Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदेला केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदेला केले संबोधित


नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदे’ला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. समयोचित पुढाकार घेतल्याबद्दल आणि अगत्यपूर्वक  निमंत्रण दिल्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आभार मानले. या महत्त्वपूर्ण परिषदेत सहभागी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “पहिल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदेचा भाग होताना मला आनंद होत आहे,” असे मोदी म्हणाले.

ब्रह्माण्डाबद्दल  मानवाला असलेल्या चिरंतन कुतूहलाचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी सांगितले की अंतराळाने अनेक शतकांपासून मानवी कल्पनाशक्तीला प्रेरित  केले आहे. हवामान आणि पिकांपासून ते महासागर आणि मानवी समुदायांपर्यंत, पृथ्वीवरील दैनंदिन जीवनाला आता अंतराळ क्षेत्रातील घडामोडी आकार देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “अंतराळात अफाट संधी  आहेत आणि आपली जबाबदारी सामूहिक आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.

 ब्रह्माण्डातील  वाढत्या गुंतागुंतीचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी  भर दिला की अंतराळातील कक्षांमध्ये आता अधिक गर्दी होत आहे, तंत्रज्ञान अधिक शक्तिशाली होत आहे आणि यात सहभागी होणाऱ्या देशांची संख्याही वाढत आहे. जागतिक भागीदारींमध्ये अल्पकालीन लाभांपेक्षा दीर्घकालीन स्थैर्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. “आपले पर्याय  स्पष्ट असले पाहिजेत: संघर्षा ऐवजी  सहकार्य, अल्पकालीन लाभाऐवजी  शाश्वतता आणि वगळण्याऐवजी समावेशकता ,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

 भारताच्या तत्वज्ञान विषयक  दृष्टिकोनाचा अंतराळाशी संबंध जोडताना पंतप्रधानांनी नमूद केले की, देशाचा दृष्टिकोन ‘वसुधैव कुटुंबकम्’ (म्हणजेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’) या सिद्धांतावर आधारित आहे. अंतराळ क्षेत्र सुरक्षित राखण्यासाठी ही सर्वसमावेशक भावना आपल्या पृथ्वीच्या सीमा ओलांडून पुढे न्यावी लागेल असे आवाहन त्यांनी केले. “आंतरराष्ट्रीय कायदा, संवाद आणि बहुपक्षीय सहकार्य यांवर आधारित सुरक्षित,  शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचे आम्ही समर्थन करतो,” यावर मोदी यांनी भर दिला.

 पारदर्शक संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताच्या अवकाशीय प्रवासात, सार्वत्रिक कल्याणाच्या तत्त्वज्ञानाचे उत्तम प्रतिबिंब उमटले आहे. जागतिक प्रगतीसाठी माहितीची नैतिक पद्धतीने देवाणघेवाण करणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “वैज्ञानिक माहिती खुल्या आणि प्रामाणिक पद्धतीने सामायिक केली गेली पाहिजे आणि तिचा उपयोग सर्वांच्या हितासाठी झाला पाहिजे,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

भारताच्या हवाई अवकाश क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रगतीच्या लक्षणीय आलेखाबद्दल बोलतांना, पंतप्रधानांनी, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आणि दिशादर्शन अशा कामांसाठी उपग्रह तंत्रज्ञानाचे प्रत्यक्षात होणारे फायदे अधोरेखित केले. या अद्ययावत क्षमता, शेतकरी आणि मच्छिमार यांच्यासह,  थेट तळागाळातील समुदायांना सेवा देत आहेत, असे नमूद करत ते म्हणाले, “या प्रवासाच्या केंद्रस्थानी असलेल्या इस्रोने, आपले उत्कृष्ट कार्य आणि वाजवी खर्चात यशस्वी केलेल्या मिशन्स मुळे, ही संस्था संपूर्ण जगाच्या प्रशंसेस पात्र ठरली आहे,” असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले.

प्रक्षेपण सेवा क्षेत्रातील भारताच्या आंतरराष्ट्रीय सहभाग आणि सहकार्याची माहिती देताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, देशांतर्गत रॉकेटच्या माध्यमातून 34 देशांमधील 430 हून अधिक पेलोड यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले आहेत. या सहकार्यपूर्ण वैज्ञानिक उपक्रमांचा जगाला व्यापक उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. “इस्रोचे तंत्रज्ञान आणि भागीदारी केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरत आहेत,” यावर पंतप्रधानांनी भर दिला.

या संस्थात्मक यशाचे श्रेय, भारतातील अविश्रांत कष्ट करणाऱ्या मनुष्यबळाला देत, पंतप्रधानांनी, भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ यांच्या समर्पण आणि अविरत कष्टाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अंतराळ क्षेत्रातल्या देशांमध्ये भारताला अभिमानास्पद स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. “दिवस-रात्र अथक परिश्रम करून, प्रत्येक मोहिमेतील यशासोबत त्यांनी इस्रोची जागतिक प्रतिष्ठा उंचावली आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.

अवकाश विज्ञानातील महत्वाच्या टप्प्यांचे स्मरण करत, पंतप्रधानांनी सांगितले की भारताचे आदित्य-एल1 सध्या सूर्याची रहस्ये उलगडत आहे, तसेच गेल्या वर्षी एका भारतीय अंतराळवीराने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट दिली. चंद्रावरील ऐतिहासिक लॅंडींगचा उल्लेख करताना त्यांनी त्याचे जागतिक स्तरावरील ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. “चांद्रयान-3 मुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला,” असे पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रीय रोडमॅपसाठी भविष्यातली महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठरवताना पंतप्रधानांनी 2035 पर्यंत स्वदेशी अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे  आणि 2040 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे लक्ष्य असल्याचे  जाहीर केले. हे दीर्घकालीन प्रयत्न एकाच, मुख्य उद्दिष्टाने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “या सर्व प्रयत्नांमध्ये, आमचे मार्गदर्शक तत्त्व स्पष्ट आहे: याचे फायदे संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचले पाहिजेत,” असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

देशांतर्गत व्यावसायिक परिसंस्थेच्या वेगाने होणाऱ्या विकासाचे वर्णन करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, संस्थात्मक घटकांबरोबरच भारताचे खाजगी अंतराळ क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. नवोदित स्टार्टअप्स आणि प्रस्थापित संस्था यांच्यात निर्माण होत असलेल्या गतिमान समन्वयाची त्यांनी दखल घेतली. “उद्योजकतेची ऊर्जा आता इस्रोच्या उत्कृष्टतेशी जोडली जात आहे,” असे मोदी म्हणाले.

दीर्घकालीन द्विपक्षीय संबंधांना महत्त्व देत, 1960 च्या दशकात थुंबा इथे भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या स्थापनेपासून फ्रान्स हा एक विश्वासू भागीदार राहिला आहे, याची आठवण पंतप्रधानांनी काढली. सध्याचे संयुक्त उपक्रम उच्च-स्तरीय संशोधन आणि मूर्त सामाजिक लाभ यांचा यशस्वीपणे मेळ घालतात यावर त्यांनी भर दिला. “आज आमचे सहकार्य पृथ्वी निरीक्षण आणि प्रगत तंत्रज्ञानापर्यंत विस्तारलेले असून, ते वैज्ञानिक उत्कृष्टता आणि मानवी उद्दिष्ट यांना एकत्र आणत आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय भागधारकांना खुले निमंत्रण देताना, पंतप्रधानांनी जागतिक समुदायाला आगामी शोध मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. अंतराळ शोधाच्या पुढील लाटेचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी जगभरातल्या भागीदारांनी एकत्र येण्याचे स्वागत केले. “आम्ही फ्रान्स आणि जगाला भारताच्या पुढील अंतराळ प्रवासात  सहप्रवासी होण्यासाठी आमंत्रित करतो,” असे मोदी म्हणाले.

आपल्या व्हिडिओ संबोधनाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी परिषदेतील सर्व नामांकित उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. सहकार्यात्मक शोध आणि नवोन्मेषाद्वारे खगोलीय वातावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. “पॅरिसमधल्या ‘अंतराळ परिषदेने एक स्पष्ट संदेश दिला पाहिजे: आपण एकत्र शोध घेऊ, एकत्र नवोन्मेष करू आणि संपूर्ण मानवजातीसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अंतराळाचे एकत्र रक्षण करू,” असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

 

 निलीमा चितळे/सुषमा काणे/राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai