Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एम्समधील विविध आरोग्यनिगा प्रकल्पांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

एम्समधील विविध आरोग्यनिगा प्रकल्पांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

एम्समधील विविध आरोग्यनिगा प्रकल्पांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

एम्समधील विविध आरोग्यनिगा प्रकल्पांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत जे. पी. नड्डा, अश्विनी चौबे, अनुप्रिया पटेल आणि या मंचावर उपस्थित रणदीप गुलेरिया, आय. एस झा, डॉ. राजेश शर्मा आणि सर्व मान्यवर !

दिल्लीतील लोकांच्या उपचारासाठी, दिल्लीला येणाऱ्या लोकांसाठी, तुम्हा सर्वांसाठी आजचा दिवस एक प्रकारे विशेष दिवस आहे आणि मला अतिशय आनंद होत आहे की आज गरीबांना, सामान्य लोकांना, कनिष्ठ मध्यम वर्ग, मध्यम वर्गीयांना आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी, आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आजारांना तोंड देण्यासाठी मदत करण्यासाठी काही नवे आधारस्तंभ तयार होत आहेत. आता काही वेळापूर्वीच सुमारे 1700 कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करण्यात आले. यामुळे दिल्लीत असलेल्या देशातील दोन नव्या रुग्णालयांमध्ये एम्स आणि सफदरजंग रुग्णालयात सुमारे 1800 हून अधिक नव्या खाटांच्या नव्या क्षमतेचा मार्ग खुला झाला आहे.

मित्रांनो, एम्सवरील वाढता ताण विचारात घेऊन दिल्लीमध्ये सर्व संकुलांची क्षमता वाढवण्यात येत आहे. आज तीनशे कोटी रुपयांहून जास्त गुंतवणुकीने उभारल्या जाणाऱ्या ‘नॅशनल सेंटर फॉर एजिंगचे’ देखील भूमीपूजन झाले आहे. हे केंद्र 200 खाटांचे असेल. येणाऱ्या दीड वर्षात या केंद्राची उभारणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा असतील. त्यात वृद्धावस्था, विज्ञान संशोधन केंद्र देखील असेल. ज्या ठिकाणी वृद्धावस्थेशी संबधित समस्यांच्या विषयी संशोधन करण्यात येईल. त्याशिवाय सफदरजंग रुग्णालयात देखील तेराशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाने रुग्णालयातील सुविधांना आणखी अत्याधुनिक बनवण्याचे काम करण्यात आले आहे. याच अंतर्गत, या ठिकाणी एका आकस्मिक कक्षातील सुपर स्पेशालिटी कक्षातील सेवांचे लोकार्पण करण्यात आले. केवळ वैद्यकीय आकस्मिक स्थितीसाठी 500 खाटांच्या क्षमतेच्या साहाय्याने सफदरजंग रुग्णालय देशातील सर्वात मोठे आकस्मिक निगा रुग्णालय बनणार आहे.

मित्रांनो, आज ज्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येत आहे, त्यामध्ये एक पॉवर ग्रिड विश्रांती गृह देखील आहे. सार्वजनिक उपक्रम आणि समाजाच्या विषयी त्यांच्या जबाबदारीचे एक उत्तम उदाहरण आहे. यामुळे केवळ रुग्णांनाच नव्हे तर त्यांची देखभाल करणाऱ्यांनाही खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे.

मित्रांनो, वेळेवर योग्य उपचार जीव वाचविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पण दिल्लीची वाहतूककोंडी यामध्ये अनेकदा अडथळे बनत असते. विशेषतः एम्सची वेगवेगळी केंद्रे आणि संकुलांच्या दरम्यान रुग्ण आणि डॉक्टरांच्या ये- जा करण्याबाबत अडचणी येत असतात. एम्सची मुख्य इमारत आणि जयप्रकाश नारायण ट्रॉमा सेंटरच्या दरम्यान देखील असलेली ही समस्या आता सोडवण्यात आली आहे. जवळपास एक किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे देखील काही वेळापूर्वीच लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या भुयाराद्वारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर आणि आवश्यक औषधे, उपकरणे यांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना शक्य झाली आहे.

मित्रांनो, भारतासारख्या आपल्या या विकसनशील देशासाठी स्वस्त, सोप्या, सुरक्षित आणि आधुनिक आरोग्य सुविधा एकत्र आणणे किती मोठी जबाबदारी आहे याची तुम्हाला चांगल्या प्रकारे कल्पना आहे. गेल्या चार वर्षात सार्वजनिक आरोग्य सुविधांबाबत देशाला एक नवी दिशा देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या एका पाठोपाठ एक धोरणांच्या अंमलबजावणीमुळे आपण त्या स्थितीच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहोत.  देशातील गरीब आणि मध्यमवर्गातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवांसाठी भटकत राहावं लागू नये, अनावश्यक खर्च करावा लागू नये. राज्य सरकारांच्या सहकार्याने केंद्र सरकार देशभर आरोग्य सुविधांशी संबंधित आधुनिक पायाभूत सुविधा उभारत आहे. हा सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे ज्यामुळे आज देशातील रुग्णालयांमध्ये बालकांना जन्म देण्याचा प्रसार, संस्थात्मक प्रसूती, त्याचा प्रसार मोठा आहे. गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या आरोग्याची सातत्यपूर्ण तपासणी, लसीकरणात पाच नव्या लसींच्या समावेशामुळे माता आणि बालकांच्या मृत्यूदरात अभूतपूर्व घट झाली आहे. या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय संस्थांनी देखील प्रशंसा केली आहे.

मित्रांनो, सरकारचा हा प्रयत्न आहे की मोठ्या शहरांच्या आजूबाजूला ज्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत, त्यांना बळकट करण्याबरोबरच अशाच सुविधा टायर २ आणि टायर ३ शहरांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. यासाठी सरकार दोन व्‍यापक स्‍तरांवर काम करण्यातयेतआहे. एक तर सध्या जी रुग्णालये देशात उपलब्ध आहेत त्यांना आणखी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात येत आहे. दुसरी बाब म्हणजे दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवल्या जात आहेत. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जितक्या एम्सना मंजुरी मिळाली किंवा उभारण्यात आली त्यापेक्षा जास्त गेल्या चार वर्षात मंजूर करण्यात आली आहेत. देशात 13 नव्या एम्सची घोषणा करण्यात आली ज्यातील आठ एम्सचे काम सुरू झाले आहे. त्याशिवाय देशभरात 15 वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालयांच्या निर्मितीचे प्रगती पथावर आहे.

मित्रांनो, न्यू इंडियासाठी अशा आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत आहेत ज्या ठिकाणी उत्तम आणि पुरेशी रुग्णालये आहेत, जास्त खाटा आहेत, चांगल्या सुविधा आहेत आणि उत्तम डॉक्टर आणि त्यांची टीम आहे. हेच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून वैद्यकीय शिक्षणात देखील नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत. आमचे सरकार 58 जिल्ह्यांमधील रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालये म्हणून सुधारित करण्यासाठी काम करत आहे. या अर्थसंकल्पात सरकारने 24 नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा केली आहे. सरकारचा हा प्रयत्न आहे की तीन लोकसभा मतदारसंघात कमीत कमी एक वैद्यकीय महाविद्यालय नक्कीच असले पाहिजे. या चार वर्षात देशभरातील वैद्यकीय शिक्षणाच्या सुमारे 25 हजार  पदवीधर किंवा पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या अधिक नव्या जागांची भर घालण्यात आली आहे.

मित्रांनो, या सरकारचा दृष्टिकोन केवळ रुग्णालये, आजार आणि औषधे आणि आधुनिक सुविधां पुरताच मर्यादित नाही. कमी खर्चात देशातील प्रत्येक व्यक्तीला उपचारांची हमी मिळाली पाहिजे, लोकांमध्ये आजारपण निर्माण करणाऱ्या समस्या संपुष्टात आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, हाच विचार करून राष्ट्रीय आरोग्य धोरणाची निर्मिती केली गेली आहे. आमच्या सरकारने आरोग्य सेवांना, आरोग्य मंत्रालयाच्या कक्षेतून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला आहे. आमचा आरोग्याविषयीचा दृष्टिकोन ग्रामीण विकास मंत्रालयाशी देखील जोडलेला आहे. स्वच्छता आणि पेयजल मंत्रालय देखील यात जोडलेले आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाला देखील त्यात समाविष्ट केलेले आहे आणि या सर्वांना आपल्या पारंपरिक आरोग्य सेवांना सशक्त करून आणि आयुष मंत्रालयाकडून देखील सहकार्य मिळत आहे.

आजारपण आणि गरिबी यांच्यात जो संबंध आहे त्यांना विचारात घेऊन सरकारने योजना तयार केल्या आहेत. त्यांना लागू करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. गरिबीचे सर्वात मोठे कारण आजारपण आहे आणि म्हणूनच आजारपणाला आळा घालणे म्हणजेच गरिबीला आळा घालण्यासारखे असते. याच दिशेने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालयांची निर्मिती, मिशन इंद्रधनुष अंतर्गत, दुर्गम भागात लसीकरण, राष्ट्रीय पोषण अभियान आणि आयुष्मान भारतासारख्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना गरिबांचा आजारपणावर होणारा खर्च कमी करत आहेत. प्रतिबंधात्मक किंवा परवडण्याजोग्या आरोग्य सुविधांबाबत जितक्या गांभीर्याने देशात सध्या काम होत आहे, तितक्या गांभीर्याने यापूर्वी देशात कधीही काम झाले नाही.

नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन  स्कीम  अर्थात राष्ट्रीय आरोग्य रक्षण योजना किंवा आयुष्मान भारत देखील या दिशेने एक महत्त्वाची साखळी आहे. या योजनेअंतर्गत देशभरात सुमारे दीड लाख म्हणजेच देशातील प्रत्येक पंचायतीं दरम्यान एक हेल्थ आणि वेलनेस सेंटर स्थापन करण्याचे काम सुरू आहे. भविष्यात या सेंटरमध्येच आजाराचे निदान करण्याच्या चाचण्या आणि उपचारांच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. याचा खूप मोठा फायदा गाव आणि आजूबाजूच्या परिसरात राहणा-या लोकांना मिळणार आहे. म्हणूच गंभीर आजाराच्या स्थितीत देशातील गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्गातील लोकांना उत्तम आणि पाच लाख रुपयां पर्यतचे मोफत उपचार उपलब्ध करून देण्यावर काम सुरू आहे.  या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त राज्यांना जोडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. खाजगी रुग्णालयांशी संबंधित लोकांशी देखील चर्चा सुरू आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनेक विषयांवर सर्व संबंधितांशी देखील सहमती निर्माण झाली आहे आणि लवकरच ही जगातील सर्वात मोठी, जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना बनून जमिनीवर उतरणार आहे.

मित्रांनो, ही योजना केवळ गरिबांनाच जीवनदान देणारी आहे असे नसून प्रत्यक्षात वैदयकीय क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी निर्माण करणा-या एका क्रांतीचे उदाहरण आहे. या योजनेमुळे आगामी काळात गावात आणि लहान लहान पाड्यांमध्ये आजूबाजूला रुग्णालयांचे जाळे निर्माण होणार हे निश्चित आहे. खूप मोठ्या प्रमाणात रुग्णालये बनणे स्वाभाविक आहे. कारण जेव्हा आजारपणाच्या खर्चाचा भार कोणीतरी उचलणार असेल तर आजारी व्यक्ती जी आज रुग्णालयात जाण्याची टाळाटाळ करत आहे ती  रुग्णालयात जाण्यासाठी स्वतःहून तयार होईल आणि रुग्णाला रुग्णालयात आल्यावर जर कोठून तरी पैसे मिळणे नक्की असेल तर रुग्णालय आणि डॉक्टर देखील स्वतःहून काम करायला तयार आहेत. आणि एका प्रकारे अशी एक व्यवस्था विकसित होत आहे जी देशात मनुष्यबळ विकास, वैद्यकीय क्षेत्रात, देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास किंवा आरोग्याविषयी जागरुक समाजाच्या रुपाने आपण एका नव्या युगात प्रवेश करणार आहोत. आणि याच क्षेत्रात रोजगाराच्या संधी तर वाढणार आहेतच.

आपल्याला माहीत आहेच की एका डॉक्टर सोबत किती रुग्णांना काम करावे लागते आणि तेव्हा कुठे एका डॉक्टरला काही तरी करून दाखवता येते. किती लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. हो, आधुनिक निदान सेवांसाठी मोठ्या शहरांच्या दिशेने येण्याचा नाईलाज मी समजू शकतो. पण ती देखील समस्या खूपच कमी होणार आहे. लोकांना आपल्या घरांच्या जवळपासच सर्व सुविधा मिळतील.

मित्रांनो, गेल्या चार वर्षात परवडणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत ज्या काही योजना सरकारने सुरू केल्या त्यांचा किती प्रमाणात फायदा सर्वसामान्य लोकांना होत आहे, याची माहिती घेण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला मी देशभरातील योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. सुमारे तीन लाख केंद्रे, आणि माझा अंदाज आहे की तीस चाळीस लाख  लोक माझ्या समोर होते. त्या वेळी आणि त्या संपूर्ण चर्चेमधून एक गोष्ट निष्पन्न झाली  ती म्हणजे कनिष्ठ मध्यम वर्गापासून गरीब व्यक्तीपर्यंतच्या आरोग्याच्या खर्चात आज खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मित्रांनो याचे कारण तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. सरकारकडून जवळ जवळ 1100 आवश्यक औषंधांच्या किमती नियंत्रक व्यवस्थेच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांना औषधांवर जो काही खर्च करावा लागत होता त्या कुटुंबांची सुमारे 10 हजार कोटी रुपयांहून जास्त बचत झाली आहे. एका वर्षात 10 हजार कोटी रुपयांची बचत आणि तो देखील एका योजनेचा परिणाम.

देशभरात 3,600 हून अधिक जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रात 700 हून जास्त औषधे आणि दीडशेहून जास्त शस्त्रक्रियेचे साहित्य स्वस्त दरात उपलब्ध आहे. अमृत स्टोअर्समध्येही मिळणारी 50 टक्के कमी दरांच्या औषधांचा फायदा सुमारे 75-80 लाख रुग्णांनी घेतला आहे. त्याशिवाय आज स्टेन्ट्स आणि गुडघा प्रत्यारोपणाच्या किमतींमध्ये कपात झाल्यामुळे देशातील गरीब आणि मध्यम वर्गाची साडेपाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. त्यांच्या किमती पूर्वीच्या तुलनेत एक तृतीयांश झाल्या आहेत, तीन पटीने कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर जीएसटी नंतरही अनेक औषधांच्या किमती कमी झाल्याने देखील लोकांना फायदा मिळाला आहे. देशातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात डायालिसिस केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या ठिकाणी गरिबांना मोफत डायालिसिस ची सोय करून देण्यात येत आहे.

आतापर्यंत अडीच लाख रुग्णांना याचा लाभ झाला आहे. तुम्ही याची कल्पना करू शकता की पूर्वी गरिबांना मोफत डायालिसिस साठी शंभर शंभर, दोन दोनशे किलोमीटर लांब जावे लागत होते. आता त्याला आपल्याच जिल्ह्यात ही सुविधा मिळू लागली आहे. ज्या वेळी त्याला इतक्या लांब जाणे शक्य होत नसायचे, त्यावेळी तो दुसऱ्या रुग्णालयात पैसे खर्च करून डायालिसिस करून घ्यायचा. आता गरिबांना मिळणाऱ्या मोफत डायालिसिस सुविधेमुळे, डायालिसिसच्या प्रत्येक खेपेसाठी त्याची सुमारे 1500 ते 2000 रुपयांची बचत होत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत जवळ जवळ 25 लाख डायालिसिस सेशन मोफत करण्यात आले आहेत. याशिवाय प्रतिबंधात्मक आरोग्य निगा म्हणून योगसाधनेने नव्याने आपली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत योगींची चेष्टा केली जात होती मात्र आता संपूर्ण जगात योगसाधनेने आपले स्थान निर्माण केले आहे, तिचा डंका सर्वत्र वाजत आहे. मी हे तर कधीही म्हणणार नाही की एखाद्या भोगी व्यक्तीला योगसाधना योगी बनवू शकेल. पण मी हे नक्कीच सांगेन की योग भोगी व्यक्तीला रोगी होण्यापासून नक्कीच वाचवू शकेल. आज योगसाधना जगभरात लोकचळवळ बनू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच आपण पाहिले की जगात 21 जून रोजी कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला आणि मला सांगण्यात आले आहे की सध्याच्या काळात एम्समध्ये देखील योगसाधनेबाबत खूपच जागरुकता निर्माण झाली आहे. सर्व डॉक्टर मित्र देखील योगसाधना करत आहेत हे ऐकून मला खूप बरे वाटले.

मित्रांनो, देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे या सरकारचे लक्ष्य आहे. मात्र, तुमच्या सक्रिय सहकार्याविना, तुमच्या सोबती विना, म्हणजेच संपूर्ण वैद्यकीय विश्वाच्या सहकार्याविना हे शक्य होणार नाही. आज जेव्हा देश न्यू इंडियाचा संकल्प करून पुढे वाटचाल करू लागला आहे तेव्हा आरोग्य क्षेत्राशी संबंधित लोकांनी देखील आपल्यासाठी नवे संकल्प निश्चित केले पाहिजेत. 2022 मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील, मी जर वैद्यकीय व्यवसायात असेन, मी जर डॉक्टर असेन, मी सहाय्यक असेन तर 2022 पर्यंत माझा हा संकल्प असेल की, जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा मी देखील हे करेन, या देशात हे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. सरकार 2025 या वर्षापर्यंत देशाला क्षयरोगापासून मुक्त करण्यासाठी काम करत आहे. क्षय रोग्यांच्या पोषणाची गरज लक्षात घेऊन महिन्याला त्यांना 500 रुपयांची आर्थिक मदत देखील दिली जात आहे.

मित्रांनो, जगातील इतर देशांनी स्वतःला क्षयरोग मुक्त करण्यासाठी 2030 या वर्षापर्यंतची कालमर्यादा निर्धारित केली आहे. आपल्याला देशाला लवकरात लवकर क्षयरोग मुक्त करण्याच्या संकल्पासहित काम केले पाहिजे. संपूर्ण जगाची नजर भारतावर आहे की तो हे करू शकेल का? माझा  देशाच्या वैद्यकीय क्षेत्रावर विश्वास आहे, की ते हे आव्हान पेलण्यासाठी पूर्णपणे वचनबद्धतेने काम करतील आणि देशाला यश मिळवून देतील हा माझा विश्वास आहे. असाच एक महत्त्वाचा विषय आहे माता आणि अर्भक मृत्यू दर. यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे गेल्या चार वर्षात भारताने या विषयासंदर्भात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र, माता आणि अर्भक मृत्यूदर कमीत कमी करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र होऊन आणखी जास्त प्रमाणात प्रयत्न करावे लागतील. यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आणि राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत एक मोहिमेच्या स्वरुपात काम करण्यात येत आहे. लोक चळवळीप्रमाणे यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करण्यात आले तर निश्चितच लवकरच आपल्याला अपेक्षित परिणाम दिसून येतील. हाच विश्वास मनाशी बाळगून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे.

मित्रांनो, आज देशात प्रामाणिकपणाचे असे वातावरण तयार झाले आहे की ज्यामुळे जास्तीत जास्त लोक आपली जबाबदारी जास्तीत जास्त प्रमाणात उचलण्यासाठी पुढे येत आहेत. लोकांमध्ये ही भावना निर्माण झाली आहे, हा विश्वास निर्माण झाला आहे की आपण जो कर भरतो त्याची पै न पै देशाच्या कल्याणासाठी खर्च होत आहे आणि या विश्वासाचा परिणाम आपल्याला समाजाच्या प्रत्येक स्तरात पाहायला मिळत आहे. तुमच्या लक्षात असेलच की मी जेव्हा लाल किल्यावरून देशातील लोकांना आवाहन केले होते की जे सक्षम आहे, जे खर्च करू शकतात अशा लोकांनी गॅस सबसिडी का घेतली पाहिजे, त्यांनी ती सोडून द्यावी. मी केवळ एक लहानशी गोष्ट सांगितली होती आणि माझ्या त्या लहानशा गोष्टीवर देशातली सव्वा कोटी कुटुंबांनी गॅस सबसिडीचा त्याग केला. नाहीतर आपल्या देशात हेच धरून चालायचे की एखादी गोष्ट मिळाली की तिचा कोणी त्याग करत नाही, एकदा मिळाले की मिळाले आणि आपला हा स्वभावच आहे विमानात तुम्ही जात असाल, शेजारची जागा रिकामी असेल, तुमची ती जागा नसेल, विमान सुटायच्या तयारीत असेल तर त्या जागेवर मोबाईल फोन ठेवला, पुस्तक ठेवले आणि तितक्यात त्या जागेवर बसणारे कोणी आले तर काय होते? जागा तुमची नसली तरी देखील ती सोडून देण्याची तुमची तयारी होत नाही, हा कोण आता आला या जागेवर, अशी तुमची मानसिकता असते.

ही मानसिकता असताना या देशात 25 कोटी कुटुंबे आहेत. 25 कोटी कुटुंबामध्ये सव्वा कोटी कुटुंबांनी केवळ गॅस सबसिडी सोडून द्या इतक्या सांगण्यावर तिचा त्याग केला. म्हणजेच या देशाचे सामर्थ्य, त्याचे स्वरुप कसे होत आहे याचा अनुभव आपल्याला येऊ लागला आहे. आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे अशाच प्रकारे गेल्या काही दिवसात रेल्वेकडून तुम्हाला माहिती आहे की रेल्वेमध्ये जे ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात त्यांना सबसिडी मिळते, सवलत मिळते आणि मी कधीही याची घोषणा केली नव्हती. विचार करत होतो की करू की नको करू पण रेल्वेने आपल्या अर्जात लिहिले की तुम्ही तुमची सबसिडी सोडून देण्याबाबत सहमत आहात का? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल आणि आपल्या या देशाचे सामर्थ्य आपण ओळखले पाहिजे. रेल्वेने केवळ आरक्षणाच्या अर्जात इतके लिहिले की तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांच्या लाभांचा त्याग करण्याची इच्छा आहे का आणि मी अतिशय अभिमानाने सांगतो आहे की गेल्या आठ नऊ महिन्यात 42 लाख ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी त्यांच्या सबसिडीचा फायदा घेतला नाही, तिचा त्याग केला. म्हणजेच देशात असे एक वातावरण तयार होऊ लागले आहे. अशाच प्रकारे मी एकदा देशातील डॉक्टरांना आवाहन केले होते की महिन्यातून एकदा 9 तारखेला कोणी गर्भवती महिला तुमच्या दारावर आली तर तुम्ही सेवाभावाने महिन्यातील एक दिवस 9 तारीख त्या गरीब मातेसाठी समर्पित करा. त्या गरीबाला तपासा, तिला मार्गदर्शन करा की तिला काय केले पाहिजे आणि मला अतिशय आनंद होत आहे की हजारो डॉक्टर सेवाभावनेने पुढे आले आणि त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर फलक लावले आहेत आणि 9 तारखेला मोफत सेवा मिळत असल्याचे त्यावरून कळल्यावर गर्भवती माता त्या डॉक्टरांकडे जाऊ लागल्या आहेत.

