Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संविधान दिनानिमित्त राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य


सभागृहाला आदरपूर्वक अभिवादन करतो. या महत्त्वाच्या विषयावर 50 सन्माननीय सदस्यांनी सविस्तरपणे आपले विचार मांडले. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एक चांगला उपक्रम आणि जेव्हा सर्व पक्षांच्या प्रमुखांसोबत अधिवेशनापूर्वी बैठक झाली होती, तेव्हा प्रत्येकाने एकमुखाने या उपक्रमाचे स्वागत केले होते, त्याला पाठिंबा दिला होता. तसे पाहिले तर या उपक्रमाचा मूळ विचार आमचा होता, असा आम्ही दावा करत नाही. माझ्या माहितीशिवाय आणखीही काही असू शकते. 2008 साली महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आणखी एक चांगले काम केले होते ते म्हणजे राज्यघटनेचा प्रस्तावना शाळांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचून घेण्याचा उपक्रम घेतला होता. जेव्हा मी गुजरातमध्ये होतो, तेव्हा मला हा प्रयोग फार आवडला. कारण आपण 15 ऑगस्ट साजरा करतो, 26 जानेवारी साजरा करतो. 15 ऑगस्ट रोजी आपण क्रांतीकारकांना वंदन करतो, वृत्तवाहिन्यांवर चर्चा घडून येतात, वर्तमानपत्रांमध्येही छापून येते. 26 जानेवारीला फार काही होत नाही. परेडवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत असते. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात एक बाब निश्चित आहे, ती म्हणजे आमच्यासाठी चालता-बोलता मार्गदर्शन करणारा जर कोणता घटक असेल तर ती आपली राज्यघटना आहे. पुढे जाण्यासाठी जर कोणता मार्ग आहे तर ती आपली राज्यघटना आहे. कठीण प्रसंगांमधून सोबत चालण्यासाठी, एकमेकांना जोडण्याचे काम राज्यघटना करते. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण राज्यघटनेची माहिती करुन दिली पाहिजे. एवढेच नाही तर राज्यघटनेतील कलम काय आहेत, कोणत्या परिस्थितीत राज्यघटनेची निर्मिती झाली, कोण कोणत्या महापुरुषांनी कशाप्रकारे योगदान दिले आणि त्यांची दूरदृष्टी कशी होती. एवढा वैविध्यपूर्ण देश आणि तोही गुलामीच्या काळात त्यांना करावा लागलेला अडचणींचा सामना. या सर्वांना बाजूला सारुन भारताचा जो मूळ आत्मा आहे, भारताची जी मूळ विचारधारा आहे, त्याच्या प्रकाशात भारतासमोर जी आव्हाने आहेत, त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एखादी व्यवस्था विकसित करावयाची होती. हे काम किती महान होते. सभागृहातील सर्व महापुरुषांचे नाव देणे कठीण आहे, मात्र आम्ही सर्वांचा आदर करतो. हा कार्यक्रम संविधानसभेत बसलेल्या ऋषितुल्य व्यक्तीमत्वांना वंदन करण्यासाठी आहे. त्यांचा आदर करण्यासाठी आहे. आणि अशाप्रकारचा कार्यक्रम पूर्वी झाला नव्हता, तो काही गुन्हा ठरत नाही. आम्हाला सुचले आम्ही केले. यामागचा आमचा उद्देश असा आहे की, आगामी शतकांमध्ये पुढील पिढ्यांना हे सर्व समजले पाहिजे. असे नाही की, माझ्या पक्षातील एखादी व्यक्ती असेल तरच मी आठवण काढली पाहिजे. अशाप्रकारे देश चालत नाही. कोणत्या विचारांचे होते, कोणत्या पक्षाशी संबंधित होते या आधारावर आपण निर्णय घेऊ शकत नाही. हा देश म्हणजे प्रत्येकाच्या सकारात्मक योगदानाचा परिणाम आहे आणि प्रत्येकाच्या सकारात्मक योगदानाला आपल्याला जोडायचे आहे. तेव्हा कुठे राष्ट्र सार्वभौम होते आणि म्हणून 26 नोव्हेंबर साजरा करण्यामागे एक विचार आहे की, देश फक्त विचारप्रणालींमध्ये अडकून राहता कामा नये, जे संविधान सभेची जोडले होते त्यांच्या भावनांशी देश जोडला पाहिजे. आम्हाला यात काही शंका वाटत नाही की, त्या बैठकीत असलेले बहुतांश लोक काँग्रेसच्या विचारधारेचे होते. पण आमच्यामध्ये हे सांगण्याच हिमंत आहे की, आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आमच्यामध्ये हिमंत आहे, आमच्यावर संस्कार आहेत त्यांचा आदर करण्याचे, त्यांचे अभिनंदन करण्याचे. हे आमचे संस्कार आहेत. याकडे आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. सूचना आल्या पाहिजेत, फार काही मोठ्या प्रमाणात आल्या नाहीत तरी चालेल पण आल्या पाहिजेत. कारण हे सभागृह आहे, याकडून फार अपेक्षा आहेत. याठिकाणी आपण पक्ष आणि विरोधी पक्ष, पक्ष आणि विरोधी पक्षापेक्षा कधी कधी निःपक्ष ही झाले पाहिजे. आगामी पिढ्यांना आपल्या राज्यघटनेविषयी कशाप्रकारे मार्गदर्शन करता येईल, राज्यघटनेप्रती त्यांची आस्था कशी वाढेल. निराशेच्या काळातही त्यांना वाटले पाहिजे की, हां काही लोक अशाप्रकारचे आहेत, गडबड सुरू आहे मात्र ही एक जागा अशी आहे की याठिकाणाहून कधी ना कधी सूर्यप्रकाश दिसून येईल. ही भावना आगामी पिढ्यांमध्ये निरंतर भरणे आवश्यक आहे. म्हणून हा संवादाचा एक प्रयत्न झाला आहे आणि म्हणून याठिकाणी हे यशस्वी झाले तर कनिष्ठ पातळीवर हे लवकरच झिरपेल.

सरकारमध्ये असलेल्या आम्हा लोकांना वाटत नाही की प्रत्येकवेळी यावर अशाप्रकारची चर्चा होवो (वाद-विवाद), असे आम्ही म्हटलेही नाही. 125 वर्ष, बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे योगदान आम्ही कमी लेखू शकत नाही. आम्ही त्यांची मोठ्या प्रमाणात झालेली उपेक्षाही पाहिली तसेच उपहासही पाहिला आणि नाईलाजाने त्यांचा स्वीकार केलेलाही पाहिला. मी मुद्दाम याठिकाणी आम्ही हा शब्द वापरत आहे, मी किंवा आपण ही भाषा मी वापरत नाही. खालून आज दबाव आला आहे की आज हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला नाकारू शकत नाही. या वास्तवाचा आम्ही स्वीकार केला पाहिजे आणि म्हणून 125 वी जयंतीदिनी राज्यघटनेवर चर्चा होत आहे, बाबासाहेब आंबेडकरांवर चर्चा झाली पाहिजे. तसेच संविधासभेतील सर्व महापुरुषांना आम्ही वंदन करत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांसह सर्वांना आम्ही वंदन करत आहोत. सर्वांचा आदर करत आहोत आणि हीच भावना घेऊन आगामी वाटचाल करावयाची आहे.

एक मात्र खरे आहे की, आपल्या येथे कुटुंबांमध्ये ही बाब सांगितली जाते, समाजजीवनातही सांगितली जाते, लोककथांमध्ये सांगितले जाते. चांगल्या गोष्टींचे पुन्हा पुन्हा स्मरण केले पाहिजे. चांगल्या काळात तसेच कठीण काळातही याचे स्मरण केले पाहिजे. सामाजिक जीवनासाठी हे अनिवार्य आहे. एखादे मुल कितीही मोठे झाले तरी, जेव्हा तो आपले गाव सोडून जायला निघतो, दहावेळा जात असेल तरीही आई म्हणते की, बाळा, चालू गाडीत चढू नकोस, खिडकीतून बाहेर पाहू नकोस. मूल मोठे झाले आहे, यापूर्वी दहावेळा बाहेर गेला आहे. त्यावेळीही त्याने हे ऐकले आहे. पण आईचे मन म्हणते की, मुलाला पुन्हा एकदा आठवण करुन दिली पाहिजे, बाळा काळजी घे. ही आपली परंपरा आहे. म्हणून डॉ कर्णसिंहजी जे याठिकाणी बसले आहेत. ते माझ्यासमोर मोठ्या प्रमाणात संस्कृत श्लोक आणून ठेवतील, कारण आपल्याकडे म्हटले जात असे

करत-करत अभ्यास के जड़मति होत सुजान ।

रसरी आवत जात ते सिल पर पड़त निसान ।।

विहीरीतून आपण जेंव्हा दोरी बांधून पाणी काढतो. दगडासोबत लढाई करण्याएवढी दोरी तर मजबूत नसते, पण निरंतर सरावाचा हा परिणाम आहे की त्या दगडावरही नवीन आकृती आकार घेते. म्हणून आमच्या राज्यघटनेसाठी एक सोहळा झाला पाहिजे. राज्यघटनेचा एक उत्सव झाला पाहिजे. राज्यघटनेच्या प्रत्येक भावनेप्रती आमचा आदर-सत्कार कैक पिढ्यांपर्यंत चालला पाहिजे. हे संस्कार, हा वारसा हे आमचे उत्तरदायित्व आहे. फक्त तू-तू, मै-मै करुन देश चालत नाही. देश सोबत मिळून चालल्याने चालतो आणि म्हणून राज्यघटना ही अशी शक्ती आहे जी आम्हाला तू आणि मी या भाषेतून बाहेर काढू शकते. राज्यघटना ही एक भावना आहे जी आम्हाला जोडण्याचे बळ देते. हे सभागृह असे आहे ज्याठिकाणी पक्ष आणि विरोधी पक्ष यापेक्षाही निःपक्षतेचाही एक संदेश देशाप्रती जाण्याचे बळ देतो. म्हणून मी या सभागृहाचा अतिशय आदर करतो.

आपल्याला मूल्यांचा सन्मान करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. आमच्या राज्यघटनेची उंची, जगातील सर्वात मोठी लोकशाहीप्रणाली, आणि संविधानसभेचे काम सुरू होते, तेंव्हाचे वृत्तपत्र आजही आम्ही पाहू शकतो. फार शंका होत्या, की ही गाडी चालेल का, या लोकांना हे शक्य आहे का, याबाबींना चिथावणी देण्यात ब्रिटीशांनाही रस होता. म्हणून लोकांना वाटत नव्हते, परंतु आपण अनेक अडथळे पार करुन एवढी वर्षे झाली, आपल्या त्या महापुरुषांनी आपल्याला अतिशय उत्तम अशी मार्गदर्शनपूर्ण राज्यघटना दिली आहे. जी आम्हाला बळ देत आहे, निरंतर बळ देत आहे. म्हणून आपण राज्यघटनेचे गुनगान गात आहोत.

अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक ग्रॅनविल ऑस्टीन यांनी भारतीय राज्यघटनेबद्दल म्हटले होते, “ फिलाडेल्फियामध्ये 1787 मध्ये ज्या राजकीय उपक्रमांची उत्त्पती झाली, संभाव्यतः त्यानंतरची महान राजकीय उत्त्पत्ती म्हणजे भारताची राज्यघटना होय, हे त्याकाळी म्हटले होते. म्हणून आपण म्हणू शकतो, आपल्याकडे आता कधी-कधी आमच्याकडे, आपले प्रमुख काम आहे, कायदानिर्मितीचे. यासाठी लोकांनी आपल्याला याठिकाणी पाठवले आहे आणि आपण अनुभवी आहोत, जाणकार आहोत. पण, आपण पाहतो की, आपल्यामध्ये फार मोठी कमतरता आहे आणि म्हणून आत्मपरीक्षण करावे लागेल. संविधानसभेतील सदस्यांची दूरदृष्टी आणि सामर्थ्य किती होते, हे आपण आठवून पाहिले तर लक्षात येईल की, आपल्याला किती उभारी घेण्याची आवश्यकता आहे, याची आपल्याला जाणीव येईल.

संविधान सभेतील सदस्यांनी 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल, त्याच्या संरक्षणाची चिंता केली आहे. आपण आज कायदे बनवतो. आपण पाहिले असेल त्यामध्ये यांचा दोष आणि त्यांचा दोष हा मुद्दा नाही. आपली एकंदरीत परिस्थिती अशी आहे की, आपण कायदा निर्माण करतो आणि लगेच दुसऱ्या सत्रात म्हणावे लागते, अरे मागच्या वेळी निर्माण केला होता, पण त्यात दोन शब्द राहिले होते. जरा पुन्हा एकदा बदल करावे लागतील. आपल्यालाही किती मर्यादा आहेत, या मर्यादांचे मूळ कारण हे नाही की, परमेश्वराने आम्हाला बुद्धी दिली नाही. त्याचे मूळ कारण आहे की, आपण निरंतर राज्यघटनेच्या प्रकाशात काही बाबींचा विचार करत नाही. कधी राजकीय परिस्थिती वरचढ ठरते. कधी कधी तात्कालीक लाभ वरचढ ठरतात म्हणून आपण समस्यांना राजकारणाशी जोडतो म्हणून तेव्हा कुठे आपण मूळ व्यवस्थेला जवळ करु शकत नाही, जे शतकानुशतके कामी येईल आणि म्हणून संविधान सभेतील सदस्यांच्या उच्च विचारांबद्दल आपण बोलू, आपण त्यापासून प्रेरणा घेऊ, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे की त्यांनी किती विचार केला असेल. त्यांच्यावरही दबाव आला असेल, त्यांच्याकडेही बऱ्याच गोष्टींचा आग्रह झाला असेल. अत्यंत विपरीत विचारही पुढे मांडले असतील. सर्वकाही झाले असेल. पण सहमतीने एक दस्तावेज तयार झाला जो आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. म्हणून आपण जे काही कलम, कायदे निर्माण करतो, आपली जबाबदारी आहे की आपण ते काम केले पाहिजे. यातही मी राज्यसभेला विशेष महत्त्व देतो. वरिष्ठ सभागृहाला मी विशेष महत्त्व देतो कारण, आपल्याकडे शास्त्रांमध्ये म्हटले आहे,

न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा,

वृद्धा न ते यो न वदन्ति धर्मम्।

धर्मः स नो यत्र न सत्य मस्ति,

सत्यं न तद् यत् छलम भ्युपैति।

संविधान सभेत अशी एखादी चर्चा झाली नसेल, ज्यात ज्येष्ठ वृद्ध जन नसतील, वृद्धजनांमध्ये धर्म नसेल, धर्म तो नसेल ज्यात सत्य नसेल, अशी ती सभा आहे. म्हणून मी समजतो की, राज्यसभेचे एक वेगळे महत्त्व आहे. एक विशेष भूमिका आहे. संविधान सभेच्या चर्चेत गोपालस्वामी अय्यंगार यांनी जे म्हटले होते, ती मी याठिकाणी म्हणू इच्छितो, “जगभरात ज्या ही ठिकाणी कोणतीही महत्त्वपूर्ण संघप्रणाली असेल, त्याठिकाणी दुसऱ्या सभागृहाची व्यावहारिक आवश्यकता असतेच. एकूणच आपण हे जाणून घेण्यासाठी विचार करत आहोत की, प्रत्येकजण उपयोगी कार्यकर्ता आहे की नाही? दुसऱ्या सभागृहाकडून आपली अपेक्षा फक्त एवढीच आहे की, महत्त्वपूर्ण विषयांवर अतिशय महान दृष्टीकोनातून चर्चा झाली पाहिजे आणि क्षणिक भावनांचा परिणाम म्हणून समोर आलेल्या कायद्याला तोपर्यंत दूर ठेवले पाहिजे जोपर्यंत हा भावनांचा आवेश शांत होत नाही आणि सभागृहाच्या समोर आलेल्या उपायांवर शांतीपूर्वक विचार केला जात नाही आणि संविधानसभेत हे मांडताना आपल्याला एक बाब लक्षात ठेवावी लागेल की जेव्हा एखाद्या महत्वपूर्ण विषयावर विशेषतः आर्थिक बाबींशी संबंधित मुद्यांवर लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहांमध्ये काही वाद असेल तर लोकसभेचे मत विचारात घेतले जावे. म्हणून दुसऱ्या सभागृहात आपल्याकडे केवळ हे साधन प्राप्त होते की, ज्याच्या माध्यमातून आपण कामकाज लांबवू शकतो, जी संभाव्यरित्या घाईगडबडीने सुरू केलेली असते आणि म्हणून आपण त्या अनुभवी व्यक्तीला एक संधी देऊ इच्छितो जो गहन राजकीय विवादांमध्ये नसेल पण ज्ञान आणि महत्वाचे मुद्दे घेऊन तो या चर्चेत सहभागी होऊ इच्छित असेल. जी बाब सामान्यरित्या आम्ही लोकसभेशी जोडत नाही. या सर्व बाबी दुसऱ्या सभागृहाशी संबंधित आहेत. मला वाटते की एकूणच विचार करता बहुतांश जण असे सभागृह तयार करणे आणि ही सावधानी बाळगण्याच्या बाजूने आहेत की, ते कायदा अथवा प्रशासनाच्या मार्गात अडथळा ठरू नये” गोपालस्वामी अय्यंगार यांनी संविधानसभेत हे सांगितले होते. मला वाटते की, आपल्यासाठी या सभागृहातील सदस्यांसाठी एवढा मोठा मार्गदर्शक सिद्धांत असू शकत नाही.

पंडित नेहरुंनी आपले विचार मांडताना एक फार महत्वपूर्ण बाब सांगितली होती. त्यांनी म्हटले होते, आपल्या राज्यघटनेचे सफल कार्य कोणत्याही लोकशाहीप्रणालीप्रमाणे दोन्ही सभागृहांतील परस्पर सहकार्यावर अवलंबून आहे आणि म्हणून आपल्यासाठी हे आवश्यक आहे की आपण कशाप्रकारे मिळून ही बाब पुढे नेऊ शकू आणि जसे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे शास्त्रांमध्ये म्हटले होते की अशी कोणतीच सभा असू शकत नाही ज्यात अनुभवी लोकांचा समावेश नसेल आणि जो वरिष्ठ नसेल जो धर्माविषयी बोलणार नाही, ज्यात सत्य मांडल्याशिवाय राहणार नाही आणि ते सत्य असत नाही, ज्यात काही छळ-कपट आणि धोकेबाजी आहे. मला वाटते की, आपल्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

त्याच प्रकारे देश आमच्याकडे पाहत आहे. हे ठीक आहे की काळानुसार आपल्या लोकांची काय परिस्थिती आहे, आपल्या समाजबांधवांची काय परिस्थिती आहे, हे आपण पूर्णपणे ओळखतो. पण हे खरे आहे की, अजूनही आमच्यासाठी काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या निभावणे एक सदस्य म्हणून, आपल्या राज्यघटनेत बरेच काही सांगितले आहे. पण आपल्या शास्त्रांमध्ये जे सांगितले आहे, ते देखील आपल्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे.

यद् यद् आचरति श्रेष्ठः तत्त देवतरो जनाः

स यत् प्रमाणम कुरूते लोकस तत अनुवर्तते।

श्रेष्‍ठ लोक जसे आचरण करतात तसे इतर त्यांचे अनुकरण करतात. ते जे काही निकष प्रस्थापित करतात, लोक त्याच निकषांचे अनुकरण करतात. आंबेडकरांनी 1946 मध्ये एडमंड बर्क यांचे विधान सांगितले होते, “It is easy to give power, it is difficult to give wisdom. मी पूर्ण भाषांतर करुन सांगतो. शक्ती हातामध्ये घेणे जेवढे सोपे आहे, तेवढेच कठीण शहाणपण देणे आहे. म्हणून आपण आपल्याला आचरणातून स्पष्ट करु की, या सभेने आपल्या स्वतःला सार्वभौम शक्ती दिल्या आहेत तर त्या शक्तींचा उचित वापरही बुद्धी, विवेकाने झाला पाहिजे. आपण केवळ याच मार्गाने सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ शकू. एकतेच्या दिशेने जाण्यासाठी हाच मार्ग आहे”.

आदरणीय सभापती महोदय, आपल्या राज्यघटनेची निर्मिती करणाऱ्यांनी एवढा विचार केला, पण एक बाब त्यांना विचार करावीशी वाटली नाही आणि असे काय झाले की आम्हाला त्या मार्गावर चालावे लागले. त्यांचा दोष नव्हता. त्यांचा आपल्यावर विश्वास होता आणि म्हणून त्यांनी यादिशेने विचार केला नाही आणि तेंव्हा या सभागृहात, मग ते वरिष्ठ सभागृह असेल किंवा लोकसभा असेल आपल्याला नीती समिती (इथिक्स कमिटी) निर्माण करावी लागली. या सभागृहाला नितीविषयक समिती निर्माण करावी लागली. यासाठी मी कोणावर टीका करत नाही. राजकारणात आपण जी राजकीय मंडळी आहोत, आपण एक जबाबदारीचा संदेशही देत असतो. जेंव्हा आपल्याकडे काही सदस्यांनी छोट्या-मोठ्या चुका केल्या असतील तर, सभागृहाची तेवढी ताकद आहे की, त्यांनी सभागृहाच्या मर्यादा, पण हे आवश्यक आहे. सभापती महोदय, मी आग्रह करेन, हे आवश्यक आहे की आपल्या सदस्यांना वेळोवेळी नीतीविषयक समितीचे जे नियम आहेत, ते पुन्हा पुन्हा सांगावे लागतील. कारण आम्ही एखादी चूक करुन बसणार नाही आणि ही तर आपली जबाबदारी आहे. यासंबंधी मी सांगू इच्छितो की,

14 ऑगस्ट 1947, डॉ राधाकृष्णन यांनी म्हटले होते. त्यांनी जे म्हटले होते ते मी समजतो की, आपणा सर्वांची जबाबदारी आहे. डॉ राधाकृष्णन म्हणाले होते की, 14 ऑगस्ट रोजी, आज रात्रीनंतर पुढच्या दिवसापासून आपण ब्रिटीशांना दोष देऊ शकत नाही, आपण जे काही करु त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असू. स्वतंत्र भारताकडे त्यापद्धतीने पाहिले जाईल, ज्यापद्धतीने भोजन, कपडे, घर, सामाजिक सेवा यासंबंधी मुद्यांवर सामान्य नागरिकांच्या हितांची काळजी घेतली जाईल. जोपर्यंत उच्च पदांवरील सध्या असलेला भ्रष्टाचार संपवला जाणार नाही. भाई-भतीजावाद, सत्तेची आस, नफेखोरी आणि काळाबाजार मूळापासून संपवणार नाही, ज्यामुळे या महान देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. जोपर्यंत आपण प्रशासन, उत्पादन आणि जीवनाशी संबंधित वस्तुंच्या वितरणात कार्यकुशलता वाढवणार नाही. हे 2015, 01 डिसेंबर रोजीचे भाषण नाही. हे 1947, 14 ऑगस्ट रोजी डॉ राधाकृष्णन पाहत होते की, आपल्याला कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. म्हणून या महापुरुषांचे स्मरण करणे आपल्यासाठी आवश्यक आहे कारण या बाबी आपण हरवून बसू. आपण पुन्हा स्मरण करु, पुन्हा एकदा संकल्प करु, अजूनही वेळ गेलेली नाही. सव्वाशे कोटींचा देश, 800 मिलियन लोकसंख्या 65 वर्षापेक्षा कमी, अशा देशाने निराश होण्याचे कारण नाही. आमच्याकडे अशा महानपुरुषांचा वारसाही आहे. आपल्याकडे युवकांच्या सामर्थ्याला वाव देण्यासाठी संधीही आहेत. या दोन्ही बाबी मिळून आपण कशापद्धतीने वाटचाल करु, हे आपल्याला पाहावे लागेल.

कधी-कधी आपण जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करतो, तेंव्हा राज्यघटनेतील काही बाबी मी नमूद करु इच्छितो, आणि हे खरे आहे की, आपली राज्यघटना केवळ कायदेशीर मार्गदर्शक एवढीच मर्यादित नाही. तो एक सामाजिक दस्तावेज आहे आणि आपण तिच्या कायदेशीर ताकदीची जेवढी प्रशंसा करतो तेवढीच ती एक सामाजिक दस्तावेज आहे म्हणूनही प्रशंसा करावी, ही आपली जबाबदारी आहे.

बाबासाहेबांनी जी आपल्याला राज्यघटना दिली आहे त्यात एक कायदेशीर तरतूद आहे ती म्हणजे समतेच्या सिद्धातांचे पालन करणे, सामाजिक न्यायाचा आग्रह आहे, सामाजिक न्यायाची चर्चा आहे. जर आपण राज्यघटनेच्या चौकटीत अडकून राहू, तर असे होईल की समता तर प्रस्थापित होईल, पण समाज आपल्यामध्ये बदल घडवून आणण्यास तयार असणार नाही. शेकडो वर्षाच्या कुप्रथांपासून मुक्त होण्याचा जर समाज संकल्प करत नसेल. जे पाप आमच्या पूर्वजांनी केले आहे, त्या पापाचे प्रायश्चित जर आपण व आगामी पिढ्या घेणार नसू तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाची ताकद असेल, समतेची ताकद असेल, ती पूर्ण करण्याची जबाबदारी एक समाज म्हणून आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

आणि जर कायदा (बंधारण) आपल्याला समतेची ताकद देत असेल तर समाजाची संस्कार सरिता आम्हाला ममतेची ताकद देते. जर आपल्याला समता कायद्यामार्फत प्राप्त होत असेल तर समाजालाही तयार राहावे लागेल की, जसा समभाव आवश्यक आहे, तसेच समाजात ममभावही आवश्यक आहे आणि देश तेव्हा चालेल जिथे समता असले, ममता असेल, समभाव असेल, ममभाव असेल. या सव्वाशे कोटींच्या देशवासियांमध्ये दलित मातेच्या पोटी जन्मलेले मूलसुद्धा माझे भाऊबंध आहे. परमेश्वराने मला जेवढी शक्ती दिली आहे, तेवढीच त्यालाही दिली आहे. मला संधी मिळाली, पण त्याला संधी मिळाली नाही. त्याला संधी मिळाली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे फक्त कायद्याच्या चौकटीत राहून नाहीतर समाजजागृतीसुद्धा तेवढीच आवश्यक आहे. न हिंदू पतितो भवेत, हा संकल्प घेऊन पुढे वाटचाल करण्याची आवश्यकता आहे आणि ही बाब या सभागृहातून पुढे आली पाहिजे, सभागृहातून पोहचली पाहिजे. आजही समाजात जर कोणासोबत अशाप्रकारचा अत्याचार होत असेल तर तो आपल्यासाठी कलंक आहे. एक समाज म्हणून कलंक आहे. एक देश म्हणून कलंक आहे. हा त्रास आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि ही पीडा आपल्याला समाजातील खालच्या पातळीपर्यंत नेऊन सामाजिक संवेदना चेतवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत.

बाबासाहेब आंबेडकरांनी, हे खरे आहे की, जेव्हा आम्ही सरदार पटेलांचे स्मरण करतो, तेव्हा भारताच्या एकतेसोबत त्यांना जोडतो. सरदार पटेलांनी देश एक केला. सरदार पटेलांनी देश एक केला. यातच आम्हाला अडकून चालणार नाही. एकतेचा मंत्र भारतासारख्या देशात केंद्रस्थानी असला पाहिजे. तुटण्यासाठी अनेक कारणे मिळतील पण जोडण्यासाठी संधी शोधणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आपली जबाबदारी आहे की तोडण्यासाठी अनेक सबबी सांगता येतील, सव्वाशे कोटींचा देश आहे, कोणत्याही कानाकोपऱ्यातून मिळेल. पण काही लोक आहेत की ज्यांची जबाबदारी आहे की, तोडण्याच्या सबबींमध्येही जोडण्याच्या संधी शोधल्या पाहिजेत, लोकांना प्रेरित केले पाहिजे आणि जोडण्याचे बळ दिले पाहिजे. ही आमची जबाबदारी आहे. देशाची एकात्मता आणि अखंडतेसाठी, आणि हेच तर आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे, राष्‍ट्रीयम जागरीयम व्‍यम. अनंतकाळाची दक्षता हीच स्वातंत्र्याची किंमत आहे. ही बाब आपल्या नसानसांमध्ये भिनली आहे. म्हणून देशाच्या एकात्मतेचा आणि अखंडतेचा मंत्र निरंतरपणे आपल्याला पुढे न्यावा लागेल. माझ्या मनात काही विचार आहेत. मला आशा आहे की, तुम्ही जे विचार करता, ते काळानुरुप नवीन विचार, कल्पना दिल्या तर अधिक चांगले निर्माण करण्यासाठी प्रयत्न करता येतील.“एक भारत, श्रेष्‍ठ भारत”, कल्पना माझ्या मनात आहे. मी सध्या मोघमपणे हा विचार मांडत आहे, अद्याप काही आराखडा तयार केला नाही. आपल्या देशात आपण खूप सहन केले आहे. दाक्षिणात्य लोकांना वाटते, हिंदी आमच्यावर जबरदस्तीने लादली जात आहे. मी पाहिले आहे, भाषणांमधून हे दिसून येते. देश समजून घेण्याचा आणि पुढे वाटचाल करण्याचा आणखी एक मार्ग आहे. मी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेलांच्या जयंतीदिनी याचा थोडा उल्लेख केला होता. काय आम्ही राज्यांना प्रेरित करु शकू की नाही? ज्यात आग्रह केला जाईल की, समजा छत्तीसगड राज्य आहे, ते निश्चित करेल की 2016 मध्ये आम्ही केरळ महोत्सव साजरा करू. छत्तीसगड राज्यामध्ये विद्यार्थ्यांना मल्याळम भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. फार नाही किमान 100 वाक्य, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सहजरित्या, चहा पिताना, हसत खेळत हे होत राहिल, ते शिकतील. कधी मल्याळी चित्रपट महोत्सव छत्तीसगडमध्ये का होणार नाही, का त्याठिकाणच्या आहारपद्धती, त्याठिकाणची नाटके लोक पाहतील. अशाचप्रकारे आणखी एखादे राज्य काही दुसरे…एक राज्य एका वर्षासाठी दुसऱ्या राज्यासोबत जोडून घेईल. त्यावर्षी या ठिकाणाहून विद्यार्थी पर्यटक म्हणून त्याच राज्यामध्ये जातील. आपण हळूहळू देशातील सर्व राज्ये अशाप्रकारे प्रत्येक वर्षी एक राज्य साजरे केल्यास फार काही नाही एक-पाच गीत. आता पाहा, आपण सर्वजण वैष्णव जन या संकल्पनेशी परिचित आहोत.‘वैष्‍णव जन तो तेने रे कहिए’ सर्वांना माहित आहे. आम्ही ‘वैष्‍णव जन तो तेने रे कहिए’ जेव्हा ऐकतो, गातो आपल्याला ते परके वाटत नाही. कोणत्या भाषेत हे लिहिले आहे हे आठवण्याची कधी गरजच पडली नाही. एवढे ते आपल्याशी एकरुप झाले आहे. अशाचप्रकारे आपण देशातील सर्व भाषांतील मिळून चार ते पाच चांगली गीतं आगामी पिढ्यांना गाण्याची सवय लावावी. आपल्याला संस्कार करावे लागतील, मला वाटते राज्यघटनेची जी भावना आहे त्या भावनेचा आदर करत आपण या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत.

बाबासाहेब आंबेडकरांचे जे आर्थिक विचार होते. त्यांच्या आर्थिक विचारांचे वेगळेपण होते. ते औद्योगिकरणाच्या बाजूने होते. त्यांचे म्हणणे होते, मी आपला फार वेळ घेत नाही. पण माझ्या भावना सभागृहाने जाणून घ्याव्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत, हिंदुस्तानमध्ये औद्योगिकरण होणे फार आवश्यक आहे. ते म्हणत की, दलितांजवळ जमिनी नाहीत, ते जमिनीचे मालक नाहीत. त्यांना जर रोजगार पुरवायचा असेल तर ज्याच्याजवळ जमीन नाही तो कुठे जाणार. औद्योगिकरण यासाठीही झाले पाहिजे की, समाजातील दलित, शोषीत, वंचित यांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या पाहिजेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आज काही लोकांना आश्चर्य वाटेल, ते काय होते. त्यांचे आर्थिक विचार ऐकून आणि मला वाटते की, आज जो आपण वाद घालत आहोत, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार केला असेल. बाबासाहेबांचे विचार आपल्याला नेहमीच दिशादर्शक राहतील. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, “राज्याचे कर्तव्य आहे की, राज्याने लोकांच्या आर्थिक जीवनासाठी अशी योजना तयार केली पाहिजे जी उच्च उत्पादकतेकडे घेऊन जाणारी असेल. पण असे करताना दुसऱ्या संधींचे दरवाजे बंद होणार नाहीत हेही पाहिले पाहिजे. याशिवाय, राज्याने रोजगार उपलब्ध करुन द्यावा किंवा जो काही नफा, लाभ मिळेल त्याचे समान वितरण करण्यात यावे.”

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, “कृषी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवली जाऊ शकते पण त्यासाठी भांडवल आणि मशिनरी सोबत कृषी क्षेत्रातील श्रमामध्ये कपात करावी लागेल, ज्यामुळे जमीन आणि श्रमाची उत्पादकता वाढवता येईल. अतिरिक्त कामगारांना गैर-कृषी उत्पादक क्षेत्रांमध्ये रोजगार मिळाल्यास कृषीवरील ताण कमी होईल आणि भारतात उपलब्ध भूभागावर असलेला अत्याधिक दबावही कमी होईल. याशिवाय, जेव्हा या कामगारांना कृषी वा औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादक कार्यासाठी लावले जाईल तेव्हा त्यांची उपजिवीका तर होईलच शिवाय उत्पादनही वाढेल आणि अधिक उत्पादन म्हणजे अधिक भांडवल. थोडक्यात, हे अगदी विचित्र वाटेल पण भारताचे औद्योगिकरणच भारताच्या कृषी समस्यांवरील प्रभावी उपाय आहे.” बाबासाहेबांनी आणखी एका ठिकाणी म्हटले होते, “ भारत दोन चिमट्यांमध्ये अडकला आहे. ज्यात एक बाजू वाढती लोकसंख्या आहे आणि दुसरी बाजू, मर्यादीत जमीन आहे. याचा परिणाम असा होतो की, प्रत्येक दशकाच्या शेवटी आपल्याकडे लोकसंख्या आणि उत्पादन यांचे नकारात्मक संतुलन निर्माण होते आणि जीवनमानाचा दर्जा खालवतो. वाढत्या लोकसंख्येमुळे भूमिहीन आणि विभाजित परिवारांची संख्या प्रचंड वाढते आहे. औद्योगिकरणाच्या बाजूने एक गंभीर मोहीम चालवण्याबरोबरच कृषी क्षेत्र लाभकारी बनवण्याच्या शक्यता कमी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी 60 वर्षांपूर्वी, आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल, आपले आर्थिक विचार काय असावे. हे त्यावेळी बाबासाहेबांनी आमच्यासमोर मांडले होते.

ही बाब खरी आहे की, आपल्यापैकी कोणाच्याही देशभक्तीवर, सव्वाशे कोटी देशवासियांच्या देशभक्तीवर कोणी शंका उपस्थित करु शकत नाही, तसेच शंका उपस्थित करण्याचे काही कारण नाही, तसेच कोणाला आपल्या देशभक्तीविषयी सकाळ-संध्याकाळ पुरावे देण्याची आवश्यकता नाही. समाज, आपण सर्व भारताच्या राज्यघटनेशी बांधील आहोत. भारताच्या महान संस्कार आणि परंपरांशी जोडले आहोत. जग आपल्याकडे कशाप्रकारे पाहत होते आणि कशाप्रकारे गौरवगान करत होते. आज जर आपण त्या महापुरुषांनी राज्यघटनेची केलेली निर्मिती पाहिली तर लक्षात येईल की त्याकाळची परिस्थिती कशी असेल. मी शेवटचे काही शब्द सांगून माझे म्हणणे संपवणार आहे.

आदरणीय सभापती जी, मी आज मॅक्स म्युलर यांचे विधान सांगू इच्छितो, ते म्हणाले होते- जर मी असा देश शोधण्यासाठी पूर्ण जगाकडे पाहिल, ज्या ठिकाणी निसर्गाने धन, शक्ती आणि सौदर्य यांची सर्वात जास्त उधळण केली आहे-पृथ्वीवर खऱ्या अर्थाने स्वर्ग असेल तर- तर मी भारताकडे बोट दाखवेन. जर मला विचारले की, कोणत्या आकाशाखाली मानवी मेंदूने आपल्या आवडत्या भेटवस्तूंपैकी काही पूर्णपणे विकसित केल्या आहेत. आयुष्यातील कठीणातील कठीण अशा समस्यांवर गहन विचार केला आहे, आणि त्यापैकी काहींवर उपायही शोधून काढले आहेत, जे त्या लोकांचे लक्ष वेधून घेईल ज्यांनी प्लुटो आणि कांट अभ्यासले आहेत-तर मी भारताकडे इशारा करेन. जर मी स्वतःला विचारले की, कोणत्या साहित्याने, याठिकाणी युरोपमध्ये, ज्यांचे पालनपोषण पूर्णपणे ग्रीक आणि रोमन तसेच यहूदी, ज्यू विचारपद्धतीने झाले आहे, ते खऱ्या गोष्टी ओळखतील ज्या की आपल्या आंतरिक आयुष्य आणखी उत्तम, विस्तृत, आणखी विश्वव्यापी आणि वास्तविकरित्या एक खरा मनुष्य बनण्यासाठी आवश्यक आहे, केवळ या जन्मासाठी नाही तर या रुपांतरीत आणि अविनाशी आयुष्यासाठी- तर माझा इशारा भारताकडे असेल.

हे मॅक्स म्युलर यांनी म्हटली आहे. हा महान वारसा आपल्याला लाभला आहे. हाच वारसा आपली शक्ती आहे. चला याचे आपण गौरवगान करुया आणि आपण संकल्प करुया की, राज्यघटनेच्या प्रकाशात आपल्या महापुरुषांचा त्याग आणि तपश्चर्या यांच्या प्रकाशात जे उत्तम आहे, ते घेऊन आपण वाटचाल करु. जे कालबाह्य आहे त्याला तर काळ देखील स्वीकारत नाही. जे नित्य नूतन आहे, त्याचा स्वीकार केला जातो. त्या नित्य नूतनाचा स्वीकार करुन राष्ट्र निर्माणात आपण सर्व सदस्य योगदान देऊ.

मी पुन्हा एकदा सर्व आदरणीय सदस्यांचे सह्रदय आभार मानतो. सभापतीजी, मी आपलाही आभारी आहे आणि राज्यघटनेवरील या चर्चेतून जे उत्तम मुद्दे समोर आले आहेत, त्या उत्तम मुद्यांच्या प्रकाशात आपण कायदेनिर्मिती करु तेव्हा, संसदेत असू तेव्हा, समाजाचे नेतृत्व करताना, समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करु तेंव्हा या सर्व बाबी लक्षात घेऊन वाटचाल करु. याच विश्वासाने मी पुन्हा एकदा या सभागृहाला उत्तम भाषणांचा लाभ करुन दिल्याबद्दल सर्व आदरणीय सदस्यांचे अभिनंदन करतो. बाबासाहेब आंबेडकर आणि या महापुरुषासोबत कार्य केलेल्या सर्व महान व्यक्तींना वंदन करतो. खूप-खूप आभार.

S.Thakur/S.Tupe/M.Desai