Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

31 जानेवारी 2018 रोजी खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


मंत्रिमंडळातील माझे सहकारी कर्नल राजवर्धन सिंह राठोड, अनिल बैजल, राहुल भटनागर, नरेंद्र बत्रा, सुशील कुमार, देश आणि जगात भारताचे नाव उज्वल करणारे सर्व खेळाडू आणि त्यांचे गुरुवर्य आणि भविष्यात देशाचे नाव उज्वल करण्याचा संकल्प करून, पूर्णपणे स्वतःला त्यात झोकून देणारे, देशाच्या कानाकोप-यातून आलेले माझे सर्व तरुण सहकारी, मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे.

भारताच्या प्रत्येक कोप-यातून 17 वर्षांखालील हे उदयोन्मुख खेळाडू आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खेलो इं‍डिया-हा केवळ एक कार्यक्रम नसून ही एक चळवळ आहे. भारतातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये खेळांना प्राधान्य देण्याची भावना कशी निर्माण करता येईल, बालकांच्या भावी कारकीर्दीत खेळ किती महत्त्वाचे आहेत, याची जाणीव आई-वडीलांना व्हावी, शाळेतील शिक्षकांना शाळेच्या एकंदर पर्यावरणात, आपल्या शैक्षणिक पर्यावरणात खेळ हे देखील आपल्या जीवनाच्या विकासाचा एक महत्त्वाचा पैलू आहेत. ही भावना कशा प्रकारे दृढ करता येईल, पाच-सात कामांमध्ये आपल्याला प्राधान्य निश्चित करायचे असेल तर खेळ प्राधान्यक्रमाच्या यादीत असले पाहिजेत.

आज प्रत्येक काम पूर्ण केल्यानंतर चला आता काही वेळ वाचवू या, थोडे खेळूया, या ऐवजी चला खेळूया आणि आपला विकास घडवू या- या निश्चयाने आपण कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो? या ठिकाणी भारताचे नाव उज्वल करणारे जे खेळाडू बसले आहेत, ते काही असेच खेळाडू बनले नाहीत. कोणीतरी त्यांच्यात असलेल्या गुणवत्तेला पाहिले, कोणीतरी ही प्रतिभा फुलवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आई-वडिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असेल. शाळेत देखील कधी कधी सांगण्यात आले असेल, अरे तू तर अभ्यासात इतका हुषार आहेस, तर या खेळांमध्ये आपला वेळ वाया का घालवत आहेस? अशा अनेक अडचणी आल्या असतील. पण कोणीतरी असेल ज्याने या खेळाडूचे बोट पकडून त्याला पुढे नेले असेल, आपल्या लक्ष्याच्या दिशेने जाण्यासाठी त्याला तयार केले असेल आणि मग त्याने देखील त्यामध्ये स्वतःला झोकून दिले असेल.

आज भारतात गुणवत्तेची कमतरता नाही. सव्वाशे कोटींचा देश, 35 पेक्षा कमी वयाचे 65 टक्के युवक- मग भारत खेळांच्या विश्वात आपले नाव उज्वल करू शकणार नाही का? आम्ही म्हणतो की भारत खूपच पुढे गेला पाहिजे.भारताने आगेकूच करावी याचा अर्थ असा नाही की केवळ लष्करी सामर्थ्य वाढले तर भारताची प्रगती झाली. केवळ आर्थिक महासत्ता बनला तर भारत पुढे जाईल. अजिबात नाही, भारत जगात सर्वोच्च शिखर त्यावेळी सर करेल ज्यावेळी आपण जीवनातील सर्वच क्षेत्रांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवत असू तरी देखील रांगेत सर्वत्र भारतच दिसला पाहिजे, चित्रपट तारेतारकांना ऑस्कर पुरस्कार मिळत असतील, तर तिथे भारतच भारत दिसेल, जगातील शास्त्रज्ञांची चर्चा होत असेल तर- तिथे भारत आणि भारतच दिसत असेल, खेळांची चर्चा होत असेल तिथे भारत आणि भारतच दिसत असेल, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिखरावर जाण्याचा आपण निश्चय करून वाटचाल करु या- आज नाही तर उद्या हे होणारच आणि मी हे आत्मविश्वासाने यासाठी सांगत आहे कारण देशाच्या गुणवत्तेवर, देशाच्या युवा पिढीवर माझा पुरेपूर विश्वास आहे.

खेलो इंडिया कार्यक्रम- जसे मी सांगितले आहे की एक स्पर्धा होईल, जिंकणाऱ्‍याला पदक मिळेल- इतकेच नाही, एका सर्वंकष दृष्टिकोनासोबत, एका सर्वसमावेशक धोरणासोबत, तळागाळातील पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल, प्रशिक्षणाचा, मार्गदर्शनाचा विषय असेल, मनुष्यबळ विकासाची बाब असेल, खेळाचे नियम खालपर्यंत समान स्वरुपात पोहोचतील, खेळांच्या मैदानांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत योग्य असेल, एकेका गोष्टी वर भर देत शास्त्रीय पद्धतीने खेळांना विकसित करण्याच्या प्रयत्नांची सुरुवात झाली आहे.

सर्वात मोठी गोष्ट आहे ती गुणवत्तेच्या शोधाची, देशाच्या कानाकोप-यातून गुणवत्तेचा शोध घेणे ही गुणवत्ता ऑनलाइन परिक्षा देऊन शोधता येऊ शकत नाही. खेळाविषयी कोण सर्वात चांगले उत्तर देईल, यावर ती निवड होऊ शकत नाही. खेळासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता खेळाच्या मैदानातूनच उदयाला येते. खेळाच्या मैदानातच ती विकसित होत जाते आणि म्हणूनच शालेय पातळीवर सातत्याने स्पर्धा सुरू राहिल्या पाहिजेत, त्यांचा रेकॉर्ड मेन्टेन झाला पाहिजे आणि हा रेकॉर्ड मेन्टेन करता करता त्यातील अतिशय प्रतिभावान खेळाडूंची निवड केली पाहिजे आणि ख-या अर्थाने उच्च प्रतिभावंतांना संधी मिळेल आणि त्या गुणवंतांना चांगले प्रशिक्षण मिळाले तर मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या देशाचा युवक प्रशिक्षणासाठी स्वतःला कितीही झोकून द्यावे लागले, वाहून घ्यावे लागले, संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही, तो अपेक्षित परिणाम साध्य करूनच दाखवेल.

आणि म्हणूनच या गुणवत्ता शोधानंतर एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशभरात विविध खेळांमधील एक हजार बालकांची निवड करण्यात येईल. जो प्रतिभावान आहे, सामर्थ्यवान आहे, त्याच्यात गुणवत्ता आहे, खेळांसाठी आवश्यक असलेला स्टॅमिना, गुण त्याच्यात आहेत, प्रत्येक चाचणीत तो उत्तीर्ण झाला आहे अशा 1000 बालकांना दर वर्षी पाच लाख रुपयांचा निधी दिला जाईल.

दर वर्षी एक-एक हजार बालकांची निवड होईल. पाच वर्षात आपल्या देशात, आपल्या देशात पाच हजार बालके अशी असतील, ज्यांच्यामध्ये ही गुणवत्ता असेल. त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रशिक्षणाची सोय असेल, जगातील चांगल्यातले चांगले प्रशिक्षक त्यांच्यासाठी उपलब्ध असतील, जगात ज्या कोणत्या ठिकाणी उत्तम प्रशिक्षण दिले जात असेल, त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या माता-पित्यांना देखील आर्थिक समस्यांमुळे त्यांना रोखले जाण्याचे प्रकार होणार नाही आणि सध्याचा अनुभव असा आहे की या दिवसात भारताच्या गावांमधून बालके पुढे येत आहेत. टायर-2 शहरातील बालके पुढे येत आहेत. आता त्यांच्या कुटुंबियांकडे संसाधने नसली तर भारताचे एक रत्न आहे तिथेच थांबेल आणि म्हणूनच पाच लाख रुपयांची ही व्यवस्था त्या कुटुंबाला देखील बळ देईल. त्याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या पोषक आहाराची गरज आहे, त्याच्या मानसिक जाणीवेसाठी काय केले पाहिजे, या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्याच्या दिशेने काम झाले पाहिजे.

आणखी एक महत्त्वाचा बदल आम्ही केला आहे- या दिवसात जेव्हा खेळाडू भारताचे नाव उज्वल करून येतात तेव्हा राज्यांमध्ये एक पोषक वातावरण तयार होते, ती राज्ये या खेळाडूंसाठी मोठमोठी बक्षिसे जाहीर करतात, समाजातील काही लोक देखील बक्षिसे जाहीर करतात. मात्र, त्यांचे जे प्रशिक्षक असतात, शेवटच्या क्षणी या खेळाडूंसोबत जे असतात, त्याच प्रशिक्षकांना विचारात घेतले जाते.

हे तर केलेच पाहिजे, पण बाल्यावस्थेपासून ज्या गुरुने या खेळाडूला शोधले आहे, सुरुवातीच्या दोन-चार पाच वर्षात ज्या प्रशिक्षकाने त्याला तयार केले आहे, पुढे नवे नवे प्रशिक्षक मिळत गेले असतीलही, पण सुरुवातीच्या काळात ज्या प्रशिक्षकाने त्या खेळाडूला मार्गदर्शन केले, त्याच्यामुळेच त्याची या क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली आणि म्हणूनच आम्ही हे ठरवले आहे जे खेळाडू देशाचे नाव उज्वल करतात, त्यांच्यासाठी बक्षिसे जाहीर होतात, त्यामध्ये त्यांच्या प्रशिक्षकांनाही बक्षिसे द्यायचे निश्चित होते. आता या खेळाडूच्या संपूर्ण जीवनकाळात जेवढ्या प्रशिक्षकांनी योगदान दिले आहे, त्यांचा देखील बक्षिसांवर अधिकार असेल. हा एक मोठा…. आणि म्हणूनच आणि खेळांसाठी जे समर्पित लोक असतात ते पैसे किंवा प्रसिद्धीसाठी नाही, तर त्यांच्यात एक ओढ असते. तुम्ही पाहिले असेल की जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात आणि भारतीय खेळाडू जेव्हा खेळतात, तेव्हा ते संघर्ष करतात, सगळी ताकद पणाला लावतात. पण ज्या वेळी ते विजयी होतात आणि त्यांच्या हातात तिरंगा येतो, त्या वेळी त्यांची संपूर्ण देहबोलीच बदलून जाते. सर्व थकवा दूर होतो. कुठे दुखापत झाली असेल, कुठून रक्त वाहात असेल, त्या सर्वांचा विसर पडतो. हातात तिरंगा घेऊन ते असे धावतात- एक खेळाडू जेव्हा जगाच्या एखाद्या भागात तिरंगा घेऊन धावत असतो तेव्हा संपूर्ण भारतात उर्जा निर्माण होते, संपूर्ण भारतात चैतन्य निर्माण होते.

आणि पुन्हा एकदा आम्ही ही परंपरा सिद्ध करणार आहोत आणि भारताला खेळ काही नवे नाहीत. जर तुमच्यापैकी कोणाला मोहेनजोदडो संस्कृती आणि त्यातल्या परंपरांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली असेल तर हजारो वर्ष जुन्या जीवन व्यवस्था, गुजरातमधील धोलाविरा- पाच हजार वर्षे जुनी व्यवस्था असलेले हे ठिकाण पुरातत्ववेत्त्यांनी शोधून काढले. मी जेव्हा पहिल्यांदा हे ठिकाण पाहायला गेलो होतो तेव्हा तिथल्या गाईड्सने मला सांगितले की पाच हजार वर्षांपूर्वी धोलाविरामध्ये हजारो लोकांना बसता येईल अशी व्यवस्था असलेले एक खूप मोठे खेळाचे स्टेडियम होते आणि आज देखील त्याचे अवशेष तिथे पाहायला मिळतात.

सांगायचे तात्पर्य हे आहे की भारतामध्ये खेळांची परंपरा नवीन नाही. आपल्याला नव्याने जागतिक पातळीवर, आधुनिक संसाधनांच्या साथीने, आधुनिक इको सिस्टमच्या जोडीने, आधुनिक नियमांचा वापर करून, या क्रीडाविश्वात स्वतःला प्रस्थापित करायचे आहे.

आजचा हा क्षण ‘खेलो इंडिया’, देशाच्या कानाकोपऱ्‍यातून 17 वर्षाच्या खालील मुलेमुली येथे आली आहेत. खेळ खेळता खेळता आपोआपच आपल्यात खिलाडू वृत्ती निर्माण होते. या ठिकाणी जितके खेळाडू आले आहेत- त्या सर्वांना एक भारत-श्रेष्ठ भारताची अनुभूती होईल. भारताची विविधता ते आत्मसात करतील. भाषा जरी येत नसली तरी आपलेपणाचा सुगंध आपल्याला नवी उर्जा, नवे सामर्थ्य प्रदान करेल.

मी याच भावनेने तुम्हा सर्व खेळाडूंना मनापासून अनेक अनेक शुभेच्छा देतो. 8 फेब्रुवारीला जेव्हा या स्पर्धांचा समारोप होईल, तुम्ही आपापल्या भागात परताल- तेव्हा अनेक नव्या गोष्टी शिकून जाल, अनेक नवे मित्र-मैत्रिणी बनवून जाल, एक भारताचा याच स्टेडियममध्ये अनुभव घेण्याची संधी घेऊन जाल. स्वतः समूहात कसे वावरायचे, याचे अगदी सहजतेने संस्कार प्राप्त करून जाल.

मी त्या सर्व बालकांना शुभेच्छा देतो,त्यांच्या गुरुवर्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्या माता पित्यांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मुलांना खेळाच्या या विश्वात आगेकूच करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे आणि म्हणूनच अनेक अनेक शुभेच्छांसोबत मी सर्वप्रथम खेलो इंडिया स्कूल गेम्सच्या शुभारंभाची घोषणा करत आहे.

धन्‍यवाद।

B.Gokhale/S.Patil/P.Kor