Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या थेट संवाद साधणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच येत्या 12 जुलैला देशभरातील बचत गटातल्या दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या तसेच राष्ट्रीय ग्रामीण आजीविका योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत. सकाळी 9.30 वाजता होणाऱ्या या संवादाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि एनआयसीच्या वेबवरुन केले जाईल. या दोन्ही योजनांच्या अंतर्गत, बचत गटांच्या महिलांनी केलेली विविध कामे आणि उपक्रम जाणून घेण्याची संधी पंतप्रधानांना या संवादातून मिळेल.

यासाठी निवडक लाभार्थी महिलांची निवड करण्यात आली असून, त्यात दारुबंदी चळवळ, मका मूल्य साखळी आणि पणन करणाऱ्या बिहारमधल्या महिला, छत्तीसगढमधल्या विटभट्टीतल्या महिला व्यापारी, सखी आणि चिंच उत्पादक महिला, सॅनिटरी नॅपकिन्स, सौर ऊर्जा पॅनेल आणि दिवे बनवणाऱ्या, महाराष्ट्रातील पशु सखी महिला, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत महिला, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या महिला यांचा समावेश असेल.

दीनदयाळ अंत्योदय योजना, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची पथदर्शी योजना आहे. या योजनेअंतर्गत, स्वयंबचत गटातल्या 9 कोटी घरातल्या महिलांना शाश्वत आजीविका म्हणजेच रोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिले जाते. त्यासाठीची कौशल्येही त्यांना शिकवली जातात.

दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन यांची सांगड घातल्यामुळे महिला सक्षमीकरणाला एक भक्कम संस्थात्मक व्यासपीठ मिळाले आहे. हे मिशन सध्या 21 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशातील 600 जिल्ह्यांमधल्या 4884 विभागात राबवले जाते. आतापर्यंत 45 लाख स्वयंबचत गटांच्या 5 कोटी महिलांना या मिशनअंतर्गत रोजगाराच्या संधी दिल्या गेल्या आहेत.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar