे म्हणणे पटते आहे. दहशतवाद मानवतेचा शत्रू आहे, हे जगाने अखेर मान्य केले आहे आणि मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्यांनी एकत्र येणे अपरिहार्य झाले आहे.
आपले सांगणे जगाच्या गळी उतरविण्यात भारत आज यशस्वी झाला आहे. प्रत्येक जण आज दहशतवादातून बाहेर पडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाचा बिमोड करण्याचा संकल्प केल्यास, दहशतवाद संपविण्यासाठी सहकार्य केल्यास, खांद्याला खांदा भिडवून मानवतावादी शक्ती उभ्या ठाकल्यास दहशतवादाला संपविणे फार कठीण नाही. या मार्गावरही भारत आणि रशिया एकत्रित काम करीत आहे.
रशिया आणि आमची मैत्री समान विचारासह पुढे चालली आहे आणि त्याचा लाभ जगाला मिळणार आहे. बंधू आणि भगिनींनो, भारत आणि रशियाचे परस्पर संबंध आता मध्यवर्ती आशियाची नवी शक्ती म्हणून उदयाला येत आहेत. मध्यवर्ती आशियाची ही शक्ती अनेक क्षेत्रांमध्ये, अनेक भू भागांमध्ये आर्थिक समृद्धीचे नवे कारण होऊ शकते.
कोणे एके काळी युरोपीय युनियनची चर्चा होत असे, कोणे एके काळी आसीयान देशांची चर्चा होत असे. आता जगात लवकरच युरेशियाची चर्चा होऊ लागणार आहे.
एक असे शक्तीशाली एकक उभे राहील, जे आगामी काळात खूप मोठ्या भू भागाच्या संतुलनास कारणीभूत ठरेल, आर्थिक विकासाचा मुलभूत घटक होईल आणि सुख व शांततेच्या शोधात एकत्रित प्रयासांसाठी एक नवे मजबूत व्यासपीठ तयार करेल. हे सारे माझ्या दृष्टीपथात आहे.
आज राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत युरेशियाच्या भविष्यातील संबंधांबाबत माझी सविस्तर चर्चा झाली आहे. असंख्य शक्यता आम्ही विचारात घेतल्या आहेत आणि आगामी काळात भेटून युरेशिया कशाप्रकारे शक्तीस्थान होईल, प्रगतीच्या संधी उपलब्ध करण्यास कशाप्रकारे कारणीभूत होईल, परिस्थिती बदलण्यासाठी एकत्रित प्रयत्न कसे करता येतील, याबाबत विचार करणार आहोत. त्यासाठी आम्ही सविस्तर चर्चा केल्या आणि योजनाही विचारात घेतल्या आहेत. त्यांचा परिणाम आगामी काळात दिसून येईल.
माझा हा दौरा अगदीच आटोपशीर होता, काल रात्री मी आलो आणि आता निघून जाईन. पण मला वाटते की हा दौरा कमी कालावधीचा असूनही खूपच सफल, फलदायी आणि परिणामकारक झाला.
इतक्या उत्साहाने आमचे स्वागत केल्याबद्दल मी रशियाचे आणि रशियन सरकारचे आभार मानतो. ज्या प्रेमाने आपण आणि रशियन कलाकारांनी भारत भक्तीचे दर्शन घडविले, त्यासाठीही मी आपला खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद.
M.Pange/M.Desai
Shri @narendramodi is attending the 'Friends of India' event in Moscow. Join. https://t.co/goVCIiwd4T
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
Few things connect like culture. Amazing atmosphere at the programme. pic.twitter.com/Z6TNpO3c3Q
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
Atal ji's poem 'Geet Naya Gata Hoon' in the voice of @mangeshkarlata. https://t.co/goVCIiwd4T
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
So many people here have not been to India yet they have a lot of affection towards India: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
We are very proud that several people in Russia have so much warmth towards India: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
I congratulate the Russian artistes who performed here this evening: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
Heard the chanting of Vedic Mantras here and I am told the singer who recited the Mantras is a very famous pop singer in Russia: PM
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
I greet everyone on Eid-e-Milad. I wish you all on Christmas. Tomorrow we also mark the birthday of Bharat Ratna Atal Bihari Vajpayee: PM
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
India-Russia ties are very deep. Political relations, trade relations is one thing. Our ties go beyond that: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
I met Indologists and they spoke to me in Hindi. They shared that they teach India's history: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
Several places across Russia marked 'International Day of Yoga' on 21st June: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
Russia has always stood with India. This is friendship, it is not merely about give and take: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
Those who saw India only as a market are now seeing India as a manufacturing hub: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
Yes we also face problems but we are not those who will only cry about the problems. We are finding solutions to the problems we face: PM
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
Mesmerising programme in Moscow. Popularity of Indian culture is tremendous & affection towards India is immense. https://t.co/QuqTQIX0h9
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2015