पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2026
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरात 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी नागरिकांच्या आत्मविश्वासाची अभिव्यक्ती, त्यांच्या परिश्रमाचे सिंहावलोकन आणि तरुणांच्या आकांक्षांचे अचूक प्रतिबिंब आहे. राष्ट्रपतींनी अधिवेशनाच्या आणि 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्व संसद सदस्यांसमोर अनेक मार्गदर्शक मुद्दे मांडले आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी साध्या शब्दांत व्यक्त केलेल्या अपेक्षा सर्व खासदारांनी निश्चितपणे गांभीर्याने घेतल्या असतील, ज्यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी यावर भर दिला की, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 व्या शतकातील पहिल्या तिमाहीची समाप्ती आणि दुसऱ्या तिमाहीची सुरुवात दर्शवत आहे, यावर त्यांनी भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी पुढील 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत आणि हा अर्थसंकल्प या शतकातील दुसऱ्या तिमाहीतील पहिला अर्थसंकल्प आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले की, देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत, जो भारताच्या संसदीय इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण आहे.
वर्षाची सुरुवात अतिशय सकारात्मक झाली असून, एक आत्मविश्वासपूर्ण भारत जगासाठी आशेचा किरण आणि आकर्षणाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, या तिमाहीच्या सुरुवातीला भारत आणि युरोपियन संघामधील मुक्त व्यापार करार भारताच्या तरुणांचे उज्ज्वल भविष्य आणि पुढील आशादायक दिशा दर्शवतो. हा करार महत्त्वाकांक्षी भारतासाठी, महत्त्वाकांक्षी तरुणांसाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी आहे, यावर त्यांनी भर दिला. भारताचे उत्पादक आपली क्षमता वाढवण्यासाठी या संधीचा फायदा घेतील, असा ठाम विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात झालेल्या ‘मदर ऑफ ऑल डील्स’ अर्थात ‘आजवरच्या सर्वात मोठ्या करारा’ मुळे एक मोठी बाजारपेठ खुली झाली आहे आणि भारतीय माल तिथे अतिशय कमी करभारासह पोहचू शकतो. परंतु यामुळे भारतीय उद्योग नेते व उत्पादकांनी शिथिल न राहता सतर्क राहून मालाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष पुरवले पाहिजे असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या खुल्या बाजारात आपण उत्तम गुणवत्तेचा माल पुरवला तर केवळ नफाच मिळेल असे नव्हे तर तर युरोपीय महासंघातील 27 देशांमधील ग्राहक त्याच्या प्रेमात पडतील व हा प्रभाव येणाऱ्या अनेक दशकांसाठी टिकून राहील. भारताच्या नाममुद्रेशी या कंपन्यांचे ब्रँड जोडले जातील व भारताला नवीन प्रतिष्ठा मिळवून देतील. या 27 देशांशी झालेल्या या करारामुळे भारताचे मच्छीमार, शेतकरी, युवक तसेच सेवाक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जागतिक स्तरावरील अमर्याद संधी उपलब्ध होणार आहेत हे मोदी यांनी अधोरेखित केले. हा ऐतिहासिक करार म्हणजे एका स्पर्धात्मक, उत्पादनक्षम व आत्मविश्वासपूर्ण भारताकडे टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.
सध्या देशाचे सर्व लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेले आहे. सुधारणा, कार्यक्षमता व परिवर्तन ही या सरकारची ओळख बनली आहे. देशाचा प्रवास आता अतिवेगवान रिफॉर्म एक्सप्रेस मध्ये सुरु आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले आणि सर्व संसद सदस्यांकडून या प्रवासासाठी मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेसाठी त्यांचे आभार मानले. देशाची आता दीर्घकालीन त्रासदायक समस्यांमधून सुटका झाली असून देश आता दीर्घकाळ परिणाम देणाऱ्या उपाययोजनांचा वापर करत आहे, यामुळे जागतिक स्तरावर देशाला आता नियोजनबद्ध व विश्वसनीय मानले जात आहे.
देशाच्या प्रगतीसाठी घेतलेला प्रत्येक निर्णय जनकेंद्रित असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारत एक देश म्हणून तंत्रज्ञान क्षेत्रात कितीही प्रगत झाला, तरी सरकार तंत्रज्ञानाशी संवेदनशीलतेची सांगड घालत संतुलितपणे पुढील प्रवास करेल व आपल्या लोककेंद्रित दृष्टिकोनाशी तडजोड करणार नाही असे मोदी यांनी म्हटले. या सरकारने सर्व योजना केवळ फाईलींमध्ये न राहता त्यांचा लाभ अगदी तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची खबरदारी घेतली आहे, त्यामुळे सरकारच्या टीकाकारांनीदेखील या उपलब्धीची प्रशंसा केली आहे. रिफॉर्म एक्सप्रेसमधील अद्ययावत सुधारणांमुळे हीच परंपरा कायम राहील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
भारतातील लोकशाही व लोकसंख्या ही सर्व जगासाठी आशादायक आहे. लोकशाहीच्या या मंदिरातून शक्ती, लोकशाहीप्रती वचनबद्धता, व लोकशाही पद्धतीने घेतलेल्या निर्णयांचा सन्मान केला जातो हा संदेश जगाला देण्याची संधी आता भारताला मिळाली आहे. सर्व जग भारताच्या या संदेशाचे स्वागत करत आहे. सध्याचा हा काळ समस्यांचा नाही, तर उपाययोजनांचा आहे, अडथळ्यांचा नाही, तर निग्रहपूर्वक पुढे जाण्याचा आहे, असे मोदी म्हणाले. या उपाययोजनांच्या व सक्षमीकरणाच्या पर्वात सर्व संसद सदस्यांनी सहभागी होऊन तळागाळातील जनतेपर्यंत योजना पोचवण्याचा या कार्यात सरकारचे साहाय्य करावे असे आवाहन मोदी यांनी केले. सर्वांना धन्यवाद व शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
Speaking at the start of the Budget Session of Parliament. May both Houses witness meaningful discussions on empowering citizens and accelerating India’s development journey. https://t.co/tGqFvc4gup
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/नितीन फुल्लुके/शैलेश पाटील/उमा रायकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Speaking at the start of the Budget Session of Parliament. May both Houses witness meaningful discussions on empowering citizens and accelerating India’s development journey. https://t.co/tGqFvc4gup
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2026