Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2019 रोजी कोबे, जपान येथे भारतीय समुदायाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केलेले संबोधन


जपानमध्ये राहणाऱ्या भारताच्या मित्रांनो आणि मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिलेल्या भारतीय समुदायातील माझ्या सर्व साथीदारांनो, तुम्हाला सर्वाना नमस्कार.

मी विचार करत होतो की मला कोबेला का नेले जात आहे? यापूर्वीही मी इथे आलो आहे. मी विचारलेही, मला इथे का नेले जात आहे? कोण येणार आहे का, पण इथे आल्यावर बघतो तर पूर्वीपेक्षाही तुमचा उत्साह वाढलेलाच दिसला. तुम्ही दर्शवलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार.

साधारण सात महिन्यानंतर पुन्हा एकदा जपानच्या भूमीवर येण्याचे भाग्य मला लाभत आहे. गेल्या वेळेसही इथे स्थायिक झालेल्या तुम्हा सर्व साथीदारांसह आणि जपानी मित्रांसोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली होती. गेल्या वर्षी जेव्हा मी येथे आलो होतो तेव्हा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते आणि माझे प्रिय मित्र शिंजो अॅबे यांच्यावर तुम्ही सर्वांनी विश्वास दर्शवला होता. आणि आज मी तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने या प्रधान सेवकावर पूर्वीपेक्षाही अधिक विश्वास आणि अधिक प्रेम व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमधल्या कोबे येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना

या जनमतामध्ये तुमच्यापैकीही अनेकांचे योगदान आहे, हे मला माहीत आहे. कोणी भारतात येऊन प्रत्यक्ष काम केले, मेहनत घेतली, 40-45 अंश सेल्सिअस तापमानात काहींनी काम केले. काही जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विटर, फेसबुक, नरेंद्र मोदी अॅप, अशा माध्यमातून तुमचे म्हणणे व्यक्त केलेत. काही जणांनी आपल्या गावांमध्ये आपल्या जुन्या मित्रांना पत्रे लिहिली, ई मेल पाठवले. कुठल्या ना कुठल्या प्रकारे भारताचा हा लोकशाही उत्सव अधिक बलशाली करण्यासाठी तुम्ही योगदान दिले. यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो.

मित्रांनो, 130 कोटी भारतीयांनी पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत सरकार स्थापन केले आहे आणि ही एक मोठी घटना आहे. तीन दशकांनंतर प्रथमच सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळालेलं सरकार स्थापन झाले आहे. भारतासारख्या विशाल देशात ही सामान्य बाब नाही. 1984 मध्येही सलग दुसऱ्यांदा एकाच पक्षाचे सरकार स्थापन झाले होते पण तेव्हाची स्थिती तुम्हाला माहीत आहे. कारण काय होते, हे तुम्हालाही माहीत आहे. लोक मतदान करायला का गेले होते तेही माहीत आहे, त्यामुळे मी त्याचे वर्णन करणार नाही. मात्र 1971 नंतर देशाने सत्तेत असलेल्या सरकारला प्रथमच पुन्हा सत्तेवर आणले.

मित्रांनो हा जो प्रचंड जनादेश भारताने दिला आहे, त्याबद्दल तुम्हाला आनंद वाटत आहे की नाही ? तर मग हा विजय कोणाचा आहे? कोणाचा विजय आहे हा? याचे उत्तर जेव्हा मी तुमच्याकडून ऐकतो, तेव्हा खूप आनंद होतो. हा सत्याचा विजय आहे. हा हिंदुस्थानच्या लोकशाहीचा विजय आहे. जपानमध्ये असूनही भारताचे मन तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता, अनुभवू शकता, त्यांच्या आकांक्षा आणि तुमच्या आकांक्षा यात कुठलाही फरक जाणवत नाही. म्हणूनच तुमच्याकडून हे उत्तर ऐकायला मिळते आणि आपण योग्य दिशेने वाटचाल करत असल्याबद्दल समाधान वाटते.

कधी कधी स्टेडियममध्ये आपण क्रिकेटचा सामना बघतो तेव्हा कळते कि बाद कसे झालो, बॉल कुठून कुठे गेला होता पण घरी जो टीव्हीवर सामना पाहत असतो त्याला दूरचे दिसत असते. त्याला लगेच कळते, ताळमेळ चुकला त्यामुळे खेळाडू बाद झाला. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा इतक्या लांबून हिंदुस्थानातल्या गोष्टींचे अवलोकन करत असता तेव्हा तेव्हा सत्य लक्षात येण्याची तुमची क्षमता अधिक असते आणि म्हणूनच तुमची ही उत्तरे- सत्याचा विजय, लोकशाहीचा विजय, देशवासीयांचा विजय, माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. मला नवीन ताकद, नवीन प्रेरणा देणारी आहेत. आणि त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे.

लोकशाही मूल्यांप्रती समर्पित राहून आशा-आकांक्षाप्रती विश्वास हेदेखील विजयामागचे कारण आहे. तुम्ही कल्पना करा, 61 कोटी मतदारांनी 40-45 अंश सेल्सिअस तापमानात आपल्या घरापासून दूर असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. 61 कोटी ! चीनचा अपवाद वगळता जगातल्या अन्य कुठल्याही देशापेक्षा अधिक मतदार आहेत हे. भारतीय लोकशाहीची भव्यता, व्यापकता पाहा. 10 लाख मतदान केंद्रे, 40 लाखांहून अधिक ईव्हीएम, 600 हुन अधिक राजकीय पक्ष निवडुकीत सक्रिय होते, सहभागी होते. 8 हजारांहून अधिक उमेदवार होते. किती मोठा उत्सव आहे हा लोकशाहीचा. मानवतेच्या इतिहासात यापेक्षा मोठ्या लोकशाही निवडुका झालेल्या नाहीत आणि प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटायला हवा.

भविष्यकाळातही हा विक्रम कोणी तोडणार असेल, कोणाला अधिक उंची गाठायची असेल तर ते हिंदुस्थानच्याच हातातच आहे. एक प्रकारे याचा कॉपीराईट भारताकडेच आहे. आपल्या सर्व भारतीयांना, भारताच्या शुभचिंतकांना याचा अभिमान आहे. पूर्ण जगाला ही बाब प्रेरणादायी आहे. लोकशाहीप्रती भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांची निष्ठा अतूट आहे, हे पुन्हा सिद्ध झालेले आहे. आपल्या लोकशाही संस्था आणि लोकतांत्रिक व्यवस्था जगात अग्रणी आहेत.

मित्रांनो, भारताची ही ताकद 21 व्या शतकातल्या जगाला नवी उमेद देणारी आहे. या निवडणुका, त्याचे परिणाम केवळ भारतापुरताच मर्यादित राहणारे नाहीत. जगभरातल्या लोकशाही मनांना प्रेरणा देणारी ही घटना आहे. नवभारताच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा जनादेश मिळालेला आहे आणि हा आदेश पूर्ण जगासोबतच्या आपल्या संबधांनाही नवी ऊर्जा देईल. जग जेव्हा भारतासोबत चर्चा करेल तेव्हा त्यांना हि खात्री असेल – जनताजनार्दनाने हे सरकार निवडले आहे. पूर्ण बहुमताने निवडले आहे, आणि यांच्यासोबत आपण जे ठरवू ते हे मार्गी लावतील, हा विश्वास आपोआपच निर्माण होतो.

पूर्ण बहुमत असलेले सरकार असणे ही आंतरराष्ट्रीय संबंधातही मोठी बाब असते. त्यातही सरकार जेव्हा आधीपेक्षा जास्त मतांनी निवडून येते तेव्हा त्या सरकारची ताकद अधिक वाढतेच त्यापेक्षाही विश्वास अधिक वृद्धिंगत होतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमधल्या कोबे येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना

सब का साथ सब का विकास यामध्ये लोकांनी ‘सब का विश्वास‘ हे अमृत मिसळले. याच मंत्रावरून आमची वाटचाल सुरू आहे. हा मंत्र जगाचा भारतावरचा विश्वास अधिक दृढ करेल आणि जगाला आश्वस्त करेल. हेच मी अनुभवत आहे.

मित्रांनो, भारताचे जगाबरोबाचे संबंध हा विषय चर्चिला जातो तेव्हा त्यात जपानचे स्थान महत्त्वाचे आहे. हे संबंध आजचे नाही शतकानुशतकांचे आहेत. याच्या मुळाशी आत्मीयता आहे, सद्भावना आहे, एकमेकांच्या संस्कृती आणि परंपरांप्रती सन्मान आहे. या नात्यांमधला एक गोफ महात्मा गांधींशीही संबंधित आहे. संयोगाने हे पूज्य बापूंचे 150 वे जयंती वर्ष आहे. गांधीजींची एक शिकवण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. ही शिकवण म्हणजे – वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. देशातले प्रत्येक मूल ही बाब जाणते. पण बापूंनी हा संदेश देण्यासाठी ज्या तीन माकडांना निवडले होते त्यांचे जन्मस्थान जपान आहे, ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे. मिजारू, किकाजारू आणि इवाजारू- जपानचा वारसा आहेत. पूज्य बापूंनी एक महान सामाजिक संदेश देण्यासाठी प्रतिकात्मकतेने त्यांना निवडले आणि त्याचा प्रसार केला.

मित्रांनो, आपल्या आचारव्यवहार आणि संस्कारांचा हा दुवा जपानमध्ये बौद्ध धर्म येण्या पूर्वीपासूनचा असल्याचे सांगितले जाते. पुढल्या महिन्यात क्योटोमध्ये गियोन सण साजरा होणार आहे. या गियोन सणामध्ये ज्या रथाचा वापर केला जातो त्याची सजावट भारतीय रेशीम धाग्यांनी होते. ही परंपरा आजची नसून अनंत काळापासून चालत आली आहे.

याच प्रकारे शिचीफुकुजीन – सात भाग्यदेवतांपैकी चौघांचा संबंध थेट भारताशी आहे. देवी सरस्वतीला बेंजाइटिन, देवी लक्ष्मीला किचिजोटेन, कुबेराला विशामोन आणि महाकालाला दाइकोकुतेन या रूपात जपानमध्ये पुजले जाते.

मित्रांनो, फॅब्रिक पेंटिंगमधील जुशोबोरी कला भारत आणि जपानच्या संबंधातील एक खूप जुना दुवा आहे. गुजरातमधल्या कच्छ आणि जामनगरमध्ये, शतकानुशतकांची बांधणी कला, कोणी बंधानी म्हणतात, कोणी बंदानी म्हणतात, त्यासाठी कलाकार ज्या रेसिस्ट तंत्राचा वापर करतात त्याचा उपयोग इथेही शतकांपासून केला जात आहे. जपानमध्ये हे काम करणारे लोक आणि कच्छ, जामनगरमध्ये हे काम करणारे लोक एकमेकांच्या प्रातांत गेले तर त्यांना आपापल्या प्रांतात असल्याचा भास होईल, इतके पराकोटीचे साम्य आहे. आपल्या बोलीतली काही समान सूत्रेही आपल्याला जोडणारी आहेत. भारतात आपण ध्यान म्हणतो, जपानमध्ये झेन म्हटले जाते. आपण सेवा म्हणतो त्याला जपानमध्येही सेवाच म्हटले जाते. सेवा परमो धर्म:, म्हणजेच निःस्वार्थ सेवा भारतीय दर्शनेत सेवेला सर्वात मोठा धर्म मानतात. जपानचा समाज तो प्रत्यक्ष जगतो आहे.

मित्रांनो, स्वामी विवेकानंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, जस्टिस राधा विनोदपाल यांच्यासह अनेक भारतीयांनी जपानसोबत आपले संबंध बळकट केले आहेत. जपानमध्येही भारत आणि भारतीयांविषयी प्रेम आणि आदरभावना आहे.

याचाच हा परिणाम होता ज्यामुळे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लगेचच भारत आणि जपानचे संबंध आणखी बळकट होऊ लागले आहेत. सुमारे दोन दशकांपूर्वी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान योशिरो मोरी यांनी एकत्रितपणे आपल्या संबंधांना जागतिक भागीदारीचे रुप दिले होते.

2014 मध्ये पंतप्रधान बनल्यावर मला माझे मित्र शिंजो अॅबे यांच्यासोबत या मैत्रीला मजबूत करण्याची संधी मिळाली. आम्ही आमच्या राजनैतिक संबंधांना राजधानी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या औपचारिकतेच्या चौकटीतून बाहेर काढून थेट जनतेपर्यंत नेले. पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या सोबत मी टोकियोशिवाय क्योटो, ओसाका, कोबे, यमानासी यांचा दौरा देखील केला. इथे कोबे मध्ये तर मी… कधी कधी मलाच चुकायला होते. कधी मी सांगतो चार वेळा, कधी मी म्हणतो पाच वेळा, कधी म्हणतो तीन वेळा, म्हणजेच वारंवार आलो आहे आणि तेव्हा तर मी पंतप्रधान देखील नव्हतो. तेव्हा देखील येत होतो. तुमच्या सोबत बसत होतो. पंतप्रधान अॅबे महोदयांनी गेल्या वर्षी यमानासी येथे त्यांच्या निवासस्थानी माझे स्वागत केले. त्यांनी दाखवलेली ही आदरातिथ्याची विशेष भावना, प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरली गेली. अन्यथा राजनैतिक संबंधांमध्ये अशा प्रकारची वैयक्तिक जवळीक निर्माण होणे फारच दुर्मिळ असते.

दिल्ली शिवाय अहमदाबाद आणि वाराणसी येथे पंतप्रधान अॅबे यांना म्हणजेच माझ्या मित्राला घेऊन जाण्याचे भाग्य मला लाभले. पंतप्रधान अॅबे माझा लोकसभेचा मतदारसंघ आणि जगातील सर्वात पुरातन संस्कृती आणि आध्यात्मिक नगरांपैकी एक असलेल्या काशी येथे गंगा आरतीमध्येही सहभागी झाले आणि केवळ सहभागीच झाले नाहीत, तर त्यांना या ठिकाणी काही बोलण्याची संधी देण्यात आली, त्यावेळी त्या आरतीच्या वेळी त्यांना आलेल्या आध्यात्मिक अनुभूतीचा उल्लेख केल्याशिवाय त्यांना राहवले नाही. ते आजही त्या भेटीची आठवण काढतात. त्यांची ती छायाचित्रे प्रत्येक भारताच्या मनात घर करून राहिली आहेत.

मित्रांनो, गेल्या सहा दशकापेक्षा जास्त काळ भारताच्या विकास यात्रेमध्ये जपानची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. 21व्या शतका न्यू इंडियामध्ये ही भूमिका आणखी जास्त महत्त्वाची होणार आहे.1958 मध्ये जपानने आपले पहिले येन लोन भारतालाच मंजूर केले होते. 1958 मध्ये. यानंतरच जपानी कंपन्या भारतात काम करत आहेत आणि त्यांनी उत्तम गुणवत्तेसाठी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

एक काळ होता ज्यावेळी आम्ही कार बनवण्यासाठी सहकार्याने काम करत होतो आणि आज आम्ही बुलेट ट्रेनच्या निर्मितीमध्ये सहकार्याने काम करत आहोत. आज पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारताचा असा कोणताही भाग नाही जिथे जपानचे प्रकल्प किंवा गुंतवणुकीचा ठसा उमटलेला नाही. अशाच प्रकारे भारताची गुणवत्ता आणि मनुष्यबळ येथे जपानची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपले योगदान देत आहे.

मित्रांनो, न्यू इंडियामध्ये आपले हे सहकार्य आणखी व्यापक होणार आहे. आम्ही आगामी पाच वर्षात भारताला पाच ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट घेऊन वाटचाल करत आहोत. सामाजिक क्षेत्राला आमचे प्राधान्य आहे. याबरोबरच पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यापक गुंतवणूक आवश्यक असून त्यावर देखील आमचा भर आहे. विशेष करून डिजिटल पायाभूत सुविधा, भारताला आज संपूर्ण जगभरात गुंतवणुकीसाठी एक आकर्षक संधी असलेला देश मानले जात आहे. भारतात डिजिटल साक्षरता अतिशय वेगाने वाढत आहे. डिजिटल व्यवहार विक्रमी पातळीवर आहेत. नवनिर्मिती आणि इनक्युबेशनसाठी खूप मोठ्या पायाभूत सुविधा तयार होत आहेत. एका नव्या वातावरणाचा अनुभव येत आहे. याच बळावर येणाऱ्या पाच वर्षात भारताला 50 हजार स्टार्ट अप्सची इकोसिस्टिम बनवण्याचे लक्ष्य आम्ही निर्धारित केले आहे.

मित्रांनो, नेहमीच असे म्हटले जाते की Sky is the limit, कोणे एके काळी हे म्हणणे ठीक होते, पण भारत या मर्यादेच्या पलीकडे जाऊन अवकाशाचे गांभीर्याने संशोधन करत आहे. भारताच्या 130 कोटी जनतेचे जीवन सुगम आणि सुरक्षित बनवण्यासाठी स्वस्त आणि प्रभावी अंतराळ तंत्रज्ञान प्राप्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मला अतिशय आनंद आहे की आम्ही यशस्वीरित्या या दिशेने आगेकूच करू शकत आहोत.

अलीकडेच फानी चक्रीवादळासहित अनेक आव्हानांची भारताने अतिशय कमीत कमी हानीसह हाताळणी केली आणि जगाने या कामाची अतिशय प्रशंसा केली आहे. कशा प्रकारे सरकारी यंत्रणा, मनुष्यबळ, अंतराळ तंत्रज्ञान या सर्वांचे एकत्रिकरण करून कामगिरी करता येऊ शकते, ते भारताने करून दाखवले आहे आणि ते देखील एका बाजूला संपूर्ण देश निवडणुकीच्या धामधुमीत व्यग्र असताना, तरी देखील हे काम अतिशय उत्तम प्रकारे पूर्ण केले आणि संपूर्ण जगाने त्याची वाखाणणी केली. आणि यामुळे आम्हाला मनोधैर्य मिळत आहे. हेच कारण आहे ज्यामुळे आम्ही काही महिन्यातच आमच्या चांद्रमोहिमेला पुढे नेत चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करणार आहोत. 2022 पर्यंत आपली पहिली मानवी अवकाशमोहीम, गगनयान पाठवण्याच्या आम्ही तयारीत आहोत आणि एखाद्या भारतीयाने तिथे तिरंगा झेंडा फडकवावा हे स्वप्न घेऊन आम्ही काम करत आहोत.

अंतराळात आमचे स्वतःचे स्थानक असावे, या शक्यतांची आम्ही चाचपणी करत आहोत. ही जी काही कामे आम्ही करत आहोत, आज भारतात महत्त्वाकांक्षांनी भरलेला एक नवा मध्यम वर्ग, समाजाचा एक खूप मोठा भाग असलेला हा वर्ग ज्यांची अनेक स्वप्ने आहेत, अनेक आकांक्षा आहेत, ज्यांना जलद गतीने निकालांची प्रतीक्षा आहे. त्यांच्या अपेक्षांनुरूप आम्ही विकासाचे नवीन नवीन प्रकार विकसित करत आहोत.

मित्रांनो, अशा वेळी संपूर्ण जग भारताला संधींचे प्रवेशद्वार या रुपात पाहात आहे. त्यामुळे जपानसोबत आमचा ताळमेळ देखील नवी शिखरे गाठणार आहे. मला तर असे वाटते की जपानचे कायजेन तत्वज्ञान भारत-जपानच्या संबंधांच्या प्रगतीला देखील लागू होते. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या सीएम स्टाफला एक कायजनचे प्रशिक्षण सातत्याने देत होतो. कारण कायजनची प्रक्रिया एक अशी प्रक्रिया आहे जी कधी थांबत नाही. आपले संबंध सातत्याने वृद्धिंगत होत राहतील, भक्कम होत राहतील.