कोट्यवधी भगिनींना याचा लाभ मिळू लागला आहे. मला असे वाटते की आणखी डॉक्टर मित्र पुढे आले पाहिजेत. हे एक सेवेचे काम आहे कारण आपण सर्वांनी एकत्र येऊन या समस्यांच्या निराकरणासाठी देशात दोन पावले पुढे चालले पाहिजे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्‍व अभियानांतर्गत सव्वा कोटी गर्भवती महिलांची तपासणी या डॉक्टरांद्वारे झाली आहे. सव्वा कोटी. या अभियानामध्ये काम करणा-या माझ्या डॉक्टर मित्रांनी दिलेल्या सहकार्याबद्दल, प्रत्येक वैद्यकीय व्यावसायासाठी काम करणा-यांची मी प्रशंसा करत आहे आणि मला असे वाटते की ही प्रक्रिया पुढे सुरू राहिली पाहिजे. हाच सेवाभाव या वेळी राष्ट्रीय स्वराज अभियानाच्या काळात चालवला जात आहे. आम्ही एक कार्यक्रम केला. तुम्हाला काही गोष्टी चोवीस तास चालणा-या वाहिन्यांवर दिसणार नाही किंवा वर्तमानपत्रांच्या ठळक बातम्यांमध्ये दिसणार नाही. आम्ही एक ग्राम स्वराज अभियान राबवले. 17 हजारांची निवड केली, काही निकष ठेवले होते आणि सात कामे निर्धारित केली, त्या सात कामांना 100 टक्के पूर्ण करायचे होते. त्यामध्ये एक लसीकरण होते. या लसीकरणाला आम्ही यशस्वीरित्या 17 हजार गावांमध्ये पूर्ण केले. आता आम्ही असे निर्धारित केले आहे की 15 ऑगस्टपर्यंत जे महत्त्वाकांक्षी 115 जिल्हे आम्ही तयार केले आहेत. जे राज्याची जी सरासरी आहे त्या तुलनेत खूप मागे आहेत पण सामर्थ्यशाली आहेत. त्या 115 जिल्ह्यांमध्ये सुमारे 45 हजार गावे जिथे देशातील ग्रामीण जीवनाच्या 40 टक्के लोकसंख्या राहते. त्यांच्यासाठी देखील आम्ही सात कामे सांगितली आहेत जी आम्हाला 100 टक्के पूर्ण करायची आहेत. त्यामध्ये एक लसीकरण देखील आहे. म्हणजेच एक प्रकारे आरोग्य क्षेत्रात आणि देशात लसीकरणाच्या व्याप्तीला वाढवण्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या लोकांनी ज्या प्रकारे काम केले आहे ते  देखील प्रशंसनीय आहे असे मला वाटते. हे सर्व तुमच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे की आज देशातील लसीकरणाच्या वाढीचे प्रमाण 6 टक्क्यांवर पोहोचले आहे. सहा टक्के ऐकल्यावर तुम्हाला ते जास्त असल्यासारखे वाटत नाही. पण पूर्वी एक टक्के देखील होत नसायचे. तुमच्या वचनबद्धते मुळेच देश संपूर्ण लसीकरणाच्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. देशातील प्रत्येक गर्भवती महिला आणि बालकाचे लसीकरण करण्याचा संकल्प नव्या भारताच्या निर्मितीमध्ये, निरोगी कुटुंबांच्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावेल.

मित्रांनो, निरोगी कुटुंबामुळेच निरोगी समाज आणि निरोगी समाजामुळेच निरोगी राष्ट्राची निर्मिती होते. आपल्या सर्वांवर आणि विशेष करून आपल्यावर देशाला निरोगी ठेवण्याची जबाबदारी आहे आणि म्हणूनच राष्ट्रपती महोदय देखील तुम्हाला राष्ट्र निर्मितीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणत होते. चला सरकार सोबत मिळूनसर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख माभवेत॥ या निरामय जगासाठी निरामय लोकांसाठी हा संकल्प मनात धरून न्यू इंडियाला प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सर्व पुढे वाटचाल करूया.

आज या आयोजनामुळे ज्या सुविधा दिल्ली आणि देशाला मिळाल्या आहेत त्यासाठी पुन्हा एकदा मी खूप खूप अभिनंदनासह विभागाचेही अभिनंदन करतो. त्यांनी निर्धारित वेळेत ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. माझे असे आवाहन आहे की आपण त्याच कामांना हात घालावा जी कामे आपण पूर्ण करू शकू. नाहीतर आपल्या देशात अशी स्थिती होती की संसदेत रेल्वे अर्थसंकल्पाच्या वेळी संसदेचे पावित्र्य, संसदेची वचनबद्धता असते.

मी काही गोष्टी लक्षात घेतल्या. माझ्या लक्षात आले जवळ जवळ 1500 गोष्टींची घोषणा करण्यात आली होती. एकट्या रेल्वेमध्येच गेली तीस, चाळीस, पन्नास वर्षे आणि मी जेव्हा विचारले तेव्हा त्या कागदावर देखील नव्हत्या, जमिनीवर तर नव्हत्याच. आम्हाला त्या मार्गावर चालायचे नाही. आम्ही दगड बसवायला आलेलो नाही, आम्ही एक परिवर्तनाचा संकल्प घेऊन आलो आहोत आणि तुम्हा सर्वांची सोबत मागण्यासाठी आलो आहोत. तुमची सोबत आणि सहकार्य घेऊन देशाच्या आशा आकांक्षाना पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन वाटचाल करत आहोत. मला विश्वास आहे की माझ्या सहकाऱ्यांनो तुम्ही देखील आम्हाला सहकार्य कराल.

खूप खूप आभार.

 

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar