पीएम्इंडिया
जय श्रीराम, मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या बंधू-भगिनींनो,
आपण सर्वाना विजयादशमीच्या खूप-खूप शुभेच्छा. प्राचीन अशा रामलीला समारंभात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. हिंदुस्तानच्या या भागाने आपल्याला तीर्थस्वरूप प्रभू राम आणि श्रीकृष्ण आपल्याला दिले. अशा या धरतीवर विजयादशमीच्या पर्वावर येऊन नमन करणे यापेक्षा भाग्य कोणते असू शकते?
विजयादशमीचे पर्व म्हणजे सत्याचा, असत्यावर मिळवलेला विजय. जुलूमाचा नायनाट करण्याचे पर्व. रावणाच्या पुतळ्याचे दहन आपण दरवर्षी करतो. या परंपरेतून आपण कोणती शिकवण घ्यायची आहे? आपल्यात, आपल्या सामाजिक रचनेत, आपल्या राष्टीय जीवनात ज्या-ज्या वाईट गोष्टी आहेत त्या नष्ट करण्याचा संकल्प, रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना आपण केला पाहिजे. दर वर्षी रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना आपल्यातल्या वाईट गोष्टी नष्ट करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करायला हवा आणि विजयादशमीच्या या समयी आपण किती वाईट गोष्टी नष्ट केल्या याचा हिशोबही करायला हवा.
आज कदाचित रावण त्या काळातल्या रूपात नसेलही, त्या काळात झाले त्याप्रमाणे राम आणि रावण यांच्यातले युद्धही नसेल मात्र आपल्यामधे सुरु असणारे द्वंद्व ही अविरत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. म्हणूनच दसरा हा जो शब्द आहे त्याचा संदेश आहे की आपल्यातल्या दहा वाईट गोष्टी नष्ट करा, जीवनात अधःपतन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर विजय मिळवल्याशिवाय जीवन सफल होत नाही. वाईट गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचे सामर्थ्य ईश्वराने प्रत्येकालाच दिलेले असते. समाज म्हणून, व्यक्ती म्हणून, राष्ट्र म्हणून, आपल्यामध्ये, आपल्या विचारात, आपल्या आचारात वाईट विचारांच्या रूपात वसणाऱ्या रावणाला समाप्त करून या राष्ट्राला गौरवशाली बनवायचे आहे.
लोकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप देऊन समाज प्रबोधनाचे साधन म्हणून त्याचा उपयोग केला त्याप्रमाणे या समितीनेही कार्य करत रामलीलेचा हा मंच केवळ पौराणिक गोष्टी भक्तिभावाने स्मरण करणारा मंच एवढाच सीमित ठेवला नाही, त्यासाठी मी समितीचा आभारी आहे. कुतूहलाने नवी पिढी पाहायला येईल, कलाकारांना संधी मिळेल यासाठी नाही केले. समाजातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची परंपरा आपण निर्माण केलीत. संपूर्ण देशाने प्रेरणा घ्यावी असे काम इथल्या रामलीलेतून करण्यात येत आहे. आजच्या आधुनिक काळातही संदेश देण्याचे सामर्थ्य रामायणातल्या या व्यक्तिरेखांमध्ये आहे. आपल्या देशाचे हे वैशिष्ट्य आहे की हजारो वर्षांपासून आपला सांस्कृतिक वारसा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली आहे. कथा तसेच कलेच्या माध्यमातून ही परंपरा आपण जीवित ठेवली आहे, समाज जीवनात त्याचे मोठे मूल्य आहे.
या वेळेचा विषय आहे दहशतवाद. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. प्रभू रामचंद्र मानवतेचे प्रतिनिधित्व करतात, मानवतेच्या उच्च मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात, मानवतेच्या आदर्शांचे प्रतिनिधित्व करतात, मर्यादा दर्शवतात, विवेक, त्याग, तपश्चर्या याचे उत्तम उदाहरण त्यांनी आपल्याला घालून दिले आहे. म्हणूनच दहशतवादाविरोधात सर्वात पहिला लढा कोणी दिला? कोणी सैनिक होता का? कोणी नेता होता का? रामायण साक्षी आहे की दहशतवादाविरोधात सर्वात पहिली लढाई जटायूने लढली होती. एका महिलेच्या सन्मानासाठी रावणासारख्या सामर्थ्यवान शक्तीविरोधात जटायू झुंजत राहिला, लढत राहिला. आजही निर्भयतेचा संदेश कोणी देत असेल तर तो जटायू देत आहे. आपण राम बनू शकत नाही, मात्र सव्वाशे कोटी देशवासीय अत्याचार, अनाचाराविरोधात जटायूची भूमिका बजावू शकतात. सव्वाशे कोटी देशवासीय एक होऊन दहशतवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवून राहतील, सजग राहतील तर दहशतवाद्यांचे इरादे पूर्ण होणार नाहीत.
30-40 वर्षांपूर्वी हिंदुस्थान दहशतवादाच्या त्रासाबाबत जगाला सांगत होता, चर्चा करत होता तेव्हा जगाला ते फारसे पटत नव्हते. 92-93 ची घटना मला आठवते, अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी मी दहशतवादाविषयी चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी सांगितले तो तुमचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मी त्यांना सांगत होतो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर दहशतवाद वेगळी गोष्ट आहे, पण त्यांना पटत नव्हते. मात्र 26/11 नंतर सगळ्या जगाला समजले दहशतवाद किती भयंकर असतो. दहशतवादापासून आपण वाचलो आहोत असे कोणी समजत असेल तर त्याने गैरसमजात राहू नये, दहशतवादाला कोणतीही सीमा नाही, दहशतवादाला कोणतीही मर्यादा नाही, कुठेही जाऊन मानवता नष्ट करण्याचा त्यांचा इरादा आहे. म्हणूनच जगातल्या मानवतावादी शक्तींनी दहशतवादाविरोधात एकजूट होणे अनिवार्य आहे. जे दहशतवाद फैलावतात त्यांना मुळापासून नष्ट करण्याची गरज आहे. जे दहशतवादाला आश्रय देतात, मदत करतात त्यांचीही गय करता कामा नये. सगळे जग होरपळत आहे, दोन दिवसांपासून दूरचित्रवाणीवर सिरियामधल्या एका लहान मुलीची छबी पाहून डोळ्यात पाणी येते. निर्दोष व्यक्तींना कशा प्रकारे मारले जात आहे, आणि म्हणूनच आज आपण रावण वध, रावणाच्या पुतळ्याचे दहन करत आहोत तेव्हा केवळ भारताने नव्हे तर संपूर्ण जगाने, केवळ तुम्ही आणि मी नव्हे तर जगातल्या मानवतावादी शक्तींनी एकजूट होऊन दहशतवादाविरोधातला लढा द्यायला हवा. दहशतवाद नष्ट केल्याशिवाय मानवतेचे रक्षण शक्य नाही.
बंधू-भगिनींनो, आपल्याकडे समाजातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या नष्ट करण्याची प्रेरणा आपण विजयादशमीतून घेतली पाहिजे. रावण रुपी त्या गोष्टी छोट्या असतील पण त्या आहेत मात्र रावणाचेच रूप. दुराचार, भ्रष्टाचार आपल्या समाजाला बरबाद करणारा रावण नाहीतर कोण आहे? त्यालाही नष्ट करण्यासाठी देशाच्या नागरिकांना संकल्प करावा लागेल.
अस्वच्छता हे ही रावणाचेच छोटे रूप आहे. ही अस्वच्छता आपल्याकडच्या गरीब बालकांचा प्राण घेते. आजारपण गरीब कुटूंबाना उध्वस्त करते. अस्वच्छतेपासून आपण मुक्ती मिळवली, अस्वच्छता रुपी रावणापासून मुक्त झालो तर देशातली मृत्यूला सामोरी जाणारी अल्पायुषी करोडो कुटूंबे आपण वाचवू शकतो, आजारपणाला बळी पडणारी ही कुटूंबे आपण वाचवू शकतो. अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, हे समाजाला नष्ट करणारे दोष आहेत. त्यापासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प आपण करायला हवा. आज एकीकडे आपण विजयादशमी साजरी करत आहोत तर दुसरीकडे संपूर्ण जग आज बालिका दिनही साजरा करत आहे. आज मी स्वतःला विचारू इच्छितो, देशवासियांना विचारू इच्छितो, की सीतामातेला पळवणाऱ्या रावणाच्या पुतळ्याचे दहन आपण दरवर्षी करतो, आणि हे पिढ्यानपिढ्या सुरु राहील कारण रावणाने सीतामातेचे अपहरण केले होते; मात्र आपण कधी विचार केला आहे की संपूर्ण जग आज बालिका दिन साजरा करत आहे त्या पार्श्वभूमीवर मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करत किती सीताना आपण गर्भातच मृत्युमुखी धाडले आहे? आपल्यातल्या या रावणाला कोण नष्ट करेल? आजच्या 21 व्या शतकातही मुलींना गर्भातच मारले जाईल? सीतामातेसाठी जटायू बलिदान देऊ शकतो तर आपल्या घरात जन्म घेणाऱ्या सीतेला वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. घरात मुलाचा जन्म झाल्यानंतर जेवढे स्वागत केले जाते त्यापेक्षा मोठे स्वागत मुलीच्या जन्मानंतर करणे हा आपला स्वभावधर्म बनायला हवा.
या वेळेचे ऑलिम्पिक पहा ना, आपल्या देशाच्या कन्यांनी देशाचे नाव उज्वल केले. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करणे म्हणजे रावणरूपी मानसिकतेचा अंश आहे. शिक्षित असू दे, अशिक्षित असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, शहरातला असू दे, ग्रामीण भागातला असू दे, हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असु दे, बौद्ध असू दे, कोणत्याही समाजाचा असू दे, कोणत्याही आर्थिक परिस्थितीतील असू दे, कोणत्याही सामाजिक परिस्थितीतील असू दे, मात्र मुलगा मुलगी हा भेदभाव असता कामा नये, महिलांना समान अधिकार असायला हवेत, महिलांना 21 व्या शतकात न्याय मिळायला हवा, मग त्या कोणत्या परंपरेशी जोडल्या गेलेल्या असल्या तरी, कोणत्याही समाजाच्या असल्या तरीही. महिलांचा गौरव करणाऱ्या या युगाचा आपण स्वीकार करायला हवा. मुलींचा गौरव करायला हवा, मुलींना वाचवायला हवे. आपल्यामध्ये वसणाऱ्या रावणाच्या या रूपापासून देशाला मुक्ती द्यायला हवी. म्हणून लक्ष्मणाच्या नगरीत आलो आहे, गोस्वामी तुलसीदास यांच्या भूमीवर आलो आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातही युद्ध होते, रामाच्या जीवनातही युद्ध होते मात्र आपण असे लोक आहोत जे युद्धाकडून बुद्धाकडे वाटचाल करतात. काळाच्या बंधनानुसार, परिस्थितीची गरज म्हणून युद्ध कधी कधी अनिवार्य होते मात्र या धरतीवरचा मार्ग युद्धाचा नव्हे तर बुद्धाचा आहे. हा देश सुदर्शन चक्रधारी मोहनला युगपुरुष मानतो, ज्याने युद्धभूमीवर गीता सांगितली, हा देश चरखाधारी मोहन ज्यांनी अहिंसेचा संदेश दिला, त्यांनाही युगपुरुष मानतो. हेच या देशाचे वैशिष्ट्य आहे की तराजूची दोनही पारडी समतोल ठेवणारा हा देश आहे. म्हणूनच युद्धाकडून बुद्धाकडे मार्गक्रमणा करणारे हे लोक आहेत. आपल्यातल्या रावणाचा नाश करण्याचा संकल्प करणारे हे लोक आहेत. आपला देश सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प हाती घेतलेले हे लोक आहेत.
अतिशय प्राचीन अशा या रंगमंचावर इथे रामलीला होते, अनेक पिढयामधली मुले कधी राम आणि लक्ष्मणाच्या रूपात तर कधी सीतामाईच्या रूपात या स्थानी त्यांची पाऊले पडतात, त्या क्षणी ते मानव नसतात, ते त्या नाट्यातली व्यक्तिरेखा नसतात, ते भक्तिरसात न्हाऊन निघालेले असतात, ते परमात्मास्वरूप बनलेले असतात. आपल्या मनात वसणाऱ्या रावणाच्या विरोधात, मग तो जातीवाद असू दे, वंशवाद असू दे, उच्च-नीच भेदभाव असू दे, या साऱ्या वाईट गोष्टी रावणाचीच रूपे आहेत, आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी आणि एकसंध हिंदुस्थान, समान हिंदुस्थान या संकल्पपूर्तीसाठी विजयादशमीच्या या पवित्र पर्वात प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू देत, सदैव मानवतेच्या मार्गावर राहण्याची शक्ती आम्हाला मिळू दे, बुद्धांचा मार्ग आमचा मार्ग राहू दे, ही अपेक्षा बाळगत आपणा सर्वाना विजयादशमीच्या खूप-खूप शुभेच्छा. माझ्यासमवेत बुलंद आवाजात म्हणा, जय श्रीराम. आवाज दूरपर्यंत पोहोचला पाहिजे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम.
B.Gokhale/N.Chitale/Anagha
My greetings on the auspicious occasion of Vijaya Dashmi: PM @narendramodi begins his speech at Lucknow
— PMO India (@PMOIndia) October 11, 2016
This land has given us Shri Ram and Shri Krishna. Am fortunate to have come here to join the Vijaya Dashmi celebrations: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2016
This festival is about the victory of good over evil: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2016
The uniqueness of this nation is- our traditions have been kept alive, generation after generation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2016
Terrorism is an enemy of humanity: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2016
Everyone has to speak in one voice against terrorism: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 11, 2016