पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 22 जुलै 2026
विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि संबंधित क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेतली.
नागरिकांचे कल्याण हे सर्व सुधारणांच्या केंद्रस्थानी राहिले पाहिजे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. लोकांच्या गरजांवर आधारित सुधारणांना खरीखुरी गती मिळाली पाहिजे, त्यातून अर्थपूर्ण परिवर्तन घडले पाहिजे, असे ते म्हणाले. प्रशासन अधिक कार्यक्षम करणे हे सुधारणांचे एकमेव उद्दिष्ट नसून, भारताचा विकसित राष्ट्र बनण्याचा प्रवास अधिक वेगवान करणे, हा त्यामागील मुख्य हेतू असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
प्रशासनात वेगाने बदल होत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. गतिमान आणि सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी प्रशासनात आवश्यक बदल करून ते अधिक सक्षम करण्याचे महत्त्व त्यांनी ठळकपणे मांडले. विविध मंत्रालये आणि विभागांमधील उदयोन्मुख गरजा नेमक्या ओळखून नमूद करण्याची सूचना त्यांनी केली.
राष्ट्राच्या विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संपूर्ण सरकारी दृष्टीकोन असण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. ‘विकसित भारत’ घडवण्याचे स्वप्न हे जन आंदोलन बनले पाहिजे, आणि या संकल्पनेचा पाया देशातील युवा शक्तीने रचला पाहिजे असे, त्यांनी आवर्जून सांगितले.
तरुणांमधील अंमली पदार्थांच्या सेवानांच्या गंभीर समस्यांचा सामना करण्याचे महत्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. युवकांसाठीच्या उपक्रमांमध्ये अनेक विभागांमधील तफावत भरून काढण्यासाठी आणि विविध विभागांमध्ये अधिक चांगला समन्वय आणि एकत्रितपणा वाढवण्यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न केले जावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी एकात्मिक दृष्टीकोनाचा अंगीकार करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. क्रीडा पर्यटन हे एक प्रमुख क्षेत्र म्हणून उदयाला येत आहे. अशावेळी, भारताने स्वतःला जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. क्रीडा क्षेत्रात तंत्रज्ञानाला चालना देण्यावर आणि स्टार्ट-अप्सच्या माध्यमातून नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
‘प्रधानमंत्री कुसुम’ (पीएम कुसुम) सारख्या योजनांचा शेतकऱ्यांनी व्यापक प्रमाणावर अवलंब केल्यास, कृषी क्षेत्रात परिवर्तनकारी बदल घडून येऊ शकतात याचा विशेषत्वाने त्यांनी उल्लेख केला. तसेच, आंतरराष्ट्रीय संधी आणि भविष्यातील गरजा यांची उत्तम सांगड घालण्याच्या दृष्टीने, आवश्यक कौशल्यांचा जागतिक स्तरावर कसा ताळमेळ घालता येईल हे ओळखण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी, उपस्थित सचिवांनी आपापल्या क्षेत्रातील विविध उपक्रम आणि त्यातील आव्हानांबद्दल आपले अनुभव आणि दृष्टीकोन मांडले. पंतप्रधानांनी देखील आपल्या सूचना आणि भविष्यातील कार्यपद्धतीबाबतचा आपला दृष्टीकोन व्यक्त केला. या बैठकीत विविध क्षेत्रांसंदर्भात सर्वसमावेशक आणि फलदायी चर्चा झाली; ज्यात, ‘विकसित भारता’ची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने प्रभावी अंमलबजावणी, अधिक समन्वय आणि जलद प्रगती यांवर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीला मंत्रिमंडळ सचिव, प्रमुख मंत्रालयांचे सचिव तसेच पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* * *
माधुरी पांगे/रेश्मा बेडेकर/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Chaired a meeting of Secretaries to the Government of India, in which we discussed progress in rural development, agriculture, social welfare-related sectors and more.
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2026
Highlighted the need to strengthen reforms that further the welfare of the people. We also discussed how to…