Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 11 ऑक्टोबर रोजी चेन्नई दौऱ्यावर जाणार


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूतील चेन्नईच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सुमारे 11:30 वाजता ते पूनमल्ली बायपास स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी पोरूर बायपास स्थानकापासून चेन्नई मेट्रोने प्रवास करतील आणि पुन्हा परत येतील. दुपारी सुमारे 12:15 वाजता ते चेन्नई येथील जलकंडेश्वरर मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. त्यानंतर ते आयआयटी मद्रास येथील ब्रेन सेंटरची पाहणी करतील.

दुपारी सुमारे 1:30 वाजता पंतप्रधान 13,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

दुपारी सुमारे 3 वाजता ते चेन्नई येथील जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालय मॅट्रिक्युलेशन उच्च माध्यमिक शाळेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. पंतप्रधान सुमारे 4,900 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील पूनमल्ली-वडपळणी मार्गाचे उद्घाटन करतील. विशेष म्हणजे या कॉरिडॉरमध्ये 3.7 किमी लांबीची एक अद्वितीय डबल-डेकर रचना आहे. तसेच चालकविरहित मेट्रो संचालनास मदत करण्यासाठी डिझाइन केलेली प्रगत सिग्नलिंग प्रणाली देखील आहे. या पर्यायामुळे प्रवाशांचा दैनंदिन प्रवासाचा वेळ कमी होण्याची तसेच चेन्नईच्या वेगाने वाढणाऱ्या पश्चिम उपनगरांना शहराच्या केंद्राशी जोडणारी संपर्क सुविधा उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान सुमारे 3,700 कोटी रुपये किमतीच्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. हे प्रकल्प राज्यातील रस्ते जोडणी मजबूत करतील, प्रवासाचा वेळ कमी करतील, वाहतूक कोंडी कमी करतील आणि आर्थिक वाढीस चालना देतील.

पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग-744 च्या वडुगापट्टी-तेरकुवेंगनल्लूर या 36 किमी लांबीच्या चौपदरी मार्गाचे उद्घाटन करतील. या प्रकल्पामुळे या भागातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना, औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांना जोडणारी संपर्क सुविधा उपलब्ध होईल, परिणामी प्रवासी आणि मालाची वाहतूक अधिक सुलभ होईल. ते राष्ट्रीय महामार्ग-744ए च्या मदुराई रिंग रोडच्या 30 किमी लांबीच्या चौपदरी मार्गाचेही उद्घाटन करतील. या प्रकल्पामुळे मदुराईच्या आसपासची वाहतूक सुरळीत होईल आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

पंतप्रधान एनएच-83 च्या नागपट्टिनम-तंजावर मार्गावरील थिरुवरूर बायपासच्या चौपदरीकरणाची पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे थिरुवरूरमधील रस्ते संपर्क अधिक मजबूत होईल तसेच शहराभोवती एक पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल.

पंतप्रधान 750 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन करतील. ते कराईकल-पेरालम रेल्वे मार्गाचे लोकार्पण करतील. यामुळे या भागातील रेल्वे जोडणी आणखी मजबूत होईल. ते कोईम्बतूर आणि आसपासच्या परिसरातील तीन रेल्वे उड्डाणपुलांचेही लोकार्पण करतील. या उड्डाणपुलांमुळे वरदळीच्या रेल्वे फाटकांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रतीक्षा वेळ कमी होईल आणि प्रवाशांची रस्ते सुरक्षा सुधारेल. पंतप्रधान पलानी, वेल्लोर कॅन्टोन्मेंट, अंबासमुद्रम, परमक्कुडी आणि नामक्कल येथील पाच अमृत स्टेशन्सचेही उद्घाटन करतील. ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे.

तामिळनाडूमध्ये सागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, माल हाताळणी क्षमता वाढवण्यासाठी आणि लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अनेक बंदर-संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे.

पंतप्रधान चेन्नई बंदरातील चार पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील: यामध्ये पक्के स्टोरेज यार्ड, आयात निर्यातीसाठी चार गोदामे, एक अद्ययावत क्रूझ टर्मिनल आणि एक सीफेरर्स क्लब यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे माल साठवणूक आणि हाताळणी सुधारेल, गोदामांची क्षमता वाढेल, एकाच वेळी अधिक क्रूझ प्रवासी जहाजामधून चढ-उतार करू शकतील यासाठी प्रवासी सुविधांचे आधुनिकीकरण होईल, तसेच येथे भेट देणारे खलाशी आणि सागरी कर्मचाऱ्यांना आधुनिक कल्याणकारी, मनोरंजक आणि सहाय्यक सुविधा उपलब्ध होतील.

पंतप्रधानांच्या हस्ते व्ही. ओ. चिदंबरनार बंदरावरील आठ महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी समारंभ होणार आहे. या प्रकल्पांमुळे मालवाहतूक व साठवण क्षमता वाढेल, अधिक स्वच्छ सागरी उर्जेतील रुपांतरणासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जातील आणि बंदर परिसंस्थेतील जहाजावरील माल उतरवण्याची व मालवाहतुकीची क्षमता सुधारेल. पंतप्रधान कामराजर बंदरावरील कोळसा उतरवून घेण्यासाठीच्या प्रकल्प 3 चे उद्घाटन करतील आणि मालवाहतूक करणाऱ्या जहाजांसाठीच्या कॅपिटल ड्रेजिंग फेज 1, स्टेज 2 प्रकल्पाचे भूमीपूजन करतील.

पंतप्रधान चेन्नई येथे चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (सीपीसीएल) कंपनीच्या सध्याच्या मनाली रिफायनरीच्या परिसरातील ग्रुप 2/3 लुब ऑइल बेस स्टॉक्स (लॉब्ज) प्रकल्पाचे भूमीपूजन करतील. प्रकल्पाचा एकंदर खर्च ₹1,620 कोटी आणि क्षमता वार्षिक 270 हजार मेट्रीक टन इतकी आहे. या प्रकल्पाचा उद्देश भारतात जागतिक दर्जाची, उत्तम गुणवत्तेची वंगण तेले उत्पादित करण्यासाठी ग्रुप 2/3 वंगण तेलांचा मूलभूत साठा निर्माण करण्याचा आहे.  

पंतप्रधान आयआयटी मद्रास इथे सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचे (एसजीबीसी) लोकार्पण करतील. 100 पेक्षा अधिक मानवी मेंदूंचे मानवी जीवनातील अर्भकावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतचे त्रिमितीय ऍटलास तयार करणाऱ्या जागतिक वैज्ञानिक अभियानाचे उद्घाटनदेखील ते करतील. सी स्ट्रोक या अनोख्या मानवी इस्केमिक स्ट्रोक ऍटलासचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये पक्षाघात झालेल्या मेंदूच्या 1000 पेक्षा जास्त सूक्ष्म पेशींवर भाष्य करण्यात आले असून पक्षाघातावरील नावीन्यपूर्ण उपचार शोधण्यासाठी जगभरातील संशोधकांना यांची मदत होईल.

चेन्नईतील जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालय  या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यामध्ये संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील पाच दशकांचे योगदान आणि शैक्षणिक सर्वोत्कृष्टता, शिस्त, सांस्कृतिक मूल्ये व सर्वंकष शिक्षण याद्वारे विद्यार्थ्यांच्या कित्येक पिढ्या घडवण्यामधील भूमिका साजरी केली जात आहे. ‘सा विद्या या विमुक्तये’ (ज्ञान जे स्वातंत्र्य मिळवून देते) या आपल्या घोषवाक्याला अनुसरुन ही शाळा  समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देणारे विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेने बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार बदल केले आहेत. त्याचवेळी चारित्र्यवान, ज्ञानी व जबाबदार नागरिक घडविण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे.

***

शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]