Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसीमधल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष दीक्षांत कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

वाराणसीमधल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष दीक्षांत कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन


सर्व विद्यार्थी मित्र आणि त्यांचा पालकवर्ग,

इथल्या विद्यापीठ विभागाचे सदस्य, उपस्थित मान्यवर,

दीक्षांत समारंभात जाण्याची संधी मला याआधीही मिळाली आहे. अनेक ठिकाणी जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. मात्र एका विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या दीक्षांत समारंभात हजर राहण्याचे भाग्य वेगळेच. मी भारतरत्न महामना यांना वंदन करतो की त्यांनी 100 वर्षापूर्वी जे बी पेरले होते त्याचा आज इतका विशाल, ज्ञानाचा, विज्ञानाचा आणि प्रेरणेचा वृक्ष झाला आहे.

दूरदृष्टी असलेले महापुरुष कोण असतात, कसे असतात? आपल्याच काळातल्या समकक्ष व्यक्तींना जेव्हा ही व्यक्ती दूरदृष्टी लाभलेली आहे, दृष्टेपण लाभलेली आहे असे म्हणतो तेव्हा जास्त लक्षात येत नाही की ही दूरदृष्टी काय असते, दृष्टेपण काय असते? मात्र 100 वर्षांपूर्वी महामना यांचे हे कार्य पाहिल्यावर लक्षात येते की दूरदृष्टी लाभलेला, दृष्टा कोणाला म्हणतात. गुलामीच्या त्या काळात देशाच्या भावी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आणि हा देश कसा असावा, स्वतंत्र भारताचे रंग-रुप कसे हवे, याचे केवळ स्वप्न नव्हे तर या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वात प्राथमिक आवश्यकता काय असू शकते? आणि ती म्हणजे ही स्वप्ने साकार करणारा मानवी समुदाय घडवणे. अशी सामर्थ्यवान, समर्पित मानवी साखळी, शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातूनच होऊ शकते आणि या बाबींची पूर्तता करण्यासाठी महामना यांनी या विद्यापीठाचे स्वप्न पाहिले. इथे इंग्रजांचे राज्य होते, तेही विद्यापीठांची निर्मिती करत होते. मात्र जास्त करुन कोलकाता, मुंबई अशा ठिकाणी त्यांचा हा प्रयत्न होता. आपला कारभार दीर्घ काळ सुरुच ठेवेल अशी माणसे घडविणे हा त्यांचा हेतू होता. तर महामना अशा महापुरुषांना निर्माण करु इच्छित होते की जे भारताची महान परंपरा कायम राखत राष्ट्राच्या निर्मितीसाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी सामर्थ्याने उभे राहतील आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर उभे राहतील. संस्काराची शिदोरी घेऊन पुढे वाटचाल करतील असे स्वप्न त्यांनी पाहिले होते.

जे काम त्यांनी केले त्यानंतर सुमारे 15-16 वर्षानंतर महात्मा गांधींनी गुजरात विद्यापीठाच्या रुपाने असे काम केले. दोघेही देशांसाठी कार्य करणारे युवक घडवू इच्छित होते. मात्र, आज आपण पाहत आहोत की महामना यांनी कोणते बीज पेरले होते, संपूर्ण शतकात किती श्रेष्ठ मान्यवरांनी, किती समर्पित शिक्षकांनी आपले ज्ञान, आपली मेहनत इथे कामी लावली. या अगणित थोर पुरुषांच्या कार्यामुळे या विशाल वटवृक्षाच्या छायेखाली ज्ञानार्जन करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. म्हणूनच महामना यांच्याप्रती आदरपूर्वक भावना बाळगतानाच या संपूर्ण शतकभराच्या प्रवासात, हे महान कार्य पुढे चालविण्याच्या कामी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे. ज्या ज्या प्रकारे योगदान दिले आहे, ज्या ज्या वेळी योगदान दिले आहे, त्या सर्व मान्यवरांना मी प्रणाम करतो.

