Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

सिंगापूरमध्ये भारतीय समुदाय स्वागत समारंभात पंतप्रधानांचे संबोधन


नमस्ते, वणक्कम, दिवाळी आत्ताच संपली. मात्र या छोटेखानी भारताने यावेळी दिवाळीतला दीपोत्सव एक आठवड्याने वाढविल्याचे मला सांगण्यात आले. याबद्दल मी सिंगापूरवासियांचा मनापासून आभारी आहे. मी याआधीही सिंगापूरमध्ये आलो आहे. भारतीय समुदायाबरोबर संवाद साधण्याची संधी मला याआधीही मिळाली आहे. आज संपूर्ण जगात भारताची जी एक प्रतिमा तयार झाली आहे. ज्या विश्वासाने जग भारताकडे बघत आहे त्याचे कारण, त्याचे कारण मोदी नव्हे, त्याचे कारण परदेशस्थित तुम्ही, माझे भारतीय बंधु-भगिनी आहात. जगभरात ज्या देशात तुम्ही गेलात, ज्या भूमीवर पोहोचलात. ओळख होती किंवा नव्हती. परिस्थिती अनुकूल होती की प्रतिकूल, तुम्ही त्या भूमीला आपलेसे केलेत. तिथल्या जनतेबरोबर तुम्ही असे एकजीव झालात जशी दुधात विरघळलेली साखर.

आपण इतिहासात वाचले आहे. ऐकले आहे की पारसी जमात जेव्हा पहिल्यांदा हिंदुस्थानच्या भूमीवर आली, गुजरातच्या किनाऱ्यावर आली तेव्हा हिंदु राजा होते जदीराणा, ही जमात परदेशातून आली आहे, कोण आहेत, का आलेत हे माहित नव्हते. त्यांनी समुद्रात संदेश पाठविला तेव्हा राजाने, दुधाने भरलेला एक पेला त्यांच्याकडे पाठविला. हा पेला दुधाने पूर्ण भरला आहे त्यात जराही जागा शिल्लक नाही मी तुम्हाला कसा सामावून घेऊ असा प्रतिकात्मक संदेशही होता. पारसी समुदायाने त्या दुधात साखर मिसळली आणि पेला राजाकडे पाठविला. आणि राजाला संदेश दिला की आम्ही परदेशातल्या भूमीवरून आलो आहोत, संकटामुळे येथे आलो आहोत. मात्र, हा पेला दुधाने पूर्ण भरलेला असूनही त्यात साखर विरघळली तसे आम्हीही येथे एकजीव होऊ आणि गोडवा वाढवू. हिंदुस्थानी व्यक्ती जिथे गेल्या तिथे आपल्या आचरणाने, त्या समाजात अशा मिसळल्या की प्रत्येकालाच ते आपलेसे वाटू लागले. जगातल्या अनेक देशात असे समजते की आजुबाजूला कोणी भारतीय व्यक्ती आल्याचे कळले की तिथे त्यांना आनंद होतो. त्यांना वाटते अरे वा आमच्या शेजारी कोणी भारतीय आला आहे. ते आपल्या मुलांना सांगतात की, तुम्ही भारतीय मुलांबरोबर मैत्री करा.

या आपल्या या वर्तणुकीमुळे शतकानुशतके आपले देशबांधव जिथे जिथे गेले तिथे आपुलकीचा गंध घेऊन गेले. आपले बनून राहिले, शतकानुशतके ही परंपरा चालली आहे. म्हणूनच भारत जेव्हा ‘सोने की चिडिया’ म्हणून ओळखला जात होता तेव्हाही कोणाला ते खटकत नव्हते. आपल्या पडत्या काळातही कोणी आपल्याला अपमानित नाही केले कारण शतकानुशतके आपल्या लोकांनी दिलेले प्रेम, आपुलकी. केवळ पुराणात आपण हे वाचले आहे असे नव्हते. वसुधैव कुटुंबकम ही आपली वेदकाळापासून धारणा आहे. भारतीयांनी खऱ्या अर्थाने, संपूर्ण जग हे एक कुटूंब आहे ही भावना आचरणात आणली आहे आणि यामुळेच आज जगात, भारतीयांप्रती, भारताप्रती कुठेही शंकेची स्थिती नसते, तर आपलेपणाचा गंध असतो आणि म्हणूनच जगभरातल्या माझ्या सर्व भारतीय बंधु-भगिनींचे मी आदराने अभिनंदन करतो.

गेल्या मार्चमध्ये मी एक दिवसासाठी सिंगापूरमध्ये आलो होतो. ज्या महान व्यक्तीने हे सिंगापूर घडवले, त्यासाठी रक्ताचे पाणी केले, आपले आयुष्य वेचले. मच्छिमारांचे एक छोटेसे गाव आज जगातल्या समृध्द देशांची बरोबरी करत आहे, असे सिंगापूर तयार झाले. अशा महान नेत्याच्या दिवंगत ली कुआन यू यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी अंत्यदर्शनासाठी मी आलो होतो. सिंगापूरची आठवण काढताना एक विश्वास निर्माण होतो.

काही करायचा निर्धार असेल तर ती गोष्ट होतेच, स्वप्ने आहेत त्यासाठी समर्पणाची तयारी असेल तर सिध्दी आपल्यासाठी तयार असते. प्रसिध्दी आणि सिध्दीमध्ये मोठा फरक असतो. काहीही केले तर प्रसिध्दी तर मिळते पण सिध्दीसाठी केवळ तपस्या हाच एक मार्ग असतो. ज्यांनी प्रसिध्दीचा मार्ग स्वीकारला आहे त्यांना सिध्दी प्राप्त होत नाही. काही काळ चर्चेत राहतात पण भूमीवर बदल नाही घडवू शकत. 50 वर्षाच्या कार्यकाळात एका पिढीसमोर देश कुठून कुठपर्यंत पोहोचवता येतो याचे सिंगापूर एक उत्तम उदाहरण आहे. भारत महान देश आहे, विशाल देश आहे, सव्वाशे कोटी जनतेचा देश आहे, सर्व काही आहे तरीही सिंगापूरकडून शिकण्यासारखेही खूप आहे.

50 वर्षांपूर्वी, 60 वर्षांपूर्वी महान पुरुषाच्या मनात विचार आला सिंगापूरची स्वच्छता. आता आपला देश हे काम नाही करू शकत का? इथल्या नागरिकांची भूमिका आहे की नाही? महात्मा गांधी आयुष्यभर एका गोष्टीसाठी आग्रही होते – स्वच्छतेसाठी स्वातंत्र्य आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींपैकी प्राधान्य द्यायचे असल्यास मी स्वच्छतेला देईल असेही त्यांनी म्हटले होते.

सध्या भारतात सर्वांना वाटते आपला देश असा असता कामा नये. अस्वच्छतेत फार राहिलो. जग बदलले आहे, हिंदुस्थानला बदलायला हवे की नको? आणि चांगली गोष्ट अशी आहे की सव्वाशे कोटी देशवासियांनी बदलण्याची तयारी केली आहे. कोणताही देश सरकारांमुळे घडत नाही, वाढत नाही, देश घडतो जनतेच्या इच्छेमुळे, जनतेच्या संकल्पामुळे, जनतेच्या त्याग आणि तपस्येमुळे. पिढ्यानपिढ्या कार्यरत राहिल्यानंतर राष्ट्र घडते. भारतात ही भावना निर्माण झाली आहे. प्रत्येक भारतीयाला वाटू लागले आहे की देशाला पुढे न्यायचे आहे, देशाला पुढे न्यायचे आहे. आपण अशा युगात जगत आहोत ज्या युगात, काही मिळाले तर ते सोडण्याची इच्छा होत नाही. आपण प्रवास करत आहोत आपली जागा आरक्षित आहे, जागेवर आपण बसलो आहोत. बाजूच्या रिकाम्या जागेवर आपली बॅग ठेवली आहे, वर्तमानपत्र ठेवले आहे, काही सामान ठेवले आहे. ती जागा आपली नाही, पण कोणाला यायला उशीर झाला आहे आपण सर्व वस्तू तिथे ठेवल्या आहेत आणि जेव्हा कोणी त्या जागेवर येते तेव्हा मन खट्टू होते. ही प्रवृत्ती आहे पण मी भारतवासियांचा कल पाहिला आहे, भारतवासियांनी काय निश्चय केला आहे ते पाहिले आहे.

मी एकदा देशवासियांसमोर एक छोटीशी गोष्ट मांडली. आपण घरी गॅसच्या शेगडीसाठी जो सिलेंडर वापरता त्यावर सरकार जवळपास 500 रुपये अनुदानाच्या रुपात देते. तुम्ही अशा कुटूंबात आहात की जिथे 500 रुपये केवळ चहा-पाण्यावर खर्च होतात. तर तुम्ही अनुदान का घेता, ते अनुदान सोडू नाही शकत? केवळ एवढी बाब मी सांगितली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की देशातल्या 40 लाख कुटुंबांनी गॅस अनुदान सोडले. बाजूची जागा सोडायला ज्याचे मन तयार नव्हते तो आज अनुदान सोडायला तयार झाला आहे. महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री यांनी सांगितले आणि देशाने केले हे आपल्याला पटते, पण माझ्यासारखी एक सामान्य व्यक्ती, चहा विकणारी व्यक्ती देशासमोर एखादी गोष्ट मांडते आणि देश त्यांचा स्वीकार करतो तेव्हा माझे मन मला सांगते, हा देश नव्या उंचीवर नक्कीच जाईल. स्वामी विवेकानंदांनी जे स्वप्न पाहिले होते की माझा भारत देश विश्वगुरू म्हणून पुढे यावा, मी आत्मविश्वासाने सांगतो की स्वामी विवेकानंदाचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. जेवढी विविधता, जेवढे पण-परंतु हिंदुस्थानमध्ये आहेत तेवढेच सिंगापूरमधेही आहेत एवढे असूनही प्रत्येक जग सिंगापुरी आहे. प्रत्येक जण सिंगापूर घडविण्यासाठी झटत आहे, खांद्याला खांदा भिडवून काम करत आहे. याबाबतीतही सिंगापुरकडून आम्ही शिकवण घेऊ इच्छितो. वसुधैव कुटुंबकम् ज्या भूमीवरून ही संकल्पना आली तिथली जनता माझा परिवार आहे, प्रत्येकजण माझा आप्त आहे, ही भावना देशाला प्रगती वर नेण्यासाठीची ताकद ठरते आणि या दिशेने पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सगळे जग एका दृष्टीने हिंदुस्थानच्या बाजूने गेल्या काही दिवसात मी जगभरातल्या अनेक नेत्यांना भेटलो. मी निवडणूक रिंगणात असताना मला पत्रकारांनी विचारले होते, आपले परराष्ट्र धोरण कसे असेल? निवडणुकीच्या वेळी पाहत होतो. पत्रकार बुध्दीमान आणि मोठे चतुरही असतात. मी जेव्हा निवडणूक प्रचार करत होतो तेव्हा त्यांना माहीत होते की मोदी कुठे कमी पडू शकतील? तो मुद्दा नेमका घेऊन येत होते. त्यांना वाटत होते की गुजरातसारख्या छोट्या राज्यात ही व्यक्ती काम करते, त्‍या व्यक्तीला हिंदुस्थानचा कोणताच अनुभव नाही, परदेशाचा तर प्रश्नच उरत नाही. प्रत्येक दोन-तीन प्रश्नानंतर ते मुद्दा परराष्ट्र धोरणावर आणत असत. त्यावेळी मी निवडणूक प्रचारात होतो तेव्हा मी त्यांना परराष्ट्र व्यवहार धोरण काय समजावू? पण ते तोच मुद्दा धरून ठेवत ते समजत होते याबाबतीत ही व्यक्ती काहीशी कमजोर आहे आणि फिरुन-फिरुन ते त्याच मुद्यावर आणत असत. मी एवढंच सांगत असे आमच्यावर जबाबदारी निभावण्याची वेळ येईल त्यावेळी पाहुया पण मी खात्रीने सांगतो की आम्ही नजर झुकवून बातचीत करणार नाही आणि डोळे वटारुन बोलणी करणार नाही तर नजरेला नजर देऊन बातचीत करू. आज 18 महिन्यांनी, माझ्या प्रिय देशवासियांनो, मी जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले आहे. हिंदुस्थान नजर झुकवून बोलत नाही. ना हिदुस्थानने कोणावर डोळे वटारण्याचा प्रयत्न केला नाही मात्र हिंदुस्थान आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे तो नजरेला नजर देऊन बोलणी करतो, बरोबरीनं बोलणी करतो त्याचा एक परिणामही आहे. आज संपूर्ण जग भारताला बरोबरीचे मानून व्यवहार करते. सव्वाशे कोटी देशवासियांचा देश काय असतो, त्याची ताकद काय असते हे जग आता जाणू लागले आहे, अनुभवू लागले आहे. भारत एक मोठी बाजारपेठ आहे. आपला माल घेऊन तिथे विकायला जाऊ असा विचार आता जग करत नाही, दृष्टीकोन आता बदलला आहे. आता जगाला वाटते, संधी मिळताच हिंदुस्थानबरोबर भागीदारी करूया. आता हा अनुभव येत आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षेत्रात हा अनुभव येत आहे.

भारतात, परदेशी गुंतवणूक निश्चित बाब आहे. प्रत्येकाची इच्छा आहे देशाची प्रगती व्हावी, प्रत्येकाला वाटते देश आधुनिक व्हावा, प्रत्येकाची इच्छा आहे देशातून गरीबीचे उच्चाटन व्हावे, प्रत्येकाची इच्छा आहे देशातल्या तरुणांना रोजगार मिळावा, हे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी जिथून शक्ती मिळेल तिथून घ्यायला हवी की नको? कुटुंबात कोणी आजारी असेल आणि त्यासाठी विदेशी औषध लागू पडत असेल तर ते घ्यायला हवे की नको? आजार बरा करायला हवा की नको?
भारतातही मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणुकीची गरज आहे. थेट परकीय गुंतवणुकीची आवश्यकता आहे मी जेव्हा थेट परकीय गुंतवणुकीबाबत बोलतो तेव्हा माझ्या डोक्यात दोन बाबी असतात. जगाच्या दृष्टीने एफडीआय म्हणजे थेट परकीय गुंतवणूक पण त्याचवेळी माझ्या डोक्यात आहे फर्स्ट डेव्हलप इंडिया म्हणजेच प्रथम भारताचा विकास म्हणून एफडीआय ते एफडीआय. परकीय थेट गुंतवणूक ते प्रथम भारताचा विकास. मला सांगा, आपण कितीही वर्ष शेजारी-शेजारी राहत आहोत आणि अचानक आपल्याला 5-10 हजाराची गरज पडली तर तो देईल का? तो म्हणेल हो-हो मी नक्कीच मदत करेन. तुम्ही असे करा भाऊसाहेब बाहेर गेलेत ते सोमवारी येतील मग मी काही मदत करेन. असंच करता ना? 10 हजार रुपयेही बाजूला द्यायला कोणी तयार नाही होत. थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत मी सत्तेवर येण्यापूर्वीच्या गुंतवणुकीशी तुलना करता 40 टक्के वाढ झाली आहे. 40 टक्के या पैशाची आम्हाला का गरज आहे? कागदावर दाखविण्यासाठी नव्हे तर आम्हाला बदल घडवून आणायचा आहे.

आज आपल्या देशात रेल्वेचे एवढे मोठे जाळे आहे, चांगले जाळे. जगातल्या अनेक देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा जास्त लोक एकावेळी रेल्वेच्या डब्यात असतात. मात्र काळानुरूप रेल्वे आधुनिक व्हायला हवी की नको? वेग वाढायला हवा की नको? रेल्वे मार्गाची लांबी वाढायला हवी की नको? सेवेत सुधारणा व्हायला हवी की नको? जगाकडे तंत्रज्ञान आहे, जगाकडे पैसे आहेत, भारतात एक संधी आहे तर आपण संधी द्यायला हवी की नको? जगात रेल्वेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक देशात, मी अनेकांना भेटलो आहे. मी त्यांना सांगतो या, सर्वात आधुनिक तंत्रज्ञान घेऊन या माझ्यासाठी रेल्वे केवळ वाहतुकीचे साधन नव्हे तर रेल्वे बदलाचे इंजिन आहे. हिंदुस्थानच्या कायपालटाचे इंजिन आहे. मी याची ताकद जाणली आहे, ओळखली आहे, म्हणूनच आम्ही पहिल्यांदा देशाचे रेल्वेक्षेत्र 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले आहे. नवे तंत्रज्ञान येईल, नवा वेग येईल, परिवर्तन येईल.

जे लोक परदेशात जातात त्यांना हे बरोबर माहीत आहे, तुमच्या खिशात लाखो रुपये असोत पण कुठे एक चहा जरी प्यायचा झाला तरी तो मिळतो का? जर डॉलर नसेल तर चहा मिळत नाही. रुपयाचे रुपांतर डॉलरमध्ये करावे लागते, रुपयाचे रुपांतर पाऊंडमध्ये करावे लागते, करावे लागते की नाही? टॅक्सीवाला पण म्हणेल, रुपया माझ्या काय कामाचा, हा तर कागद आहे, माझ्या काय कामाचा? डॉलरमध्ये रक्कम द्या. भारताचे चलन, त्याचा सन्मान वृध्दींगत झाला पाहिजे की नाही, जगाने भारताच्या चलनालाही तितकाच सन्मान द्यावा, असे आपल्याला वाटते की नाही? प्रथमच लंडनच्या शेअर बाजारात ‘रुपी बॉण्डसाठी’ आम्ही पुढाकार घेतला. रेल्वेच्या रुपी बाँडमध्ये जगातली कोणीही व्यक्ती रुपयांमध्ये गुंतवणूक करू शकते आणि त्याला परतावाही रुपयात मिळू शकतो. ही रुपयाची कमाल आहे, नाहीतर आतापर्यंत सोने चालायचे किंवा डॉलर नाहीतर पाऊंड चालायचे. आज जगाच्या बाजारात आपण रुपयाच्या रुपात प्रवेश करत आहोत. याचे कारण हे आहे की संपूर्ण जगात एक विश्वास निर्माण झाला आहे. हा जो रुपी बॉण्ड आम्ही लागू केला, आत्ता मी जेव्हा इंग्लंडला गेलो होतो, अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना कळलेलेच नाही की मी काय करून आलो. आता आज मी समजावत आहे तेव्हा कदाचित चर्चा सुरू होईल. रुपी बॉण्ड भारताच्या आर्थिक संपन्नतेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे आणि हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाने याकडे गौरवाने बघितले पाहिजे. यातूनच तर भारताची ताकद वाढते. आपणच कुढत राहिले तर जग आपल्याकडे का बघेल? म्हणूनच आत्मविश्वासाने भरलेल्या एका समाजाच्या रुपात जगात आपली ओळख निर्माण झाली पाहिजे, ताकद निर्माण झाली पाहिजे. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

आज हिंदुस्थानात संरक्षण क्षेत्रात सर्व वस्तू आपल्याला आयात कराव्या लागतात. आता आजच्या काळात सव्वाशे कोटी देशवासियांना आपण असुरक्षित ठेवायचे का? त्यांना नशिबाच्या हवाल्यावर सोडायचे का? देशातल्या सव्वाशे कोटी देशवासियांना सुरक्षेची हमी असली पाहिजे की नाही? त्यांच्यासाठी जर आमच्या सैन्यातला जवान काठी घेऊन उभा राहिला तर चालेल का? त्यालाही शस्त्रसंपन्न केले पाहिजे की नाही? पण स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही प्रत्येक गोष्ट आपण बाहेरून आणायची का? सव्वाशे कोटी देशवासी त्या तयार करू शकत नाही का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडे जो अश्रू धूर असतो तोही आपण बाहेरून आणतो. यावर रडावे की हसावे हे मला समजत नाही. ही स्थिती बदलली पाहिजे. भारताचा बराच पैसा संरक्षणासाठी आपण बाहेरून जी सामग्री आणतो त्यावर खर्च होतो. भारताकडे तरुणांचे बळ आहे, भारताकडे बुध्दीमत्ता आहे, भारताकडे कच्चा माल आहे. आपली संरक्षण सामग्री हिंदुस्थानात का तयार होऊ नये आणि म्हणूनच मी विडा उचलला आहे की संरक्षण क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. यासाठी आम्ही परदेशी थेट गुंतवणूक प्रथमच 49 टक्क्यांपर्यंत खुली केली आहे आणि आम्ही हेही सांगितले आहे की उत्तम प्रतीचे तंत्रज्ञान जर असेल तर परदेशी थेट गुंतवणूक 100 टक्क्यांपर्यंतही खुली करू. लोक येतील, भारतात निधी आणतील आणि भारताचे तरुण शस्त्रास्त्रे तयार करतील. ती आमचेही संरक्षण करतील आणि इतरत्र कुठे पाठवायची असतील तर पाठवूही शकतो आणि म्हणूनच जगभरातले देश आज आपल्याबरोबर करार करत आहेत. एक काळ असा होता की संरक्षण क्षेत्रात जर काही खरेदी करायची तर प्रत्येक वेळी भ्रष्टाचाराचे आरोप लागायचे. त्यामुळे एक तर निर्णय व्हायचाच नाही किंवा झाला तर काहीतरी शिजल्याचा वास यायचा. 18 महिने झाले, आम्ही एका पाठोपाठ निर्णय घेतले, पारदर्शकपणे निर्णय घेतले आणि आतापर्यंत कोणी आमच्या दिशेने बोट उंचावू शकलेला नाही.

जगातल्या ज्या देशांमध्ये समृध्दी आहे त्यांच्यासमोर एक आव्हानही आहे. जगात असे अनेक देश आहेत जे आर्थिकदृष्ट्या मोठ्या उंचीवर पोहोचले आहेत पण त्यांच्या देशात वृध्दांची संख्या मोठी आहे. तारुण्य उरलेले नाही. भारत जगातल्या तरुण देशांपैकी एक देश आहे. भारताची 65 टक्के लोकसंख्या, 800 दशलक्ष लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. जो देश तारुण्याने संपन्न आहे त्याची स्वप्नही तरुण असतात. संकल्पही तरुण असतात आणि हेतूही तरुण असतात आणि पुरुषार्थही तरुण असतो. आपली तरुणाई हे आपले बलस्थान आहे पण जेव्हा आपल्या तरुणांच्या हातात कौशल्य असेल, रोजगाराच्या संधी असतील. तेव्हाच त्याचे शक्तीत रुपांतर होईल. ते नसेल तर 35 वर्षांचा तरुण अधिक काळप्रतीक्षा करू शकत नाही आणि म्हणूनच देशाला हे 65 टक्के तरुण, त्यांची शक्ती भारत निर्माणासाठी वापरायची आहे आणि म्हणूनच आम्ही कौशल्य विकास अभियान सुरू केले आहे. कौशल्य विकासात सिंगापूर आयटीईएस बरोबर आम्ही काम करत आहोत. कौशल्य विकासात नाव असलेल्या जर्मनीसह आम्ही काम करत आहोत, आम्ही अमेरिकेसह काम करत आहोत. जगातल्या ज्या देशांनी कौशल्य विकासात नाव कमावले आहे, ज्यांच्याकडे जे उत्तम आहे ते आम्ही आणू इच्छितो. त्यात आपले लोक भर घालतील. आपण खूप वेगाने पुढे जाऊ शकतो. आपण जेव्हा जगाबरोबर संबंध जोडतो तेव्ही ही ताकद आपल्या उपयोगी पडत असते.

आपल्याकडे खूप मोठ्या संख्येने विद्यापीठे, महाविद्यालये उघडत आहेत. यात खासगीही खूप आहेत. विद्यार्थिही येतात पण अध्यापक मिळत नाहीत. यासाठी एक योजना आखली आहे. आम्ही जगभरातल्या लोकांना विशेषत: भारतीय समुदायाला सांगितले की तुमच्या येथे जेव्हा हवामान प्रतिकूल असते, कडाक्याची थंडी असते, हिमवर्षाव असतो, अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही भारतात या. सहा महिने आमच्या येथे राहा, मुलांना शिकवा, सहा महिन्यांनी तिथे पुन्हा उन्हाळा सुरू होईल तेव्हा जा. आम्ही अमेरिकेसोबत करार केला आणि मला आनंद आहे की खूप मोठ्या संख्येने, शेकडोंच्या संख्येने भारतीय वंशाचे आणि परदेशी वंशाचेही विद्वान जे निवृत्त झाले आहेत ते भारतात येऊन शिकवण्यासाठी तयार झाले आहेत. आपल्या नव्या पिढीला शिक्षित करण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवली आहे.

सांगायचे तात्पर्य हे की जगात जे श्रेष्ठ आहे ते हिंदुस्थानात असले पाहिजे आणि आमच्यात जे सर्वोत्तम आहे ते जगातल्या सर्वोत्तमाशी जोडले गेले पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आपला देश, आपले तरुण, त्यांची शक्ती यांना घेऊन प्रगती साधायची आहे.

येथे आपल्यापैकी असे अनेक लोक असतील ज्यांच्या गावात वीजटंचाई असेल, 24 तास वीज तर पाहिलीच नसेल. ते दिवस आठवत आहेत ना की विस्मरणात गेले. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर तरी माझ्या देशवासियाला वीज मिळाली पाहिजे की नाही? त्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे की नाही? त्याला मोबाईल फोन तर मिळतो पण चार्चिंगसाठी दुसऱ्या गावाला जावे लागते. ही स्थिती बदलली पाहिजे, बदलायची आहे, आपण वास्तवाकडे पाठ फिरवू शकत नाही. हे वास्तव आहे की आजही माझ्या देशातली लाखो-करोडो कुटुंबे, हजारो गावे वीज संकटात आहे. मला जर आधुनिक हिंदुस्थान घडवायचा असेल, आपल्या मुलांना शाळांमध्ये संगणक चालवायचा असेल, त्यांना शिकवायचे असेल तर वीज लागणार. आम्ही विडा उचलला आहे, सन 2022, देश 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असेल तेव्‍हा हिंदुस्थानातल्या प्रत्येक कुटुंबाकडे 24 तास वीज असेल, 365 दिवस वीज असेल. एकीकडे जग हवामान बदलामुळे संकटात आहे. कोळशापासून वीजनिर्मिती करू नका म्हणून जग दबाव आणत आहे. आमचीही इच्छा आहे की जगाच्या सुखात आम्हीही सहभागी व्हावे कारण आम्ही शतकानुशतके पर्यावरणाचे संरक्षणच केले आहे. आम्हीच तर ते लोक आहेत ज्यांनी रोपात परमात्मा पाहिला. आम्हीच तर ते लोक आहोत जे जीवात शिवाचे दर्शन घेतात. ही महान परंपरा लाभलेले आम्ही लोक आहोत. आमच्यासाठी पर्यावरण हे आमच्या श्वासाप्रमाणे आमच्याशी जोडलेले आहे आणि म्हणूनच मानवजातीचे नुकसान होईल असा विचारही आम्ही कधी करू शकत नाही. महात्मा गांधींसारखा पर्यावरणाचा कोणी मोठा दूत असू शकत नाही. आम्हाला ऊर्जा तर हवी आहे पण त्याकरिता जगासाठी कोणतेही संकट निर्माण करायचे नाही. सन 2030 पर्यंत 40 टक्के वीज अजैविक पध्दतीने निर्माण करण्याचे स्वप्न भारताने ठेवले आहे. छोट्या छोट्या बेटांचे जे देश आहेत त्यांना भीती आहे की समुद्राची पातळी जर वाढली तर आपण बुडू. पण आम्ही तुम्हाला बुडू देणार नाही. आमची परंपरा ‘वसुधैव कुटुंबकम्’ आहे आणि म्हणूनच आम्हाला अणुऊर्जा हवी आहे, पुनर्नवीकरणीय ऊर्जा हवी आहे, जलविद्युत हवी आहे, सौरऊर्जा, पवनऊर्जा हवी आहे, बायोमासपासून हवी आहे. या गोष्टी खर्चिक आहेत जर तुम्हाला अणुऊर्जा हवी असेल तर युरेनियम पाहिजे. पण तुम्हाला गरज आहे म्हणून किंवा तुमच्याकडे पैसे आहेत या जोरावर युरेनियम मिळत नाही. युरेनियमचा उपयोग तुम्ही शांततापूर्ण कारणांसाठी करणार आहात, कुठल्याही पापात तुम्ही सहभागी होणार नाही याबाबत जर जगाचा तुमच्यावर विश्वास असेल तरच आताच्या काळात युरेनियम मिळते. भारताने हा विश्वास निर्माण केला आहे. आपल्या आवश्यकतेनुसार जगातले नवनवे देश आता युनेरियम द्यायला तयार झाले आहेत. गेल्या 18 महिन्यात कझाकिस्तान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांनी नागरी अणुऊर्जेसाठी आपल्याबारेबर करार केला आणि काहींनी त्याचे वितरणही सुरू केले आहे.

आपण भारतातले लोक जेव्हा विजेबाबत बोलतो तेव्हा आधी जास्तीत जास्त युनिटबद्दल चर्चा करतो. किती युनिट वीज, किती खर्च वगैरे. थोडे पुढे जाऊन आपण मेगावॅटचा विचार करतो, इतके मेगावॅट, तितके मेगावॅट. विजेबाबत भारताने कधी मेगावॅटच्या पुढे विचारच केला नाही. आम्ही पहिल्यांदा निर्णय घेतला 175 गिगावॅट पुनर्नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचा. आपण जेव्हा शाळेत परीक्षा द्यायचो तेव्हा शिक्षक काय सांगायचे? शिक्षक सांगायचे की परीक्षेमध्ये जे साधे सरळ प्रश्न आहेत ते पहिले करायला घ्या. हेच शिकवायचे ना? माझ्या शिक्षकांनी तरी हेच शिकवले. तुम्हालाही तसेच शिकवले असेल. जे सोपे प्रश्न आहेत ते पहिले सोडवा आणि जे कठीण आहेत ते उरलेल्या वेळेत करायला घ्या. असेच असते ना? मला सांगा आपल्याकडे सूर्य कितीवेळ असतो? वर्षाचे जवळजवळ 365 दिवस सूर्य आपल्याकडे तापतो आणि आपण मुलांना पर्यावरणही छान पध्दतीने शिकवतो. प्रत्‍येक आई मुलाला सांगते हा चांदोबा तुझा मामा आहे आणि सूर्य दादा आहे. पण आपण त्या दादाचे बोट पकडून चालायला शिकलोच नाही. सूर्यशक्तीच आपल्यासारख्या देशाच्या विकासाचा मोठा स्तंभ का होऊ शकत नाही आणि म्हणूनच सौरऊर्जेवर आपण भर देत आहोत. 100 गिगावॅट सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोमास, माझी स्वच्छ भारताची चळवळ आहे. 500 शहरांच्या कचऱ्यातून, घाणीतून वीज निर्माण करायची आहे. भलेही ती महागात पडली तरी माझे शहर साफ झाले पाहिजे.

या गोष्टींसाठी परदेशातून धन पाहिजे. परदेशातून तंत्रज्ञान पाहिजे. निर्मिती करणारे लोक परदेशातून पाहिजेत. जे लोक याच्यात निपुण आहेत ते लोक पाहिजेत. मला सांगायला आनंद वाटतो की आज जगात भारताच्या 175 गिगावॅट पुनर्नवीकरणीय ऊर्जेने इतके आकर्षण निर्माण झाले आहे. जगभरातल्या राजकीय नेत्यांना आश्चर्य वाटत आहे आणि जगभरातल्या गुंतवणूकदारांना नव्या संधी खुणावत आहेत. भारतात येऊन आमच्याबरोबर वीज उत्पादन करण्यास ते तयार होत आहेत.

जगाबरोबर जे संबंध निर्माण होतात ते वरवरच्या बोलण्यातून होत नाहीत. जग एकतर तुमचे वर्चस्व मानते किंवा जगाला आपुलकिची भाषा कळते. आज मी समाधानाने सांगतो की जगाबरोबर भारताच्या संबंधांनी अशा प्रकारचे वळण घेतले आहे. पश्चिम आशियातल्या देशांमध्ये जो संघर्ष सुरू आहे, निर्दोषांना बळी पाडले जात आहे, दहशतवादाने कळस गाठला आहे. त्या देशांमध्ये 70 लाख हिंदुस्थानी राहत आहेत, 70 लाख, 7 दशलक्ष. तुम्हीच मला सांगा, तुम्ही सिंगापूरमध्ये राहता. त्यामुळे तुम्ही हे सहज समजू शकाल. त्या लोकांना त्यांच्या नशिबाच्या हवाल्यावर सोडून द्यायचे का? त्यांच्यावर संकट आले तर ते कोणाकडे बघणार? ते संकटात असतील तर कोणाकडे बघणार? अशा वेळी भारताने जर म्हटले की बेटा तू तर निघून गेलास, आता काय आठवण काढतोस? चालेल का? कुठूनही जर मदतीसाठी हाक आली, कुठूनही जरी एक हुंदका ऐकू आला तर दुसऱ्याच क्षणी त्याला आवाज ऐकू गेला पाहिजे की काळजी करू नको, भारत आहे ना. एकदा का त्याच्या कानात हा स्वर गुंजला की तो निश्चिंत होतो. ठीक आहे. संकटाचे ढग गोळा झाले आहेत पण माझा देश मला वाचवेल आणि तेव्हा हे जगाबरोबरचे संबंध उपयोगाला येतात. येमेन असो, इराक असो, हजारोंच्या संख्येने आपले भारतीय बंधु-भगिनी तिथे अडकले होते. आपल्या केरळमधल्या परिचारिका भगिनी, त्यांनी जन्म-मृत्यूच्या हिंदेाळ्यावरचे क्षण कसे काढले असतील त्याची कल्पना आपण करू शकतो.

पण जगातल्या काही देशांना आम्ही विनंती केली, बघा यात तुम्ही काय मदत करू शकता आणि आज मी आनंदाने सांगू शकतो की या देशांनी या आमच्या मुलींना आणून केरळपर्यंत पोहोचण्यात आमची खूप मदत केली. येमेनेमध्ये आपले हजारो लोक अडकले होते त्यांना आम्ही तीन महिन्यांपासून तिथून निघायला सांगत होतो पण ते निघायलाच तयार नव्हते. बाहेर राहणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. किती समजावले पण नंतर बघू साहेब, असे त्यांचे उत्तर असायचे कारण त्या ठिकाणाबद्दल त्यांना इतकी आपुलकी निर्माण झाली होती की कुठले संकट येऊ शकते याची त्यांना शंका आली नाही. पण चहूकडून बॉम्बहल्ले सुरू झाले. जगातल्या काही देशातल्या लोकांशी मी दूरध्वनीवरून बोललो आहे. जगातल्या त्या देशांनी आपल्याला मदत केली आणि येमेनमध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांना आम्ही परत आणले. इराक असो, लिबिया असो, येमेन असो जगाबरोबरचे संबंध आज प्रत्येक घडीला प्रत्येक वेळेला आवश्यक असतात. कधीकधी आपले प्रवासी नेपाळमध्ये गेले आणि बस खड्डयात अडकली तर नेपाळ सरकारबरोबर आपले संबंध नसतील तर त्या प्रवाशांकडे कोण बघणार? जगाबरोबर संबंध जोडण्यासाठीचा प्रयत्न औपचारिकतेनं नाही चालत आज काळ बदलला आहे, नाते जिवंत असणे अनिवार्य आहे. आपल्या देशवासियांचे जीवन धोक्यात आले आले असतील तर हे संबंध उपयोगी पडतात आणि त्यांचे आयुष्य वाचते.

जगातल्या कोणत्या एका देशात एका भारतीयाचे प्राण गेले तर संपूर्ण हिंदुस्थान बेचैन होतो. हजारो जणांचे प्राण वाचले तर त्याचा आनंद किती असेल याचा अंदाज तुम्ही करू शकता आणि म्हणूनच आमचा प्रयत्न आहे की भारताने विकासाची नवी उंची गाठावी. आज काळ असा नाही की चार देशांशी मैत्री केली की काम झाले. याआधी जग दोन गटात विभागले गेले होते. तुम्ही कोणत्याही एका गटाबरोबर मैत्री कराल तो गट तुमचे रक्षण करत असे. आज तो काळ राहिला नाही. आज संपूर्ण जग एकमेकांवर अवलंबून राहणारे बनले आहे. कोणताच देश, जगापासून वेगळा राहू शकत नाही आणि जगातला कोणताही देश मग तो समृध्दातला समृध्द असू दे, सर्वात प्रबळ असू दे तो एखाद्याच्या बळावर सर्व काही करू शकत नाही, त्याला छोट्यातल्या छोट्या देशावरही अवलंबून रहावे लागते. संपूर्ण जग एकमेकांवर अवलंबून आहे. भारताला जागतिक पातळीवर पुढे जायचे आहे, आपले स्थान निर्माण करायचे आहे तर या परस्परावलंबी दुनियेत आपसातले संबंध टवटवीत ठेवायला लागतात. देश कितीही छोटा असू दे पण संघटनेत त्याची ताकद असते. तुम्ही कल्पना करू शकता मी हिंदुस्थानवासियांना सांगितले की, स्वयंपाकाच्या गॅसवरचे अनुदान सोडून द्या तर 40 लाख लोक हे अनुदान सोडतात यावरून तुम्ही कल्पना करू शकता की भारतात काळ कसा बदलला आहे.

हिंदुस्थानने सांगितले जगाने योगासने करावीत, आम्ही कोणाला कान पकडायला सांगितले नाही. 21 जून हा दिवस संपूर्ण जगाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा. या गोष्टीचा कोणाला अभिमान वाटणार नाही. बंधु-भगिनींनो, नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले तेव्हा फक्त अमेरिकन नव्हे तर जगातल्या मानवजातीला अभिमान वाटला असेल. 21 जूनला संपूर्ण जग योगदिवस साजरा करायला पुढे येते, कोणते बंधन नाही, कोणते रंगरुप नाही, कोणती परंपरा नाही, एकदिलाने संपूर्ण जग योगासाठी तयार झाले. एवढ्या कमी वेळात संयुक्त राष्ट्र संघात हा ठराव संमत झाला ही जगातली पहिलीच घटना. अनेक देशांनी यात सहभाग घेतला. सिंगापूरमधेही मोठ्या प्रमाणात योगदिन साजरा केला मोदींनी योग आणला का? तो तर होताच. पण आपलाच आपल्यावर विश्वास नव्हता, आपण संकोचत होतो, की कोणाला सांगितले तर त्याचा राग येईल की तो नाही म्हणेल, माहित नाही. आपला आपल्यावर विश्वास असेल तर जग आपल्याबरोबर चालायला तयार होतो. जगही शांततेच्या शोधात आहे. आनंदाच्या शोधात आहे, बोट धरून चालवणारा कोणी येईल तर जग चालायला तयार आहे आणि भारत आज तयार आहे. जगाच्या खांद्याला खांदा भिडवून तयार आहे.

बंधू-भगिनींनो, मी एक काम करायला निघालो आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मला आपला आशीर्वाद हवा आहे. सव्वाशे कोटी देशवासियांच्या आशीर्वादाबरोबरच जगभरातल्या भारताच्या बंधू-भगिनींनो आपले आशीर्वादही हवेत. आणि ते काम आहे, एकच काम करायचे आहे मला. विकास, विकास, विकास. तो विकास ज्याच्यात गरीबांचे अश्रू पुसायची ताकद आहे, तो विकास जो तरुणांना रोजगार देतो. तो विकास जो शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो, तो विकास जो आपल्या माता-भगिनींना सबल करतो, तो विकास जो एकता आणि अखंडतेचा मंत्र घेऊन जगात अभिमानाने मान उंचावू शकतो, असा विकास घडवायचे स्वप्न घेऊन मी निघालो आहे. भारत पुढे जात आहे एवढेच पुरेसे नाही तर भारत आधुनिक बनणेही तितकेच आवश्यक आहे. कधीकधी आपण बघतो कोणत्या वयोवृध्दाला आपण भेटतो, तो 70 वर्षांचा असेल 80 वर्षांचा असेल. नात-नातू नमस्कार करायला जातात तेव्हा तो काय म्हणतो या बसा, मी 30 वर्षांचा असताना असे करत असे आणि मुलांनी ही गोष्ट दहा-बारावेळा तरी ऐकली असेल, जेव्‍हा आजोबा बोलवतात तेव्हा मुले त्यांना दाद देत नाहीत. त्यांना वाटते आजोबा आता पुन्हा गोष्ट ऐकवणार. आपण असे बघतो, लहान मुलेही जास्त वेळ जुन्या पराक्रमांबाबत ऐकायला तयार नसतात.

मी आज देशवासियांना सांगण्याचे धैर्य दाखवितो की, आपल्या पूर्वजांनी जे पराक्रम गाजविले आहेत ते आपली प्रेरणा बनू शकतात पण त्या पराक्रमाचे पोवाडे गात आपल्याला जीवन जगता येत नाही. पूर्वजांपासून प्रेरणा घेऊन आपल्याला वर्तमानकाळही उज्ज्वल करायचा आहे आणि भविष्यासाठी मजबूत पाया निर्माण करण्याचीही आपली जबाबदारी आहे. केवळ महान संस्कृती, महान परंपरा पाच हजार वर्षांचा उज्ज्वल इतिहास याचेच गुणगान गात राहिलात आणि शेजाऱ्यांना पाणीही द्यायला तयार नाही असा माझा देश असू शकत नाही. म्हणूनच पूर्वजांचे पराक्रम, महान संस्कृती, महान परंपरा, ज्या उत्तम गोष्टी आहेत त्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे मात्र आपल्या घामाने, कष्टाने वर्तमानही घडवायचा आहे. आपल्या इच्छाशक्तीचा मजबूत पाया घालायचा आहे जेणेकरून पुढची पिढी असे म्हणायला नको, की तुमच्या पुर्वजांनी खूप काही केले तुम्ही सांगा तुम्ही काय केले? या प्रश्नांचे उत्तर देण्याचे मनोबल आपल्याकडे असेल असा हिंदुस्थान घडवायचा आहे. आपल्या सामर्थ्याने, पराक्रमाने, पुरुषार्थाने, त्यागाने, तपस्येने, आपला देश घडवायला हवा, देशाला प्रगती पथावर न्यायला हवे. आपली मूल्ये, सांस्कृतिक ठेवा, यांचा जगाला परिचय करून द्यायला हवा.

मला विश्वास आहे की विकासाची ही स्वप्ने घेऊन आम्ही जी वाटचाल करत आहोत त्यात तुमचे संपूर्ण योगदान राहील. भारताचा गौरव वृध्दींगत करण्यासाठी आम्ही जिथे कुठे असू तिथून आम्ही आपापल्या परीने प्रयत्न करत राहू. जगाला देण्यासाठी या देशाकडे भरपूर काही आहे. अनेक संकटांनंतरही आजही ताठ मानेने उभे राहण्याची हिंमत आमच्यात आहे. जेव्हा आपण वर्तमानाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, सामूहिक प्रयत्न करतो तेव्हा अपेक्षित परिणाम मिळतात.

सिंगापूरला प्रत्येकाने घडवले आहे, प्रत्येक जण घडवत आहे आणि सिंगापूरच्या आजूबाजूच्या प्रदेशांना घडवण्याची हिंमत प्रत्येकात आहे. सिंगापूरचे मी अभिनंदन करतो, सिंगापूरच्या विकासयात्रेला नमन करतो. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेला हिंदुस्थानही त्याच उमेदीने आणि उत्साहाने आगेकूच करेल या संकल्पासह मी पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन करतो, खूप खूप धन्यवाद!

N.Chitale/S.Kulkarni/S.Tupe/N.Sapre