मित्रांनो, पंतप्रधान म्हणून माझा जपानचा हा चौथा दौरा आहे, पंतप्रधान म्हणून… सर्व दौऱ्यात मी जपानमध्ये भारताविषयीच्या आत्मीयतेचा, एका आपुलकीचा अनुभव घेतला आहे. आपली सभ्यता आणि आपल्या मूल्यांचा अभिमान बाळगणे, गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाला देशाच्या प्रगतीचा भाग बनवणे आणि परंपरेच्या चौकटीत बनवणे, हे मी जपानमध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहे आणि असा अनुभव येणारा मी एकमेव व्यक्ती नाही.

मित्रांनो, स्‍वामी विवेकानंदांनी देखील जेव्हा एका शतकापूर्वी जेव्हा जपानचा दौरा केला होता तेव्हा ते देखील येथील सभ्यता, जनतेची समर्पित आणि कामाविषयीची तत्वनिष्ठा यांनी खूप जास्त प्रभावित झाले होते. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी तर असेही म्हटले होते की प्रत्येक भारतीयाने जपानला भेट दिली पाहिजे. पण त्यावेळी लोकसंख्या थोडी कमी होती. आता काही हे शक्य होणार नाही. देशाचे 30 कोटी लोक… खरंतर आम्ही देखील असे मानतो की 130 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारे तुम्ही सर्व येथे आहात. तुम्ही जपानच्या गोष्टींना, येथील कामाच्या संस्कृतीला, कामाविषयीच्या नीतीमूल्यांना, येथील गुणवत्तेला, येथील परंपरांना, येथील तंत्रज्ञानाला भारतात पोहोचवत राहिले पाहिजे आणि भारताच्या गोष्टी येथील सर्वसामान्यांना सांगितल्या पाहिजेत. हाच सेतू आम्हाला नवी शक्ती देतो, नित्य नूतन व्यवस्थेमध्ये परिवर्तित करतो, संबंधांना प्राणदायी बनवतो. हे काही रितीरिवाज विधि नाहीत तर एक जिवंत व्यवस्था आहे आणि जिवंत व्यवस्था जनसामान्यांशी जोडले गेल्याने बनते.

सर्वात शेवटी माझ्या बोलण्याचा समारोप करण्यापूर्वी तुम्हा सर्वांसाठी, जपानवासियांसाठी, भारतवासियांसाठी आणि आपल्या सर्व जपानी बंधुभगिनींसाठी मी अशी कामना करतो, नव्या रेवा इरा- रेवा युगात मी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात या युगाच्या नावानुरुप सुंदर तालबद्धता सदैव राहो. जपानमध्ये विशेषतः कोबे येथे प्रत्येक वेळी तुम्ही ज्या आपुलकीने माझे स्वागत, सत्कार आणि सन्मान केला आहे, त्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानतो.

कदाचित तुम्हाला कळले असेल की 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस होता आणि भारत सरकार योगसाधनेचा प्रचार, प्रसार आणि विकास-विस्तारासाठी काम करणाऱ्या संस्थांना, व्यक्तींना भारतातील आणि भारताबाहेरच्या देखील सन्मानित करत असते, त्यांना पारितोषिके देते. तुम्हाला कळले असेल की यावेळी जपानमध्ये योगसाधनेसाठी काम करणाऱ्या संस्थेला सन्मानित करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. म्हणजेच आपण प्रत्येक बाबतीत एकमेकांशी जोडले गेले आहोत.

याच सन्मानासह पुन्हा एकदा तुम्हा सर्वांमध्ये येण्याची मला संधी मिळाली, तुमचे आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करतो.

धन्यवाद.

S.Tupe/S.Kakade/S.Patil/D.Rane