एका शतकाच्या वाटचालीत लाखो युवक इथुन बाहेर पडले. सुमारे शंभर वर्षांच्या या प्रवासात इथुन बाहेर पडलेल्या युवक-युवतींनी जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. कोणी डॉक्टर झाला असेल, कोणी इंजिनियर झाला असेल, कोणी शिक्षक बनला असेल, कोणी प्राध्यापक झाला असेल, कोणी नागरी सेवेत दाखल झाला असेल, कोणी उद्योगपती बनला असेल. भारतात एक काळ असा होता की कोणतीही व्यक्ती, कुठल्याही क्षेत्रात काम करताना, तिथे त्याने कितीही उंची गाठलेली असू दे, कितीही प्रतिष्ठा प्राप्त केलेली असू दे मात्र आपला परिचय देताना तो अभिमानाने सांगत असे की मी बनारस हिंदू विद्यापीठाचा विद्यार्थी आहे.

माझ्या युवा मित्रांनो, एका शतकभरात या धरतीवर लाखो युवक शिक्षित होऊन तयार झाले आणि ज्या क्षेत्रात गेले, जिथे गेले त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाशी आपले नाते कायम राखले एवढेच नव्हे तर आपल्या यशाचे श्रेय बनारस हिंदू विद्यापीठाला द्यायला संकोचही केला नाही. हे फार क्वचित आढळते. कारण जीवनात यशाचे शिखर जेव्हा एखादी व्यक्ती गाठते तेव्हा त्या व्यक्तीला वाटते की हे मी मिळवले आहे, माझ्यामुळे झाले आहे, मी शोध घेतल्यामुळे झाले. मात्र हे बनारस हिंदू विद्यापीठ आहे, ज्यामधून गेल्या 100 वर्षात बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी एकमुखाने सांगितले. जिथे गेले तिथे सांगितिले की हे सर्व बनारस हिंदू विद्यापीठामुळे प्राप्त झाले आहे.

एका संस्थेची शक्ती काय असते, एक शिक्षित व्यक्ती जीवन कोठून कुठे नेऊ शकते. मात्र कधी-कधी प्रश्न उत्पन्न होतो की बनारस हिंदू विद्यापीठाचा विद्यार्थी बनारस हिंदू विद्यापीठाला गौरवाचा मान देतो. मात्र भारताच्या काना-कोपऱ्यात, सव्वाशे कोटी देशवासियांच्या मनात बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रती हा श्रद्धा भाव निर्माण झाला आहे का? अशी कोणती कार्यशैली आली, अशी कोणती विचारधारा आली, अशी कोणती अडचण आली की इतकी महान परंपरा, इतक्या महान संस्थेने, हिंदुस्तानच्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्यात कुठे ना कुठे संकोच केला. आज काळाची गरज आहे की केवळ हिंदुस्तान नव्हे तर संपूर्ण जगाला दाखविण्याची की भारताच्या या भूमीवर अनेक शतकांपूर्वी ज्या नालंदा, तक्षशिला यांच्याबद्दल आम्ही अभिमान बाळगतो, आगामी काळात आम्ही हिंदुस्तानी या नात्याने बनारस हिंदू विद्यापीठाबाबतही अभिमान बाळगू. हा भारताचा वारसा आहे, भारताची संपत्ती आहे. शतकभराच्या कार्यातून निर्माण झालेला ठेवा आहे, लाखो लोकांच्या तपस्येचा हा परिपाक आहे की आज बनारस हिंदू विद्यापीठ इथे उभे आहे, आणि म्हणूनच आपलेपणाच्या भावनेचा, आपल्या गोष्टींचा, आपल्या परंपरेचा गौरव करणे, ताकदीने करणे, जगाला सत्य समजवण्यासाठी शक्तीनिशी करणे, अशीच जगाची भारताकडून अपेक्षा आहे.

मी कधी कधी विचार करतो योगाबाबत. योग ही काही नवी गोष्ट नाही. भारतात शतकांनुशतकं योगसाधनेची परंपरा चालत आली आहे. जगातल्या वेगवेगळ्या भागात, योगाकडे वेगवेगळ्या रुपानं जिज्ञासेने पाहिले गेले आहे. मात्र आपला योग हे आपले सामर्थ्य आहे आणि त्याद्वारे आपण जगाला आपलेसे करु शकतो अशी आपली मानसिकता नव्हती. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने योगाचा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या रुपात स्वीकार केला. जगभरातले 192 देश यात सहभागी झाले आणि जगाने त्याचे गुणगान केले अणि त्यात सहभागी होऊन आनंद घेतला. आपल्याजवळ जे काही आहे त्याचा आपण अभिमान बाळगला, गौरव केला तर जग आपल्याबरोबर वाटचालीसाठी तयार होते. हा विश्वास जेव्हा ज्ञानाच्या अधिष्ठानावर उभा असतो, प्रत्येक विचार तावून-सुलाखून निघालेला असतो तेव्हा त्याचा स्वीकार अधिकच मोठ्या प्रमाणात होतो. बनारस हिंदू विद्यापीठाद्वारे हा प्रयत्न अखंड सुरु आहे.

आज ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली, त्यांचे त्यांच्या कुटुंबियांचे मी मनापासून अभिनंदन करतो. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीक्षांत समारंभात पदवी मिळाली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचेही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हा दीक्षांत समारंभ आहे. मात्र मनात हा विचार कधीही आणू नका की हा शिक्षांत म्हणजे शिक्षणाचा अंत आहे. कधी कधी मला वाटते दीक्षांत समारंभ खऱ्या अर्थाने शिक्षणाचा आरंभ समारंभ असायला हवा. हा शिक्षण संपल्याचा समारंभ नाही आणि दीक्षांत समारंभाचा सर्वात मोठा संदेश असतो तो म्हणजे जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल, बदलत्या काळानुरुप आपले आयुष्य त्याच्याशी जोडलेले ठेवायचे असेल, तर त्याची पहिली अट असते ती म्हणजे आपल्यातला विद्यार्थी कधी संपता कामा नये, कोमेजता कामा नये. जीवनाच्या अंतापर्यंत जो विद्यार्थीदशा जपण्याचा प्रयत्न करतो, आपल्यातला विद्यार्थी कायम ठेवतो, तोच या जगात, या विशाल दुनियेत, या विशाल व्यवस्थेचे विविध पैलू अनुभवू शकतो, काही प्रमाणात मिळवू शकतो. दीक्षांत समारंभातून बाहेर पडल्यानंतर आपल्यासमोर एक विशाल जग आहे. पहिल्यांदा आपण या काही चौरस किलोमीटरच्या परिसरात जगत होतो. परिचित लोकांशीच गाठ-भेट होत असे. परिचित विषयांशीच संबंध येत असे मात्र अचानक या जगातून बाहेर पडून एका विशाल जगात आपण पाऊल टाकत आहोत. ही सामान्य बाब नव्हे. एकीकडे आनंद असतो की मी इतकी मेहनत केली. तीन वर्ष, चार वर्ष, पाच वर्ष या परिसरात राहिलो. जितके शक्य होते तेवढे मी घेतले, प्राप्त केले. मात्र आता इथून बाहेर पडताच जगाची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलते.

जोपर्यंत मी विद्यार्थी होतो तोपर्यंत कुटुंबिय, समाज, मित्र, सर्वजण कौतुक करत होते, खूप छान, चांगले करत रहा, खूप शिक, प्रगती कर, मात्र मी पदवी प्रमाणपत्र घेऊन आल्यावर लगेच प्रश्न उपस्थित केला जातो की, पुढे काय करणार सांग, परिक्षा द्यायला गेलो तेव्हा तर सगळे जण प्रोत्साहन देत होते, मदत करत होते आणि पदवी-प्रमाणपत्र घेऊन घरी आल्यावर सगळे विचारायला लागतात, आता पुढे काय? आमची जबाबदारी पूर्ण झाली आता सांग तू कोणती जबाबदारी निभावणार आणि इथूनच जीवनाच्या परीक्षेला सुरुवात होते म्हणूनच विज्ञानाचे दोन भाग असतात, एक विज्ञान आणि दुसरे उपयोजित विज्ञान. जीवनात जे ज्ञान प्राप्त केले आहे त्याचा वापर करण्याचा आपला काळ आता सुरु होतो, त्यात आपण टिकाव कसा धरु शकतो. त्यासाठी आपण आपल्याला कसे योग्य बनवतो. कधी-कधी या परिसरातल्या चार भिंतीत, वर्गातल्या चार भिंतीमधे शिक्षकांच्या सहवासात, प्राचार्यांच्या सानिध्यात अनेक गोष्टी सोप्या, सरळ भासतात. मात्र एकट्याला जेव्हा त्या कराव्या लागतात तेव्हा वाटते अरेरे मी त्यावेळी लक्ष दिले असते तर बरे झाले असते. त्यावेळी तर मी मित्रांबरोबर सरांची थट्टा करत होतो. हे शिकायचे राहूनच गेले. मी तेव्हा पाहिले असते तर बरे झाले असते अशा अनेक गोष्टी आठवतील. संपूर्ण आयुष्यभर विद्यापीठातल्या या गोष्टी आठवत राहतील. काय राहून गेले, ते राहून गेले नसते, तर मी आज कुठे असतो? प्रत्येक क्षणा-क्षणाला या गोष्टी आठवत राहतात.

माझ्या युवा मित्रांनो, इथे शिस्तीबाबत कुलगुरुंनी एक परंपरागत संदेश आता सांगितला. आपणा सर्वांना माहित आहेच की आपल्या देशात शिक्षणानंतर दीक्षा ही हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे. तैतृक उपनिषदात याचा सर्वप्रथम उल्लेख आढळतो. ज्यामधे पहिला दीक्षांत समारंभ रेखाटला आहे. तेव्हापासून भारतात हे, दीक्षांत समारंभाची परंपरा चालत आली आहे आणि आजही हा दीक्षांत समारंभ एक नवी प्रेरणा देणारा ठरतो. जीवनात आपण बरेच काही कराल, मात्र मी सांगितले त्याप्रमाणे आपल्यातला विद्यार्थी कायम जागता ठेवा, तो कोमेजता कामा नये. जिज्ञासा, विकासाची मुळे मजबूत करते. जिज्ञासा संपली की जीवन ठप्प होते. वय कितीही असे ना, म्हातारपण येऊ दे, प्रत्येक क्षणी जीवन नवीन कसे राहील, प्रत्येक क्षण चेतनादायी कसा राहील, प्रत्येक क्षणी नवे करण्याची उर्मी तशीच राखली पाहिजे, ज्याप्रमाणे 20 वर्षांपूर्वी नवे काही करण्याची उर्मी होती. तेव्हा पहा जीवन जगण्यातला आनंद काही खासच असतो. जीवन कधी कोमेजता कामा नये. कधी कधी मला वाटते कोमेजण्याऐवजी चांगले आहे ते नष्ट होणे. जीवन प्रफुल्ल हवे. संकटे झेलण्याचे सामर्थ्य आले पाहिजे आणि जो हे सामर्थ्य प्राप्त करतो तो जीवनात कधी अयशस्वी ठरत नाही. मात्र प्रासंगिक गोष्टींनी डगमगून जातो. काळोख दाटल्यासारखा वाटतो त्या वेळी ज्ञानाचा प्रकाशच आपल्याला मार्ग दाखवितो. म्हणूनच बनारस हिंदू विद्यापीठाच्या या धरतीवरुन जे ज्ञान प्राप्त केले आहे, ते प्रत्येक संकटाच्या वेळी आपल्याला मार्ग दाखविण्यासाठी, प्रकाश दाखविण्याची संधी प्राप्त करुन देते.

देश आणि जगातही अनेक आव्हाने आहेत. त्या आव्हानांसंदर्भात भारत आपली भूमिका निभावू शकतो का? आपली ही संस्था, आपले विद्यार्थी यांनी येत्या काळात मानव जातीला, संपूर्ण जगाला काही देण्याचे स्वप्न का पाहू नये? आणि माझी इच्छा आहे की बनारस हिंदू विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हा भाव सदैव असला पाहिजे की आहे त्यापेक्षा चांगले तर करुच मात्र मी असं काही करेन जे येणाऱ्या अनेक युगांपर्यंत टिकून राहील.

नवनवे शोध हा समाज जीवनाच्या शक्तीचा एक आधार असतो. नवे संशोधन फक्त पीएचडी प्राप्त करण्यासाठी, कट पेस्ट अर्थात कापा आणि चिकटवा या पुरते नव्हे. मी विचार करत होते की बनारस हिंदू विद्यापीठाला ही बाब कदाचित माहितीही नसेल पण आपल्याला नक्कीच माहिती असेल. मात्र मला विश्वास आहे की आपण याचा उपयोग करत नसाल. आपल्याला आवश्यक आहेत शोध. गेले काही दिवस एक गोष्ट माझ्या मनाला वेदना देत आहे. जगातल्या काही नोबेल पारितोषिक प्राप्त व्यक्तींना भेटायला गेलो होते ज्यांनी वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात कार्य केले आहे. त्यांच्या समोर मी एक विषय मांडत असे. माझ्या देशात जे आदिवासी बंधू-भगिनी आहेत, ते ज्या भागात राहतात त्या पट्ट्यात सिकल-सेल नावाचा आजार परंपरागत आहे. माझ्या आदिवासी कुटुंबांना उद्‌ध्वस्त करत आहे. कर्करोगापेक्षाही भयानक आणि व्यापक आहे. आज विज्ञानाने, नव-नव्या शोधांनी, कर्करुग्णांसाठी नव नव्या गोष्टी येत आहेत, तर सिकल सेलने पीडीत माझ्या आदिवासी बंधू-भगिनींसाठी विज्ञान काही आणू शकते का? माझे युवा मित्र काही नावीन्यपूर्ण घेऊन येऊ शकतात का? त्यांनी स्वत:ला वाहून घ्यावे, शोध घ्यावा, कदाचित जगातल्या दुसऱ्या देशातली व्यक्ती जे देऊ शकेल त्यापेक्षा जास्त इथे असणारी व्यक्ती देऊ शकेल, कारण ती व्यक्ती इथली वृत्ती, प्रवृत्ती, परिसर आवड-निवड यांच्याशी परिचित आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून माझ्या अपेक्षा आहेत की देशाच्या या समस्या आहेत, त्या समस्यांच्या निराकरणासाठी, येता काळ लक्षात घेऊन आपण काही देऊ शकतो का?

जागतिक तापमान वाढ, हवामानबदल यामुळे संपूर्ण जग चिंतीत आहे. जगभरातल्या सगळ्या देशांचे नेते आता पॅरिसमधे भेटले. COP-21 मधे 2030 पर्यंत संपूर्ण विश्वाचे तापमान 2 अंशाने कमी करायचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे कसे साधायचे यावर संपूर्ण जग विचारविनिमय करत आहे कारण हे जर केले नाही तर किती बेटे बुडतील, समुद्र किनाऱ्यालगतची किती शहरे पाण्याखाली जातील, याचा अंदाजच नाही. जागतिक तापमानवाढीमुळे काय होईल? याबाबत सारे जग चिंतातुर आहे. निसर्गावर प्रेम करण्याचे बाळकडू मिळालेली आपण माणसे आहोत. आपण असे लोक आहोत ज्यांनी संपूर्ण ब्रम्हांड हेच एक कुटुंब मानले आहे. आपल्या नसा-नसात हे तत्वज्ञान भिनलेले आहे. मूल लहान असताना त्याची आई त्याला शिकवण देते की, बाळा, हा सूर्य आहे ना ते तुझे आजोबा आहेत आणि चंद्र आहे ना तो तुझा मामा, वृक्षांमधे परमात्मा आहे, असे मानतो आणि नदीला मातेसमान मानतो. हे संस्कार आहेत इथे, निसर्गाची हानी हा इथे गुन्हा मानला जातो. निसर्गाचा ऱ्हास हा या धरतीवर गुन्हा मानला जातो. जागतिक तापमानवाढीच्या संकटापासून जगाला वाचविण्यासाठी एखादा नवा आधुनिक शोध माझे वैज्ञानिक घेऊ शकतात का, माझ्या संस्था घेऊ शकतात का ? समस्यांच्या निराकरणासाठी ठोस मार्ग दाखवू शकतात का ? माझ्या संस्था घेऊ शकतात का ? समस्यांच्या निराकरणासाठी ठोस मार्ग दाखवू शकतात का ? 2030 पर्यंत जगाने जे संकल्प केले आहेत त्‍यापेक्षा जास्त करण्याचा निश्चय भारताने केला आहे. कारण अनेक शतकांपासून आम्ही हे मानत आलो आहे की निसर्गाबरोबर संवाद असायला हवा, निसर्गाबरोबर संघर्ष असता कामा नये.

आता आम्ही दोन उपक्रम हाती घेतले आहेत. एक म्हणजे अमेरिका, फ्रान्स, भारत आणि बिल गेटस्‌ यांची समाजसेवी संस्था असे सर्व मिळून एका शोधाबाबत काम करता आहेत. नवीकरणीय ऊर्जा परवडणाऱ्या दरात कशी उपलब्ध करुन देता येईल, सौर ऊर्जा वाजवी दरात कशी देता येईल, ही ऊर्जा अखंड कशी राखता येईल यावर काम सध्या सुरु आहे. दुसरा म्हणजे जगातल्या ज्या देशात 300 दिवसांपेक्षा जास्त स्वच्छ सूर्यप्रकाश असतो अशा देशांची संघटना केली आहे. जगातल्या 122 देशांत जिथे सूर्याचा मुबलक प्रकाश आहे अशा देशांची जगात प्रथमच एक संघटना झाली आहे, आणि त्या संघटनेची जागतिक राजधानी हिंदुस्थानमध्ये ठेवण्यात आली आहे. त्याच्या सचिवालयाचे, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी नुकत्याच केलेल्या दौऱ्यात उद्‌घाटन झाले. समाज, देश जग संकटांचा मुकाबला करत आहे.

उत्तर प्रदेशातला आमचा ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असतो. मात्र ऊसाच्या मळीपासून इथेनॉल बनवले, पेट्रोलियम उत्पादनात त्याचा वापर केला तर पर्यावरणालाही ते उपयुक्त ठरते आणि माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचाही फायदा होऊ शकतो. माझ्या बनारस हिंदू विद्यापीठात याबाबत संशोधन होऊ शकते की इथेनॉलचा आम्ही जास्तीत जास्त वापर कसा करु, कोणत्या प्रकारे करु जेणेकरुन उत्तर प्रदेशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचाही फायदा होईल, माझ्या देशाच्या पर्यावरणालाही ते उपकारक ठरेल, मानवतेच्या कल्याणासाठी ते उपयुक्त ठरेल आणि वाहन चालविणाऱ्या व्यक्तीलाही ते थोडे स्वस्त दरात मिळेल. अशा गोष्टींच्या शोधांची गरज आहे.

सौर ऊर्जेवर आम्ही काम करत आहोत. भारताने 175 गिगावॅट सौर ऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे, नवीकरणीय ऊर्जेचे स्वप्न ठेवले आहे. मात्र सौर ऊर्जेची जी सध्या उपकरणे आहेत त्यांना काही मर्यादा आहेत. नवनिर्मितीद्वारे, अधिक लाभ देणारी अधिक ऊर्जा मिळवू शकणारी उपकरणे विकसित करु शकतो का ? माझ्या युवा मित्रांनी हे आव्हान पेलावे, यासाठी या बनारस हिंदू विद्यापीठाच्या धरतीवरुन मी हिंदुस्तान आणि जगभरातल्या युवकांना आवाहन करत आहे. आगामी काळात, शतकात मानवजातीला ज्या संकटांचा मुकाबला करावा लागणार आहे त्या संकटातून मार्ग काढण्यासाठी, त्‍याचा शोध घेण्यासाठी आपण स्वत:ला वाहून घेऊ या. मित्रांनो स्वप्न भव्य असली पाहिजेत. स्वत:साठी बरेच जण जगतात, स्वप्नांसाठी आयुष्य वेचणारी स्वत:चे प्राण अर्पण करणारे फारच कमी असतात, आणि आपल्यासाठी नव्हे तर स्वप्नांसाठी जे जगतात तेच लोक जगात काही करुन दाखवतात.

तुम्हाला एका गोष्टीचे आश्चर्य वाटेल की इथे आज माझे स्वत:चे काही पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना बघुन तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे माझे जे पाहुणे आहेत, ज्यांच्यासाठी मी विद्यापीठाला विशेषकरुन आग्रह केला की या दीक्षांत समारंभात, जिथे सर्व युवावर्ग उपस्थित असतो, त्या कार्यक्रमाला या माझ्या पाहुण्यांना अवश्य बोलवा. सरकारी शाळेत काही विद्यार्थी येथे आले आहेत, ते माझे खास पाहुणे आहेत. मी त्यांना यासाठी बोलावले आहे आणि जिथे जिथे दीक्षांत समारंभासाठी मी विद्यापीठात जातो तिथे माझा आग्रह असतो की त्या ठिकाणच्या शाळांमध्ये शिकणारे गरीब विद्यार्थी आहेत अशा 50-100 विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला बोलवा. त्यांना पाहू दया दीक्षांत समारंभ काय असतो. हा दीक्षांत समारंभ कसा असतो ? या प्रकारच्या वेशभूषेत पदवीप्राप्त विद्यार्थी का येतात ? त्यांच्या हातात काय दिले जाते ? गळ्यात काय घातले जाते ? या मुलांच्या स्वप्नांना खतपाणी देण्याचे छोटेसे काम आज येथे होत आहे. आश्चर्य वाटेल, की या सर्व व्यवस्थेत ही एक लहानशी घटना आहे, मात्र या छोटयाशा घटनेतही एक फार मोठे स्वप्न दडलेले आहे. माझ्या देशातल्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांला अशा गोष्टी बघण्याची संधी मिळत नाही. माझा आग्रह असतो की या मुलांनी या गोष्टी बघाव्यात आणि मी विश्वासाने सांगातो की आज ही मुले हा कार्यक्रम बघत आहेत, त्यांच्या मनातही हा विचार मूळ धरु लागला असेल की मी पण कधी येथे येईल, मलाही तिथे जाण्याची संधी मिळेल, कधी माझ्याही डोक्यावर ती पगडी असेल, माझ्याही गळयात पाच-सात पदके असतील, हे स्वप्न ही मुले पाहत असतील.

ज्या मुलांना आज सुवर्णपदक मिळाले आहे त्‍यांनी शाळेत या मुलांना अवश्य भेटावे, त्यांच्याशी गप्पा माराव्या, त्यांच्यात एक विश्वास निर्माण करावा. हाच तर आहे दीक्षांत समारंभ, आपले काम येथूनच सुरु होते. आज इथुन जे लोक बाहेर पडत आहेत, जे युवक आज समाजजीवनाच्या आपल्या जबाबदारीच्या दिशेने पाऊल टाकत आहेत ते मोठया जबाबदारीच्या दिशेने जात आहेत. भिंतीच्या मर्यादा ओलांडून, मोकळया आकाशाखाली, संपूर्ण जगाच्या जवळ पोहोचत आहेत, तेव्हा येथून जे काही प्राप्त केले आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, तुमच्यामधले सामर्थ्य जागे करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या कायम तुमच्या मनात जागत्या ठेवा. जीवनाच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला सुयश मिळावे या आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद.

N.Chitle / S. Tupe / M. Desai