Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वामी दयानंद सरस्वती जन्मोत्सव प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

स्वामी दयानंद सरस्वती जन्मोत्सव प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी, डीएव्ही कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. पूनम सुरीजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनो…..

आर्य समाजाच्या या महान परंपरेप्रती आणि त्यांच्याशी संबंधित सर्व मान्यवरांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. या विशाल शक्ती स्त्रोताचे, संस्कारधारेचे आचमन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. मला पूनमजी सांगत होते की, आर्य समाजात दोन मुख्य विचारधारा गेल्या 130 वर्षांपासून आहेत. आणि 130 वर्षानंतर आज ही पहिलीच वेळ आली आहे, की जेव्हा दोन्ही विचारधारा एकत्र येऊन पुढे जाण्याचा संकल्प करत आहेत, ही गोष्ट माझ्यासाठी इतकी गौरवपूर्ण आहे, इतकी आनंददायक आहे, की जिचे वर्णन मी शब्दात करु शकत नाही, जेव्हा या दोन्ही शक्ती, दोन्ही विचारधारा, एकत्र येऊन, नवी दिशा, नवा संकल्प करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतील, तेव्हा राष्ट्राचे किती कल्याण होईल, याचे अनुमान मी निश्तिच लावू शकतो. आणि त्यामुळेच या निर्णय प्रक्रियेशी जोडल्या गेलेल्या सर्व मान्यवरांना मी मन:पूर्वक धन्यवाद देत आहे.

गुजरातच्या भूमीने स्वामी दयानंद सरस्वती जगाला दिले, असे पुनमजी मला सांगत होते, पण आजच ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली आहे. त्या महापुरुषांच्या नावाच्या शृंखलेत माझ्यासारख्या सामान्य व्यक्तिचे नाव जोडले जावे, असा कोणताही हक्क मला नाही. हे महापुरुष एवढे महान होते की, त्यांच्या चरणांची धूळ घेऊन आपण चांगलं काहीतरी करु शकू, त्यांचा आशिर्वाद मिळेल आणि आपल्या सर्वांना ज्या कालखंडाचे दायित्त्व मिळत आहे, ती जबाबदारी पूर्ण समर्पित भावनेने आपण निभावू शकू, अशी शक्ती आपल्याला मिळत राहो, ज्यामुळे आपण देशाचे चांगले कल्याण करु शकू.

1857 मध्ये या देशाने स्वातंत्र्य संग्रामाद्वारे आपल्या आत्मिक शक्तीचे दर्शन घडवले होते. शतकांच्या गुलामगिरीनंतर एक चेतना प्रगट झाली होती आणि ती किरकोळ नव्हती, केवळ दोन-पाच-पन्नास स्वातंत्र्यवेड्यांच्या पराक्रमापुरतीच मर्यादित नव्हती, एक प्रकारे सर्व देश एकत्रित उभा राहिला होता. मात्र त्याचा इच्छित परिणाम प्राप्त झाला नाही. परदेशी शक्तींनी पुन्हा एकदा देशावर अधिराज्य गाजवले. आपण ही पार्श्वभूमी पाहिली पाहिजे, 1857च्या स्वातंत्र्य संग्रामानंतरचे ते दिवस आठवले पाहिजेत, इतिहासाची पाने पडताळून पाहिली पाहिजेत, तरच आपल्या लक्षात येईल की, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना का झाली? या स्थापने मागे 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाची पार्श्वभूमी होती.

स्वामी दयानंदजी ज्ञान मार्गाचे प्रणेते होते. वेदांच्या प्रकाशात सत्य प्राप्त करुन भावी पिढ्यांना सत्याच्या प्रकाशाची ओळख करुन देणे, हा स्वामी दयानंदजींचा प्रयत्न होता. ते वृत्तीने क्रांतीकारक होते आणि क्रांतीकारक होण्याच्या नात्याने अंध विश्वासाविरुध्द लढा देणे, परंपरांना आव्हान देणे आणि तेही परिस्थितीसमोर पळ काढून नव्हे, तर स्वत:ला महान हिंदू संस्कृती, आर्य परंपरेचा पाईक मानत, त्या अंतर्गत राहून, तीच भगवी वस्त्रे परिधान करुन, त्याच समाजातील वाईट रुढींविरुध्द लढा देणे. यासाठी खूप मोठी ताकद लागते, व्यवस्थे बाहेर पडून त्यावर टीका करणे, स्वत:ला मोठे म्हणणे ही वेगळी गोष्ट आहे. समान व्यवस्थेत राहुन, त्यातील परंपरांचा गौरव करतानांच, ज्या कालबाह्य गोष्टी आहेत, त्यांना आव्हान देण्यासाठी एक अनन्य साधारण शक्ती लागते, आणि पूज्य स्वामी दयानंदजी त्या शक्तीचे स्त्रोत होते.

आणि त्या महान परिसाची विचार प्रक्रिया, चिंतना प्रती समर्पण, ज्ञानाच्या अधिष्ठानावर आधारीत विचार, चिंतन, मननाच्या आधारावर जीवनाची शुध्दी होत रहावी, या गोष्टींवर त्यांनी भर दिला. आणि याचा परिणाम असा झाला की, महर्षीजींच्या जाण्यानंतरही त्याच उत्कटतेने, त्याच समर्पणाच्या भावनेतून हे आंदोलन आजही सुरुच आहे. आणि त्या मागे त्या विचारांच्या बीजाची ताकद आहे. त्या विचार बिजांचे असे सामर्थ्य आहे की, ज्यामुळे आर्य समाजरुपी एक विशाल वटवृक्ष आज संपूर्ण देशाला सावली देत आहे / छाया देत आहे. आमची स्वप्ने साकार करण्याची संधी देत आहे. आव्हानांशी झुंज देण्याचे सामर्थ्य देत आहे. आणि त्यामुळेच मी आज ती महान परंपरा, ती महान संस्था, या महान आंदोलनाला नमन करतो आणि पूज्य महर्षी स्वामी दयानंदजींच्या चरणांनाही वंदन करतो.

एवढा मोठा विशाल परिवार, 20 लाख विद्यार्थी, 60 हजारांहून अधिक प्राध्यापक-प्राचार्य आहेत आणि परमजी सांगत होते की, दररोज सुमारे 2 कोटी कुटुंबांशी रोजचा संबंध येतो. आणि एका शतकाहून अधिक काळ ज्या संस्थेने अशी सेवा केली असेल, तर त्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांची संख्याही केवढी असेल! इथे 40 लाख असे लिहिले पण, ही संख्या 40 लाख एवढीच असेल असे मी मानत नाही. हे खूप विशाल कुटुंब असेल/आहे. या सर्वांनी मिळून दरवर्षी एक विषय ठरवावा, आणि त्या विषयावर पूर्ण शक्ती केंद्रीत करावी. तुम्ही बघा, त्याचे परिणाम दिसू लागतील. जगाच्या ते लक्षात येईल. डीएव्हीने जर असे ठरवले की, 2020 मध्ये जेव्हा ऑलिम्पिक होईल, तेव्हा डीएव्हीचा विद्यार्थी सुवर्ण पदक पटकावून येईल, तर मी सांगतो, ते असे करु शकतात. नवीन संकल्प काय असू शकतात? जगात भारताची महानता कशी वाढेल, हा नवा संकल्प असावा. डीएव्हीचा डंका केवळ हिंदुस्तानातच का वाजाव? पूर्ण जगात का नको? आणि म्हणूनच जेव्हा 2025मध्ये आर्य समाजाला 150 वर्ष होतील. 1875 मध्ये आर्य समाजाचा प्रारंभ झाला. 2025मध्ये 150 वर्ष होतील, त्यामुळे आत्तापासूनच गुरुकूल परंपरा असो, डीएव्ही असो, आर्य समाज ही संस्था असो. हे सर्व पाच सूत्री, दहा सूत्री, कार्यक्रम तयार करु शकतात की, जेव्हा आर्य समाजाचा 150 वा स्थापना दिन साजरा करु, तो पर्यंत म्हणजे 2025 पर्यंत आमच्याकडे जी दहा-अकरा वर्ष आहेत, आठ-नऊ वर्ष आहेत, त्याचा उपयोग या गोष्टी साध्य करण्यासाठी करुन घेऊच, असा संकल्प करता येईल का? आणि मला वाटते की, ही दयानंद सरस्वतीजींना खरीखुरी श्रध्दांजली ठरेल.

त्यासाठी आत्तापासूनच एक आराखडा तयार व्हायला हवा. काय करा, काय करु नका हे आर्य समाजाला सांगायची गरजच नाही. त्यांची मूळ विचारधारा ही राष्ट्राच्या कल्याणाशी जोडली गेली आहे. ज्यात भारताचे कल्याण होईल, त्यातच आर्य समाजाला कल्याण दिसते, आणि त्यासाठीच भारताचे कल्याण आणि एकविसाव्या शतकातील भारत, 18व्या शतकातला भारत नाही, तर आधुनिक भारत, वैज्ञानिक भारत, जगाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य असलेला भारत, अशा भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या स्वत:ला सज्ज करायला हवे, अशाच प्रकारे आता मला पूनमजी सांगत होते की, तुम्ही आम्हाला एक काम द्या, आणि आम्हाला ते पूर्ण करुन दाखवायचे आहे. सामान्यत: अशा कोणत्या कार्यक्रमात जातो, तेव्हा ते जे बोलावणे करणारे लोक असतात, ते बोलावणे करतांना आम्हाला खूप सांगतात की, तुम्ही खूप मोठ्या व्यक्ति आहात, तुम्ही या त्यामुळे आमची शोभा वाढेल, आमचे हे होईल……, आमचे ते होईल! आणि जेव्हा तिथे जातो, तेव्हा निवेदन देतात, आमच्यासाठी हे करा, आमच्यासाठी ते करा…. बहुतेक वेळा आमचा हा अनुभव असतो आणि तो चुकीचा आहे, असे मी म्हणणार नाही. ते स्वाभाविक पण आहे. पण इथे मात्र मला वेगळाच अनुभव येतो आहे. इथे माझ्याकडून काही मागितले जात नाही आहे, तर मला सांगण्यात येतंय की मोदीजी आम्हाला काही काम सांगा. ही गोष्ट छोटी आहे असे मी मानत नाही, माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की कोणी पाहुणा कुठे जात असेल आणि बोलावणारा आमच्याकडे काहीच मागत नाही. आणि वरती हेही सांगतो की आमच्यासाठी काहीतरी काम सांगा. तेव्हा मी पूनमजींना विचारले, की काय वाटते तुम्हाला, तुम्ही काय करु शकता? तेव्हा त्यांनी सांगितले की, तुमची जी गंगा स्वच्छतेची मोहिम आहे, आम्ही त्यात सहभागी होऊ शकतो का? आम्ही आमच्या डीएव्हीच्या विद्यार्थ्यांना गंगा स्वच्छतेच्या कामाशी जोडतो. आमच्या शिक्षकांना जोडतो, आमच्या प्राध्यापकांना जोडतो. गंगा स्वच्छतेची मोहीम राबवतांना अनेक सरकारं आली आणि गेली, पण हे काम पूर्ण नाही झाले. पण आज मला असे वाटतेय की, जर मला ही साथ मिळाली, तर गंगेची स्वच्छता होणारच….

जेव्हा जनता-जनार्दनाचे आशिर्वाद असतात, तेव्हा कोणतीही समस्या ही समस्या राहात नाही. त्या समस्येचे आपोआप संधीत रुपांतर होते. आणि आज मी पाहतोय की, डीएव्हीची ही शक्ती, आर्य समाजाची शक्ती, गुरुकुलांची शक्ती, आर्य समाजाशी जोडल्या गेलेल्या सर्व साधु-महात्म्यांची शक्ती, हे सर्व जर गंगा स्वच्छता मोहिमेचा हिस्सा बनले तर मग गंगा स्वच्छतेचे ते स्वप्न कधी अपूर्ण राहील असे मला वाटतच नाही आणि हाच नवा संकल्प आहे. गंगा स्वच्छ झाली तर ती केवळ तिथे जाणाऱ्या-येणाऱ्यांसाठी अथवा जवळ राहणाऱ्यांसाठी नाही, तर संपूर्ण जगात भारताचा गौरव वाढवणारी घटना होईल.

आपण एक काम सुरु करुया, आम्ही गंगेला अस्वच्छ होऊ देणार नाही. एकदा निश्चय केला की, आम्ही गंगेला अस्वच्छ होऊ देणार नाही, तर मग गंगेमध्ये अशी ताकद आतूनच आहे, की स्वच्छता तर ती आपणहूनच करेल. आज गंगा ही समस्या नाही तर तिला अस्वच्छ करणारे आपण समस्या आहोत. केवळ एकदा गंगेच्या तीरावर राहणाऱ्या सर्वांनी फक्त एकदा एक संकल्प केला. गंगेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांनी संकल्प केला की आम्ही गंगा नदी अस्वच्छ होऊ देणार नाही, तर मग गंगा स्वच्छता मोहिम सफल होणे कठीण नाही. आणि हा माझा विश्वास आहे आणि जर डीएव्हीचं हे दोन कोटी जणांचं कुटुंब जर या कामाला लागले तर आमची गंगा अशुध्द राहील, हे मी मानायलाच तयार नाही. जेव्हा आपण आर्य समाजाचा दीडशेवा वर्धापन दिन साजरा करु तेव्हा आम्ही या भारत मातेच्या चरणांवर शुध्द गंगा, स्वच्छ गंगा कशी देऊ शकू? हे स्वप्न सोबत घेऊन चला अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो.

जग म्हणते की 21वे शतक आशियाचे आहे. कोणी म्हणतात, 21वे शतक भारताचे आहे. अनेक शतकांपासून हे दिसून आलेय की, जेव्हा जेव्हा मानव जातीने ज्ञान युगात प्रवेश केला आहे, तेव्हा-तेव्हा भारताने जगाचे नेतृत्व केले आहे. 21वे शतक ज्ञानाचे शतक आहे आणि जेव्हा 21वे शतक ज्ञानाचे असेल, स्वत: दयानंदजी ज्ञानमार्गी असतील आणि भारतातील 65 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल. तेव्हा हिंदुस्थान हा आज जगातला सर्वात तरुण देश आहे आणि जेव्हा जो देश जगात सर्वात तरुण असतो तेव्हा त्या देशाची स्वप्नेही तरुण असतात, निर्धार पण तरुण असतात, संकल्प पण तरुण असतात. आणि म्हणूनच या देशाची ही जी युवा शक्ती माझ्या समोर मी पाहतोय, ही 65 टक्के लोकसंख्या ही केवळ भारताचे भाग्यच बदलण्यासाठी सक्षम नाही, तर पूर्ण जगाचे भाग्य बदलण्यासाठीही सक्षम आहे. आणि या मुळेच आमचा प्रयत्न आहे की आमच्या देशाचा हा अमूल्य वारसा, आमची अमूल्य संपत्ती याचा उपयोग राष्ट्राच्या कल्याणासाठी कसा करता येईल? देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवा शक्तीवर कसे लक्ष केंद्रीत करता येईल? आणि या साठीच सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कौशल्य विकास, आम्हाला माहित आहे की आम्ही जेव्हा पदवीधर होतो, चांगल्यात चांगले गुण मिळवून होतो, उत्तमातला उत्तम संस्थेचे प्रमाणपत्र असते, पण आपण जेव्हा शिक्षण पूर्ण करुन समाजातले नवे जीवन सुरु करतो तेव्हा नोकरीसाठी जिथे जातो तेव्हा नोकरी देणारा विचारतो – काही अनुभव आहे का? सर्वात पहिला हाच प्रश्न विचारतात – तुम्हाला काही अनुभव आहे का? आणि आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. आम्हाला विचारण्यात येत की तुमच्या जवळ प्रमाणपत्र तर आहे, पण याही पेक्षा आणखी काय आहे? तेव्हा आम्ही मान खाली घालतो. आपल्या देशातल्या नवयुवकांनी आपल्या स्वत:ला निरुपयोगी मानणे आम्हाला नको आहे. त्याच्या हातात केवळ प्रमाणपत्र असून, पुरेसे नाही, तर त्याच्या हातात कौशल्य असणे आवश्यक आहे. आणि या साठीच आम्ही कौशल्य विकास मोहिम हाती घेतली आहे. देशातल्या नवयुवकांकडे काही ना काही कौशल्य असायलाच पाहिजे आणि त्याच्या मध्ये स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळही असले पाहिजे आणि मला विश्वास आहे की, आपल्या देशातील युवकांना जर का योग्य संधी मिळाली, तर ते त्या संधीचा नक्कीच योग्य उपयोग करुन घेतील.

