पीएम्इंडिया

इथे उपस्थित माझे सर्व सहकारी,
तुम्ही सगळे तर प्रयोगशाळेत आयुष्य काढणारे लोक आहात. तुमच्याकडे एका पायलट प्रोजेक्ट म्हणजे ‘प्रायोगिक तत्वावर केलेल्या प्रयोगांची परंपरा निश्चितच असेल. आणि प्रायोगिक तत्वावरील प्रयोग यशस्वी झाल्यावर, त्याच्या परिणामांचा अभ्यास केला जातो, तो राबवणे शक्य आहे की नाही याची खातरजमा केली जाते. मगच खरा प्रयोग केला जातो, आधी असतो, तो केवळ सराव! आणि आता खरा प्रयोग हा आहे.आणि म्हणूनच आजच्या आपल्या हिरोंना आपण उभे राहून मानवंदना द्यायला हवी. आपण सगळे त्यांना मानवंदना देऊया., आधीचा केवळ सरावाचा प्रयोग होता, आता झालेला खरा आहे.
आज राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त तुमच्या सर्वांमध्ये येण्याची संधी मला मिळाली. तुम्हा सर्वांना माहितीच आहे, की आपले महान शास्त्रज्ञ डॉ सी वी रामन यांच्या ‘रामन इफेक्ट्स’ या शोधाचे स्मरण म्हणून आजचा हा दिवस साजरा केला जातो. त्यांच्या याच संशोधनामुळे देशाला पहिले नोबेल पारितोषिक मिळाले होते. आज डॉ सी वी रामन यांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच मी या विज्ञान दिवसानिमित्त तुम्हा सर्वांना, संपूर्ण वैज्ञानिक विश्वाला आणि विद्यार्थ्याना खूप खूप शुभेच्छा देतो.
संशोधन आणि विकासाशी संबंधित तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होवोत अशीच माझी इच्छा आहे आणि विशेषतः तुमच्या या संशोधनांचा लाभ देशाला व्हावा, जनतेला व्हावा, ही अपेक्षा आहे. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळालेल्या सर्व विजेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचेही खूप खूप अभिनंदन! तुमच्या या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. मी या सगळ्यांच्या कुटुंबियांचे यासाठी विशेष अभिनंदन केले कारण एक शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत आपले संपूर्ण आयुष्य घालवतो, त्यामुळे सर्वात जास्त त्याग आणि तपस्या त्याच्या कुटुंबालाच करावी लागते. तुमच्या प्रयत्नांमुळे, तुमच्या कार्याचा लाभ देशाला आणि समाजाला मिळतो. आणि हे कार्य तर असे असते, ज्याचा लाभ अनेक पिढ्यांना मिळत राहतो. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ हा नव्या भारताचा मार्ग बनावा. त्यासाठी अशा प्रकारच्या पुरस्कारांची आणि राष्ट्रीय विज्ञान दिवसासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनाची गरज असते.
मित्रांनो, या वर्षीची संकल्पनाही अतिशय प्रासंगिक आहे. मी नेहमीच विज्ञानाला जनतेच्या गरजांशी जोडण्याची शिफारस करत असतो. आमचे सरकार देखील आपल्या अनेक योजना आणि उपक्रमातून या दिशेने काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असते.
मित्रांनो, आपल्याकडे लोकशाही, वैविध्यपूर्णता आणि मागणी याचे समतोल विभाजन असलेली व्यवस्था आहे. आज भारत जगातली सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्या युवकांच्या महत्त्वाकांक्षा सर्वश्रेष्ठ असून या महत्वाकांशा पूर्ण करण्याची त्यांची जिद्द आमची सर्वात मोठी ताकद आहे. अशा काळात आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधन आणि नवोन्मेषाला जनतेच्या आकांक्षांशी जोडत, त्यांना समाजाच्या आकांक्षांशी अनुरूप बनवावे लागेल. यावर्षी जालंदर येथे झालेल्या भारतीय विज्ञान परिषदेत, मी म्हंटले होते की विज्ञान हीच भारताची खरी ताकद आहे. विज्ञानाला समाजाच्या गरजांशी जोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही सगळे, आमचे अणुशास्त्रज्ञ अणुऊर्जा, अवकाश विज्ञान आणि संरक्षण अशा विषयांशी संबधित आपले कौशल्य आणि संशोधन अधिकाधिक उन्नत कराल.
मित्रांनो, आपल्या देशाला आता “सर्वोत्तम” पेक्षा काहीच कमी करुन चालणार नाही. कारण आपण आताच खूप वरचा दर्जा मिळवला आहे. आता जर आपल्या संस्थांचे विचार जुनाट राहिलेत तर आपण देशाच्या वाढत्या आकांक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरू. विज्ञानाशी संबधित आपल्या सर्व संस्थांना भविष्यातील गरजांच्या अनुरुप स्वतःला तयार करावे लागेल, स्वतःमध्ये बदल करावे लागतील. आपल्याला आपली मूळ शक्ती कायम ठेवत भविष्यातील गरजांच्या अनुरूप आधुनिक बनावे लागेल. मी माझ्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांना यासंदर्भात योजना बनवून पुढे जाण्याचा आग्रह केला आहे, मात्र त्यात तुम्हा सर्वांचा सहभाग अतिशय आवश्यक आहे.
मित्रांनो, जेव्हा इच्छाशक्ती असते, तेव्हा मर्यादित संसाधनांच्या मदतीने देखील अद्भूत परिणाम साधले जाऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले अवकाशक्षेत्र आहे. आपले चांद्रयान मिशन असो किंवा मंगळयान किंवा मग उपग्रह प्रक्षेपणात आपण केलेली कामगिरी. तुमच्यासारख्या अनेक वैज्ञानिकांच्या या अचाट कौशल्याने जगभरातील विज्ञानक्षेत्राला चकित केले आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपल्या वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहाच्या कक्षेत आपले मंगळयान यशस्वीपणे पोहोचवले. ही मोहीम यशस्वी करणारा आपला पहिलाच आशियाई देश आहे. आपण अवकाश क्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीमुळेच, 2022 पर्यंत, देशाचे गगनयान आपल्या अंतराळवीरांसह अवकाशात झेपावेल, आणि आपला तिरंगा तिथे फडकवला जाईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
मित्रांनो, आमच्या वैज्ञानिकांनी कायमच मानवतेच्या सेवेसाठी आपले योगदान दिले आहे. ज्या क्षेत्रात आपण उत्तम काम केले आहे आणि देशातील सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य अधिक सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे औषधनिर्माण क्षेत्र. या क्षेत्रात आज भारत जगातील जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि जगात तिसरी सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ. आज भारताची औषधे 200 पेक्षा जास्त देशात निर्यात केली जात आहेत.
मित्रांनो, आपल्या औषधनिर्माण क्षेत्राच्या ह्या विकासामागे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा परिषद म्हणजेच, सीएसआयआर सारख्या संस्थेच्या तंत्रज्ञानाची ताकद आहे. जगभरात अतिशय महाग मिळणारी औषधे भारतात अत्यंत कमी दरात उपलब्ध करुन देण्याचे श्रेयही याच संस्थेला जाते. त्यांच्याकडे औषधे बनवण्याचे ज्ञान आहे आणि भारताच्या जंगलात अशा औषधी वनस्पतींचा खजाना आहे. त्यातून सीएसआयआर संस्थेचा अधिक विस्तार निश्चितच होऊ शकतो. मला वाटते कि आता आपल्या औषधनिर्माण क्षेत्राला आणि जैवतंत्रज्ञानाला अधिक गती देण्याची गरज आहे. त्यासाठी जेनेरिक आणि जैवतंत्रज्ञानातून तयार होणाऱ्या संशोधनाची गरज आहे.
मित्रांनो,वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा परिषदेकडून केला जाणारा आणखी एका प्रयत्न प्रशंसनीय आहे. तो प्रयोग आहे, ‘अरोमा मिशन’… अरोमा मिशनच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर, पूर्वोत्तर भारत आणि छत्तीसगड मधल्या आदिवासी भागात, या संस्थेचे काम पोहोचले आहे. मला असं सांगण्यात आलं आहे की, गेल्या १८ महिन्यात देशातील सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर अरोमटीक म्हणजे सुगंधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यासाठी मी सीएसआयआरच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो.
सुगंधी वनस्पतींशिवाय, जैवइंधनाच्या क्षेत्रातही सीएसआयआरचे महत्वाचे योगदान आहे. सीएसआयआरने तयार केलेल्या हवाई जैवइंधनाची चाचणी देखील यशस्वी झाली आहे.27 ऑगस्ट 2018 ला पहिल्यांदा देहरादून ते दिल्ली ह्या मार्गावर हे विमान उडवण्यात आले होते. या चाचणीमुळे, जैवइंधनावर विमाने चालवणाऱ्या काही निवडक देशांच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट झाले आहे. केवळ नागरीच नाही, तर यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला आपल्या हवाईदलाचे जेट उडवण्यासाठी देखील जैवइंधनाचा वापर केला गेला.
मित्रांनो, आता एका नव्या प्रकारच्या इंधनाची गरज निर्माण होणार आहे. येत्या दोन दशकांत बिग डेटा, मशीन लर्निंग, ब्लॉक चेन, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या कित्येक नव्या तंत्रज्ञानाचे युग येणार आहे. हे सगळे तंत्रज्ञान डेटावर आधारलेले असेल आणि म्हणूनच आता असं म्हंटलं जातं की जगात नवा इंधन डेटाही अस्तित्वात येणार आहे. या नव्या गरजा लक्षात घेता, आमच्या सरकारने आंतरविभागीय सायबर फिजिकल व्यवस्थाविषयक राष्ट्रीय अभियान सुरु केलं आहे. या अभियानावर सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत.या अंतर्गत, येत्या पाच वर्षात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल, उत्पादन, बिग डेटा एनालिसिस,क्वांटम कम्युनिकेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स सारख्या क्षेत्रात संशोधन आणि विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मित्रांनो,केंद्र सरकारने एक कृत्रिम बुद्धिमत्ता कृतीगट देखील स्थापन केला आहे. ज्याद्वारे भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी तयार होऊ शकेल. देशातील वैज्ञानिक समूह आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांना माझे आवाहन आहे की चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या ह्या पहिल्या टप्प्यात जगाची दिशा बदलणारे नवे तंत्रज्ञान विकसित करा.म्हणजे भारत, उत्पादन क्षेत्र, ज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित उद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास येऊ शकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग देशात कृषीपासून वाहतूक आणि आरोग्यापासून ते हवामान शास्त्र विभागापर्यत होऊ शकेल. यात इतकी ताकद आहे, की त्या बळावर आपण निश्चित केलेल्या उद्दिष्टापर्यत नक्कीच पोहचू शकू.
आज विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाला सीमांमध्ये बांधता येणार नाही.त्यासाठी नव्या प्रकारच्या विचारसरणीची गरज आहे. आंतरविभागीय संशोधनातून या नव्या विचाराला अधिक बळ मिळेल.
यातून संशोधनाचे एक असे वातावरण बनावे जिथे इंजिनियर्स सेल बायोलॉजिस्ट सोबत काम करु शकतील. एक केमिस्ट, मानवशास्त्र विभागाकडून प्रेरणा घेऊ शकेल, एक भौतिकशास्त्रज्ञ किंवा सामाजिक शास्त्रज्ञ एखाद्या प्रकल्पावर एकाच विचाराने एकत्र काम करु शकतील.वेगवेगळ्या शाखा आणि विभागांचा हा संगम निश्चितच संशोधन आणि कल्पनेवर आधारित नवोन्मेषाची एक नवी संस्कृती विकसित होऊ शकेल.
मला विश्वास आहे, की आमच्या सरकारकडून उच्चशिक्षणात सुधारणेसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे या नवोन्मेषी संस्कृतीला बळ मिळेल , असा मला विश्वास वाटतो. आमच्या सरकारने शिक्षण विशेषतः उच्च शिक्षणाच्या विकासासाठी अनेक पावलं उचलली आहेत.आम्ही संशोधन, विकास आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देत आहोत. उच्च शिक्षण संस्थांना स्वायत्तता देत आहोत. जेणेकरून शिक्षणाची गुणवत्ता सुधारली जाईल. याचाच भाग म्हणून आम्ही 21 विद्यापीठांसह 60 उच्चशिक्षण संस्थांना स्वायत्तता दिली आहे. आयआयएमना स्वायत्तता देण्यामागेही हाच विचार आहे. याचप्रकारे देशातील प्रतिष्ठीत संस्थांसाठी सुद्धा काम सुरु केले आहे. अशा संस्थांनाही पूर्ण स्वायत्तता दिली जात आहे. म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ संस्थांमध्ये ते स्थान मिळवू शकतील. आपल्या युवकांच्या विचारांना प्रेरित करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवणे आवश्यक आहे. कारण हे युवाच आपले भविष्य आहेत. तेच भारताची धुरा सांभाळणार असून जगाला मार्गही दाखवणार आहेत.
मित्रांनो, जेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ देशातील वंचित आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हाच त्याचा सर्वाधिक परिणाम झाला असे मानता येईल. अशा स्थितीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाला देशासमोरच्या आव्हानांशी जोडणे आणि सर्व वैज्ञानिक संस्थांना या अभियानात सहभागी करून घेणे अतिशय आवश्यक आहे. आपले संशोधन ‘समस्याभिमुख’ बनवायला हवे आहे. आरोग्य सुविधा, परवडणारी घरे, स्वच्छ उर्जा, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, कृषी, अन्नप्रक्रिया, इलेक्ट्रिक मोबिलिटी, सायबर सुरक्षा, मूल्यवर्धन यासारख्या क्षेत्रात असलेल्या समस्यांवर आपल्याला उत्तर शोधावे लागणार आहे. माझे असे मत आहे की विज्ञान मूलभूत असायलाच हवे, त्याच्याशी तडजोड करता येणारच नाही, मात्र तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर विकसित केले जावे,. स्थानिक पातळीवर याचा अर्थ, भारतातील परिस्थिती आणि गरजा यांचा विचार करुन त्यानुसार आपल्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तर शोधावे लागेल. हे अभियान यशस्वी व्हावे यासाठी आपल्याला आपल्या एकल काम करण्याच्या पद्धतीतून बाहेर पडावे लागेल, तुकड्यातुकड्यांमध्ये विचार न करता समग्र विचार करावा लागेल. जर आपल्याला एक झाड लावायचे असेल, तर खड्डा कोण खोदणार, बी कोणीतरी दुसराच पेरणार आणि पाणी आजून कोणीतरी तिसराच टाकणार अशा पद्धतीने काम होणार नाही. आपले उद्देश स्पष्ट असायला हवेत. तेव्हाच स्वच्छपाने मार्ग दिसेल. जलद गतीने बदलत असलेल्या तंत्रज्ञानासह आपल्याला स्वतःला बदलावे लागेल. त्यासाठी आपले सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग सक्षम आणि उर्जावान आहेत, मात्र तरीही स्पर्धेच्या या युगात आपल्याला स्वतःला पुढे नेण्यासाठी आपल्याला आणखी काही मोठी पावले उचलावी लागतील. समाजातील याच आव्हानांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान विज्ञान-तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सल्लागार परिषद अतिशय गांभीर्याने काम करत आहे.
मित्रांनो, तुमच्या क्षमता, तुमचे कौशल्य आणि सामर्थ्य यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या याच सामर्थ्यातून नवभारतासाठी नवे प्रयोग, नवे संशोधन विकसित होऊ शकेल. नव्या तंत्रज्ञानाविषयी विचार करता येईल. आणि विज्ञानाच्या माध्यमातून देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने देश प्रगती करेल. आपल्या या विज्ञानाचा, संशोधनाचा लाभ आपल्या देशातील जवानांना होईल आणि शेतकर्यांनाही ! विज्ञान क्षेत्रात ज्या महान लोकांनी अभ्यास साधना केली आहे, अशा सर्व ऋषितुल्य वैज्ञानिकांचा आज येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. अशा सर्व लोकांचे मी आदरपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद।
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
Honouring the winners of the Shanti Swarup Bhatnagar Prizes. https://t.co/uNp48mbhAt
— PMO India (@PMOIndia) February 28, 2019