Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मोझांबिकच्या अध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन( 07 जुलै, 2016)

मोझांबिकच्या अध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन( 07 जुलै, 2016)


महामहीम अध्यक्ष फिलिपे न्युसी,

प्रसारमाध्यमांचे सदस्य

तुम्हा सर्वांचे मी या स्वागताबद्दल आभार मानतो. भारताविषयी आणि आपल्या द्विपक्षीय संबंधांविषयी तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांबाबत मी मनापासून सहमती व्यक्त करतो. अध्यक्ष न्युसी तुम्ही गेल्या वर्षी आशियामध्ये सर्वप्रथम भारताला भेट दिली होती. आज मला देखील अतिशय आनंद होत आहे, कारण आफ्रिकेच्या मुख्य भूमीमध्ये सर्वप्रथम भेट देण्यासाठी मी मोझांबिकमध्ये आलो आहे.

मित्रांनो,

वसाहतवादी दडपशाहीमुळे आपण भोगलेल्या सामाईक हालअपेष्टा आणि त्याविरोधात केलेला संघर्ष यामुळे आपण दोन्ही देश एकत्र आलो आहोत. मोझांबिकच्या स्वातंत्र्याचा खंबीरपणे पुरस्कार करणा-या देशांपैकी भारत एक देश होता. पण केवळ एवढ्या गतइतिहासापुरतेच हे मर्यादित नाही. अध्यक्ष आणि मी आगामी वर्षांमध्ये भक्कम भागीदारीसंदर्भात आमच्या दृष्टीकोनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. प्रत्यक्षात आफ्रिकी देशातील भारतीय गुंतवणुकीच्या प्रवेशद्वारांपैकी मोझांबिक हे पहिल्यापासूनच एक प्रवेशद्वार आहे. आफ्रिकेतील एकूण भारतीय गुंतवणुकीपैकी एक चतुर्थांश गुंतवणूक मोझांबिकमध्ये आहे. आपल्यातील वाणिज्य आणि व्यापारविषयक संबंधांमध्ये गेल्या दशकात सातत्याने वाढ होत राहिली आहे. अध्यक्ष न्युसी यांच्या नेतृत्वाखाली या गुंतवणुकीला पोषक वातावरण उपलब्ध होत राहील, असा विश्वास आम्हाला वाटत आहे. क्षमता आणि रुची यांच्या संमिलनामुळेही आमच्या भागीदारीला बळ प्राप्त होत आहे.

. मग ते कृषी किंवा आरोग्य निगा किंवा ऊर्जा सुरक्षा

. नैसर्गिक संसाधन किंवा तंत्रज्ञान

. कौशल्य विकास किंवा संस्था उभारणी;

. सुरक्षितता किंवा संरक्षण यामधील असो

मोझांबिकच्या विविध प्रकारच्या क्षमता या देखील भारताच्या गरजांची पूर्तता करणारी क्षेत्रे आहेत आणि मोझांबिकला ज्याची गरज आहे ते भारतात उपलब्ध आहे. आम्ही दोन्ही देश एकमेकांना पूरक आहोत. कृषी क्षेत्राचा विकास ही अध्यक्ष न्युसी यांच्या दृष्टीने सर्वाधिक प्राधान्यक्रमाची बाब आहे. आम्ही कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी व उत्पादकता वाढवण्यासाठी एकत्र कार्य करू शकतो याबाबत आमच्या तज्ञांनी चर्चा केली आहे. आज आम्ही हे सहकार्य जलदगतीने वाढविण्याबाबत सहमती व्यक्त केली. अन्न सुरक्षा क्षेत्रातील आमची भागीदारी देखील बळकट करण्यावर आम्ही भर देत आहोत. मोझांबिकमधून डाळी खरेदी करण्याची भारताची वचनबध्दता भारताची गरज भागविण्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे. त्यामुळे या देशात व्यावसायिक शेतीमधील दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे, कृषी क्षेत्रातील रोजगारात वाढ होणार आहे आणि शेतकऱ्‍यांचे उत्पन्न वाढणार आहे. आरोग्य निगा हे आणखी एक क्षेत्र असे आहे जिथे भारताची क्षमता आणि मोझांबिकच्या गरजा यांचा योग्य ताळमेळ राहिला पाहिजे. मोझांबिकच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीसाठी भारताकडून एड्स वरील उपचारांसहित अत्यावश्यक औषधे मदत म्हणून मोफत दिली जाणार आहेत.

मित्रांनो,

सुमारे 20000 मोझांबिक नागरिकांना त्यांचे पूर्वज भारतामध्ये होते असल्याचे दिसून येईल. आपल्या अर्थव्यवस्था आणि आपले समाज यांना जोडणारे ते जिवंत सेतू आहेत. युवक आणि क्रीडा सहकार्य आणि देवाणघेवाण यांना चालना देण्यासाठी आपल्यात झालेल्या कराराबाबत मी विशेषत्वाने आनंदी आहे. भारतामध्ये शिक्षण घेतलेल्या मोझांबिकमधील तरुणांशी आजच्या दिवसात नंतर होणा-या चर्चेकडेही मी उत्सुकतेने पाहत आहे.

मित्रांनो,

आपला विकास आणि आर्थिक संबंध यांचा फायदा आपल्या समाजांना व्हावा असे आम्हाला वाटत आहे. आमच्या देशांच्या जनतेची सुरक्षितता व संरक्षण यांची हमी या भागीदारीमुळे मिळावी अशी देखील आमची इच्छा आहे. सध्या जगाला भेडसावणारी सर्वात भयकंर समस्या म्हणजे दहशतवाद असल्याचे मला आणि अध्यक्ष न्युसी यांना वाटत आहे. मोझांबिक व भारत हे देखील याला अपवाद नाहीत. भारत आणि मोझांबिक यांच्यावर दहशतवादाचा मोठा परिणाम होत आहे. दहशतवादाचे जाळे इतर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांशी जोडले गेलेले आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीला प्रतिबंध करण्याबाबत आम्ही केलेला करार म्हणजे आमचा या समस्येला आळा घालण्यासाठी आणि या जाळ्याचे उच्चाटन करण्यासाठी आम्ही केलेल्या निर्धाराचा पुरावा आहे.

भारत आणि मोझांबिक हिंदी महासागराने जोडले गेले आहेत. अनेक आर्थिक संधींचा हा महासागर आहे. पण त्याचवेळी या सागरी क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेली सुरक्षाविषयक आव्हाने आणि संरक्षणविषयक समस्या यांची देखील आम्हाला जाणीव आहे. आमच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी अध्यक्ष आणि मी आमच्या संरक्षण व सुरक्षाविषयक संबंधांना बळकट करण्याबाबत सहमती व्यक्त केली. मोझांबिकच्या संरक्षण दलांना पाठबळ देण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. क्षमतांमध्ये वाढ व संस्थांची उभारणी, कर्मचा-यांना प्रशिक्षण, सामग्रीचा पुरवठा आणि त्यांच्या नव्याने निर्माण होणाऱ्‍या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रतिसाद देऊन हे काम हाती घेतले जाईल.

मित्रांनो,

आमचे सहकार्य केवळ आमच्या सामाईक समृद्धीसाठी नाही. अधिक व्यापक प्रादेशिक व जागतिक हिताचा देखील आम्ही विचार करत आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध मुद्यांवर आम्ही एकमेकांच्या पाठीशी आहोत. संयुक्त राष्ट्रांमधील सुधारणांपासून, तर 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता मिळवण्यापर्यंत. गेल्या वर्षी कॉप-21 (सीओपी-21) या पॅरिसमध्ये झालेल्या शिखर परिषदेमध्ये सौर उर्जेला अपारंपरिक उर्जेचा स्रोत म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी भारताने आग्रही भूमिका घेतली. यासाठी आम्ही हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली. या आघाडीला 120 हून अधिक देशांचा पाठिंबा आहे आणि या पुढाकारामध्ये मोझांबिकच्या भागीदारीचे महत्त्व अनन्यसाधारण असून आम्ही त्याचे आभार मानतो.

मित्रांनो,

आर्थिक समृद्धीच्या दिशेने सुरू असलेल्या मोझांबिकच्या वाटचालीमध्ये भारत प्रत्येक पावलावर सहकार्य करेल. तुमच्या विकासाच्या वाटचालीत भारत एक भरवशाचा मित्र असेल आणि आपल्या जनतेच्या एका उज्वल, सुरक्षित आणि संरक्षित भवितव्याची हमी देणारा एक विश्वासार्ह भागीदार असेल. मी पुन्हा एकदा अध्यक्ष न्युसी, मोझांबिकची जनता व सरकार यांनी केलेले माझे व माझ्या शिष्टमंडळाचे अतिशय जिव्हाळ्याचे स्वागत आणि आदरातिथ्य याबद्दल आभार मानतो.

धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.

S.Patil/B.Gokhale