पीएम्इंडिया
तत्पर प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी यासाठीचा बहुआयामी मंच “प्रगती” ची 27 वी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.
प्रगतीच्या 26 व्या बैठकीत पंतप्रधानांनी 11 लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. विविध क्षेत्रातल्या सार्वजनिक तक्रारींच्या निवारणाचाही त्यांनी आढावा घेतला.
आजच्या सत्ताविसाव्या बैठकीत पंतप्रधानांनी रेल्वे, रस्ते,ऊर्जा क्षेत्रातल्या आठ पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, ओदिशा, चंदीगड, आंध्रप्रदेश, दिल्ली, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात हे प्रकल्प आहेत.
जिल्हा रुग्णालयांशी संलग्न नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याच्या योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. आरोग्य क्षेत्रासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना करत आहे असे सांगतानाच आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा जलदगतीने विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले.
14 एप्रिल ते 5 मे 2018 दरम्यान राबवण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य अभियानाच्या पहिल्या टप्प्याने 16000 खेड्यात केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यश आल्याचे पंतप्रधान म्हणाले. महत्वाकांक्षी जिल्ह्यातल्या 40,000 गावात ग्राम स्वराज अभियानाचा दुसरा टप्पा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
15 ऑगस्टपर्यंत या संदर्भात उत्तम परिणाम हाती यावेत यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांनी झटून काम करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
सौभाग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत झालेल्या प्रगतीची त्यांनी प्रशंसा केली. नियोजित वेळेत 4 कोटी कुटुंबियांना वीज जोडण्या देण्याचे महत्वाकांक्षी उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत असे पंतप्रधान म्हणाले.
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar