पीएम्इंडिया

पायाभूत विकास असेल, गुणवत्तापूर्ण आयुष्य असेल, आर्थिक ऊर्जा असेल, स्वयंपूर्ण कुटुंब असेल,या सर्व घटकांना सामावून विकास कसा करता येऊ शकतो, याचा खूपच सुंदर नमुना मला पहायला मिळाला आणि आमचे मनही त्यात इतके गुंतले की, आम्हाला इथे पोहोचायला उशीर झाला.
मी भारताचा पहिला पंतप्रधान आहे ज्याला इथे येण्याची संधी मिळाली आहे. मात्र मला आनंद होत आहे की, माझ्यासह भारतातून खूप मोठे उद्योग प्रतिनिधिमंडळ आले आहे. भारत वेगाने विकास करत आहे याचा तो पुरावा आहे. मात्र आमचा मंत्र तर ‘सबका साथ सबका विकास’ आहे आणि म्हणूनच आम्ही तर विकास करूच मात्र आमच्याबरोबर सहभागी होऊन चालणारे जे कुणी लोक असतील, त्या सर्वाना विकास साधण्यात मदत मिळेल आणि आम्ही एकत्रितपणे वाटचाल करू, ही आमची मूलभूत कल्पना आहे.
भारतीय व्यापारी मंचाचे जे लोक आले आहेत, त्यांना मी खासकरून सांगेन की तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही केवळ रवांडाला आला आहात. आज स्थिती अशी आहे की रवांडाला येणे म्हणजे तुमच्यासाठी पूर्ण आफ्रिकेची दरवाजे खुली होतात कारण चावी इथे आहे. संपूर्ण आफ्रिकेत रवांडाच्या मॉडेलची चर्चा होते , त्यांच्या विकासाची चर्चा होते. त्यांच्या प्रशासनाची चर्चा होते. एक प्रकारे आफ्रिकेत नवीन कल बनला आहे आणि राष्ट्रपती त्याचे नेतृत्व करत आहेत. तुमचे इथे येणे म्हणजे तुम्ही एका देशाच्या सीमेला बांधील नाहीत. असे समजून चाललात तर तुम्हाला आणखी शक्यता दृष्टीस पडतील, आणखी आव्हाने देखील येतील, आणखी संधी देखील येतील, आणि मला वाटते की तुम्ही ही संधी दवडणार नाही.
मी कालपासून पाहतो आहे की राष्ट्रपती उत्साही आहेत. सुशासन, विकास आणि लोकांची प्रगती, लोकांची समृद्धी, समाजात शांतता हे सर्व मुद्दे त्यांच्या केंद्रस्थानी आहेत. आपणा भारतीयांसाठी सर्व गोष्टी अनुकूल आहेत. आपल्या निसर्गाला देखील हे अनुकूल आहे.
आता हा असा देश आहे, जेव्हा जगाचे लक्ष आफ्रिकेकडे नव्हते. इथे कुणालाही यावेसे वाटत नव्हते. त्यावेळी भारताने या भूमीवर यायचा निर्णय घेतला होता. आता गुजरातमधील जोधपूरमधील कुटुंब आहे, मला वाटते ते 19व्या शतकाच्या अखेरीस इथे आले. आणि तेव्हापासून भारतीय लोक इथे आले आहेत. इथल्या लोकांबरोबर मिसळून गेले आहेत. इथल्या विकास यात्रेचे भागीदार बनले आहेत. हे खरे आहे की आता जगाचे लक्ष या देशाकडे लागले आहे. इथे यायची जगाला इच्छा होत आहे. मात्र आम्ही त्यावेळी आलो जेव्हा खरोखरच इथे गरज होती. आणि म्हणूनच आज आम्ही याचा विकास करू इच्छितो जेणेकरून आपण जगाला मदत करू शकू. जगात अजूनही जे मागे आहेत, ज्यांना संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी काहीतरी करावे. या विचाराने आम्ही जगासमोर जात आहोत. जगातील अन्य देशांना बरोबर घेऊन जात आहोत. जगातील या देशांच्या साथीने तेथील जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला काम करायचे आहे.
राष्ट्रपती गुजरातमध्ये आले होते, त्यांनी गुजरातमध्ये अनेक गोष्टी पाहिल्या, समजून घेतल्या. जेव्हाजेव्हा ते भारतात आले, विकासाभिमुख गोष्टींकडे त्यांचा जास्त ओढा होता. ते स्वतः जातीने त्या गोष्टी पाहतात, समजून घेतात आणि लोकांना आमंत्रित करतात.
ज्या देशाचा प्रमुख विकासाप्रति इतका कटिबद्ध असेल, आणि ज्याचा स्वभाव नवनवीन गोष्टी समजून घ्यायचा, ती स्वीकारण्याचा आणि सिद्ध करून दाखवायचा आहे अशा देशात काम करायला कधीही अडथळे येत नाहीत.
अमर्याद संधी आहेत आणि तुम्ही एक खिडकी उघडली तर तुम्हाला दुसरी संधी नजरेस पडेल. आणि तुम्ही जर दुसरी खिडकी उघडली तर तुम्हाला त्याहून आणखी मोठी संधी दिसेल. आणि तुम्ही पुढे जात रहाल, जोमाने चालत रहाल आणि यशस्वी होत रहाल. आणि इथे मला स्पष्टपणे या संधी दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतातही तेवढ्याच संधी आहेत. रवांडामध्ये अनेक उद्योजक आहेत आणि त्यांना जर भारतात उद्योग वाढवायचा असेल तर भारत त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवायला तयार आहे. मी त्यांना निमंत्रण देतो.
मात्र मी भारतातील लोकांना विनंती करेन की रवांडा ज्या आधुनिकतेच्या दिशेने जात आहे, मग ते पायाभूत विकास असेल, ग्रामविकास असेल, आर्थिक घडामोडी असतील, छोट्या उद्योगांचे जाळे त्यांना उभारायचे असेल किंवा त्यांच्या उत्पादनांसाठी त्यांना जागतिक बाजारपेठ विकसित करायची असेल, हे सर्व मुद्दे असे आहेत ज्यात भारतीय उद्योग जगतातील सदस्य एकत्रितपणे खूप गोष्टी करू शकतात.
भारताने देशात मेक इन इंडिया चळवळ सुरु केली आहे. या मेक इन इंडिया चळवळीबद्दल आम्ही रवांडाला सांगू इच्छितो, त्यांच्याबरोबर सहभागी होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून आम्ही हवामान बदलासारख्या समस्या सोडवण्यासाठी पुढे मार्गक्रमण करत आहोत. आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी सौर ऊर्जेचा वापर कसा करता येईल यासाठी एक खूप मोठे अभियान राबवले जात आहे. यासाठी रवांडातील लोक पुढे येतील अशी मी आशा करतो.
आज मी राष्ट्रपतींबरोबर प्रवास करत असताना एलईडी दिव्यांच्या वापराबाबत बोललो. भारतातील मध्यमवर्गीय लोकांना, कुटुंबांना एलईडी दिव्यांचा आर्थिकदृष्ट्या एवढा फायदा झाला आहे की पूर्वी जे विजेचे बिल येत होते ते आता एकतृतीयांश येते. जर आपण रवांडामध्येही हे एलईडी दिव्यांचे अभियान राबवले तर तिथल्या लोकांना ऊर्जेची बचत करण्यात मदत होईल आणि देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना फायदा होईल.
आणि ऊर्जेची गरज कमी झाल्यामुळे वीज निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी जो खर्च येतो तो देखील कमी करता येईल. जी ऊर्जेची बचत होईल तिचा उपयोग औद्योगिक वापरासाठी करता येईल जी आज घरगुती कामासाठी वापरली जाते. म्हणजे एक छोटीशी गोष्ट देखील किती मोठे परिवर्तन घडवू शकते. या दिशेने आपण एकत्रितपणे काम करू शकतो. दूग्ध उत्पादन क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. दूध क्रांतीची शक्यता आहे आणि भारत त्यात वाकबगार आहे.
आपण त्यांच्याबरोबर सहभागी होऊन एकत्रितपणे काम करू शकतो. म्हणजे एक प्रकारे गाव पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत भारताकडे जी क्षमता आहे, भारतीय उद्योगाचे आणि उद्योग समुदायाचे जे सामर्थ्य आहे, त्याचा पुरेपूर वापर आपण रवांडाच्या विकासासाठी करू शकतो. रवांडा हा मित्र देश आहे. या देशाकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलंत तर तुम्हाला आढळेल की भारतात जी संस्कृती आहे तशीच तिथंही आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आपलेपणा दिसून येईल. आणि जिथे हा आपलेपणा आहे, लोकशाही मूल्ये आहेत, पारदर्शक प्रशासन आहे, कार्यक्षमता आहे आणि समर्पित नेतृत्व आहे त्या देशात काम करणे किती सोपे आहे ते आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो.
काल मी विमानतळावर उतरल्यापासून आतापर्यंत राष्ट्रपतींनी पूर्ण वेळ आमच्याबरोबर व्यतीत केला. ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. त्यांचे पूर्ण सरकार माझ्याबरोबर आहे. आपण जगातील वेगवेगळ्या देशांना भेट देत असतो, मात्र एकेका मिनिटाचा उपयोग कसा करायचा हे राष्ट्र्पतींकडून शिकण्यासारखे आहे. मला खूप आनंद झाला आहे. आणि मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
We want to boost economic ties between India and Rwanda. Our nations can do a lot together. There are several opportunities in rural development and small scale industries: PM @narendramodi tells CEOs from India and Rwanda
— PMO India (@PMOIndia) July 24, 2018
Furthering ties of trade and commerce...President @PaulKagame and I addressed leading CEOs from India and Rwanda. pic.twitter.com/DGVcmPixIN
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2018