Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य योजना


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेचा लाभ 2016-17 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी सरकारने 18,276 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर साल दर शेकडा फक्त चार टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यंत पीक कर्ज घेता येणार आहे. तसेच या कर्जाची परतफेडीची मुदत वर्षभर ठेवण्यात आली आहे.

या अर्थसहाय्य योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत-

1) जे शेतकरी 2016-17 या वर्षात तीन लाख रुपयांपर्यंत कृषी कर्ज घेणार आहेत, त्यांच्या कर्जावरील व्याजापैकी 5 टक्के व्याज केंद्र सरकारच्या अनुदानातून देण्यात येणार आहे. यापुढे शेतकऱ्यांना कर्जावरील फक्त चार टक्के व्याज द्यावे लागणार आहे. समजा शेतकरी हे अल्प मुदतीचे कर्ज फेडू शकला नाही तर, सरकार आणखी दोन टक्के व्याज अनुदान म्हणून देणार आहे. म्हणजेच एकूण व्याजामध्ये सात टक्के अनुदान सरकार देणार आहे.

2) व्याज अनुदान योजनेसाठी केंद्र सरकार 2016-17 या आर्थिक वर्षात अंदाजे 18,276 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

3) लहान आणि मध्यम शेतकरी हंगामानंतर पिकांच्या साठवणूकीसाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज घेतात. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने व्याज दरावर दोन टक्के अनुदान दिले आहे.

4) नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या व्याजावर दोन टक्के अनुदान केंद्र सरकार देणार आहे.

S.Bedekar/B.Gokhale