संपूर्ण देशात कौशल्य विकासाची मोहीम राबवली जात आहे. आमचे सरकार आल्यानंतर, कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले, स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्यात आला, स्वतंत्र अधिकाऱ्यांची फौज दिली गेली की ज्यामुळे हिंदुस्थानातील कोट्यवधी युवकांना कौशल्य विकासाचा लाभ मिळेल. येणाऱ्या काळात, 2030 मध्ये जगाची स्थिती अशी होणार आहे की, अनेक देश असे असतील, जिथे तरुणच नसतील. सर्व म्हातारी कुटुंब रहात असतील. सर्व जगाला एका कामगार शक्तीची गरज भासेल आणि जगाची कामगार शक्तीची जी गरज आहे ती शक्ती पुरवण्याची ताकद जर कुणाकडे असेल, तर ती फक्त भारताकडे असेल. आपले भारतीय तरुण आपल्या बळावर जगाचे भाग्य बदलतील, असे दिवस येणार आहेत.

आम्ही एक योजना सुरु केली – मुद्रा योजना. आपल्या देशाच्या आर्थिक विकासाबाबत नेहमी दोन विषयांची चर्चा होते. एक तर खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्र. आर्थिक कारभार चालवण्यासाठी दोनच पध्दती समोर आहेत – खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र. आम्ही नवा विचार केला आहे. इथे जी गोष्ट समोर आली आहे ती आहे नवी दिशा. आम्ही सांगितले खाजगी क्षेत्राने आपले काम करावे, सार्वजनिक क्षेत्राने आपले काम करावे…. बहरावे, पुढे जावे. पण देशाच्या प्रगतीसाठी एका तिसऱ्या क्षेत्राची गरज आहे आणि त्याला आम्ही म्हटलंय – व्यक्तिगत क्षेत्र. प्रत्येक व्यक्तीमध्ये असे सामर्थ्य असावे, ती स्वत:च्या पायावर उभी रहावी, ती व्यक्ती नोकरी शोधणारी नव्हे, तर रोजगार निर्मित करणारी व्हावी. दोन, पाच, सात जणांना रोजगार देणारी व्यक्ती व्हावी आणि त्यासाठी आम्ही ती ताकद निर्माण करु इच्छितोय.

समाजातील छोट्या-छोट्या व्यक्ती ज्यांना कधी बँकेत प्रवेशही मिळत नव्हता. आम्ही मुद्रा योजनेअंतर्गत सांगितलंय की, जे सर्वसामान्य आहेत, केस कापणारा न्हावी असो, धोबी असेल, वृत्तपत्र विक्रेता असेल, दूध विक्रेता असेल, चहा विकणारा असेल, समाजातील सामान्य माणसे…. मुद्रा योजनेअंतर्गत त्यांना पैसे दिले जातील आणि कोणत्याही प्रकारच्या हमी शिवाय पैसे दिले जातील, ज्यामुळे ते सावकारांच्या व्याजाच्या विळख्यातून मुक्त होतील आणि त्याला 50 हजार, लाख, दोन लाख, पाच लाख पाहिजे असतील, तर ते आपला व्यवसाय वाढवू शकतील. आज जर ते दोन लोकांना रोजगार देत असतील, तर नंतर ते पाच जणांना रोजगार देऊ शकतील. कोणी आणखी काही काम करु शकत नसेल, तर तो नवी सुरुवात करु शकेल. ऑटोरिक्षा घेऊन आपली स्वत:ची रिक्षा चालवू शकेल. आपल्या कुटुंबाला आपल्या पायांवर उभे करु शकेल आणि त्यासाठी मुद्रा योजना सुरु केली आहे.

मला आनंद वाटतो की आम्ही कोणतेही ढोल बडवले नाहीत, मोठे-मोठे मेळे भरवले नाहीत, राजकारण करु दिले नाही, दोन कोटी लोकांना आत्तापर्यंत मुद्रा योजनेतून पैसे देण्यात आले आहेत. आणि जवळ-जवळ एक लाख कोटी रुपये, तेही कोणत्याही हमी शिवाय या देशातील लोकांवर विश्वास ठेवून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि काम केले. हे लोक देशाची आर्थिक स्थिती चालवतील. हिंदुस्थानचे सरकार हिंदुस्थानच्या नागरीकांविषयी शंका घेत असेल, तर ही दरी मिटली पाहिजे आणि आम्ही ठरवले की आम्ही नागरीकांवर विश्वास ठेवणार, भरोसा ठेवणार.

आपल्याला माहित असेल, इथे जे शिक्षक बसलेत त्यांना बरोबर आठवत असेल… अभ्यास तुम्ही करा, मेहनत तुम्ही करा, रात्ररात्र जागून अभ्यास करा, परीक्षा तुम्हीच द्या, तुम्हीच गुण मिळवा, नंबर तुम्हाला मिळेल. पण जेव्हा कुठे नोकरी हवी असेल, सरकारमध्ये अर्ज करायचा असेल, तेव्हा आपले प्रमाणपत्र तोवर स्वीकारले जात नाही, जोवर त्याच्यावर त्या शहरातला कोणी नेता शिक्का मारत नाही, प्रमाणित करत नाही, तोपर्यंत आपले ते प्रमाणपत्र, प्रमाणपत्र मानले जात नाही. नागरीकांविषयी यापेक्षा अधिक मोठा अविश्वास कोणता असू शकतो? आम्ही निर्णय घेतला की, सच्चा दाखला घेण्यासाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही. आपण आपल्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत पाठवू शकता. जेव्हा अंतिम निर्णय होईल, त्यावेळी आपले मूळ प्रमाणपत्र घेऊन या, ते पाहता येईल, काम होईल. असाच विश्वास आम्ही मुद्रा योजनेवर ठेवला. कोणतीही हमी नाही, घेऊन जा… आणि माझे मत आहे की, सामान्य माणूस, गरीब माणूस व्याजासहित पैन-पै परत करतो आणि ते ही मुदतीपूर्वी, तो कधी पैसे बुडवत नाही. मी गरीबांमधली श्रीमंती पाहिली आहे. श्रीमंतांमधली गरीबीही पाहिली आहे पण मी गरीबांमधली मनाची श्रीमंती पाहिली आहे.

जेव्हा आम्ही प्रधानमंत्री जनधन योजना आणली तेव्हा लोक म्हणाले होते की, शून्य ठेवीशिवाय बँक खाते उघडता येईल. एकही पैसा दिला नाही, तरी बँक खाते उघडता येईल. कारण माझी इच्छा होती की हिंदुस्थानातील गरीबातील गरीब व्यक्तीलाही बँक सेवेचा अधिकार मिळाला पाहिजे. 60 टक्के लोक या सेवेपासून वंचित होते, त्यांना या प्रवाहात आणायचे होते. शून्य ठेवीशिवाय बँक खाते उघडणार होते, पण आज मी अभिमानाने सांगू शकतो की, सरकारने तर मोफत खाते उघडणे निश्चित केले होते, पण आमच्या गरीबांमधली श्रीमंती बघा-त्यांनी सांगितले. नाही-नाही आम्ही फुकट नाही करणार, पाच रुपये-दहा रुपयेही ठेवू आणि 30 कोटी ठेवले या लोकांनी. 30 कोटी रुपये! फक्त एकदा सामान्य व्यक्तीवर विश्वास ठेवला तर तो किती शक्तीचे दर्शन घडवून देतो, त्याचे हे उदाहरण आहे.

आम्ही तरुणांसाठी “स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया” उपक्रम सुरु केला आहे. कौशल्य विकास असो, मुद्रा योजनेतून पैसे मिळतील. “स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया” नवनवीन गोष्टी हाती घ्या. विशेष करुन आमचे दलित बंधू- भगिनी, आमचे अनुसूचित जमातीतील बंधू-भगिनी, आदिवासी बंधू-भगिनी, तेही आपल्या पायावर, आपल्या बळावर पुढे जावेत, त्यासाठी सरकारने मदत करायला हवी. मी म्हटलं की सव्वा लाख शाखाच का? मुद्रा योजनेतून प्रत्येक बँकेत एका दलिताला, एका आदिवासीला बँक कर्ज द्यावे. हिंदुस्थानात सव्वा लाख बँक शाखा आहेत, दीड लाख नवे उद्योजक आमच्या समाजात येऊ शकतात. गरीब, पिडीत, दलित, शोषित समाजातून ते पुढे येऊ शकतात आणि हे काम वेगाने सुरु आहे.

आम्ही “स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया” द्वारे देशातल्या युवकांना आवाहन केले आहे की, नव्या पध्दतीने काही करायची जिद्द बाळगा. या, सरकार तुमच्या मागे ठामपणे उभे राहील आणि आम्ही जगात एका स्टार्ट अपच्या जोरावर प्रगती करु, ज्यामुळे आमच्या युवकांना संधी मिळेल. अशा प्रकारच्या एका पाठोपाठ एक येणाऱ्या योजना- ज्यामुळे समाज सक्षम होईल, कुटुंब आपल्या पायांवर उभे राहण्याएवढे सक्षम होईल. कुटुंबाची स्वप्ने पूर्ण होतील. ह्या सर्व गोष्टी सोबत घेत आम्ही पुढे जात आहोत. आज सर्व जगाने मान्य केलेय- मग ती जागतिक बँक असो किंवा इतर कुठलीही संघटना. प्रत्येकाचे हेच म्हणणे आहे की, संपूर्ण जग आर्थिक संकटाचा सामना करत आहे. फक्त संपूर्ण जगात एकटा हिंदुस्थानच आज वेगाने आर्थिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करत आहे. ही असामान्य स्थिती आहे. सर्व जग झाकोळतेय, त्याच वेळी हिंदुस्थान चमकतोय! ही गोष्ट जगभरातील लोक सांगताहेत. गेल्या दीड वर्षात एका पाठोपाठ एक जी पावले उचलली, त्याचा परिणाम असा आहे की, ज्या मोठ्या आर्थिक सत्ता आहेत त्यांच्यात आज हिंदुस्थान सर्वात जास्त गतीने/वेगाने प्रगती करणारा देश झाला आहे.

आपल्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे. आपल्याला या समस्यांपासून केवळ एकाच गोष्टीने मुक्ती मिळू शकते. आम्हाला गरीबी पासून केवळ एकाच गोष्टीने मुक्ती मिळू शकते. आम्हाला निरक्षरतेपासून केवळ एकाच गोष्टीमुळे मुक्ती मिळू शकते. आपल्याला या आजारावरील औषध केवळ एकाच गोष्टीमुळे मिळू शकेल आणि ती एक गोष्ट आहे…. विकास! विकास हाच एक मार्ग आहे, जो भारताला गरीबीच्या संकटातून बाहेर काढू शकेल. समस्यांमधून बाहेर काढू शकेल. आणि या साठीच आपल्या सरकारने विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. देशाचा जलदगतीने विकास व्हायला हवा. कृषी क्षेत्राचा विकास हवा, गावांचा विकास हवा, शहरांचा विकास हवा, गरीबांना रोजगार मिळावा या सर्व गोष्टी आम्हाला बळ देत आहेत आणि आज त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.

आज मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे आणि तुम्ही असे लोक आहात, जे समाजासाठी काही ना काही करायच्या संस्‍काराने जोडले गेले आहात. ज्या कोणत्याही सात्विक शक्ती आहेत, त्यांनी आज अधिक प्रखरतेने काम करण्याची गरज आहे. जितक्या सात्विक शक्ती एकत्र येऊन, प्रखर होऊन पुढे येतील, तेव्हा या देशाला अडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे मनसुबे धुळीला मिळतील. हाच संकल्प सोबत घेऊन वाटचाल करा. मी पुन्हा एकदा आचार्यजींचे, पूनमजींचे, आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो, की आज मला आपल्या सर्वांसोबत येण्याची संधी मिळाली आणि पूज्य स्वामी दयानंदजींचे स्मरण करण्याची संधी मिळाली. खूप-खूप धन्यवाद!

J. Patankar / S. Tupe / M. Desai