Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय युवा दिनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

राष्ट्रीय युवा दिनाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त छत्तीसगढमध्ये नया रायपूर येथे रेसकोर्स मार्गावरुन व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटनपर भाषण केले.

अल्प कालावधीत किती जास्त साध्य करता येते याचा झळाळता आदर्श आणि सर्व युवांसाठी प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

छत्तिसगडमध्ये आज एकत्रितपणे देशाच्या विविध भागांतून आलेले युवक देशाच्या विविधतेचे प्रतिनिधीत्व करतात, मात्र भारतमातेच्या सेवेच्या समान मंत्राने ते परस्परांशी जोडले गेले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की एकजुटीच्या याच संकल्पनेने एके दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले होते आणि आज ते आपल्याला नव्या उंचीवर नेत आहे. देशातील 125 कोटी नागरिक देशाला नव्या उंचीवर नेण्याच्या ध्येयाने एकत्र आले आहेत. ज्या देशात इतकी जास्त युवा शक्ती आहे त्याची उद्दीष्ट्ये आणि स्वप्ने अमर्याद असली पाहिजेत, असे पंतप्रधान म्हणाले.

व्याख्येनुसार, भूतकाळाची काळजी न करता भविष्यातील उद्दीष्ट्ये गाठण्याच्या दिशेने कार्यरत असतो, त्याला युवा म्हणतात, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.

सद्‌भावना आणि एकजुटीवर भर देत, शांतता, एकी आणि सद्‌भावनेशिवाय विकास निरर्थक असतो, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपण कितीही विकसित झालो तरी शांतता ही आपली पहिली गरज आहे. वैविध्यपूर्ण असतानाही एकजूट कायम राखण्याची एकमेवाद्वितीय वृत्ती आपल्याकडे आहे, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. वेदांपासून विवेकानंदांपर्यंत आणि उपनिषदांपासून उपग्रहांपर्यंत विस्तारलेला हा आपल्या पूर्वजांचा वारसा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

या शतकाला भारताचे शतक बनविण्यासाठी आपल्या युवकांना क्षमता आणि कौशल्ये प्रदान करणे, हे भारताचे ध्येय आहे असे श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नक्षलवादाची समस्या असतानाही या दिशेने प्रगती करणाऱ्या छत्तीसगढ राज्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

श्रम सन्मानाच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला आणि लोकांमध्ये श्रमसन्मान रुजवला पाहिजे, असे मत व्यक्त केले. विकास साध्य करण्यासाठी गरीबांच्या जीवनात विशेषत: ग्रामीण भागातील गरीबांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे, हे भारताचे ध्येय असले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. युवकांनी 16 जानेवारी रोजी नवी दिल्लीत स्टार्ट अप इंडिया समारंभाच्या शुभारंभाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

2019 आणि 2022 या वर्षी अनुक्रमे महात्मा गांधींची 150 वी जयंती आणि स्वातंत्र्याची 75 वी वर्षपूर्ती असेल त्यामुळे या वर्षासाठी युवकांनी ठाम ध्येय निश्चित करण्याच्या दिशेने विचार करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी युवकांना केले.

M. Pange/S.Tupe/M.Desai