पीएम्इंडिया
हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात भारताने जगाचे नेतृत्व केले पाहिजे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत आयोजित राज्यांच्या पर्यावरण आणि वन मंत्र्यांच्या परिषदेचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते. निसर्गाचा आदर करण्याच्या आणि त्याच्यावर प्रेम करण्याच्या भारताच्या परंपरेचा जागतिक वर्तुळात योग्य प्रकारे प्रचार झालेला नाही आणि त्यामुळे हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात देशाला काही वेळा अडथळ्यांचा सामना करावा लागतो, अशी खंत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.
भारतीय नेहमीच निसर्गाचे संवर्धन करत आले आहेत आणि आताही जागतिक पातळीवर कमीत कमी कार्बन उत्सर्जित करणाऱ्या देशांमध्ये भारताची गणना होते, असे मोदी यांनी नमूद केले.
विकास आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी शक्य आहे. मात्र या संदर्भात मोठा अपप्रचार केला जात आहे असे ते म्हणाले. भूसंपादन विधेयकाचे उदाहरण देत ते म्हणाले की, विधेयकातील तरतुदींमुळे आदिवासी आणि वन जमिनींना कुठलाही धोका नाही. मात्र या विधेयकासंदर्भात मोठ्या प्रमाणात अपप्रचार आणि गैरसमजुती पसरवल्या जात आहेत. समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न म्हणजे देशाचे नुकसान करण्यासारखे आहे, असेही त्यांनी सांगितले.
अणु इंधन आयातीवरील भारतासाठी असलेली बंधने शिथिल करण्याची विनंती पंतप्रधानांनी यावेळी जगाला केली. भारतदेखील सौर, पवन व जैव ऊर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वच्छ अणु ऊर्जा निर्माण करू शकेल.
देशातील वाघांची संख्या वाढल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी समाधान व्यक्त केले. निसर्गाचा आदर करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे हे उदाहरण आहे असेही ते म्हणाले.
परिषदेपूर्वी पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली. स्टॅडर्ड टर्म्स ऑफ रेफरेंस फॉर एनवायरमेंट इम्पॅक्ट एनालिसिस या पुस्तकाचेही पंतप्रधानांनी यावेळी प्रकाशन केले. व्यापार सुलभतेमध्ये योगदान देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
देशातील मुख्य शहरांमधील वायू गुणवत्तेचे निरीक्षण करणारा राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांकही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी जारी करण्यात आला.