पीएम्इंडिया

मंत्रीमंडळातले माझे सहकारी राजनाथ सिंह, श्रीपाद येसो नाईक, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत, तिन्ही सेनांचे उच्च पदाधिकारी, संरक्षण सचिव, राष्ट्रीय छात्र सेनेचे महा संचालक, मित्र राष्ट्रांमधून आलेले अतिथी आणि देशाच्या काना कोपऱ्यातून उपस्थित एनसीसीचे माझे युवा मित्र, सर्व प्रथम, इथे झालेल्या कार्यक्रमाबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन.
प्रजासत्ताक दिनाचे संचलन आणि आजच्या उत्तम कार्यक्रमाबरोबरच आपण देशासाठी जे काम करत आहात मग ती समाज सेवा असो, क्रीडा क्षेत्र असो, आपण जी कामगिरी केली आहे ती प्रशंसनीय आहे.
आज ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. युवक आदान-प्रदान कार्यक्रम अंतर्गत आपल्या शेजारी आणि मित्र देशांचे कॅडेट इथे उपस्थित आहेत, त्यांना नमस्करा.
मित्रहो,
देशाच्या युवा शक्ती मधे शिस्त, निर्धार आणि देशाप्रती निष्ठा दृढ करण्यासाठी, एनसीसी एक मजबूत मंच आहे. देशाच्या विकासाशी या भावना संलग्न आहेत. ज्या देशाचे युवक शिस्तबद्ध आहेत, त्यांच्याकडे दृढ इच्छा शक्ती आहे, निष्ठा आहे त्या देशाचा वेगवान विकास कोणी रोखू शकत नाही.
मित्र हो,
एक युवा देश म्हणून आज जगात आपली ओळख आहे. देशातली 65 % पेक्षा जास्त लोकसंख्या 35 वर्षापेक्षा कमी वयाची आहे.
देश युवा आहे याचा आपल्याला अभिमान आहे. मात्र देशाची विचारशक्तीही युवा राहावी ही आपली जबाबदारी आहे.
युवा विचार याचा अर्थ काय होतो ?
जे थकलेले, हताश लोक असतात ते विचार करण्याचे सामर्थ्य बाळगत नाहीत आणि देशासाठी काही करण्याचा उद्देशही ठेवत नाहीत. त्यांच्या बोलण्यात कोणत्या प्रकारच्या गोष्टी असतात, याकडे आपण लक्ष दिले आहे का ?
जसे आहे तसे चालवून घेऊया!
आता राहू दे मग पाहू !
पुढे पाहूया,
एवढी काय घाई आहे, आता टाळू या, उद्या बघू !!
मित्रहो,
अशा प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांचा उद्या कधीच येत नाही.
अशा लोकांना फक्त आपला स्वार्थ दिसतो,
बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा विचाराचे बरेचसे लोक दिसतील.
अशी स्थिती आजचा युवा भारत स्वीकारण्यासाठी तयार नाही. स्वातंत्र्याला इतकी वर्षे होऊनही अशा गोष्टी कधीपर्यंत चालत राहणार,
हा युवक बाहेर जातो, जग पाहतो, आणि त्याला भारतात जुन्या दशकांपासूनच्या समस्या दिसतात.
या समस्यांचे आपण बळी ठरू नये असे त्याला वाटते.
देशात परिवर्तन घडवू इच्छितो, परिस्थिती बदलू इच्छितो.
म्हणून त्याने आता निश्चय केला आहे की आता टाळायचे नाही, आता परिस्थितीला सामोरे जात निपटारा करायचा.
भारताच्या युवकाचा हा विचार आहे, हे युवा मन आहे, हा आहे युवा भारत.
देशाला भूतकाळातल्या समस्यांपासून मुक्त करण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे हेच युवा भारताचे म्हणणे आहे.
देशाची आताची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्याचा पाया मजबूत करण्यासाठी वेगाने विकास व्हायला हवा हेच युवा भारताचे म्हणणे आहे. देशाचा प्रत्येक निर्णय भावी पिढ्यांच्या उज्वल भविष्याची हमी देणारा हवा असेही हा युवा भारत म्हणत आहे.
भूतकाळातली आव्हाने, वर्तमान काळातल्या आवश्यकता आणि भविष्यातल्या आकांक्षा लक्षात घेऊन आपल्याला तिन्ही स्तरावर एकत्र काम करायला हवे.
मित्रहो,
आपण एनसीसीत आल्यानंतर इतकी मेहनत करता, जेव्हा बोलावले जाते तेव्हा हजर होता, अभ्यासबरोबरच तास-तास सराव करता, दोन्ही बरोबरीने करता. शिक्षणही घेणार आणि देशासाठीही सेवा करणार हा आपला निश्चय आहे.
बाहेर काय स्थिती आहे ?
कधी इथे दहशतवादी हल्ला झाला, इतके निर्दोष मारले गेले, कधी तिकडे नक्षलवाद्यांनी भू-सुरुंग लावल्याने इतके जवान शहीद झाले. कधी फुटीरतावाद्यांनी असे भाषण दिले, कधी भारताविरोधात विखार पसरवला तर कधी तिरंगी ध्वजाचा अपमान केला.
अशी स्थिती स्वीकारायला आम्ही तयार नाही. युवा भारत तयार नाही, नव भारत तयार नाही.
मित्रहो,
कधी-कधी आजार दीर्घ काळ राहिला तर तो शरीराचा एक भागच बनतो. आपल्या राष्ट्र जीवनातही असेच झाले आहे. अशा अनेक आजारांनी देशाला इतके दुर्बल केले आहे की देशाची बरीचशी शक्ती यांच्याशी निपटण्यातच जाते. असे किती काळ चालणार?किती वर्षे आपण या आजारांचे ओझे झेलत राहायचे ? किती वर्षे हे टाळत राहायचे ?
आपण विचार करा.
देश स्वतंत्र झाल्यापासून काश्मीर प्रश्न आहे. या प्रश्न सोडवण्यासाठी काय केले गेले ? तीन-चार घराणी, तीन-चार पक्ष, आणि सर्वांचा भर समस्या सोडवण्यावर नव्हे तर समस्या कायम ठेवण्यावरच राहिला होता.
परिणाम काय झाला? दहशतवादाने काश्मीर उजाड केले, दहशतवाद्यांनी हजारो निर्दोष लोकांच्या हत्या केल्या.
तिथे राहणाऱ्यांना, लाखो लोकांना एका रात्रीत घर सोडून तिथून कायमचे निघून जाण्यासाठी सांगण्यात आले आणि सरकार काहीही करू शकले नाही.
दहशतवाद्यांची हिम्मत वाढवणारा, सरकार आणि प्रशासन दुर्बल करणारा हाच विचार होता.
काश्मीर मधे असेच चालू द्यायचे का,
मित्रहो,
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 तात्पुरत्या स्वरुपात लागू करण्यात आले होते. संविधानातही हेच लिहिले होते. संविधानाने जे तात्पुरते आहे असे म्हटले होते ते कलम हटवण्याची हिंमत कोणी केली नाही.
कारण तेच, आपला स्वार्थ, आपल्या राजकीय पक्षाचा स्वार्थ, आपली व्होट बँक.
आपल्या देशातल्या युवकांना आपण असे काश्मीर देणार होतो का? जिथे दहशतवाद फोफावत आहे, जिथे निर्दोष लोक मारले जात आहेत, जिथे आपल्या तिरंगी ध्वजाचा अपमान होत आहे आणि सरकार हे सर्व निमूट पाहत आहे ?
नाही.
काश्मीर भारताचा मुकुटमणी आहे. काश्मीर आणि तिथल्या लोकांना, दशकांपासून जुन्या समस्येतून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी होती आणि आम्ही ती निभावली.
मित्रहो,
आपल्याला माहित आहे की आपल्या शेजारी देशाचा आपण तीन-तीन युद्धात पराभव केला आहे. त्यांना धूळ चारण्यासाठी आपल्या सैन्याला दहा दिवसही पुरेसे आहेत. असे असूनही दशकांपासून भारताविरोधात छुपे युध्द लढले जात आहे, त्यात भारताचे हजारो नागरिक मारले गेले आहेत.
मात्र याआधी याबाबत काय विचार असे? हा दहशतवाद, दहशतवादी हल्ले, बॉम्ब स्फोट हा तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे असे त्यांचे म्हणणे होते.
याच विचारसरणीमुळे बॉम्ब स्फोट होत असत, दहशतवादी हल्ल्यात लोक मारले जात असत.
खूप बोलून झाले, भाषणे खूप झाली, मात्र आपले सैन्य कृतीसाठी सरसावल्यावर त्यांना मनाई केली जात असे, ती बाब टाळली जात असे.
आज युवा विचार आहे, युवा मन घेऊन देश पुढे जात आहे म्हणूनच देश सर्जिकल स्ट्राईक करत आहे, दहशतवाद्यांच्या तळावर जाऊन त्यांना धडा शिकवत आहे.
याचा परिणाम काय आहे हे आपण पाहताच आहात.
आज जम्मू-काश्मिरच नव्हे तर देशाच्या इतर भागातही शांतता नांदत आहे, फुटीरतावाद, दहशतवादाला आळा घालण्यात आला आहे.
मित्रहो,
ईशान्येकडच्या राज्यांसाठी ज्या पद्धतीचे धोरण अंमलात आणले गेले, ते आपण जाणताच.
दशकांपासून तिथल्या लोकांच्या आशा-आकांक्षांकडे दुर्लक्ष केले गेले.
लोकांच्या आकांक्षाच नव्हे तर तिथल्या समस्या, आव्हानेही लक्षात घेतली गेली नाहीत.
पाच-पाच, सहा-सहा दशके तिथले अनेक भाग बंडखोर गटांनी त्रासले होते. आपल्या मागण्यांसाठी ईशान्येत काही बंडखोर संघटना निर्माण झाल्या होत्या. या संघटनांचा लोकशाहीवर विश्वास नव्हता. हिंसेच्या माध्यमातून मार्ग निघेल असा त्यांचा विचार होता.
या हिंसेत हजारो निर्दोष लोक, हजारो सैनिक मृत्युमुखी पडले.
ईशान्येकडच्या राज्यांना आपण अशाच परिस्थितीत सोडून द्यायचे का? आपल्या या बंधू- भगिनींच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून राहायचे का ?
हा आपला संस्कार नाही, ही आपली कार्यसंस्कृती नाही.
ईशान्येबाबत आजच्या वर्तमानपत्रात एक मोठी बातमी आहे. आपण माध्यमातही पाहिले असेल. बोडो समस्येबाबत फार मोठा आणि ऐतिहासिक करार झाला आहे.
गेल्या पाच – सहा दशकात देशाचे असे भाग, विशेषकरून आसाममधली परिस्थिती याबाबत वाचन करा, संशोधन करा, आपल्या कळून येईल ईशान्येकडच्या लोकांनी कोणत्या परिस्थितीचा सामना केला आहे. मात्र, या परीस्थितीत सुधारणा करण्यासाठी याआधी काही ठोस पावले उचलली गेली नाहीत.
आपण ही परिस्थिती अशीच चालू ठेवणार होतो का ?
नाही कदापि नाही.
आम्ही एकीकडे, ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी अभूतपूर्व योजनांची सुरुवात केली आणि दुसरीकडे स्वच्छ मनाने सर्व संबंधीतांशी बोलणी सुरु केली. बोडो करार याचाच परिपाक आहे.
काही दिवसांपूर्वी मिझोराम आणि त्रिपुरा यांच्यामध्ये ब्रू जमातीबाबत झालेला करार याचाच परिणाम आहे. या करारानंतर ब्रु जमातीची 23 वर्षापासून जुनी समस्या सोडवण्यात आली आहे.
युवा भारताची ही विचारधारा आहे. सर्वांच्या सहकार्याने, सर्वांचा विकास साधत, सर्वांचा विश्वास प्राप्त करत आम्ही देशाला पुढे नेत आहोत.
मित्रहो,
आपल्या देशाचे सैन्य आधुनिक असावे, सामर्थ्यवान असावे असे कोणाला वाटत नाही ?
प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला, प्रत्येक राष्ट्र भक्ताला असेच वाटते की आपले सैन्य आधुनिक आणि समर्थ असावे.
आपण कल्पना करू शकता, 30 वर्षांत, आपल्या हवाई दलात, एकही अत्याधुनिक लढाऊ विमान दाखल झाले नव्हते.
जुनी होणारी आपली विमाने, अपघातग्रस्त होत होती, आपले वैमानिक शहीद होत होते, मात्र ज्यांच्यावर नवी विमाने खरेदी करण्याची जबाबदारी होती त्यांना मात्र कशाचीच चिंता नव्हती.
आपण हे सर्व असेच चालू राहू द्यायचे का ?आपले हवाई दल दुबळे होऊ द्यायचे का ?
नाही.
तीन दशकांपासून जे काम रखडले होते ते आम्ही सुरु केले. तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर देशाला अत्याधुनिक लढाऊ राफेल विमाने मिळाली याचा मला आनंद आहे. लवकरच ही विमाने भारताच्या आसमंतात भरारी घेतील.
मित्रहो,
आपण तर सर्व गणवेशात आहात. गणवेशा बरोबर कोणती कर्तव्ये येतात याबाबत आपणाला जास्त आपुलकी असेल. हेच कर्तव्य बजावत असताना आपला जवान सीमेवर, देशात, कधी दहशतवाद्यांशी, कधी नक्षलवाद्यांशी सामना करतो.
त्याच्याकडे बुलेट प्रुफ जॅकेट नसेल तर काय होईल याचा विचार करा.
आपल्याकडे असेही सरकार होते, असेही लोक होते जे जवानांना बुलेट प्रुफ जॅकेट पुरवण्याचीही तसदी घेत नव्हते. 2009 पासून आपल्या जवानांची बुलेट प्रुफ जॅकेटची मागणी होती मात्र तेंव्हाच्या सरकारने त्याकडे लक्ष पुरवले नाही.
आपले जवान असेच दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या गोळीचे शिकार होत राहणार ?
देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या जवानांचे प्राण, आपणा सर्वसामान्य नागरिकापेक्षा बहुमोल आहेत.
म्हणूनच आमच्या सरकारने, जवानांसाठी बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करण्याचा आदेश दिला, इतकेच नव्हे तर आता भारत दुसऱ्या देशांना बुलेटप्रुफ जॅकेट निर्यात करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मित्रहो,
आपल्यापैकी अनेक जण असे असतील ज्यांच्या कुटुंबातला एखादा तरी सदस्य सैन्यात असेल. आपण कोणाला भेटता तेव्हा अभिमानाने सांगता की माझे वडील, काका, मामा, भाऊ, बहिण सैन्यात आहे.
सैन्यातल्या जवानांप्रती आपल्या मनात स्वाभाविक अभिमानाची भावना असते. ते देशासाठी असामान्य कार्य करतात. त्यामुळे त्यांना पाहताच सन्मानाची भावना निर्माण होते. मात्र वन रँक वन पेन्शन ही त्यांची 40 वर्षाची, जुनी मागणी पूर्वीची सरकारे पूर्ण करू शकली नाहीत.
आमच्या सरकारने 40 वर्षांची ही मागणी पूर्ण केली.
मित्रहो,
सीमेवरचे जवान केवळ देशाच्या सीमेचे नव्हे, लोकांचे नव्हे तर देशाच्या स्वाभिमानाचेही रक्षण करत असतात. कोणत्याही स्वतंत्र देशाची ओळख असते – स्वाभिमान. देशाच्या स्वाभिमानाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांसाठी राष्ट्रीय युध्द स्मारकाची मागणी स्वातंत्र्यापासून होत आहे. त्याचप्रमाणे, देशाची अंतर्गत सुरक्षा कायम ठेवण्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलिसांसाठी, पोलीस स्मारकाची मागणीही दशकांपासून होत आहे.
या एका कामासाठी 50-50 वर्षे 60-60 वर्षे वाट पाहावी लागेल अशी कल्पना कोणी करू शकते का, कशी पद्धत होती, कसे विचार होते, देशाला कोणत्या मार्गाने हे लोक नेत होते?
