Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शुगरकेन व्हैलू चेन – व्हिजन २०२५ या पुणे इथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

शुगरकेन व्हैलू चेन – व्हिजन २०२५ या पुणे इथे आयोजित  आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


विशाल संख्येने आलेले शेतकरी बंधू भगिनींनो, सहकार क्षेत्रातील सर्व मान्यवर,

मी सर्वप्रथम वसंतदादा पाटील यांच्या जयंतीच्या शुभारंभ प्रसंगी त्यांना आदरपूर्वक नमन करतो. सार्वजनिक आयुष्यात त्यांनी उच्च मूल्य प्रस्थापित केली होती परंतु त्यासोबतच आपलं जीवन शेतकऱ्यांसोबत, सहकारी संघटनांसोबत घालवलं आहे आणि हे सर्व करतानाच आधुनिकतेची कास धरून पुढे वाटचाल करत राहण्याकरिता प्रोत्साहन देत राहण्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे आणि आज आपण या संस्थेचा जो मजबूत पाया बघत आहोत त्याच्या मुळाशी वसंतदादा पाटील यांची दीर्घदृष्टी, त्यांचे योगदान आहे. भारताच्या अर्थकारणाची नाळ ही गाव आणि शेतकऱ्यांशी जोडली गेलेली आहे. याच गोष्टीला चांगल्या प्रकारे समजून त्यालाच मजबुती प्रदान करण्याचा निरंतर प्रयत्न हा केवळ आताच्याच आणि येणाऱ्या पिढीला देखील खूप अनुकूल ठरेल.

आपल्या देशात ज्या गतीने कृषी क्षेत्रात संशोधन व्हायला पाहिजे होते, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हायला पाहिजे होता, विश्व ज्या गतीने प्रगती करत आहे या सर्व बाबतीत आपण खूपच पिछाडीवर आहोत. आजदेखील जगभरात प्रति एकर उसाचे जे उत्पन्न होते त्यातुलनेत देखील आपण खूप मागे आहोत. आज देखील जगभरात उसामध्ये साखरेची जे प्रमाण आहे, आपल्या देशात त्यामध्ये देखील विभिन्नता आहे. दक्षिणेकडे एक अनुभव येतो, मध्य मध्ये दुसरा तर उत्तरेकडे तिसराच अनुभव येतो. आणि अशावेळी एक समर्पित संस्था जी निरंतर वैज्ञानिकांना आपल्यासोबत घेवून तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत त्यांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न ही संस्था करत आहे मला नाही वाटत की हे छोटे काम आहे आणि याचा सकारात्मक परिणाम आपणा सर्वच बघत आहोत. आज मी शरद पवार यांच्या सोबत शेताला भेट देखील दिली आणि सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला. मला देखील या सर्व गोष्टी जाणून घ्यायची जिज्ञासा आहे. उसाच्या पिकामध्ये जे सिंचन केले जायचे ते पाहून मी कधीतरी अस्वस्थ व्हायचो. शेतकऱ्यांच्या तर डोक्यात बसले होते की शेत जो पर्यंत पाण्याने पूर्णपणे पाण्याने भरलेले नसते तो पर्यंत चंगले पिक येत नाही.

या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी मी खूप वर्षापूर्वी मॉरीशसला गेलो होतो तेव्हा मी राजकारणात नव्हतो. मी तिथे पाहिले की, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून त्यांची शेती डोलत होती. पाण्याचा अतिरिक्त वापर बिल्कुल नव्हता. मी भारतात परत येवून जेव्हा शेतकऱ्यांसोबत या विषयी बोललो तर त्यांना हि गोष्ट पटतच नव्हती. ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी मी त्यांना समजावत होतो. त्यांना हे सगळ जरा अजब वाटत होत त्यांना वाटत होतं की ह्याला काय कळत. पण मी प्रयत्न करत राहिलो आणि त्यांना समजावत राहिलो. आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून चांगल्या प्रतीचे उसाचे पिक घेऊ शकतो. पाण्याचे जे संकट सध्या आपल्याला भेडसावत आहे विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातला, इथला शेतकरी वेगाने उसाच्या पिकासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करत आहे आणि त्याचा फायदा देखील त्याला दिसत आहे. जिथे सूक्ष्म सिंचन पद्धतीने उसाची लागवड केली जाते तिथे पिक, पिकाची गुणवत्ता, पिकाचे प्रमाण आणि त्यातील साखरेची धारणा या सर्वांमध्ये सुधारणा दिसून आली आणि हळूहळू साखर उद्योगाला देखील हे समजू लागले की, जर आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरला प्रोत्साहन दिले तर त्याचा आवश्य लाभ होईल.

इथे जी संशोधन संस्था कार्यरत आहे ती २ गोष्टींवर काम करू शकते. मी सरकारच्या संबंधित विभागांसोबत याआधी याबाबत चर्चा केली होती. उसामध्ये ज्या दोन गाठी असतात जगभरातल्या उसातील या दोन गाठीनंमधील अंतर खूप जास्त आहे. आपल्या येथील जो ऊस आहे त्यामधील गाठींचे अंतर कमी आहे आणि याच कारणास्तव आपल्या इथल्या उसामधील साखरेचे प्रमाण खूप कमी असल्याने आपले नुकसान होते. टाकाऊ कचरा जास्त निघतो. आपल्याला आनुवंशिक मध्यस्थतेच्या सहाय्याने आपल्याकडील उसामधील ज्या गाठी आहेत त्यामधील अंतर वाढवण्यात जर यश प्राप्त झाले तर उसामधील साखर धारणा वाढेल, आणि असे झाले तर पाण्याचा अपव्यय कमी होईल. हि संस्था देखील उसासाठी समर्पित आहे. याशिवाय अजून एक क्षेत्र आहे ज्यामध्ये जर शरद पवारांनी पुढाकार घेतला आणि इथल्या वैज्ञानिकांना यामध्ये काही काम केले आणि दोघांची प्रकृती जवळजवळ सारखीच आहे आणि ते आहे बांबू. बांबूच्या शेतीची एक वैश्विक बाजारपेठ आहे. परंतु आपल्या देशातील जो बांबू आहे त्यामध्ये देखील समस्या आहे. या बांबू मधील २ गाठींमधील जे अंतर आहे ते खूपच कमी आहे, आणि याचमुळे बांबूचे जे मूल्यवर्धन होते त्यापासून जी उत्पादने तयार केली जातात त्याचा जास्त फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. बांबूच्या शेतीला पाणी कमी लागते आणि त्याचे उत्पन्न देखील जास्त मिळते. ज्या आनुवंशिक मध्यस्थेच्या सहाय्याने आपण साखरेमध्ये बदल घडवून आणणार आहोत मला असे वाटते मी वैज्ञानिक तर नाही वैज्ञानिक यामध्ये अधिक सहाय्य करू शकतील बांबू मध्ये देखील जर हेच संशोधन लागू होऊ शकतो तर आपण जागतिक स्पर्धात्मक दर्जात्मक बांबूचे जर आपण उत्पन्न घेऊ शकलो तर आपल्या देशात कृषी अर्थव्यवस्थेच्या एका नवीन क्षेत्राची सुरुवात होऊ शकते. त्या दिशेने आपण विचार करू शकतो.

