Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आय आय आय टी गुवाहाटीच्या कोनशिला समारंभाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

आय आय आय टी गुवाहाटीच्या कोनशिला समारंभाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

आय आय आय टी गुवाहाटीच्या कोनशिला समारंभाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ मान्यवर, युवा सहकारी आणि ईशान्य भारताच्या अनेक भागातून या कार्यक्रमात online सहभागी झालेले विद्यार्थी ,या सर्वांचे मी स्वागत करतो.
मला इथे येण्यास खूप उशीर झाला, त्याबद्दल मी सर्वात आधी तुम्हा सर्वांची माफी मागतो . आज सकाळी मला सिक्कीमहून इथे यायचे होते. मात्र खराब हवामानामुळे येण्याची वेळ वारंवार बदलावी लागली, मी मात्र शेवटी पोहचलो. कधी कधी उशीर होतो , मात्र मी पोहचतो नक्की. आज इथे दोन महत्वाचे कार्यक्रम आहेत. एक तर आयसीटी च्या नव्या इमारतीचा कोनशिला समारंभ आणि आय सी ती अकादमीचा उद्घाटन समारंभ ! आपण आजकाल ऐकतोच की एकविसावे शतक हे हिंदुस्थानचे शतक आहे. मात्र त्यामागचे कारण काय आहे? एकविसावे शतक हे ज्ञानाचे शतक आहे, माहितीचे शतक आहे आणि या दोन क्षेत्रात जे अव्वल ठरतील ,तेच या शतकात जगाचे नेत्तृत्व करतील, हे एक कारण आणि दुसरे कारण म्हणजे भारत हा आज जगातील सर्वात तरुण देश आहे. या देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षाही कमी आहे. या देशाची एक महत्वपूर्ण आणि अभिमानास्पद परंपरा आहे, ती म्हणजे, जेव्हा जेव्हा मानवजात कुठल्या संकटाला सामोरी गेली आहे, तेव्हा तेव्हा प्रत्येकवेळी तिचे नेतृत्त्व भारताने केले आहे. एकविसाव्या शतकात भौगोलिक विविधता ही आपली शक्ती बनली आहे. ज्या देशात इतक्या मोठ्या संख्येने तरुण असतील , त्या देशाची स्वप्नेही तरुणच असतात. या तरुण स्वप्नांमध्ये एक समर्पण भाव असतो , उर्जा असते, चेतना असते. या परिस्थितीचा लाभ आपण कसा घेऊ शकतो ? जगाच्या पटलावर एक मोठी शक्ती या स्वरुपात भारत उभा राहू शकेल का? ही आपल्यासाठी संधीही आहे, आणि आव्हानही !! आणि आव्हाने पेलल्याशिवाय कोणीच आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. जो आव्हाने पार पाडतो, संधी त्यालाच मिळते आणि तोच संधीला सिद्धी बनवू शकतो. आज संपूर्ण जगात ज्या ज्या मानकांवर चर्चा होते, मग तो जागतिक बँकेचा अहवाल असो, किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल, पतमानांकन संस्था इतर वैश्विक वित्तीय संस्था ,या सर्वांचे अहवाल पाहिले तर एका गोष्ट जाणवते आणि ती अशी की आज मोठ्या देशांमध्ये सर्वाधिक वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था असेल, तर ती भारतीय अर्थव्यवस्था आहे.

आजकाल सतत बातम्या येत असतात ,जगात अमुक सुरु आहे, तमुक सुरु आहे… सगळ्या जगात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. जग आर्थिक संकटात सापडले आहे. अशा संकटकाळात एक भारतच असा देश आहे, जो स्वतःच्या पायावर उभा आहे, आणि अतिशय वेगाने पुढे जातो आहे. येत्या काळात भारत यापेक्षाही अधिक गतीने पुढे जाईल हे सगळ्या जगाने मान्य केले आहे. ही जी संधी आपल्याला मिळाली आहे, तिचा लाभ घेतला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला देशाच्या युवाशक्तीवर लक्ष केंद्रित करायला हवे. सरकारने ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे, त्या अशा विखुरलेल्या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. सरकारमध्ये आहोत , तर काहीतरी करायला हवे अशा वरवरच्या भावनेतून केलेल्या गोष्टी नाहीत. आमचे प्रत्येक पाऊल एकमेकांना जोडलेले आहे. एकापाठोपाठ एक अशा सुरु केलेल्या योजना, कार्यक्रम अंतिम ध्येय गाठण्याचाच प्रवास आहे. पहिल्यांदाच देशात कौशल्य विकासासाठी एक वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे. याआधी प्रत्येक विभाग आपापल्या परीने, आपल्या पद्धतीने कौशल्य विकासाचे काम करत असत, मात्र मोठ्या विभागात एका कोपऱ्यात जर कौशल्य विकासाचे टेबल असेल, तर त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. गोष्टी असतात, त्या फक्त कागदावर दिसतात. मात्र प्रत्यक्षात कुठलीही कृती होताना दिसत नाही. म्हणूनच आम्ही कौशल्य विकासासाठी वेगळा विभाग बनवला आणि एकविसाव्या शतकाला अनुकूल असे मनुष्यबळ तयार करण्यावर भर देत आहोत.

आवश्यक ते मनुष्यबळ तयार करण्यासाठीच्या योजना आखतो आहोत. केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या संदर्भात आपण पाहिले तरी आपण कल्पना करू शकाल ,की जेव्हा सगळे जग वयस्कर झाले असेल तेव्हा जगापाशी पैसे असतील ,उद्योगांसाठी कारखाने उभारलेले असतील ,मात्र ते चालवण्यासाठी युवाशक्तीच नसेल तर काय होईल ? सगळ्या जगाला २०३० नंतर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागणार आहे. आणि जागतिक स्तरावर मनुष्यबळ पुरवण्याची गरज केवळ भारतच पूर्ण करू शकेल. जगातील प्रत्येक कोपऱ्यात जाऊन तिथे नोकरी करण्याची क्षमता असलेला आपला तरुण त्या त्या देशाच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतो. आणि ते दिवस आता दूर नाहीत. म्हणूनच आपण मनुष्यबळ तयार करताना जागतिक स्तरावरील मागणी आणि गरजांची पूर्तता करणारे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. तरच येत्या काळात आपण जगाची गरज भागवू शकू.

मात्र दुसरीकडे भारत फक्त सेवा पुरवठादार देश असावा का? तर हे आम्हाला मान्य नाही. आणि म्हणूनच आम्ही ‘मेक इन इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. आज पेट्रोलियम उत्पादनांच्या नंतर भारत चार पाच गोष्टींची सर्वाधिक आयात करतो आणि या आयातीतून आपला खूप पैसा परदेशात जातो. ज्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे , इलेक्ट्रोनिक वस्तू आणि उपकरणे. मग ते Laptop असो किंवा मोबाईल फोन ,वैद्यकीय उपकरणे, त्यांची आपण आयात करतो. आज आपल्याकडे इतक्या उत्तम दर्जाच्या माहिती-तंत्रज्ञान संस्था आहेत. गुवाहाटी आय आय टी ने तर या शहराला नवी ओळख दिली आहे. मात्र अशा संस्था असतांनाही आपल्याला इलेक्ट्रोनिक वस्तूंची आयात करावी लागते , ही काय चांगली गोष्ट आहे का? थर्मामीटर असेल , रक्तदाब मोजण्याचे यंत्र असेल हे सुद्धा आपल्याला परदेशातून आयात करावे लागते.

मित्रांनो ,आपल्याला या गोष्टी बदलायच्या आहेत. मी आज तुमच्यासमोर हे आव्हान घेऊन आलो आहे ,की तुम्ही या इलेक्ट्रोनिक वस्तू देशात बनवू शकता का? इतकेच नाही, तर त्यांची निर्यात करू शकतो का ? आपल्या देशात गुणवत्तेची वानवा नाही, आपली स्वप्न , महत्वाकांक्षा आणि इरादेही मजबूत आहेत. देशातल्या प्रत्येक युवकाकडे जर काही करण्याची इच्छा असेल, तर आपला देश “मेक इन इंडिया” मोहीम नक्कीच पुढे नेऊ शकेल. आज जगाने भारताची ही ताकद मान्य केली आहे. तुम्ही सिलिकॉन व्हेली मध्ये जाऊन बघा. त्याचा पत्ता अमेरिकेचा असला तरी चेहरा पूर्ण भारतीय आहे. कारण तिथे ५० ते ६० टक्के भारतीय युवक काम करतात. आपल्या देशात अचाट गुणवत्ता आहे.

भारताने मंगळ मोहीम यशस्वी केली. मंगळ मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करणारा भारत हा जगातला पहिलाच देश आहे. इतर देशाना यासाठी २०-२५ वेळा प्रयत्न करावे लागले. भारताला त्याचा खर्चही अतिशय कमी लागला. तुम्ही गुवाहाटीत रिक्षाने एक किलोमीटर अंतर जात असाल तर तुम्हाला दहा रुपये सहज लागतील. मात्र मंगळयानाचे एक किलोमीटर अंतर गाठायला फक्त सात रुपये खर्च आला. हॉलीवूडच्या एका चित्रपटाला जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा कमी पैशात आपण मंगळावर पोचलो. हे कसे शक्य झाले ? तर आपल्या देशातील युवकांच्या बुद्धिमत्तेमुळे, काही करून दाखवण्याच्या जिद्दीमुळे आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या समृद्ध अनुभवामुळे .ज्या देशात इतकी गुणवत्ता आणि बुद्धीमत्ता असेल, त्या देशाच्या पंतप्रधानाने मेक इन इंडियाचे स्वप्न का बघू नये?

आपले दुसरे क्षेत्र आहे, संरक्षण ! भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी आपण आपल्या संरक्षणासाठी ,शस्त्रसज्जतेसाठी इतरांवर अवलंबून राहणार का? आपल्याला तर साधा अश्रू गैस पण बाहेरून आयात करावा लागतो. ही स्थिती आता बदलायला हवी. आपल्या संरक्षणासाठी आवश्यक वस्तू आपणच बनवायला हव्यात. इतकेच नाही, तर आपण जगाला त्यांचा पुरवठा करू शकू एवढी आपली ताकद हवी.

आज आपण मोबाईलशिवाय जगू शकत नाही. आणि आपल्यापैकी कितीतरी जण वेगवेगळ्या माध्यमांनी माझ्याशी जोडलेले आहात, माझ्या नरेंद्र मोदी app वर अनेक जण काही ना काही लिहित असतात . मात्र हा मोबाईल फोन आपल्याला बाहेरून आयात करावा लागतो . आपल्या देशात इतक्या आय आय टी आहेत, तांत्रिक संस्था आहेत, त्या संस्थामध्ये “मेक इन इंडिया” चे वातावरण मला तयार करायचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मला अशी भावना तयार करायची आहे की, मी शस्त्रास्त्रांच्या जगात भारताला असे योगदान देईन की कुठलाही शत्रू माझ्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही.

आपण आयसीटी च्या क्षेत्रात प्रवेश करतो आहोत . या माध्यमातून आपण व्यापार उद्योगांसाठी नवनवे सॉफ्टवेयर बनवण्याची ताकद तयार करतो आहोत. मात्र जगासमोर आज आणखी एक मोठे आव्हान आहे, ते म्हणजे सायबर सुरक्षेचे ! प्रत्येक देश आज या समस्येने ग्रासला आहे. आपले तंत्रज्ञान कोणी हायजैक तर करणार नाही ना ? अशी भीती प्रत्येक देशाला वाटते. आपण कुठलेही काम करत असू, त्या कामात सायबर हल्ला तर होणार नाही न? अशी भीती सर्वांच्या मनात असते. आज आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इतकी प्रगती केली आहे, तर आपण सायबर सुरक्षेमध्ये संशोधन करू शकत नाही का? जगात आज कुणालाही सायबर सुरक्षेची गरज असेल ,तर ते भारतीय संशोधकांवर भरवसा ठेऊ शकतील का? आपण ह्या क्षेत्रात असे काम करायला हवे.

आणि म्हणूनच मित्रानो, कौशल्य विकासापासून ते “मेक इन इंडिया” असा प्रवास आपल्याला करायचा आहे. येत्या दोन दिवसात आपल्यापैकी अनेक लोक माझ्यासोबत विडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहात. दोन दिवसांपूर्वी मी “स्टार्ट अप” मोहीम सुरु केली. जेव्हा मी स्टार्ट अप ची संकल्पना मांडली तेव्हा अनेक अनेकाना त्याची कल्पना नव्हती. स्टार्ट अप इंडिया- stand अप इंडिया ही घोषणा मी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केली, तेव्हा असे वाटले की हा विषय आला आणि तसाच हवेत विरला… मात्र जेव्हा खरच स्टार्ट अप कार्यक्रम झाला तेव्हा लाखो तरुणांनी त्यासाठी नोंदणी केली. आज देशात एक मूड बनतो आहे, देशातला तरुण विचार करतोय की मी नोकरीसाठी अर्ज करत बसणार नाही, आपला उद्योग सुरु करेन, आणि आपल्या पायावर उभा राहीन. नवे संशोधन करून आपल्या पद्धतीने जगासमोर आणेन.

देशात स्टार्ट अप चे वातावरण बनले आहे. आजची पिढी नोकरी शोधणारी नाही तर नोकरी देणारी पिढी बनू इच्छिते. आणि सरकार स्टार्ट अप इंडिया- stand अप इंडिया च्या भरवशावर या पिढीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहिले असेल की आम्ही अनेक योजना जाहीर केल्या आहे, नवे उपक्रम राबवतो आहोत . भारत ‘स्टार्ट अप’ ची राजधानी बनू शकतो कारण आपल्याकडे ती गुणवत्ता आहे. इंटरनेट सारख्या माध्यमातून आपण पाहिले तर आपल्याला दिसेल की अगदी २२ ते ३० मधल्या वयाचे तरुण अब्जावधी रुपयांचे उद्योग-व्यापार यशस्वीपणे सांभाळीत आहेत. गेल्या दोन तीन वर्षात या सर्वानी आपले व्यापार सुरु केले आहेत, वाढवले आहेत, आणि पाच हजारापासून २५ हजारापर्यंत लोकाना रोजगार दिले आहेत. आणि हे सगळे यश त्यांनी त्यांची बुद्धी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मिळवले आहे.