काही लोक भारताच्या शहिदांचे विस्मरण घडवण्याचा प्रयत्न करण्याचे पाप करत होते.
देशाचे सैन्य, सुरक्षाबलाचा आत्मगौरव वाढवण्याऐवजी, त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला.
एनसीसीचे इथे बसलेले छात्र याच्याशी सहमत आहेत का,
आपल्या युवकांच्या मनात जे आहे तेच आमच्या सरकारने केले. आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकही आहे आणि पोलीस स्मारकही आहे.
मित्रहो,
आज संपूर्ण जगात, वेगवेगळ्या स्तरावर सैन्य व्यवस्थेत परिवर्तन होत आहे. आता हत्ती-घोड्यावर बसून युद्ध जिंकता येत नाही हे आपण सर्वजण जाणतो. आधुनिक युद्धात पाणी, जमीन आणि आकाश म्हणजेच आपले सैन्यदल, नौदल आणि हवाईदल यांच्या समन्वयानेच आगेकूच करायला हवी.
तिन्ही दलांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती व्हावी यावर अनेक वर्षे चर्चा होत राहिली.
दुर्दैवाने यावर चर्चा होत राहिली. फाईल एक टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फिरत राहिली. कोणीही निर्णय घेतला नाही.
मित्रहो,
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची निर्मिती, त्या पदावर नियुक्ती हे सर्व काम आमच्या सरकारने केले आहे.
आता निर्णय टाळू नका, आता निर्णय घ्या, हा युवकांचा विचार लक्षात घेऊनच आमच्या सरकारने हे काम केले.
एक अधिक एक अधिक एक म्हणजे तीन होतात तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीनंतर एक अधिक एक अधिक एक म्हणजे एकशे अकरा होतात.
मित्रहो,
आपण कल्पना करू शकता, कोणता देश, आपल्या हक्काचे पाणी असेच वाहू देतो, मात्र भारतात हे घडत होते. भारतातला शेतकरी पाण्याच्या समस्येने ग्रस्त होता आणि देशाचे पाणी वाहून पाकिस्तानमध्ये जात होते. हे पाणी भारतातल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची हिंमत कोणी केली नाही. पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याचा निर्णय आम्ही केला आणि आता त्यावर वेगाने काम होत आहे. भारताचे हक्काचे पाणी आता भारतातच राहील.
मित्रहो,
आपण उत्तम पुस्तके वाचली, पूर्वग्रह रहित इतिहासकारांची पुस्तके वाचली तर आपल्याला वास्तव जाणता येईल. मात्र सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत आज दिशाभूल केली जात आहे, त्याला विरोध केला जात आहे. त्याबाबतची सत्यता देशाच्या युवकांनी जाणणेआवश्यक आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यानंतरच स्वतंत्र भारताने पाकिस्तानात, बांगलादेशात, अफगाणिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना-शीखांना आणि इतर अल्पसंख्याकांना हे आश्वासन दिले होते की जर त्यांना गरज लागली तर ते भारतात येऊ शकतात, भारत त्यांच्या पाठिशी उभा राहील.
इंदिरा गांधी यांची देखील हीच इच्छा होती. 1950 मध्ये झालेल्या नेहरू- लियाकत कराराची देखील हीच भावना होती. या देशांमध्ये ज्या लोकांवर त्यांच्या श्रद्धेमुळे अत्याचार झाले, त्यांना आश्रय देणे, त्यांना भारताचे नागरिकत्व देणे ही भारताची जबाबदारी होती. पण या विषयाकडे अनेक लोकांनी पाठ फिरवली.
अशा लोकांसोबत झालेल्या ऐतिहासिक अन्यायाला आळा घालण्यासाठी, भारताच्या जुन्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आज जर आमच्या सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा आणला आहे, तर काही राजकीय पक्ष आपल्या मतपेटीवर कब्जा करण्याच्या शर्यतीत उतरले आहेत.
शेवटी कोणाच्या हितासाठी हे लोक काम करत आहेत?
या लोकांना पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार दिसत नाहीत का?
केवळ त्यांच्या धर्मामुळे पाकिस्तानात त्यांच्या मुलीबाळींवर अत्याचार होत आहेत, त्यांच्यावर बलात्कार होत आहेत, त्यांचे अपहरण होत आहे, हे सर्व खोटे असल्याचे सिद्ध करण्याचा यांचा इतका अट्टहास का आहे?
मित्रांनो, यापैकी काही लोक शोषितांचा आवाज बनण्याचे सोंग करत आहेत. हे तेच लोक आहेत, ज्यांना पाकिस्तानमध्ये शोषितांवर होणारे अत्याचार दिसत नाहीत. पाकिस्तानात धार्मिक छळ झाल्याने जे लोक भारतात पळून आले आहेत, त्यापैकी बहुतेक लोक शोषितच आहेत
मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये तेथील लष्कराने एक जाहीरात प्रसिद्ध केली होती. लष्करामध्ये सफाई-कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी. त्या जाहिरातीमध्ये काय लिहिले होते माहीत आहे का तुम्हाला?
त्यामध्ये लिहिले होते- सफाई कर्मचारी या पदासाठी केवळ तेच लोक अर्ज करू शकतात जे मुस्लीम नाहीत. म्हणजेच ही जाहीरात कोणासाठी होती? आमच्या याच शोषित बंधु-भगिनींसाठी. त्यांना याच नजरेने पाहिले जाते पाकिस्तानात. ही परिस्थिती आहे तिथली.
मित्रांनो,
फाळणीच्या वेळी अनेक लोक भारत सोडून गेले. पण येथून गेल्यानंतर ते लोक येथील मालमत्तांवर आपला अधिकार सांगत होते.
आपल्या शहरांच्या मधोमध उभ्या असलेल्या लाखो करोडो रुपयांच्या या मालमत्तांवर भारताचा अधिकार असून त्यांचा देशासाठी काहीच उपयोग नव्हता. अनेक दशकांपर्यंत शत्रू मालमत्ता विधेयक प्रलंबित ठेवण्यात आले. जेव्हा आम्ही हे विधेयक संसदेत सादर करण्यासाठी आणले तेव्हा हे विधेयक संमत करण्यासाठी आम्हाला अतिशय कष्ट करावे लागले.
मी पुन्हा विचारेन, कोणाच्या हितासाठी असे करण्यात आले?
जे लोक सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध करत आहेत, तेच लोक शत्रू मालमत्ता कायद्याला विरोध करत होते.
मित्रांनो,
फाळणीनंतर भारत आणि तेंव्हाचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांग्लादेश यांच्यातही काही भागात सीमावाद सुरू राहिलेला आहे. हा वाद सोडवण्यासाठी कोणतीही खंबीर पावले उचलण्यात आली नाहीत.
जर सीमाच वादग्रस्त असेल तर घुसखोरी थांबणार कशी?
आपल्या स्वार्थासाठी वाद कायम ठेवून घुसखोरांना येण्यासाठी रस्ते मोकळे ठेवा, आपले राजकारण करत राहा, हेच आपल्या देशात सुरू होते.
हे आमचे सरकार आहे ज्याने बांग्लादेशासोबतचा सीमावाद सोडवला. आम्ही दोन मित्र देशांनी समोरा-समोर बसून चर्चा केली, एकमेकांचे म्हणणे ऐकून घेतले. एक असा तोडगा काढला ज्याविषयी दोन्ही देशांची सहमती झाली. आज केवळ आमच्या सीमावादावरच तोडगा निघाला नाही तर भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध देखील आज ऐतिहासिक पातळीवर आहेत. आम्ही दोघेही एकत्र येऊन गरिबीविरोधात संघर्ष करत आहोत.
मित्रांनो,
भारताच्या फाळणीच्या वेळी कागदावर एक रेषा आखण्यात आली होती. देशाचे विभाजन करण्यात आले होते. कागदावर आखलेल्या या रेषेने गुरुद्वारा कर्तारपूर साहिबला आमच्यापासून दूर केले, त्याला पाकिस्तानचा भाग बनवण्यात आले.
कर्तारपूर, गुरु नानक यांची भूमी होती. कोट्यवधी देशवासीयांची श्रद्धा या पवित्र स्थानावर होती. या स्थानाचा त्याग का करण्यात आला? ज्यावेळी पाकिस्तानच्या 90 हजार सैनिकांना बंदी बनवण्यात आले होते तेंव्हा सांगता आले असते की कमीत कमी कर्तारपूर साहिब तरी आम्हाला परत द्या.
पण, हे देखील करण्यात आले नाही. दशकांपासून शीख भाविक या प्रतिक्षेत होते की त्यांना विनासायास कर्तारपूरला जाण्याची संधी मिळेल. आपल्या गुरुभूमीचे दर्शन करता येईल. कर्तारपूर मार्गिका बनवून हे काम देखील आमच्या सरकारने केले.
मित्रांनो, श्रीराम जन्मभूमीचा खटला अनेक दशकांपासून न्यायालयात प्रलंबित राहिला होता, तर यामागे देखील या लोकांची हीच विचारसरणी आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी महत्त्वाचे विषय प्रलंबित ठेवायचे, देशाच्या नागरिकांची दिशाभूल करायची. हे लोक न्यायालयाच्या चकरा मारत राहायचे आणि कोणत्याही प्रकारे सुनावणी पुढे जात राहील, अशा प्रयत्नात असायचे. न्यायालयाला आपला निकाल देता येऊ नये, यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या पद्धतींचा वापर करण्यात आला, ते देशाने पाहिले आहे. जे अडथळे आणण्यात येत होते, त्यांना हटवण्यात आले आहे आणि आज इतक्या महत्त्वाच्या संवेदनशील प्रकरणाचा निकाल देखील लागला आहे.
मित्रांनो,
अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या आमचे सरकार सोडवत असून आमच्या निर्णयांवर जे लोक जातीयवादाचा आरोप करत आहेत, त्यांचा खरा चेहरा देखील देशाने पाहिला आहे आणि पाहात आहे.
मी पुन्हा सांगेन, देश पाहात आहे आणि त्यांना समजत आहे. ते गप्प आहेत मात्र त्यांना सर्व काही कळत आहे. मतपेढीसाठी कशा प्रकारे या लोकांनी मनाला वाटेल तसे खोटेनाटे पसरवत जात आहेत, हे देशाने देखील पाहिले आहे.
समाजातील वेगवेगळ्या स्तरांवर बसलेले हे लोक आता पूर्णपणे उघडे पडले आहेत. दररोज यांची वक्तव्ये, त्यांना स्वतःला आणि त्यांच्या विचारसरणीला उघडे पाडत आहेत.
