पीएम्इंडिया
माननीय,
आधुनिक नायक महात्मा गांधींचे म्हणणे होते की – ‘आपण न पाहू शकणाऱ्या भावी विश्वाचीही आपण काळजी केली पाहिजे.
ज्या- ज्या वेळी अखिल विश्वाने भविष्याप्रती आपले उत्तरदायित्व निभावले आहे, मानवतेला विकासाची योग्य दिशा आणि कर्तव्याची जोड मिळाली आहे.
सत्तर वर्षांपूर्वी जेंव्हा एका भयंकर जागतिक युद्धाचा शेवट झाला, त्यावेळी या संघटनेच्या रुपाने एका नव्या आशेला जन्म मिळाला. आज आपण पुन्हा एकदा मानवतेसंबंधी नवी दिशा निश्चित करण्यासाठी याठिकाणी जमलो आहोत. अशा अतिशय महत्त्वाच्या शिखर संमेलनाच्या आयोजनाबद्दल मी महासचिवांचे सहृदय अभिनंदन करतो.
मसुदा-2030 चे ध्येय महत्वाकांक्षी आहे आणि उद्देशही तितकेच व्यापक आहेत. गेल्या कित्येक दशकांपासूनच्या समस्यांना यात प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण या मुद्यांवरील आमची परिपक्व झालेली विचारसरणी यातून दिसून येते.
अतिशय आनंदाची बाब म्हणजे आपणा सर्वांचे स्वप्न दारिद्र्यमुक्त विश्वाचे आहे. आम्ही निश्चित केलेल्या उद्दिष्टांमध्ये दारिद्र्य निर्मुलनाला अग्रक्रम आहे. आज जगात 1.3 अब्ज लोक गरीबीचे दयनीय आयुष्य जगत आहेत.
गरिबांच्या गरजा पूर्ण करणे एवढीच आमची समस्या नाही. तसेच गरीबांच्या अस्तित्व आणि सन्मानापुरताच हा प्रश्न मर्यादीत नाही. आमची ही नैतिक जबाबदारी आहे, असेही मानण्याचाही प्रश्न नाही. जर आम्हा सर्वांचा संयुक्तरित्या संकल्प असेल तर-
– जगात शांतता असावी
– व्यवस्था न्यायपूर्ण असावी
– आणि शाश्वत विकास असावा
मात्र गरिबीत हे कधीच शक्य होणार नाही. यासाठी दारिद्र्यनिर्मुलन हे आपणा सर्वांचे पवित्र कर्तव्य आहे.
भारतातील महान विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचा प्रमुख मुद्दा अंत्योदय आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मसुदा 2030 मध्येही अंत्योदयाचा समावेश आहे. भारतात जेंव्हा दीनदयालजींच्या जन्मशताब्दी वर्षाची तयारी सुरू आहे, त्यावेळेस ही बाब निश्चितच एक सुखद योगायोग आहे.
भारत पर्यावरण उद्दिष्टांतर्गत असलेल्या हवामान बदल आणि शाश्वत वापर यांना देण्यात आलेल्या मुख्य स्थानाबद्दल स्वागत करतो. आज जग द्वीप राष्ट्रांबद्दल चिंतीत आहे आणि त्यांच्या भविष्यावर लक्ष केंद्रीत केले आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. या देशांतील पर्यावरणीय पद्धतीबद्दल स्वतंत्ररित्या ध्येय निश्चित केले आहे, हे अतिशय महत्त्वाचे पाऊल असल्याचे मी मानतो.
मी निळ्या क्रांतीचा समर्थक आहे. ज्यात आमच्या छोट्या-छोट्या द्वीपसमूह राष्ट्रांची सुरक्षा, नैसर्गिक संपत्तीचा उचित वापर आणि निळेशार आकाश या तीन बाबींचा समावेश आहे.
आम्हा भारतीयांसाठी आनंदाची बाब म्हणजे आम्ही जो विकासाचा मार्ग निवडला आहे तो मार्ग आणि संयुक्त राष्ट्रसंघटनेद्वारा प्रस्तावित शाश्वत विकास उद्दिष्टे यात फार साम्य आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्ही दारिद्रयनिर्मुलनाचे स्वप्न पाहिले आहे. आम्ही गरीबांना सबल करुन दारिद्रयनिर्मुलनाचा मार्ग निवडला आहे. शिक्षण व कौशल्य विकासाला आम्ही प्राधान्य दिले आहे. गरीबांना शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासोबत त्याला कौशल्याची जोड देणे हा आमचा प्रयत्न आहे.
आम्ही आर्थिक समावेशकतेवर निश्चित कालावधीत एका मोहिमेसारखे काम केले आहे. नवीन 180 दशलक्ष बँक खाते उघडण्यात आली आहेत. गरीबांना मिळणाऱ्या सुविधा थेट त्यांच्या बँक खात्यावर मिळत आहेत. गरीबांना विमा योजनांचा लाभ मिळावा यासाठी महत्वाकांक्षी योजना आम्ही राबवत आहोत.
भारतात फार कमी लोकांची पेन्शन सुविधा आहे. गरीबांपर्यंत पेन्शन सुविधा पोहचावी यासाठी पेन्शन योजनांच्या विस्तारीकरणाचे काम केले आहे. आज गरीबातील गरीब व्यक्तीच्या मनात गरीबी विरोधात लढण्याची इच्छा निर्माण झाली आहे. नागरिकांच्या मनात स्वप्न साकार करण्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
जगात आर्थिक विकासाची चर्चा दोन क्षेत्रांपर्यंत मर्यादीत राहिली आहे. एक तर सार्वजनिक क्षेत्र व खासगी क्षेत्र याभोवतीच ही चर्चा होती. आम्ही आता एका नव्या क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. ते आहे व्यक्तीगत क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि व्यक्तीगत क्षेत्र. भारतात व्यक्तीगत क्षेत्र म्हणजे व्यक्तीगत उद्योग-व्यवसाय, ज्यात लघु वित्त आहे, नवनवीन कल्पना, स्टार्ट- अप प्रमाणेच ही नवी चळवळ झाली पाहिजे.
सर्वांसाठी घर, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. एका चांगल्या सन्मानजनक आयुष्यासाठी या सर्व बाबी अत्यावश्यक आहेत. या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी एक निश्चित योजना आणि निश्चित कालावधी निर्धारीत करण्यात आला आहे. महिला सबलीकरण आमच्या विकास कार्यक्रमांचा एक महत्वपूर्ण भाग आहे. ज्यात आम्ही मुलगी वाचवा- मुलगी शिकवा, हा मंत्र घराघरात पोहचवला आहे.
आम्ही कृषीला अधिक सुपीक व बाजारपेठेशी चांगल्या रितीने जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच नैसर्गिक संकट लक्षात घेता शेतकऱ्यांना कमीत कमी जोखीम उचलावी लागेल यासाठी आम्ही पावलं उचलत आहोत.
आम्ही उत्पादनक्षेत्राला पुनरुज्जीवित करत आहोत, सेवा क्षेत्रात सुधारणा घडवून आणत आहोत. पायाभूत क्षेत्रांमध्ये आम्ही अभूतपूर्व अशी गुंतवणूक करत आहोत आणि आमची शहरे स्मार्ट, शाश्वत तथा जिवंत विकास केंद्र होतील या पद्धतीने आम्ही विकसित करत आहोत.
समृद्धीकडे जाणारा आमचा मार्ग शाश्वत असेल यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. या कटीबद्धतेचे मूळ आमच्या परंपरा आणि संस्कृती यांच्याशी जोडलेले आहे. तसेच भविष्यकाळासाठी आमची जबाबदारीची भावना यातून दिसून येते.
मी त्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतो, जिथे धरतीला माता म्हणतात आणि मानतात. वेदांमध्येही सांगितले आहे-
आमच्या योजना महत्वाकांक्षी आणि उद्देशपूर्ण आहेत, जशा –
– आगामी सात वर्षात 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जाक्षमतेचा विकास
– ऊर्जा कार्यक्षमतेवर जोर
– मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम
– कोळशावर विशेष कर
– वाहतूक व्यवस्थेत सुधारणा
– शहरे आणि नद्यांची स्वच्छता
– टाकाऊपासून टिकाऊची चळवळ
मानवतेचा सहावा भाग असलेला शाश्वत विकास अखिल विश्वाला तसेच आमच्या सुंदर वसुंधरेसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
निश्चितच हे विश्व कमी आव्हानांचे आणि व्यापक आकांक्षेचे होईल. ज्याला आपल्या यशाविषयी अधिक विश्वास असेल.
आम्ही आमचे यश आणि स्रोत परस्परांमध्ये वाटून घेऊ. भारतीय परंपरेत अखिल विश्वाला एका परिवाराच्या रुपाने पाहिले आहे.
आज भारत आशिया, आफ्रिका, प्रशांत महासागर ते अटलांटिक महासागरादरम्यान छोट्या द्वीपसमूहांसोबत विकासाचा भागीदार या नात्याने आपली जबाबदारी पार पाडत आहे.
शाश्वत विकास सर्व राष्ट्रांसाठी राष्ट्रीय उत्तरदायित्वाचा विषय आहे. तसेच त्यांना धोरण ठरवण्यासाठी पर्यायांची आवश्यकता देखील आहे.
आज आम्ही संयुक्त राष्ट्रसंघात जमा झालो आहोत, कारण आंतरराष्ट्रीय भागीदारी ही अनिवार्य स्वरुपात आमच्या सर्व प्रयत्नांचा केंद्रबिंदू असली पाहिजे, असे आम्ही मानतो. मग तो विकासाचा मुद्दा असो वा हवामान बदलाचे आव्हान असो.
आमच्या एकत्रित प्रयत्नांचे मूळ म्हणजे- सामूहिक पण विभिन्न जबाबदाऱ्या
जर आम्हाला हवामानबदलाची काळजी आहे, तर आम्ही आमच्या वैयक्तिक सुखाला कुठेतरी सुरक्षित करतो आहोत, असे वाटते. परंतु, आम्ही जेंव्हा हवामान न्यायाविषयी बोलतो तेंव्हा गरिबांना नैसर्गिक संकटांवेळी सुरक्षित ठेवण्याचा एक संवेदनशील संकल्प समोर येतो.
हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपणास काही बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरुन आम्ही आमची उद्दिष्टे गाठण्यात यशस्वी होऊ. आम्हाला जागतिक लोक-सहभाग निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ज्याच्या जोरावर तंत्रज्ञान, नवनवीन संशोधन आणि संपत्तीचा वापर करुन आम्ही स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा सर्वांना मिळवून देऊ शकू.
आम्हाला आमच्या जीवनपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन ऊर्जेवरचे आमचे अवलंबित्व कमी होईल आणि आम्ही शाश्वत वापराकडे लक्ष देऊ.
सोबतच एक जागतिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची आवश्यकता आहे. जो आमच्या भावी पिढ्यांना नैसर्गिक संपत्तीचे रक्षण व संवर्धन करण्यास तयार करेल.
मी अशी अपेक्षा करतो की, विकसित देश काहीही आढेवेढे न घेता समान ध्येयाने विकास आणि हवामान बदल या मुद्यावर आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करतील.
मी अशीही अपेक्षा करतो की, तंत्रज्ञानाची सुविधा, तंत्रज्ञान आणि नवीन कल्पांना जगाचे कल्याण करण्यात यशस्वी होतील. मात्र, या वैयक्तिक लाभापर्यंत मर्यादीत राहू नयेत.
आम्ही आता पाहत आहोत की, दूर अंतरामुळे समस्यांपासून सुटका होणार नाही. दूर्गम अशा देशात चालत असलेला संघर्ष आणि त्यांचे परिणाम यापासूनही ती निर्माण होऊ शकते. अखिल विश्व परस्परांशी जोडले आहे, परस्परांवर अवलंबून आहे आणि परस्परांशी संबंधित आहे. यासाठी आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदारीत पूर्ण मानवतेचे कल्याण प्रमुख असले पाहिजे.
सुरक्षा परिषदेसह संयुक्त राष्ट्रसंघटनेत सुधारणा अनिवार्य आहेत. जेणेकरुन तिची विश्वासर्हता आणि उपयुक्तता टिकली पाहिजे. तसेच व्यापक प्रतिनिधीत्वाच्या माध्यमातून आमच्या उद्दिष्टांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करता येईल.
आपण एक असे विश्व निर्माण करुया, जेथे प्रत्येकाला सुरक्षित असल्याची भावना निर्माण होईल, प्रत्येकाला समान संधी उपलब्ध होतील आणि सन्मानपूर्वक राहता येईल. आम्ही आमच्या भावी पिढ्यांसाठी पर्यावरण अधिक चांगल्या अवस्थेत सोडून जावू. निश्चितपणे यापेक्षा महान उद्दिष्ट दुसरे असू शकत नाही. परंतु, हेही तितकेच खरे की, यापेक्षा आव्हानात्मक उद्दिष्टही दुसरे नाही.
आज सत्तराव्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघटनेमध्ये आम्हा सर्वांना अपेक्षा आहे की, आम्ही आपली सद्सद्विवेकबुद्धी, अनुभव, उदारमतवादीपणा, सहृदयता, कौशल्य व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या आव्हानांवर विजय प्राप्त करु शकू.
मला ठाम विश्वास आहे की, आम्ही असे करु शकू.
शेवटी मी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो-
सर्वजण सुखी असतील, सर्वजण निरोगी असतील, सर्वांचे कल्याण होईल, कोणालाच कसल्याही प्रकारचे दुःख नाही झाले.
या मंगल कामनेसह सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
S. Thakur/M. Desai
My speech at the @UN. http://t.co/ltNznpXEIS #UNGA
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2015