पीएम्इंडिया
व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद – 2019 साठी डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोक्के रासमुस्सीन 18-19 जानेवारी या काळात भारत दौऱ्यावर आहेत. या परिषदेत डेन्मार्क हा भागिदार देश म्हणून सहभागी होत आहे. प्रमुख डॅनिश कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या व्यापारी प्रतिनिधी मंडळही डेन्मार्कच्या पंतप्रधानांसमवेत भारतात दाखल झाले आहे.
गांधीनगर इथल्या व्हायब्रंट गुजरातच्या पार्श्वभूमीवर डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. याआधी एप्रिल 2018 मधे पहिल्या भारत-नॉर्डिक परिषदेदरम्यान या दोन पंतप्रधानांची भेट झाली होती.
यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्यांवर तसेच परस्पर हिताच्या विविधांगी मुद्यांवर चर्चा केली. दोन्ही देशादरम्यान द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रचंड क्षमता आहे, यावर यावेळी भर देण्यात आला.
भारतासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या अनेक तंत्रज्ञानात डेन्मार्क जागतिक क्षेत्रात आघाडीवर आहे. डेन्मार्ककडे कौशल्य आहे, असं सांगून जगाला नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अन्न सुरक्षा, जल व्यवस्थापन, हवामान बदल, शाश्वत विकास यांसारख्या जागतिक स्तरावरच्या समस्यांच्या निराकरणासाठी भारत आणि डेन्मार्कने संशोधन मंच विकसित करावा, यासाठी पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले.
या बैठकीदरम्यान दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. भारतीय नौवहन मंत्रालय आणि डेन्मार्कचे व्यापार आणि वित्तीय व्यवहार मंत्रालय यांच्या सागरी मुद्यांविषयी एक सामंजस्य करार झाला. गोव्यात पणजी इथे अर्बन लिव्हिंग लॅब उभारणीसाठी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट आणि नवी दिल्लीतली डॅनिश यांच्यात सामंजस्य करार झाला.
नौवहन, नवीकरणीय उर्जा, पर्यावरण, कृषी, अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रात 130 डॅनिश कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. स्मार्ट अर्बन डेव्हलपमेंट, कचऱ्यातून उर्जा यासारख्या इतर क्षेत्रातही विस्तारासाठी, या कंपन्या उत्सुक आहेत. नौवहन आणि नवीकरणीय उर्जा क्षेत्रात गुजरातमधे महत्वाच्या अनेक डॅनिश कंपन्या आहेत.
भारत भेटीदरम्यान डेन्मार्कचे पंतप्रधान डॅनिश सांस्कृतिक संस्था आणि नवी दिल्लीतल्या डॅनिश दुतावासाच्या नव्या इमारतीचे 19 जानेवारीला उद्घाटन करतील. ते आग्रा इथंही भेट देतील.
***
N.Sapre/N. Chitale/D. Rane
Had an excellent meeting with PM @larsloekke of Denmark.
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2019
Denmark is a valued friend and we discussed deepening cooperation in energy, trade, agriculture and other areas. pic.twitter.com/p3eP0jqUMW