हे तेच लोक आहेत ज्यांनी देशहितापेक्षा स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य दिले आहे. अशा लोकांनी मतपेढीचे राजकारण करून अनेक दशके समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले नाहीत.
मित्रांनो,
तुमच्या सारख्या छात्रांच्या जन्माच्या खूप वर्षे आधी म्हणजे 1985-86 या वर्षातील ही घटना असेल, ज्यावेळी देशातील सर्वात वरच्या स्थानावर असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम महिलांना देशातील इतर माताभगिनींप्रमाणेच अधिकार देत ऐतिहासिक निकाल दिला होता. पण या लोकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालालाच बाजूला सारले.
इतकी वर्षे ज्या हजारो-लाखो मुस्लीम माता-भगिनींचे आयुष्य तिहेरी तलाकमुळे नरकासमान बनले होते. यासाठी हे लोक जबाबदार नाहीत का? नक्कीच हेच लोक आहेत.
या लोकांच्या खुशामतीच्या राजकारणामुळे मुस्लीम माता-भगिनींना अनेक दशके तिहेरी तलाकपासून मुक्ती मिळू शकली नव्हती. दुसरीकडे जगातील अनेक मुस्लीम देशांनी आपापल्या भागात तिहेरी तलाकवर बंदी घातली होती. पण या लोकांनी भारतात हे करायला दिले नाही.
विचारसरणी तीच होती, ना बदलणार, ना बदलू देणार
म्हणूनच देशाने या लोकांनाच बदलून टाकले. हे आमचे सरकार आहे ज्यांनी तिहेरी तलाकच्या विरोधात कायदा बनवला आहे. मुस्लीम महिलांना नवे अधिकार दिले आहेत.
मित्रांनो,
ज्या दिल्लीमध्ये हे आयोजन होत आहे, याच दिल्लीमध्ये, देशाच्या राजधानीमध्ये, स्वातंत्र्यानंतर लाखो निर्वासितांना वसवण्यात आले. काळानुरुप आणखी लाखो लोक दिल्लीत आले आणि स्थायिक झाले. दिल्लीत अशा 1700 पेक्षा जास्त वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना अनेक दशकांपर्यंत त्यांच्या घरांची मालकी मिळाली नव्हती. म्हणायला केवळ त्यांचे घर होते, पण कायद्याच्या नजरेत ते बसत नव्हते. अशा 40 लाखांपेक्षा जास्त लोकांची ही मागणी होती त्यांना त्यांच्या घरांची मालकी दिली जावी.
पण अनेक दशके त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. ज्यावेळी आमच्या सरकारने त्या दृष्टीने प्रयत्न केले, त्यातही अडथळे आणण्याचे काम करण्यात आले.
युवा भारताचा विचार आहे, नवभारताचा हा विचार आहे, ज्याने दिल्लीच्या 40 लाख लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता दूर केली आहे. आमच्या सरकारच्या निर्णयाचा फायदा हिंदूना होणार आहे आणि मुस्लीमांना देखील होणार आहे, शीखांना होणार आहे आणि ख्रिस्ती लोकांनाही होणार आहे.
मित्रांनो,
आमच्यासाठी प्रत्येक देशवासी महत्त्वाचा आहे आणि याच विचाराने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. आसाममध्ये ज्या ब्रू-रियांग जमातीचा उल्लेख मी यापूर्वी देखील केला, त्यांना तशाच परिस्थितीत सोडून देण्यात आले होते. आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता देखील आमच्या सरकारने दूर केली आहे. या लोकांना मिझोराममधून पळून जाऊन त्रिपुरामध्ये आश्रय घ्यावा लागला होता. अनेक वर्षांपासून हे लोक निर्वासितांचे जीवन जगत होते. ना राहण्याचा ठावठिकाणा, ना मुलाबाळांचे भवितव्य.
पूर्वीच्या सरकारांनी या समस्यांबाबत टाळाटाळ करण्याचे काम केले. आम्ही सर्वांना सोबत घेतले आणि या समस्यांवर उपाय शोधला. येणाऱ्या काळात सरकार ब्रू-रियांग जमातीचे जीवन सुकर बनवण्यासाठी सहाशे कोटी रुपये खर्च करणार आहे.
मित्रांनो,
येथे बसलेल्या प्रत्येक तरुणाला असे वाटते की देशातील भ्रष्टाचार संपुष्टात यावा. भ्रष्टाचार आपल्या देशातील साधनसंपत्तीला वाळवीसारखा पोखरत होता. या भ्रष्टाचाराने श्रीमंतांना आणखी श्रीमंत बनवले आणि गरीबांना आणखी गरीब. अगदी देशाच्या पंतप्रधानांनी एके काळी म्हटले होते की केंद्र सरकार गरिबांसाठी जेव्हा एक रुपया पाठवते तेव्हा त्यातील केवळ 15 पैसेच त्यांच्यापर्यंत पोहोचतात. ही परिस्थिती होती. पण ती बदलण्यासाठी आपण काय केले? केवळ तोंडदेखल्या गोष्टी- फक्त देखावा. भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रामाणिकपणाने काही कारवाई करण्याचे प्रयत्नच झाले नाहीत.
आमच्या सरकारने जनधन, आधार आणि मोबाईलच्या सामर्थ्याने, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आळा घातला आहे. आमच्या सरकारने असे करून एक लाख 70 हजार कोटी रुपये चुकीच्या हातात पडण्यापासून वाचवले आहेत.
मित्रांनो,
1988 मध्ये देशात एक कायदा तयार झाला होता. बेनामी संपत्तीच्या विरोधात. देशाच्या संसदेने हा कायदा संमत केला होता. पण 28 वर्षात हा कायदा लागू करण्यात आलाच नाही. बेनामी संपत्तीच्या विरोधातील या कायद्याला याच लोकांनी केराच्या टोपलीत टाकले.
दुसरीकडे आमच्या सरकारने केवळ बेनामी संपत्ती कायदा लागूच केला नाही तर हजारो कोटी रुपयांची मालमत्ता या कायद्यांतर्गत जप्त केली.
मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कारण याचे उत्तर ऐकून तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल.
तुमच्या घरात जे स्वयंपाकघर आहे, त्या जागेत 400-500 लोक मावू शकतात का?
नाही ना !!!
बरे मग मला सांगा की स्वयंपाकघराइतक्या जागेत दोन हजार, तीन हजार लोक मावू शकतात का?
नाही ना !!!
मला माहीत आहे. पण पूर्वी देशातील कागदपत्रांमध्ये असेच होत असायचे. स्वयंपाकघराइतक्या जागेत देशातील चार-चारशे, पाच-पाचशे कंपन्या सुरू असायच्या. कागदावर या कंपन्यांचे अनेक कर्मचारी देखील असायचे.
या कंपन्यांचा कोणाला उपयोग होता? इकडचा काळा पैसा तिकडे. तिकडचा काळा पैसा इकडे, हेच त्यांचे काम होते.
आमच्या सरकारने अशा साडेतीन लाखापेक्षा जास्त संशयास्पद कंपन्या बंद केल्या आहेत.
हे काम यापूर्वी देखील होऊ शकले असते पण तसे करण्याची वृत्तीच नव्हती, युवा भारत ही विचारसरणी नव्हती.
आम्हाला समस्यांचे निराकरण करायचे आहे, त्यांना प्रलंबित ठेवायचे नाही.
वस्तू आणि सेवा कर असो, गरिबांच्या आरक्षणाचा निर्णय असो, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याबद्दल फाशीचा कायदा असो आमचे सरकार याच युवा विचारांनी लोकांच्या अनेक वर्षांपासून बाकी असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे काम करत आहे.
मित्रांनो,
विसाव्या शतकातील 50 वर्षे आणि 21व्या शतकातील 15-20 वर्षे, आम्हाला दशकानुदशके जुन्या समस्यांसोबत जगायची सवय होत होती.
कोणत्याही देशासाठी अशी स्थिती योग्य नाही, आपण भारताचे लोक असे होऊ देऊ शकत नाही. आपले हे कर्तव्य आहे की आपल्या हयातीतच या समस्यांपासून देशाला मुक्त केले पाहिजे.
आपल्या पुढल्या पिढ्यांना या समस्यांची झळ पोहोचली, त्यामध्ये ते अडकून पडले तर देशाच्या भविष्यावर हा अन्याय ठरेल. आम्ही असे होऊ देणार नाही.
आणि म्हणूनच, मी भावी पिढ्यांसाठी, देशाच्या युवकांच्या भल्यासाठी, सर्व राजकीय घडामोडींचा सामना करत आहे.
मी त्या लोकांची सर्व कारस्थाने अयशस्वी ठरवत आहे कारण देश यशस्वी झाला पाहिजे, सर्व प्रकारची टीका, सर्व प्रकारचे शिव्याशाप यांना मी सामोरा जात आहे, जेणेकरून आपल्या भावी पिढ्यांना या परिस्थितीला तोंड द्यावे लागू नये.
मी प्रत्येक अपशब्द, प्रत्येक टीकेसाठी, सर्व प्रकारचे जुलूम सहन करायला तयार आहे, पण देशाला या परिस्थितीच्या जोखडात अडकवून ठेवायची माझी तयारी नाही.
सध्या हे लोक अपप्रचार करत आहेत, परदेशी प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्यासारखे असलेल्या लोकांच्या माध्यमातून असे पसरवत आहेत की, आमच्या सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे मोदी यांची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यांचा सन्मान कमी झाला आहे. पण मोदींचा जन्म यासाठी झालेला नाही. बदलणारा भारत यांना कधी समजलेलाच नाही.
यांच्या या दबावाचा सामना मी अनेक वर्षे केला आहे. जेवढे हे लोक स्वतःला ओळखत नाहीत, त्यापेक्षा जास्त मी यांची नस अन् नस ओळखून आहे आणि त्यांच्या कटकारस्थानाची मला ओळख आहे. यामुळे या लोकांनी कोणत्याही भ्रमात राहू नये.
मित्रांनो,
अनेक समस्यांच्या बेड्यांमध्ये जखडून पडलेला देश प्रगती कशी काय करणार? आम्ही समस्यांचे निराकरणही करत आहोत आणि या बेड्या देखील तोडत आहोत. हा देश आम्हालाच मजबूत बनवायचा आहे, आम्हालाच याला विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचे आहे.
2022 मध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा सोहळा साजरा करू, तेव्हा अशा अनेक समस्यांपासून देशाला आम्हाला कायमचे मुक्त करायचे आहे.
स्वातंत्र्यानंतर कायम राहिलेल्या समस्यांपासून मुक्तीच या दशकातील नव्या भारताला सशक्त करतील.
जेव्हा देश जुन्या समस्यांपासून मुक्त होऊन पुढे जाईल, त्यावेळी त्याचे सामर्थ्य देखील नव्या झळाळीने खुलेल.
भारताची उर्जा जिथे गरज आहे तिथेच खर्च झाली पाहिजे.
चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारताला, युवा भारताला खूप मोठी भूमिका बजावायची आहे. आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर न्यायचे आहे.
आपल्याला एकजुटीने एक स्वयंपूर्ण, सशक्त, समृद्ध आणि सुरक्षित भारताची निर्मिती करायची आहे.
मित्रांनो, वर्ष 2022 इतकी मोठी संधी आहे, हे दशक इतकी मोठी संधी आहे. याची सर्वात मोठी ताकद आपली युवा उर्जा आहे. याच उर्जेने आपल्या देशाला सांभाळले आहे आणि हीच उर्जा या दशकाचा सांभाळ करेल.
चला कर्तव्याच्या मार्गावर आगेकूच करुया,
समस्यावरील तोडग्यानंतर आता राष्ट्रनिर्मितीची नवी उद्दिष्टे आपली प्रतीक्षा करत आहेत.
या लक्ष्यांपर्यंत आपण एकत्रितपणे पोहोचणार आहोत, नक्कीच पोहोचू याच विश्वासाने मी माझ्या भाषणाचा समारोप करतो
तुमचा खूप जास्त वेळ मी घेतला.
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.
भारत माता की जय !!!
जय हिंद !!!
S.Thakur/N.Chitale/S.Patil/D.Rane
NCC, देश की युवाशक्ति में Discipline, Determination और देश के प्रति Devotion की भावना को मजबूत करने का बहुत सशक्त मंच है। ये भावनाएं देश के Development के साथ सीधी-सीधी जुड़ी हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
आज विश्व में हमारे देश की पहचान, युवा देश के रूप में है। देश के 65 परसेंट से ज्यादा लोग 35 वर्ष से कम उम्र के हैं। देश युवा है, इसका हमें गर्व है लेकिन देश की सोच युवा हो, ये हमारा दायित्व होना चाहिए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
इस स्थिति को मेरे आज का युवा भारत, मेरे भारत का युवा, स्वीकारने के लिए तैयार नहीं है। वो छटपटा रहा है कि स्वतंत्रता के इतने साल हो गए, चीजें कब तक ऐसे ही चलती रहेंगी? कब तक हम पुरानी कमजोरियां को पकड़कर बैठे रहेंगे: PM @narendramodi pic.twitter.com/yPZVhi3bfP
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
वो देश बदलना चाहता है, स्थितियां बदलना चाहता है।
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
और इसलिए उसने तय किया है कि अब टाला नहीं जाएगा, अब टकराया जाएगा, निपटा जाएगा: PM @narendramodi
आज युवा सोच है, युवा मन के साथ देश आगे बढ़ रहा है, इसलिए वो सर्जिकल स्ट्राइक करता है, एयर स्ट्राइक करता है और आतंक के सरपरस्तों को उनके घर में जाकर सबक सिखाता है: PM @narendramodi pic.twitter.com/Scm7kxlY8d
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
हमने एक तरफ नॉर्थ ईस्ट के विकास के लिए अभूतपूर्व योजनाओं की शुरुआत की और दूसरी तरफ बहुत ही खुले मन और खुले दिल के साथ सभी Stakeholders के साथ बातचीत शुरू की। बोडो समझौता आज इसी का परिणाम है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
यही तो युवा भारत की सोच है। सबका साथ लेकर, सबका विकास करते हुए, सबका विश्वास हासिल करते हुए देश को हम आगे बढ़ा रहे हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
आपकी युवा सोच, आपका युवा मन जो चाहता है, वही हमारी सरकार ने किया। आज दिल्ली में नेशनल वॉर मेमोरियल भी है और नेशनल पुलिस मेमोरियल भी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
दशकों पुरानी समस्याओं की सुलझा रही हमारी सरकार के फैसले पर जो लोग सांप्रदायिकता का रंग चढ़ा रहे हैं, उनका असली चेहरा भी देश देख चुका है और देख रहा है।
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
मैं फिर कहूंगा- देश देख रहा है, समझ रहा है। चुप है, लेकिन सब समझ रहा है: PM @narendramodi
ये युवा भारत की सोच है, न्यू इंडिया की सोच है जिसने दिल्ली के 40 लाख लोगों के जीवन से, उनकी सबसे बड़ी चिंता को दूर कर दिया है। हमारी सरकार के फैसले का लाभ हिंदुओं को होगा और मुस्लिमों को भी, सिखों को होगा और ईसाइयों को भी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
हम समस्याओं का समाधान चाहते हैं, उन्हें लटकाए रखना नहीं चाहते।
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
GST हो, गरीबों को आरक्षण का फैसला हो, रेप के जघन्य अपराधों में फांसी का कानून, हमारी सरकार इसी युवा सोच के साथ लोगों की बरसों पुरानी मांगों को पूरा करने का काम कर रही है: PM @narendramodi
वर्ष 2022, इतना बड़ा अवसर है, ये दशक इतना बड़ा अवसर है। इसकी सबसे बड़ी ताकत हमारी युवा ऊर्जा है। इसी ऊर्जा ने हमेशा देश सँभाला है और यही ऊर्जा इस दशक को भी संभालेगी।
— PMO India (@PMOIndia) January 28, 2020
आइए, कर्तव्य पथ पर बढ़ चलें: PM @narendramodi pic.twitter.com/C9U5FoYDEO