पीएम्इंडिया
शिक्षक दिनानिमित्त संपूर्ण शिक्षकवृंदाला शुभेच्छा!
परिश्रम, निष्ठा आणि बांधिलकी जपणाऱ्या संपूर्ण शिक्षकवृदांला नमन करण्याचा हा दिवस आहे. शाळेतल्या वर्गात विविध विषय शिकवण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिक्षक, हे मार्गदर्शक आणि गुरूही असतात.
शिक्षकांच्या नि:स्वार्थी वृत्तीची जगभरात वाखाणणी केली जाते. व्यस्त जीवन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलतानाही, विद्यार्थ्यांनी, नवनव्या कल्पना आणि संकल्पना सहजपणे आत्मसात कराव्यात यावर शिक्षकांचा कटाक्ष असतो.
फलश्रृतीवर लक्ष:
देशात शिक्षण क्षेत्रात सध्या मोठे बदल घडत आहेत. पारंपरिक पद्धतीच्या चौकटी बाहेर जाऊन आपण आता फलनिष्पत्तीला प्राधान्य देत आहोत. यासंदर्भात युवामनात संशोधन आणि नाविन्यतेची आस जागवण्यासाठी आपल्या शिक्षकांचे परिश्रम पाहून मला आनंद होत आहे. यामुळे युवा मनात स्वत:साठी आणि राष्ट्रासाठी नवनव्या गोष्टी करण्याची जिज्ञासा निर्माण होईल.
एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टीकचा उपयोग टाळण्यासाठी मदत –
या शिक्षक दिनी, शिक्षक वृंदाला माझी एक विनंती आहे. एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टीकपासून मुक्त होण्यासाठी भारताने अभियान हाती घेतले आहे हे आपल्याला माहितीच आहे. यामध्ये शिक्षक वृंदानं सक्रीय सहभाग द्यावा असे आवाहन मी करतो. एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टीकमुळे पर्यावरणाची कशी हानी होते. हे शिक्षकांनी, विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्याचा वापर टाळण्याला प्रवृत्त केले तर विद्यार्थ्यांचाही यात सहभाग राहील. आपल्या लाडक्या बापूंना त्यांच्या 150 व्या जयंतीला ही मोठी आदरांजली ठरेल.
आजच्या दिवशी, महान शिक्षक, मार्गदर्शक आणि गुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मी आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या जीवनचरित्रापासून स्फूर्ती घेऊन अधिकाधिक लोकांनी शिक्षकीपेशा स्वीकारून युवा मनांना आकार द्यावा.
शिक्षक दिनाच्या पुन्हा शुभेच्छा!
B.Gokhale/N.Chitale/P.Kor