दुसरा विषय आहे, जमीन कमी होत आहे. शेतकऱ्याचे कुटुंब पिढ्यानपिढ्या वाढत चालल आहे. मुलांमध्ये जमिनीची वाटणी होत आहे. लोकसंख्या वाढत असल्यामुळे कृषी क्षेत्र कमी होणे आणि त्याचा वापर इतर गोष्टींकरिता वाढणे हे तर स्वाभाविक होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण प्रति हेक्टर उत्पादन क्षमता वाढवू तेव्हाच शेतकऱ्यांना लाभ होईल. शेतात खताची रास ओतल्यानंतरच प्रति हेक्टर उत्पादन क्षमता वाढेल असे काही नाही. वैज्ञानिक पद्धतीने संतुलित वापर केल्यानंतरच उत्पादन क्षमता वाढेल. ऊसाच्या दोन रांगांमध्ये दुसरे कोणते पिकं घेऊ शकतो हे याआधी ऊस शेतकरी स्वीकारायलाच तयार नव्हता. उसामध्ये आंतरपिक म्हणून शेतकरी आता डाळींचा विशेषतः मुगडाळ, तुरडाळ याची लागवड करायला हळूहळू सुरवात केली आहे ही आता आनंदाची बाब आहे. आणि ज्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी हे अगदी सहज शक्य झाले आहे. हे एक प्रकारे उप-उत्पादन आहे. ऊसापासून जे उत्पन्न आहे ते तर मिळतेच मधली जी जागा आहे त्यामध्ये अतिरिक्त पिक म्हणून काहीजण भाज्यांची लागवड करतात, काहीजण फुलांची लागवड करतात पण जास्तीतजास्त लोकं डाळींचेच उत्पन्न घेतात. डाळींना प्रोत्साहन देण्याची आमची इच्छा आहे. आजदेखील भारतात मोठ्याप्रमाणात डाळींची आयात करावी लागते. आपली डाळींची मागणी जास्त आहे आणि म्हणूनच आपण ऊसासोबतच डाळींना देखील प्रोत्साहन दिले एका खात्रीशीर बाजारपेठेची हमी आहे. कधीतरी ऊसामध्ये चढउतार आला तरी देखील या आंतरपिकामुळे आपले शेतकरी त्यावर्षी त्या संकटामधून बाहेर येवू शकतील आणि यासाठी जितक्या जास्त प्रमाणात संशोधन होईल ते करण्यामध्ये आम्ही सहकार्य करू.

आतापर्यंत आपला शेतकरी ऊसाशी जोडलेला होता. त्याचे पूर्ण नशीब साखर कारखान्यावर अवलंबून होते. साखर कारखानाच त्याचे भाग्य ठरवायचा. जिथे सहकार्याचा पाया मजबूत राहिला आणि वसंतदादा पाटील असो किंवा शरद पवार यांच्या वडिलांच्या वेळेची गोष्ट असो अथवा वैकुंठ राय यांच्यासारखे सहकारी चळवळीला समर्पित केलेले मोठे नेता असो या पिढीने या सहकार चळवळीचा पाया इतका मजबूत केला ज्यामुळे आज गुजरात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संकटाच्या काळात या सहकारी संघटनांमुळे थोड्याफार प्रमाणात मदत मिळते हा त्यांचा अनुभव आहे. आपल्या मूल्यवर्धन प्रक्रियेमध्ये आपण जागतिक अर्थव्यवस्थेला डावलून चालणार नाही. जगात जर साखरेचे उत्पादन जास्त झाले तर त्याचा फटका भारताला बसतो. जगात साखरेची कमतरता भासू लागली तर त्याचा फायदा भारताला होतो. कधी कधी भारतासाठी बाजारपेठ उपलब्ध असते परंतु दुष्काळ असतो त्यावेळी शेतकरी देखील संकटात असतो आणि आपण या संधीचा फायदा उचलू शकत नाही. या अशा अवस्थेमध्ये आपल्या या क्षेत्राला सांभाळावे लागते. यामध्ये एक मार्ग आहे, ज्यामध्ये खात्री आहे. ते आहे इथेनॉल.

आज भारताला उर्जा आयात करावी लागत आहे आणि आपले सर्वात अधिक परकीय चलन यासाठी खर्च होत आहे. ते पेट्रोल, डीझेल, तेल यासाठी खर्च होत आहे. इथेनॉलच्या वापरुन आपण हि आयात कमी करू शकतो. आपल्या सार्वजनिक वाहतूक प्रणालीमध्ये याचा वापर करू शकतो. जगभरात ब्राझील सारखे अनेक देश आहेत ज्यांनी इथेनॉलचा उत्तम प्रकारे वापर करून पेट्रोल आदी वाचवले आहे आणि पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली सुरु केली आहे. आपण भारतात याचा वापर कशाप्रकारे करू शकतो. मागील २ वर्षात इथेनॉलचे उत्पादन आणि त्याची विक्री तीन पटीने वाढली आहे. २०१५-२०१६ मध्ये हे सर्वाधिक होते, परंतु आपल्या क्षमतेच्या तुलनेत या क्षेत्रातील आपले कार्य अजून पिछाडीवरच आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी हे आवश्यक आहे की, धोरणांद्वारे, आधार प्रणालीद्वारे आपण मूल्यवर्धनामध्ये इथेनॉलचा वापर कसा करू शकतो आणि आपली आयात कशाप्रकारे कमी करू शकतो यावर विचार करायला हवा. आपल्या वाहतूक प्रणालीमध्ये खाडीचे तेल वापरायचे की झाडीचे तेल(oil made from bush) वापरायचे. मला विश्वास आहे की, आपल्या देशातील शेतकऱ्यांमध्ये खाडी तेलाच्या वापरापासून देशाला मुक्ती मिळवून देवून झाडी तेलाचा वापर करून देशाला प्रगतीच्या पथावर नेण्याची ताकत आहे. आपल्याला या गोष्टींना प्रोत्साहन द्यायचे आहे. सरकारने देखील काही विकासात्मक योजना तयार केल्या आहेत. पहिल्यांदाच इथेनोलमध्ये एम एस पी सारखी व्यवस्था सुरु केली आहे जेणेकरून बाजारात हमी निर्माण होईल. काही साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल तयार करण्याचा प्लांट नाही. आम्ही त्यांना सांगितले होते तुम्ही दुसर्याचे काम घ्या आम्ही तुमची भरपाई करू आणि यामुळे संपूर्ण उसाच्या उत्पादनापासून इथेनॉल तयार करण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. साखरेच्या बाजारपेठेत घसरण झाली तरीदेखील आपण यामध्ये संतुलन राखू शकतो. साखर बाजारपेठेतील समस्या आपण दुसरीकडे वळवू शकतो. म्हणजेच एका प्रयोगाच्या स्वरुपात याचा वापर करून अर्थव्यवस्थेत समतोल राखण्याच्या दृष्टीने आपण याचा विचार करू शकतो.

अजून एक क्षेत्र आहे स्टार्ट अप चे. ही गोष्ट निश्चित आहे की, नाविन्याच्या दिशेने आपल्याला अजून बरेच कार्य करायचे आहे. आणि जितके नाविन्य आज शेतीत होत आहे त्याहून अधिक नाविन्य कृषीमध्ये आज अभियांत्रिकेच्या माध्यमातून होत आहे. चिकित्सा विज्ञान ज्याप्रकारे संपूर्णतः तंत्रज्ञानावर चालते. चिकित्सा विज्ञानामध्ये तंत्रज्ञान खूप मोठी भूमिका बजावते तो दिवस दूर नाही जेव्हा कृषी क्षेत्रामध्ये देखील तंत्रज्ञान खूप मोठी भूमिका बजावेल. आपण आपल्या युवकांना, वैज्ञानिकांना, आपल्या तंत्रज्ञान तज्ञांना स्टार्ट अप च्या माध्यमातून संधी दिली पाहिजे, नाविन्याची संधी दिली पाहिजे.

वसंतदादा पाटील संस्थेद्वारा आपण साखरेवर लक्ष केंद्रित करून शेती आणि साखर आणि साखरेची उप उत्पादने यावर लक्ष केंद्रित करू शकतो. यासाठी काही नवीन मशीन मी आता पाहिल्या. ज्याप्रकारे दुधातून मेद (fat) काढतो त्याचप्रकारे साखरेतील मेद काढण्यासाठी साखरेची स्थिती जाणून घेण्यासाठी मशीनचा वापर केला जाऊ शकतो. ह्या मशीन आता लोकप्रिय होत आहेत. परंतु अशा खूप छोट्या छोट्या मशीन आपल्या देशातील हुशार युवक तयार करू शकतील. आपल्याला स्टार्ट अप ला प्रोत्साहन द्यायचे आहे. आपले स्टार्ट अप जेवढ्या अधिक प्रमाणत कृषीक्षेत्रात येतील आपल्या देशातील शेतकऱ्याचे कृषी आणि मूल्यवर्धन एकमेकांना अनुकूल होऊ शकते आणि या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या देशातील कृषीक्षेत्रात ज्या दुसऱ्या क्रांतीविषयी चर्चा होत आहे टी फक्त शेतीचे क्षेत्रफळ आणि कृषी उत्पादन इथपर्यंत सीमित राहणार नाही.

सरकारने पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक सुरक्षित विमा योजना सुरु केली आहे. आपल्या शेतात कोणते पिक घ्यावे हि खूप मोठी समस्या नेहमी शेतकऱ्यासमोर असायची परंतु मृदा आरोग्य कार्डाद्वारे आता शेतकऱ्याला सहज कळते की आपल्या शांतता कोणते पिक घ्यायचे. जर बाजूच्या शेतकऱ्याने एखद्या लाल डब्यातील औषध आणले आणि ते जर त्याने फवारले तर ह्यालादेखील वाटायचे की, मी देखील लाल डब्यातील औषध आणले पाहिजे. जर बाजूच्या शेतकऱ्याने पिवळी पावडर टाकली तर ह्याला देखील वाटते आपण देखील पिवळी पावडर टाकायला पाहिजे. दोघांच्या जमिनीचा गुणधर्म वेगळा आहे. दोन्ही जमिनींची आवश्यकता वेगळी आहे. एकाच्या जमिनीत काही गुण जास्त आहेत तर दुसऱ्याच्या जमिनीत दुसरे गुण जास्त आहेत. मृदा आरोग्य कार्डाच्या माध्यमातून आपण आपल्या जमिनीचे आरोग्य समजून घेतले पाहिजे. मानवी शरीराचा विचार केला तर ज्याप्रकारे रक्त, लघवी यांचे रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत डॉक्टर औषध देत नाहीत तसेच जमिनीचे आहे. आपले शेतकरी देखील आपल्या सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मृदा आरोग्य प्रयोगशाळा स्थापन करू शकतात. आणि दरवर्षी पिक पेरणी करण्याआधी एकदा आपल्या जमिनीचा पोत समजून घेण्याची सवय शेतकऱ्याला लागली पाहिजे आणि त्यानुसार त्याने आपले वेळापत्रक तयार केले पाहिजे. तुम्ही पहालच आपला खर्च खूप कमी होईल.

महाराष्ट्र सरकारने सौर पंपाचा खूप मोठा उपक्रम सुरु केला आहे. सौर पंप चळवळीला आपण शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाऊया. आपला सर्वात अधिक खर्च प्रभावी शेती, वीज आणि पाण्यावर होतो. सौर पंप उपक्रमाला भारत सरकार देखील मदत करत आहे. महाराष्ट्र सरकारने देखील पुढाकार घेतला आहे. सहकारी संघटना देखील त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि जर आपण वीज वाचवून सौरुर्जेचा वापर शेतीमध्ये केला तर प्रभावी शेती खर्चामध्ये याचा खूप फायदा होईल आणि या दिशेने आपल्याला प्रयत्न केला पाहिजे.

मला विश्वास आहे की, शेती क्षेत्रात तुम्हा सर्वांना माझ्याहून अधिक अनुभव आहे. आणि मी पाहिले आहे की शरद पवार राजकीय जीवनात कितीही व्यस्त असले असले, कितीही राजकीय चिंता असल्या तरीही, जर शेतकऱ्याचा विषय आला, शेतीचा विषय आला तर ते लगेचच कार्यरत होऊन त्या कामाला लागतात. त्यांच्या या समर्पितवृत्तीला मी पहिले आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक आयुष्यात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कार्यकाळाला ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. मी आत्ताच त्यांचे अभिनंदन करतो. ५० वर्ष निरंतर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणे, जे निवडणुका लढवतात आणि जिंकतात त्यांना हे माहित आहे की कशाप्रकारे आयुष्य जगावे लागते. शरद पवारांनी हे आयुष्य जागून दाखवले आहे. आणि सार्वजनिक जीवनात कार्यरत असणाऱ्या सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण प्रस्थापित केले आहे.

जर मी आपल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर महानगरपालिकेच्या त्यांनी नगरसेवक म्हणून जिंकून आलेल्या निवडणुकीपासून मोजले तर ते देखील लोकप्रतिनिधी म्हणून निरंतर २५ वर्ष कार्यरत आहेत. इतक्या छोट्या वयात त्यांचा……पण शरद पवार हे खासदार आणि आमदार म्हणून निवडून आले होते. हा खरंच एक खूप मोठा वारसा आहे. सार्वजनिक जीवनातील खूप मोठी पुंजी आहे.शरद पवारांचा वैयक्तिक जीवनात आदर करणाऱ्या व्यक्तींमध्ये मी आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी त्यांनी मला पदोपदी मदत केली आहे. आणि ही गोष्ट सार्वजनिकपणे मी मान्य करतो आणि मला असे वाटते की, सार्वजनिक आयुष्य हे जनहितासाठी असते.

बंधू भगिनींनो मी ह्या विषयाव्यतिरिक्त देखील काही सांगू इच्छितो. ८ तारीख रात्री ८ वाजता….. आपल्याला हे माहित आहे आपले शत्रू आपल्याला नेस्तोनाबूत करण्यासाठी त्यांच्या स्वतः च्या देशाचे जितके चलन छापतात त्यापेक्षा अधिक बनावट नोटा आपल्या देशात याव्या अशी खेळी नेहमी खेळत असतात. आणि मोठे चलन जे मोठ्या प्रमाणत आहे. नक्षलवादाच्या रुपात, उग्रवादाच्या नावाने लोकांकडून खंडणी वसूल केली जाते. जंगलात झाडाखाली लपवली जाते. त्यापासून शस्त्रास्र खरेदी केली जातात. दहशतवादला प्रोत्साहन मिळते. त्यांची ही जी दुहेरी नस आहे ज्यातून त्यांना हा पैसा येतो त्याला कापणे खूप गरजेचे होते. म्हणूनच ८ तारखेला रात्री ८ वाजता १००० आणि ५०० च्या नोटा बनावट नोटा यासंदर्भात सरकारने खूप मोठा निर्णय घेतला. देशाच्या जनतेने त्याला जो आशिर्वाद दिला आहे त्यासाठी मी देशवासीयांचे आभार मानतो. एक भ्रम पसरवला जात आहे इथे मोठ्या प्रमाणत शेतकरी बांधव उपस्थित आहेत म्हणून मी सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना भ्रमित केले जात आहे की, आता ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्या, आता तुमच्याकडे जे शेतीतून मिळालेले पैसे आहेत ते तुम्हाला बँकेत जमा करायला लागतील आणि नंतर मोदी यावर कार आकारणार. माझ्या शेतकरी बांधवानो तुमच्यावर कुठलाही कार आकारला जाणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. हा देश तुमचा आहे हे पैसे तुमचे आहेत हि बँक देखील तुमची आहे आणि हा मोदी देखील तुमचा आहे. त्यामुळे या सर्व भ्रमजलातून बाहेर या. पण हे ही सत्य आहे की, ८ तारखेलाच मी देशाच्या जनतेकडे ५० दिवसांचा कालावधी मागितला होता. कारण इतका मोठा बदल घडवून आणायचा आहे. तुम्हाला माहित असेल १९७८ मध्ये जनता पक्षाचे सरकार होते तेव्हा मोरारजी देसाईंनी १००० रुपयाची नोट रद्द केली होती. मी पहिला नाही ज्याने हे काम केले आहे. त्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार होते. त्यांनी चार आण्याचे नाणे बंद केले होते. तुम्हाला कदाचित लक्षात असेल त्यांनी चार आण्यावर प्रतिबंध लावला होता. ते तर आता तुम्हाला माहिती. परंतु मोरारजीभाई यांनी १००० च्या नोटांवर बंदी आणली होती. परंतु त्यावेळी रिझर्व बँकेने एकूण १४५ कोटी रुपयांच्या १००० च्या नोटा छापल्या होत्या आणि त्यातील फक्त ८० कोटी लोकांकडे होते. ६५ कोटी बँकेतच होते. त्यावेळी देशात ५०० आणि १००० च्या नोटांचे मूल्य अंदाजे १४ लाख कोटी होते. कुठे १४५ कोटी आणि कुठे १४ लाख कोटी आणि शत्रूंनी समाजद्रोही कारवाया करणाऱ्यांनी आणि भ्रष्टाचारी लोकांनी याचा फायदा उचलला. जर याला मुळापासून काढून फेकले नाही तर देशाच्या भावी पिढीची स्वप्ने पूर्ण करण्यामध्ये आपली व्यवस्था बाधा निर्माण करेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो मी असे कधीच म्हणणार नाही की इतक्या मोठ्या निर्णयामुळे त्रासच होणार नाही. मी पहिल्याच दिवशी सांगितले होते यामुळे असुविधा होईल. कष्ट पडतील, त्रास होईल परंतु ७० वर्षांपासून ज्या आजाराने देशाला ग्रासले आहे त्यापासून देशाला मुक्ती मिळेल. गरीब, मध्यमवर्गीय व्यक्ति उजळ माथ्याने जगू शकेल. असुविधा होत आहेत परंतु हे भागीरत कार्य पूर्ण करण्यासाठी देशवासियांनी सहकार्य करावे अशी मी त्यांना विनंती करतो. काही लोकं असतील ज्यांना जास्त त्रास होईल. माहित नाही ते काय करणार, परंतु मला त्यांची जास्त काळजी नाही. मला देशाच्या सामान्य नागरिकाची चिंता आहे.

आणि मी तुम्हाला विश्वास देतो की, तुम्हला तुमची ५०० रुपयांची नोट कोणालाही ४९९ रुपयांना देण्याची गरज नाही. तुमचे ५०० रुपये आहेत आणि त्याचे तुम्हाला ५०० रुपयेच मिळाले पाहिजे हा तुमचा हक्क आहे. तुम्हाला १००० रुपयाच्या नोटेमधील १० रुपये देखील कोणाला द्यायची गरज नाही. तुम्हाला १००० रुपयांचे संपूर्ण १००० रुपयेच मिळतील. मी केवळ ३० डिसेंबर पर्यंत ५० दिवसांचा कालावधी मागितला आहे. व्यवस्था सुरु आहे, या सर्व गोष्टी मी ८ तारखेपूर्वी करू शकत नव्हतो. नाहीतर या गोष्टी लपून राहिल्या नसत्या. ह्या गोष्टी गुप्त राहिल्या नसत्या. ह्या गोष्टी उघड झाल्या असत्या आणि जर ह्या गोष्टी उघड झाल्या असत्या तर ज्यांच्याकडे काळ्यापैशाच्या गोणी भरलेल्या आहेत त्यांनी तर मैदान मारले असते. मी इथे गरिबांसाठी आहे गरिबांच्या हक्कासाठी आहे. सामान्य नागरिकांसाठी आहे. सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आहे. हे सर्व करताना खूप त्रास होणार याची पूर्ण कल्पना आहे.

सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बँकांमध्ये पैसे पोहोचणे थोडे त्रासाचे होते. पण मला विश्वास आहे देशवासी ३० डिसेंबर पर्यंत मला सहाय्य करतील.

देशामध्ये शुध्दीकरणासाठी प्रामाणिकतेच्या या पर्वामध्ये सगळे सहकार्य करतील.

याच एका अपेक्षेसह वसंत राव दादांना प्रणाम करतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि हे शताब्दी वर्ष शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी, आधुनिक कृषी क्षेत्राकडे आपल्याला घेऊन जाणारे असावे अशी मी शुभेच्छा देतो. मला याप्रसंगी इथे येण्याची संधी मिळाली यासाठी मी शरद पवारांचा आभारी आहे ज्यांनी इतक्या स्नेहाने आणि सन्मानाने इतक्या मोठ्या सोहळ्यासाठी मला आमंत्रित केले. खूप खूप धन्यवाद.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha