पीएम्इंडिया
सर्व राज्यांमधून आलेले प्रतिनिधी, मंत्री परिषदेचे सदस्य, खासदार आणि सर्व
उपस्थित मान्यवर,
साधारणपणे सरकारने एखादा पूल बांधला किंवा एखादा रस्ता बांधला तर आपल्या देशात ती फार मोठी घटना मानली जाते. प्रसार माध्यमेही लक्ष ठेवून असतात आणि त्या क्षेत्रातील लोक त्याबाबत फार काळ चर्चा करतात. वर्षानुवर्षे एखादी मागणी प्रलंबित राहते आणि मोठ्या मुश्किलीने, १५-१५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याबाबत काही घडते, असे अनुभवायला मिळते. आम्ही एक व्यापक आणि एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारला आहे. आम्हाला माहिती आहे की या समस्या आहेत, तर शक्य ती संपूर्ण शक्ती लावून देशाला त्या समस्येतून कसे बाहेर काढता येईल, याचा आम्ही विचार करतो. साधारणपणे सरकार वाढीव कामे करण्याची सवय अंगी बाणवते. आधी पाच कामे होत असतील तर आता सात करतो, आधी सात करीत असू तर आता दहा करतो. मोठी झेप घेण्याचा, मोठी पावले उचलून समस्यांमधून बाहेर पडण्याचा, पूर्वीचा वेग आणि निर्णय करण्याच्या प्रक्रियांमधून बाहेर पडण्याचा आमचा प्रयत्न आहे. गती वाढविण्याचा, त्वरीत निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यामुळे सर्व योजना साकार होतात.
सेतु भारतम योजना. आताच नितीनजी मला सांगत होते की त्यांना कोणते पूल कोठे बांधले जाणार आहेत, हे माहिती नाही, त्यांचा पत्ता माहिती नाही. म्हणजे कसे काम होणार आहे, हे त्यांना माहिती नाही. आता मी येथे कोणत्याही निर्वाचित संस्थेला दोष देऊ इच्छित नाही की अमके पंतप्रधान होते किंवा तमके राज्यमंत्री होते. मला असे म्हणायचे नाही. हा यंत्रणेचा दोष आहे की आम्ही या बाबींना प्राधान्य दिले नाही. आणि म्हणूनच पहिले काम हाती घेतले ते असे की बाबांनो, या देशात काय सुरू आहे, काय परिस्थीती आहे, ते आधी समजून घ्या. आता पूलांच्या वर्गीकरणाचे काम सुरू आहे की आयुर्मानानुसार कोणता पूल किती वर्षे जुना आहे, लांबी-रूंदीच्या प्रमाणानुसार ते कोणत्या गटात मोडतात, अशा प्रकारचे वर्गीकरण सुरू आहे. तर दुसरीकडे त्या पुलाचा नेमका पत्ता निश्चित केला जात आहे. अक्षांश-रेखांशाच्या माध्यमातून, अवकाश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, सध्या हा पूल नेमका कोणत्या ठिकाणी आहे, ते पडताळून पाहिले जात आहे. कदाचित एखादा पूल कागदावर दिसत असेल, पण तो प्रत्यक्षात अस्तित्वात नसेल, ते सुद्धा समजू शकेल. असा सगळा प्रयत्न सुरू आहे.
दुसरे असे की अनेक किरकोळ बाबी आहेत. आपणास जाणून आश्चर्य वा़टेल की आपल्याकडे पूर्वी महामार्ग बांधले जायचे, त्यासाठी आधी जमीन संपादित केली जात असे. मात्र एकदा महामार्ग तयार झाला की त्या नजिकच्या जमिनीवर अतिक्रमण केले जायचे. अशा वेळी भविष्यात त्या महामार्गाचे चौपदरीकरण किंवा सहा पदरीकरण करायचे असल्यास त्या महामार्गाची रूंदी वाढविणे अशक्य होत असे. कारण रस्ता रूंद करायचा, त्या जागी अतिक्रमण झालेले असे. आजघडीला मात्र असे अतिक्रमण होणे कठीण आहे, कारण हल्ली दर दोन वर्षांनी निवडणुका होतात. निवडणुका समोर दिसू लागल्या की मग कोणी असे करायचे धाडस करीत नाही. मग न्यायालयाकडूनही अशा कामांना स्थगिती मिळते. या आणि अशा अनेक समस्यांमुळे आपले रस्ते वाढतच नाहीत.
आम्ही या संदर्भात एक लहानसा निर्णय घेतला आहे. आम्ही ठरविले आहे की जेव्हा रस्ता बनवायचा असेल तेव्हा जमीन संपादित केल्यानंतर दोन्ही टोकांना वर आणि खाली जाणारा रस्ता तयार केला जाईल, मध्ये मोकळी जागा ठेवली जाईल. म्हणजे मग जेव्हा रस्त्याचे रूंदीकरण करावयाचे असेल तेव्हा ते रस्त्याच्या आतील बाजूस करता येईल आणि अतिक्रमणाचा प्रश्न उद्भवणार नाही. अशा गोष्टी खरे तर किरकोळ दिसतात, परंतु त्या दीर्घ काळ उपयुक्त ठरतात. अशाच प्रकारे, ज्या पद्धतीने आपल्या देशाचा विकास सध्या सुरू आहे, अशा अनेक गोष्टी आवश्यक आहेत. आपल्याला खरे तर असे करता येऊ शकेल की आपल्याला नजिकच्या भविष्यात ज्या बाबींची आवश्यकता भासू शकेल, ज्या सुविधांची आवश्यकता भासू शकेल, त्यांचा अंदाज घेऊन त्यानुसार तरतूद करता येईल. जसे – २० किलोमिटर ऐवजी ३० किलोमिटर लांबीच्या रस्त्याची तरतूद का करू नये? विश्रांती कक्षाची रचनाही त्याच वेळी करता येणे शक्य आहे काय, याचा अंदाज का घेऊ नये? आम्ही या पद्धतीने विचार करीत आहोत.
याच प्रकारे गावांमधील लोकांना आपण उत्पादित केलेल्या वस्तु शहरात विकायच्या असतील तर अशा स्थितीत अशा मोठ्या रस्त्यांच्या जवळ असे एखादे ठिकाण असावे की जेथे ते आपल्याकडच्या उत्पादित वस्तु विकण्यासाठी तसेच इच्छुक लोक अशा वस्तु खरेदी करण्यासाठी सहज पोहोचू शकतील. अशा एकात्मिक विकासाच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच माध्यमातून हे काम पूर्ण होऊ शकेल. एकाच वेळी १५०० पूलांचे बांधकाम आणि सुमारे ५१ हजार कोटी रूपये खर्चाचा अंदाज. एके काळी रेल्वे आणि रस्त्यांच्या संदर्भात इतके कागदी घोडे नाचवले जात की तो सगळा पत्र व्यवहार एकत्र केला तर एखादा अत्त्युच्च पूल बांधता येईल. आम्ही सांगितले की हे पाहा, शांत व्हा आणि तुमची समस्या काय आहे ते बसून सांगा. आता आम्ही केले काय, तर आम्ही फॉर्म्युला तयार करून दिला. रेल्वेच्या वरून जाणारा पूल असेल, तर तो असा तयार होईल, रस्ता आणि रेल्वेमार्ग परस्परांना छेद देत असतील तर अशा प्रकारचा पूल तयार होईल, त्याचा आराखडा असा असेल. आता अशा प्रकारचा आराखडा आला की त्याला लगेच मंजुरी द्या. अशा अनेक प्रस्तावांना वेगाने मंजुरी दिली जात आहे, कामे वेगाने मार्गी लागत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे की, आज १५०० पूलांच्या निर्मितीचे काम हाती घ्यायचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यात दुरूस्तीचे काम आहे, नव निर्मितीचे काम आहे आणि ही सगळी कामे वेळेत पूर्ण करण्याचा विचारही केला गेला आहे. जमिनीची गरज भासली तर त्यासाठी राज्य सरकारांसोबत चर्चा करून काम पुढे न्यायचे आहे. आमचा प्रयत्न आहे की आम्हाला बदल घडवून आणायचा आहे. आपण एक गोष्ट मान्य करू या की शरीरामधील रक्तवाहिन्यांची अमूक एक भूमिका आहे, शिरांची अमूक एक भूमिका आहे, धमन्यांची अमूक एक भूमिका आहे आणि हे सगळे अवयव आपले काम करतात, त्याद्वारे शरीराला शक्ती प्राप्त होते आणि शरीराला गतीही प्राप्त होते. हे सगळे अवयव आपल्या शरीरात ज्या भूमिका बजावतात, त्याच प्रकारे पायाभूत सुविधाही देशरूपी शरीरात अवयवांप्रमाणे काम करतात. जर रस्ते संबंधी पायाभूत सुविधा सज्ज असतील, जर रेल्वे संबंधी पायाभूत सुविधा सज्ज असतील तर त्याद्वारे आपल्या विकासाची गती वाढेल.
बदलत्या युगाबरोबर पायाभूत सुविधांची व्याख्याही बदलते. मला आठवते की माझ्या लहानपणी जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा दुष्काळी स्थितीत मातीची अनेक कामे समोर येत. अशा वेळी गावातील लोक पत्रे लिहायचे. आमच्या गावात मातीची कामे करून घ्या, जेणेकरून आम्हाला येणे – जाणे सोईस्कर होईल, अशी विनंती करायचे. तर दुष्काळी कामांमध्ये माती टाकली जायची. माती टाकून झाली की, वाह, छान काम झाले, फार मोठे काम झाले, अशा प्रतिक्रियाही द्यायचे. आपले आमदार, आपले खासदार चांगलेच सक्रिय आहेत, असे मनात येऊन समाधान वाटायचे. मग आणखी काही काळ गेला. लोक म्हणू लागले की साहेब, आता डांबरी रस्ता बनवून द्या. आज गावातले लोक सांगतात की साहेब, आता फायबरचा रस्ता बनवायला हवा. ग्रामस्थांना फायबरचा रस्ता हवा आहे, असे सांगणाऱ्या गावकऱ्यांमध्ये जे बदल झाले आहेत, त्यानुसार त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दिशेने आम्हाला काम करावे लागेल. आणि आम्ही त्या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. ग्रामीण भागातील रस्त्यांकडे आम्ही विशेष लक्ष देत आहोत.
आपण पाहिले असेल की या वेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे काम पायाभूत सुविधेचे आहे आणि मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणेच देशाच्या प्रगतीला गती देणारे आहे. मी म्हणालो की एक काळ असा होता की फक्त माती टाकली तरी नागरिकांचे समाधान होत असे. आज मात्र महामार्गही हवेत आणि आय – वेज् सुद्धा हवेत. आय – वेज् म्हणजे इन्फर्मेशन वेज् अर्थात माहितीचे मार्ग आणि हाय वेज् अर्थात महामार्ग. या दोन्ही बाबी समांतररित्या व्हाव्यात, असा सरकारचा प्रयत्न आहे. डिजीटल ऑप्टीकल फायबरचे जाळे उभारायचे आहे तसेच कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधाही महत्वाच्या आहेत. आपण सिंचनासाठी ज्या पायाभूत सुविधा उभारतो, त्यामुळे संपूर्ण कृषी क्षेत्राला सहाय्य मिळते. आम्ही या बाबींवर भर देत आहोत.
रेल्वेचे उदाहरण पाहू या. आधी काय होते रेल्वे ? रेल्वे म्हटले की संसदेत बाकड्यांवर टाळ्या वाजवल्या जात असत. अमक्या खासदाराला खुश करण्यासाठी त्याच्या भागातून जाणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीची घोषणा करा. मग त्या मार्गाच्या क्षेत्रातील सगळे दहा-बारा खासदार खुश होतील. हेच करायचे. मग आणखी काही करायची गरज नाही. अरे बघा जरा, अनेक जुन्या घोषणा पडून आहेत, ज्या अजून सुरू व्हायच्या आहेत. आम्ही म्हणालो की अरे बाबांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ टाळ्या वाजवून देश चालणार नाही. रेल्वेमध्ये आमूलाग्र परिवर्तनाची आवश्यकता आहे. रेल्वे, रेल्वेचे रूळ टाका, गेझ बदला, रेल्वेला डिझेलवरून विद्युतीकरणाकडे घेऊन चला. पर्यावरणाच्या दृष्टीने काम करा, गतीच्या दृष्टीने काम करा. रेल्वेकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला आहे. आत्तापर्यंत आपल्या देशात केवळ रेल्वेमध्ये ज्या सुधारणा होत आहेत, त्यांकडे कोणाचे फारसे लक्ष गेलेले नाही. बीग बँकच्या बाता करणाऱ्यांनी, सुधारणांच्या बाता करणाऱ्यांनी केवळ रेल्वेचे उदाहरण पाहून घ्यावे. रेल्वेत होणारे बदल टिपावेत, म्हणजे रेल्वे कोठून कोठे जाऊ शकते, त्याचा अंदाज येईल.
ऑप्टीकल फायबरचे जाळे असो, रेल्वेचे जाळे असो किंवा पूलांची निर्मिती असो, आम्हाला संपूर्ण देशात गुणात्मक बदल घडवून आणायचा आहे. आम्हाला केवळ किलोमीटर वाढवायचे नाहीत. आम्हाला गुणात्मक बदल घडवून आणायचे आहेत आणि दीर्घ काळाच्या गरजांची पूर्तता लक्षात घेत हे ध्येय साध्य करायचे आहे. देशाला सशक्त बनविण्यात, देशाला समृद्ध बनविण्यात, देशाला गतीमान बनविण्यात पायाभूत सुविधा महत्वाची भूमिका बजावतात, याची मला खात्री वाटते. ज्याप्रमाणे शरीराच्या सशक्ततेचे कारण शरीरातील रक्तवाहिन्यांची भूमिका आहे, शिरांची भूमिका आहे त्याचप्रमाणे देशाच्या मजबुतीचा आधार पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे, रस्त्यांच्या जाळ्यावर आहे, ऑप्टीकल फायबरच्या जाळ्यावर आहे, पाणी जोडणीवर आहे, ग्रीड जोडणीवर आहे. या गोष्टींवर आपण जितके लक्ष देऊ, तितकेच प्रभावी परिवर्तन आगामी काळात घडून येईल. आणि सरकार त्या दिशेनेच प्रयत्नशील आहे.
देशांतील पुलांच्या स्थितीकडे लक्ष देणाऱ्या नितीनजींचे मी अभिनंदन करतो. मला तर असे वाटते की आमची जितकी विद्यापीठे आहेत, विशेषत: अभियांत्रीकी आणि वास्तुशास्त्रविषयक विद्यापीठे, तेथे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात जुना पूल, त्याची अभियांत्रीकी, या विषयावर पी. एच. डी करावी, जगात काय सुरू आहे, त्याबद्दल संशोधन करून त्या विषयावर पी. एच. डी करावी. आपण हे सारे एका वैज्ञानिक स्वरूपात विकसित केले पाहिजे. त्याच प्रकारे आपण आपल्या अभियांत्रीकी आणि वास्तुशास्त्रविषयक विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी या पूलांवर काम करायची संधी देता येईल. यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि आपल्या देशात दर्जेदार मनुष्यबळ तयार होईल. अर्थात एकीकडे मनुष्यबळ विकास होईल आणि त्याचबरोबर दुसरीकडे पायाभूत सुविधाही विकसित होतील. आपल्या संस्थांची क्षमता वाढावी, या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. मी पुन्हा एकदा आपले खूप-खूप अभिनंदन करतो. मन:पूर्वक धन्यवाद.
M.Mayekar / S. Tupe / M. Desai
Building bridges for safe and seamless travel on National Highways. pic.twitter.com/PaU7xlLblg
— PMO India (@PMOIndia) March 4, 2016
There are many accidents, people get injured on highways. Our priority is to save lives & ensure such accidents don't occur: @nitin_gadkari
— PMO India (@PMOIndia) March 4, 2016
Watch Union Minister @nitin_gadkari speak at launch of Setu Bharatam Project. https://t.co/8Y7VBHSSkZ
— PMO India (@PMOIndia) March 4, 2016
We have taken a comprehensive & integrated approach. We know the problems & we want to change them with strength, not incremental change: PM
— PMO India (@PMOIndia) March 4, 2016
The first thing is to take complete stock of the situation & then work ahead: PM @narendramodi https://t.co/8Y7VBHSSkZ
— PMO India (@PMOIndia) March 4, 2016
When it comes to roads, we need to also think about facilities for people & how our roads can help people in rural areas: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 4, 2016
This infrastructure will give speed and strength to the development of India: PM @narendramodi inaugurates Setu Bharatam Project
— PMO India (@PMOIndia) March 4, 2016
Setu Bharatam Project illustrates a comprehensive & integrated approach to create top quality infrastructure for the benefit of our citizens
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2016
Emphasised on improving connectivity in rural areas & spoke on how our Govt is transforming the Railways. https://t.co/X8XlOZr09l
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2016