आजचा काळ app चा काळ आहे. प्रत्येक गोष्टीचे app बनवले जाते आणि जग त्याच्याशी जोडले जाते. मी पण या app च्या माध्यमातून तुमच्याशी जोडला गेलो आहे. मात्र आपल्या युवकांमध्ये जी गुणवत्ता आहे ,ती काहीतरी करून दाखवण्याची गुणवत्ता आहे. आणि त्यांच्यासाठीच कौशल्य विकास पासुन स्टार्ट अप ते मेक इन इंडिया असा प्रवास आम्ही सुरु केला आहे. आधी “मेक इन इंडिया” आणि मग “मेक फॉर ग्लोबल” अशा रीतीने जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला पुढे जायचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानसंपन्न शाकीची खूप गरज आहे. प्रत्येक हातात कौशल्य असायला हवे. कधी कधी आपण तक्रार करत बसतो. आपल्या देशात अशाही काही सवयी आहेत. अडचणी असतातच, प्रत्येकाच्या नशिबात लोण्यावर भाग्यरेखा काढण्याचे सुख नसते. पण आपल्यात पाषाणावरही रेघ काढण्याचे सामर्थ्य असले पाहिजे.जर आपण स्वतःला युवक म्हणवत असू, तर त्याची पहिली अट ही आहे की आपण लोण्यावर रेघ काढण्याचे म्हणजेच सोपे सहज मार्ग न निवडता कठीण मार्गाचा प्रवास निवडायला हवा, तो पार करण्याची ताकद आणि उमेद बाळगायला हवी. जर असे कठीण मार्गाचे आव्हान आपण स्वीकारले ,तर आपण स्वतःसोबतच अनेकांची आयुष्य घडवू शकू.

भारतात आपल्या जितक्या शिक्षणसंस्था आहेत, तंत्रशिक्षण संस्था आहेत, विद्यापीठे आहेत, मग त्या आय आय टी असो , की इतर छोट्या संस्था,या सर्व संस्थांमध्ये एकसूत्रता असली पाहिजे आणि ह्या सगळ्यानी मिळून देशाची मागणी पूर्ण करणारे कुशल मनुष्यबळ तयार केले पाहिजे. तसे सामर्थ्य वाढवले पाहिजे. समस्या येतातच , मात्र प्रत्येक समस्येसोबत त्याचे समाधानही जन्माला येत असते. फक्त ते ओळखण्याची आणि सोडवण्याची ताकद हवी. माझ्या देशातल्या युवकाने एखाद्या समस्येकडे पाहिले तर त्याच्या मनात हे विचार यायला नको, की हे असे का आहे? आता कसे करायचे ? तर आहे हे असे आहे, यातून मार्ग काढायचा आहे, आणि तो बदल आपल्यालाच घडवायचा आहे असा सकारात्मक दृष्टीकोन हवा. आपल्या विचारपद्धतीत आपण बदल घडवायला हवा.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनात काही शालेय विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. आपले राष्ट्रपती समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी असे अनेक उपक्रम राबवत असतात. त्यांनी त्यावेळी मला तिथे बोलावले. आठवी , नववी आणि दहावीचे विद्यार्थी होते. आणि स्वच्छ भारत विषयात तंत्रज्ञान काय भूमिका निभावू शकते, कुठली नवी उपकरणे बनवली जाऊ शकतात, ज्यामुळे स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकेल ,याविषयी या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. तुम्हाला आश्चर्य वाटेल ,पण आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी इतकी छान उपकरणे बनवली होती, की ती बघून मी अक्षरशः थक्क झालो. याचाच अर्थ प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य आपल्याकडे आहे.

जर भारताकडे लक्षावधी समस्या असतील ,तर अब्जावधी बुद्धिमान व्यक्तीही आहेत. मित्रानो, या नव्या भवनात तुमच्यासाठी ज्ञानाची नवी दालने उघडणार आहेत. भारताच्या पूर्वेकडून होणारा हा सूर्योदय असा दैदिप्यमान असू दे की त्याच्या प्रकाशात संपूर्ण देश उजळून जाईल, अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत !! खूप खूप धन्यवाद !!!

S. Thakur/ B. Gokhale/ M. Desai