Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी येथे 22.01.2016 रोजी सामाजिक अधिकारिता शिबीरादरम्यान मदत व सहाय्यक साधनांच्या वितरणाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

वाराणसी येथे 22.01.2016 रोजी सामाजिक अधिकारिता शिबीरादरम्यान मदत व सहाय्यक साधनांच्या वितरणाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

वाराणसी येथे 22.01.2016 रोजी सामाजिक अधिकारिता शिबीरादरम्यान मदत व सहाय्यक साधनांच्या वितरणाप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी कलराज मिश्र, या विभागाचे माझे सहकारी, थावरचंद, रेल्वेमंत्री आणि भूमीपूत्र बंधु मनोज सिन्हा, कृष्णपाल, विजय सांपला, राज्य सरकारचे मंत्री बलराम, केंद्र शासनाचे सचिव लव वर्मा, ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डसचे सदस्य आणि भारतात तसेच जगभर विधवांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत असलेले लॉर्ड लुम्बा, त्यांच्या पत्नी, आणि आज मला ज्यांचे दर्शन करण्याचे भाग्य लाभले असे सर्व दिव्यांग बंधु-भगिनींनो आणि काशीतील उपस्थित माझ्या प्रिय बंधु आणि भगिनिंनो..

आज मी काशीमध्ये आलो आहे, तेंव्हा विशेषत्वाने दोन मान्यवरांचे पुण्यस्मरण करु इच्छितो. एक जयस्वाल, आणि दुसरे हरीश, या दोन मान्यवरांनी आयुष्यभर या क्षेत्राची सेवा केली आहे आणि ते आता आपल्यामध्ये नाहीत. मी त्यांचे पुण्यस्मरण करतो, त्यांना माझी आदरांजली.

आज सकाळी शासकीय व्यवस्थेमुळे आमचे काही दिव्यांग लाभार्थी या कार्यक्रमासाठी येत असतांना बस उलटली, काहींना इजा झाली, दिल्लीहून मी निघालो त्याचवेळी मला हे वृत्त समजले, आमचे मंत्री महोदय ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. शासकीय अधिकारी पोहचले. काही जणांना अगदीच किरकोळ इजा झाली आहे. तर, काही जणांना काही दिवसांसाठी रुग्णालयात ठेवावे लागणार आहे. ही सर्व व्यवस्था सरकारकडून केली जाणार आहे. ही सर्व मुले लवकरात लवकर बरी व्हावी, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

आज आमच्यासमवेत डॉक्टर लुम्बा आणि त्यांच्या पत्नी आहेत. परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि परदेशातही विधवांच्या कल्याणासाठी हे काम करतात. काही दिवसांपूर्वी मला भेटले, तेंव्हा चर्चा झाली होती काशीमध्येसुद्धा विधवांसाठी काही तरी केले जावे आणि तेंव्हापासून त्यांनी काम सुरू केले आहे. त्या कामाला पुष्टी मिळत आहे. आमच्या या माता, भगिनी सन्मानपूर्वक जगाव्या यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे त्याबद्दल मी अभिनंदन करतो.

दोघं पती-पत्नी उत्साहाने याकामी व्यस्त आहेत आणि तुम्ही त्यांना कोठेही भेटा, लग्नसमारंभात भेटा, संसदेत भेटा, मी नुकताच ब्रिटनला गेलो होतो, संसदेत सर्वांना भेटत होतो तेंव्हा आमचे लुम्बाजी आले आणि लगेच विधवांविषयी चर्चेला सुरुवात झाली. मी लुम्बाजीना म्हणालो, मला दुसरे काही तरी काम करु द्या. आपल्या आईचे पुण्य स्मरण म्हणून हे काम त्यांनी हाती घेतले आहे, ते फार मन लावून काम करतात. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि विशेषत्वाने माझ्या काशी क्षेत्रातील सेवेमध्ये ते आपला वाटा उचलत आहेत म्हणून मी काशीचा प्रतिनिधी म्हणूनही आपले आभार व्यक्त करतो. आपले अभिनंदन करतो.

काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान भेटीसाठी आले होते. आता दोन दिवसांपूर्वी जपानच्या पंतप्रधानांचा जपानमध्ये एक भाषणाचा कार्यक्रम होता. बौद्ध चळवळी अंतर्गत ते भाषण होते पण मी इंटरनेटवर ते भाषण वाचले आणि मी पाहिले की, त्यांनी या भाषणात आपल्या काशी यात्रेचे जे वर्णन केले आहे, गंगा मातेचे वर्णन केले आहे, आरतीच्या वेळचे मनोभावे वर्णन केले आहे, प्रत्येक काशीवासी, प्रत्येक भारतीयांसाठी त्यांचे हे शब्द अभिमानास्पद आहेत की आमचा आपलेपणा किती व्यापक आणि विशाल आहे. मी जपानचे पंतप्रधान आबे यांचा आभारी आहे, त्यांनी जपानला गेल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी एवढ्या सविस्तरपणे आमच्या काशीचे गुणगान केले आहे, आमच्या गंगेचे गुणगान केले आहे, गंगा आरतीचे स्मरण केले आहे, मी यासाठीही त्यांचा खूप-खूप आभारी आहे.

आताच मी थावरचंदजींना ऐकत होतो. तुम्हाला माहिती असेल, जेंव्हा लोकसभा निवडणूक पूर्ण झाली आणि संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्यांनी माझी नेतेपदी निवड केली, पंतप्रधानपदाच्या जबाबदारीसाठी मला निवडण्यात आले आणि त्या दिवशी माझे एक भाषण होते, त्या भाषणात मी म्हटले होते, हे जे सरकार आहे, हे सरकार गरींबाप्रती समर्पित आहे. दलित, पिडीत, शोषीत, वंचित ज्यांना आयुष्यात त्रास सहन करावा लागत आहे, त्यांच्यासाठी हे सरकार काही ना काही करण्याचे प्रयत्न करेल, हे मी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी जाहीर केले होते आणि तुम्ही आता पाहत असाल की सरकारच्या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी या देशातील गरीबांना विकासाचा लाभ कसा पोहचेल, गरीबांच्या आयुष्यात कसे परिवर्तन घडून येईल, त्या दिशेने निरंतर प्रयत्न सुरू आहेत.

आज काशीमध्ये हे जे शिबीर घेण्यात येत आहे, हे काही पहिले शिबीर नाही, नाहीतर काही लोकांना वाटेल की, हा पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे म्हणून याठिकाणी पाचही बोटं तुपात आहेत, म्हणून याठिकाणी शिबीर भरवण्यात आले आहे. असे नाही, यापूर्वीही असे 1800 शिबिरं भरवण्यात आली आहेत. लाखो लोकांना ही सुविधा पोहचवण्यात आली आहे, हे काही शेवटचे शिबीर नाही. यानंतरही देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात आमच्या दिव्यांग बंधु आणि भगिनींचा शोध घेऊन, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना काही साधने मिळतील का, जीवनाप्रती त्यांचा विश्वास वाढेल, काहीतरी करून दाखवण्याचा विश्वास मिळेल, त्यांच्या आयुष्यात सहजता येईल, सुख सुविधा मिळतील यादृष्टीने आज प्रयत्न सुरू आहेत, सुरुच राहतील.

सरकार पूर्वीसुद्धा होते. हा विभागही 1992 पासून सुरू आहे. सरकारमध्ये हा विभाग 1992 मध्ये सुरू झाला. निधीही देण्यात आला. पण मला सांगण्यात आले की, 1992 पासून 2014 पर्यंत मोठ्या मुश्किलीने 50,55,100 शिबीरं भरवण्यात आली. हे सरकार गरीबांसाठी धावणारे सरकार आहे, काही तरी करण्याची इच्छा असणारे सरकार आहे म्हणून तर एका वर्षाच्या आत 1800 शिबीरं भरवण्यात आली..अठराशे. वीस, बावीस, 25 वर्षात 100 शिबीरंही भरवण्यात आली नाहीत आणि एका वर्षात 1800 शिबीरं भरवण्यात आली आणि सरकार लाभार्थ्यांना शोधते, ज्यांचा हक्क आहे त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करते.

आम्ही जाणतो, कधी कधी सरकारी योजनांचा दुरुपयोग करणारे कमी नसतात, दलाल मैदानात येतात. ते एखाद्या गरजूजवळ जातील, त्यांच्यासोबत चर्चा करतील, त्याला म्हणतील हे बघ तुला हे मिळवून देतो. मधला एवढा वाटा आहे तो माझा असेल. तुला तीनचाकी सायकल देतो, मला काहीतरी दे. तुमच्यासाठी श्रवणयंत्राची व्यवस्था करतो, मला काहीतरी दे. अशाप्रकारचे शिबीर भरवण्याचा परिणाम हा झाला आहे की, मध्यस्थ हा प्रकार संपुष्टात आला आहे.

माझ्यावर कधी कधी जे जागतिक वादळ सर्व बाजूने सुरू असते, सकाळी उठल्यानंतर लक्षात येते, चोहोबाजूने हल्ला सुरू आहे, चोहोबाजूंनी लोक बोलत आहेत. त्यांना वाटते की, मोदी आपले तोंड, आपला मार्ग सोडून वेगळ्या मार्गावर येईल. वादामध्ये भर पडेल. पण माझा मंत्र आहे तो, देशातील पीडितांची, गरीबांची सेवा करणे आणि म्हणून मी विचलीत होत नाही. हे असे होत आहे कारण, व्यवस्थांमध्ये परिवर्तन घडून येत आहे. नट बोल्ट असे आवळले जात आहेत की ज्यामुळे दलालांची दुकाने बंद झाली आहेत आणि त्यामुळे हा सर्व प्रकार सुरू आहे. अशाप्रकारच्या व्यक्तींचा जरा त्रास होत असेल, पण त्यांच्या या त्रासामुळे मला मात्र काहीही त्रास होत नाही. मला जर काही त्रास आहे तो आहे माझ्या देशातील गरीबांच्या दुर्दशेचा. दलालांच्या त्रासामुळे मी दुःखी नाही.

आज याठिकाणी नऊ हजार व्यक्तींना या शिबिराच्या माध्यमातून काही ना काही साधने उपलब्ध करुन दिली जात आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, काशीमधील काम पूर्ण झाले. अजूनही नोंदणी सुरू आहे. तपासणी सुरू आहे, माहिती जमा केली जात आहे. आणखी जशा गोष्टी माझ्या लक्षात येतील त्यावेळी मी येईन अथवा येणार नाही पण काम सुरु राहिल, कामं सुरु राहतील. शेजारील जिल्ह्यांमध्येही भलेही ते काशी लोकसभा क्षेत्राचा भाग नसतील, त्याठिकाणीही हे काम केले जाईल आणि या सुविधा लोकापर्यंत पोचवल्या जातील.

मी याठिकाणी लहान लहान मुलांना भेटलो. त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर मला चमक दिसत होती कारण ती मुलं ऐकू शकत नव्हती. ऐकू शकत नव्हती म्हणून बोलू शकत नव्हती. जसेही ऐकणे सुरू झाले सोबतच बोलणेही सुरू झाले आणि जवळपास प्रत्येक मुलगा माझ्यासोबत काही ना काही बोलला. एक-दोन, एक-दोन शब्द प्रत्येक मुलाने म्हटले आणि त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर आनंदभाव दिसून आला. आता ही मुलं जन्मतः या अवस्थेत होते. मागच्या दिवसांमध्ये मी सार्वजनिक रुपाने माझ्या मन की बात कार्यक्रमात एक इच्छा व्यक्त केली होती की आम्ही विकलांग शब्द बदलून दिव्यांग शब्द वापरावा.

जगातील प्रत्येक देशात, प्रत्येक भाषेत अशाप्रकारच्या अवस्थेतील व्यक्तींसाठी नवनवीन शब्द आले. परिभाषा बदलली, सतत त्यात सुधारणा होत आहे. प्रत्येकजण नवनवीन पद्धतीने हा विषय हाताळत आहे. पण आमच्या देशात वर्षांपासून हाच शब्द रुढ आहे. तसे पाहिले तर अचानक हा शब्द बदलणे कठीण आहे. माझ्याही भाषणात बोलता-बोलता बहुतेक पाचवेळा तोच जूना शब्द आला. कारण ही सवय बदलण्यास वेळ लागेल. सरकारलाही नियमात बदल करावे लागतील, त्यासाठीची बरीच प्रक्रिया असते. पण आम्ही हळूहळू सुरुवात करु जेणेकरुन मोठे परिणाम दिसून येतील.

समजा एखादा व्यक्ती आपणास भेटला आणि परिचय करुन देताना सांगितले की, हे अमूक अमूक पुजारी आहेत. पुजारी म्हटल्यानंतर आपली नजर लगेच त्या व्यक्तीच्या कपाळाकडे जाते, गंध वगैर पाहतो. पुजारी म्हटले की कपाळावर गंध, टीळा लगेच दिसून येतो. कोणी सांगतो हे फार मोठे ज्ञानी आहेत. तर, लगेच आपल्या मनात विचार येतो की कोणत्या विषयाचे ज्ञान असेल. त्यांचे ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होते. आपली जर कोणाशी ओळख करुन देताना सांगितले की हे पैलवान आहेत. तर लगेच त्याच्या दंडाकडे आपले डोळे वळतात आणि किती मजबूत आहे असे वाटते. तशाचप्रकारे जर कोणी विकलांग म्हटले तर सर्वप्रथम आमची नजर शरीरात काय व्यंग आहे याकडे जाते. शरीराचा कोणता भाग दुबळा आहे यावर जाते. ही विचारसरणी बदलण्याचा माझा प्रयत्न आहे, अशा व्यक्तींना भेटल्यानंतर त्याची ओळख करुन देताना सांगावे हा दिव्यांग आहे, तर माझी नजर त्याच्यामध्ये कोणती असाधारण गुणवत्ता त्याला ईश्वराने दिली आहे यावर जाईल.

आम्ही डोळ्यांनी पाहतो, डोळ्यांनी वाचतो पण एक प्रज्ञाचक्षू बोटांनी वाचतो. तो ब्रेल लिपीवर आपली बोटं फिरवतो आणि वाचतो याचा अर्थ ते त्याचे दिव्यांग आहे. परमेश्वराने त्याला ही दिव्यता दिली आहे. या दिव्यतेने त्याला विकसित केले आहे आणि म्हणून जेंव्हा मी विकलांग ऐवजी दिव्यांग म्हणतो तेंव्हा ज्या ज्या वेळी आपण अशा परिवारांना भेटू, आपल्या व्यक्तींना भेटू, त्यावेळी त्याच्यामध्ये काय न्यून आहे याकडे आपले लक्ष जाणार नाही, तर त्याच्यामध्ये कोणती असाधारण गुणवत्ता आहे, याकडे आपले लक्ष जाईल.

मला याठिकाणी राहुल नावाचा मुलगा भेटला, मंदबुद्धी आहे, त्याला संगणक दिला आणि मी पाहिले की त्याने लगेच संगणक सुरू केला, प्रोग्राममधून कसे पुढे जायचे हे त्याने लगेच सुरु केले. त्याच्या कुटुंबासाठी तो नवीन आशा घेऊन आला आहे. एक नवीन विश्वास घेऊन आला आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न हा आहे की, या व्यवस्थांच्या माध्यमातून आमच्या समाजात हे जे करोडोंच्या संख्येने आमचे कुटुंबीय आहेत त्यांची आम्हाला काळजी आहे.

मी समाजाच्या नात्याने ही बाब मनापासून सांगतो की, विशेषतः ज्या कुटुंबामध्ये मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलं जन्म घेतात. फार कमी लोकांना हे माहित असेल. त्या कुटुंबातील आई-वडिलांचे आयुष्य कसे असेल. बाहेरच्या लोकांना याचा अंदाज येणार नाही. जर कुटुंबात अशाप्रकारचे मुल जन्मले असेल, त्यावेळी आई-वडिलांचे वय असते 25 वर्षे, 30 वर्षे, 35 वर्षे. अजून आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण व्हायची आहेत. पण एक दोन वर्षाचे मूल झाले की बालकात काहीतरी कमतरता आहे असे वाटते. तुम्ही पाहिले असेल की त्या बालकाचे आई वडिल आणि घरात जर आजी-आजोबा असतील तर ते सर्व आपल्या आयुष्यातील स्वप्नांचा शेवट करतात. आपल्या सर्व इच्छा मारुन टाकतात. आपली सर्व क्षमता त्या बालकाच्या सेवेसाठी वापरतात. कुटुंबात जर आणखी दोन तीन मुलं असतील, त्यांच्यावर जेवढे प्रेम करतात त्यापेक्षा अनेक पटींनी ते या मुलांवर प्रेम करतात. त्यांच्या मनात ही भावना असते की, परमेश्वराने आमची परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. पण समाजाच्या नात्याने जर विचार केला तर ज्या कुटुंबात असे बालक जन्माला आले आहे फक्त त्याच कुटुंबाची ही जबाबदारी आहे का माझा आत्मा म्हणतो नाही. परमेश्वराने या कुटुंबाची निवड केली आहे. कारण त्याला खात्री आहे की, हे कुटुंबच या मुलाचा चांगला सांभाळ करेल. पण समाजाच्या नात्याने आपणा सर्वांची जबाबदारी आहे की बालक जरी त्यांच्या पोटी जन्माला आले असेल, त्या घरात वाढत असेल, पण समाजाची एक सामुहिक जबाबदारी आहे, की अशा बालकांची त्यांनी काळजी करावी, म्हणून आमच्या सरकारने याच भावनेने, याच भूमिकेतून अशा बालकांची काळजी विशेषत्वाने करत आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जेंव्हाही आंतरराष्ट्रीय खेळ होतात, त्यावेळी आमची मुलं शारिरीकदृष्ट्या इतरांच्या तुलनेत उंची कमी, वजन कमी असूनही सुवर्णपदकावर नाव कोरतात. या बालकांसाठीचे जे ऑलिम्पिक असते, सर्व सुवर्णपदक विजेते ठरतात. मी दर वर्षी प्रयत्न करतो की, अशा विजेत्यांना भेटले पाहिजे. यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते, ते जेंव्हा अशाप्रकारचा विजय मिळवतात, त्यांना माहित असते, त्यांनी देशासाठी काय कमावले आहे, अभिमानाने सांगतात, कधी कधी तर मी पाहिले आहे की , ते जेंव्हा चषक जिंकून येतात, तर माझा हात पकडतात, त्यांना वाटते हा चषक द्यावा. मी म्हणतो नाही, तुम्ही हा जिंकून आला आहात, तुम्ही घेऊन जा. तर ते म्हणतात, इशारांमधून सांगतात की, तुमच्यासाठी आणले आहे. जेंव्हा मी गुजरातमध्ये होतो, तेंव्हा मन पिळवून टाकणाऱ्या घटना घडत होत्या. ही जी शक्ती आहे, याला मी दिव्यांग रुपात पाहतो. हे भारतमातेचेही दिव्यांग आहे. प्रत्येक मूल ज्याच्या आयुष्यात काही अभाव असेल तो आमच्यासाठी दिव्यांग आहे. त्याच रुपात आम्ही याला पुढे घेऊन जाऊ इच्छितो.

आगामी दिवसात, आताच आम्ही एक मोठे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे, सुगम्य भारत. जगात याविषयावर मोठ्या जागरुकतेने काम झाले आहे. आमच्याकडे संवेदना असतात, सहानुभूती असते, रस्त्याने कोणी जात असेल तर आम्ही मदत करतो, पण व्यवस्थाच विकसित करण्याचा फार कमी लोकांचा स्वभाव असतो. म्हणून आमची घरं असतील, रेल्वे असेल, बस असेल, यामधून त्यांना जायचे असेल तर, त्यांना अशा सुविधा मिळाव्या ज्या सक्षम व्यक्तींना मिळतात. ही मोठी अडचण आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे, एक नवीन वातावरण तयार करता येईल, नवीन इमारत बनेल, मग तो पूर्ण आयुष्यभर एकच व्यक्ती तीनचाकी सायकलवर आला तरी चालेल. पण आम्ही त्याठिकाणी अशी व्यवस्था विकसित करु की, त्याला काहीही अडचण होणार नाही. हळूहळू आम्हाला सवय लावावी लागेल. एवढा मोठा देश आहे, काम करण्यास वेळ लागतो, पण आम्ही सुरुवात करु, जसे आता सरकारने सुरुवात केली आहे. किमान शासकीय इमारतींमध्ये तर करता येईल. आता ज्याकाही शासकीय इमारतींचे बांधकाम होईल, त्यामध्ये अशा व्यक्तींसाठी वेगळे शौचालय असेल, त्यांना येण्याजाण्यासाठी वेगळा मार्ग असेल. या व्यवस्था हळूहळू विकसित करणार आहोत.

मागच्या दिवसांमध्ये एका चळवळीच्या रुपाने काम सुरू केले आहे, प्रत्येक विभागाला याविषयी मार्गदर्शन केले जात आहे की आतापर्यंत झाले ते झाले, आता आम्ही काही तरी करु. तुम्ही पाहा, प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना प्राथमिकता देऊ आणि सर्व सरकारे याकडे लक्ष देतील. ज्याठिकाणी कायदे बदलण्याची वेळ येईल कायद्यांमध्ये बदल करण्यात येईल. ज्याठिकाणी नियम बदलून व्यवस्था परिवर्तन होत असेल त्याठिकाणी नियम बदलण्यात येतील. पण यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करु, ही बाब हळूहळू पुढे नेण्यात येईल.

तुम्ही पाहा जेंव्हा त्यांना वाटेल की माझ्यासाठी चांगला रस्ता तयार झाला आहे, त्यावेळी समाजात माझेही विशेष स्थान आहे ही भावना निर्माण होईल. यामुळे त्याचा आत्मविश्वास वृद्धींगत होईल. तो रडत बसणार नाही, त्याला तर आमच्यापेक्षाही वेगाने रेल्वेत बसून जाण्याची शक्ती आहे. जर व्यवस्था विकसित झाली तर, त्याला वाटेल एक समाज माझ्याप्रती संवेदनशील आहे. ही भावना जागृत करण्याचा आणि व्यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

आगामी काळात या सर्व बाबींचा उपयोग एक नवी क्षमता विकसित करण्यासाठी, एक नवा विश्वास निर्माण करण्यासाठी, एक नवे सामर्थ्य निर्माण करण्यासाठी होत राहिल. मी पुन्हा एकदा श्री गहलोतजी, कृष्णपालजी, सांपलाजी, कारण आमचे तिन्ही मंत्री या विभागाचे आहेत, ज्या भावनेने ते काम करत आहेत आणि आज माझ्या काशीमध्ये ज्यांनी मला निवडून दिले आहे, त्यांच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत घेतली, सतत तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्या या सर्व बंधु-भगिनींना ही जी व्यवस्था पोहचवली आहे यासाठी मी विशेष रुपाने या तिन्ही मंत्र्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांचेही अभिनंदन करतो, त्यांनी एवढ्या थंडीतही हे काम पूर्ण केले. जे माझे दिव्यांग बंधु-भगिनी याठिकाणी आले आहेत, फार लोक आहेत, जे माझे बोलणे ऐकू शकत असतील पण मला पाहू शकत नसतील, तसेच जे मला पाहू शकत असतील पण ऐकू शकत नसतील, असे असूनही आज ज्या भावनेने माझे विचार त्यांच्यापर्यंत पोहचण्याची व्यवस्था केली आहे त्यांना मी विश्वास देतो की, तुम्ही कोणापेक्षा कमी नाहीत, आणि आम्ही यशस्वी होणार हा मंत्र घेऊन पुढे वाटचाल करुया. माझ्या तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद.

S. Thakur/ B. Gokhale/ M. Desai