Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चाबहार संपर्क समारंभात पंतप्रधानांचे वक्तव्य

चाबहार संपर्क समारंभात पंतप्रधानांचे वक्तव्य


इराण इस्लामी गणराज्यचे राष्ट्राध्यक्ष महामहिम डॉ. हसन रोहानी, अफगाणिस्तान इस्लामी गणराज्यचे राष्ट्रपती डॉ. अश्रफ घनी, आदरणीय मंत्रीजन आणि सज्जनहो,

प्रसिध्द फारसी कवी हाफेझ यांनी म्हटले होते. रोजे-हिज्रो-शबे-फुर्कते-यार आखर शुद जदम इन फालो-गुजश्‍त अख्तरो कार आखर शुद्‌

(अर्थ – वियोगाचा काळ समाप्त झाला. प्रतिक्षेच्या रात्रीही संपत आहेत, आपली मैत्री सदैव कायम राहील.)

आज आपण सर्व इतिहास घडताना पाहत आहोत. केवळ आपल्या तीन देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण प्रदेशासाठी संपर्क साधणे ही मानवाची मूळ इच्छा असते. आज आपण ती पूर्ण करु इच्छितो. या अनोख्या आयोजनाबद्दल महामहिम रोहानी यांचे मी आभार मानतो. राष्ट्रपती अश्रफ घनी, आपल्या उपस्थितीबद्दल आपले आभार. हा विशेष महत्त्वाचा क्षण आहे. येथे उपस्थित असणे हा सन्मान आहे. महामहिम रोहानी, राष्ट्रपती घनी आणि मी अनेक विषयांवर आत्ताच विस्ताराने चर्चा केली. आर्थिक सहयोगासाठीच्या कार्यक्रमाला आमचे प्राधान्य आहे. आमचा उद्देश समान आहे. शांतता आणि समृध्दीसाठी नवे मार्ग शोधणे हे आमचे समान उद्दिष्ट आहे. जगाशी जोडले जाण्याची आमची इच्छा आहे. मात्र आपसातल्या संपर्कालाही आमचे प्राधान्य आहे. खरेतर या क्षेत्राासाठी ही नवी पहाट आहे. महामहिम, इराण, अफगाणिस्तान आणि भारत आपल्यातल्या प्राचीन दळणवळणाविषयीचे वास्तव जाणतात. कला, संस्कृती, विचार आणि ज्ञान, भाषा आणि परंपरेच्या आधारे शतकानुशतके आपण एकमेकांशी जोडले गेले आहोत. इतिहासात घडामोडी होत असतानाही आपल्या समाजातला संपर्क टिकून राहिला आपल्या सहकार्याचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आपण आज भेटत आहोत. महामहिम त्रिपक्षीय परिवहन आणि टांझीट कॉरीडॉर स्थापण्याबाबतच्या थोडया वेळापूर्वी झालेल्या स्वाक्षऱ्या या क्षेत्राचा इतिहास बदलू शकतात. आपल्या तीन देशांच्या एकत्र येण्यासाठीचा हा आधार आहे.

कॉरिडॉरमुळे या क्षेत्रात वाणिज्य आणि व्यापाराचा ओघ वाढेल. भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या ओघामुळे चाबहारमध्ये नव्या औद्योगिक पायाभूत सोयी-सुविधांचा मार्ग प्रशस्त होईल. यामध्ये वायूवर आधारित खत सयंत्र, पेट्रो रसायन, औषधनिर्माण आणि माहिती-तंत्रज्ञानाचा समावेश राहील कॉरिडॉरचा मुख्यमार्ग इराणच्या चाबहार बंदरातून जाईल. ओमानच्या खाडी मुखावर वसलेल्या या बंदराला धोरणात्मक महत्व आहे. उर्वरित जगाबरोबर व्यापारासाठी अफगाणिस्तानला एक आश्वासक, आणि अतिशय अनुकूल मार्ग उपलब्ध होईल. या करारामुळे या तीन राष्ट्रांखेरीज अन्य क्षेत्रांनाही आर्थिक लाभ होणार आहे. मध्य आशियाई देशांपर्यंत हे लाभ पोहोचू शकतात. आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन कॉरिडॉरबरोबर हा जोडल्या गेल्यास एका टोकाला दक्षिण आशिया आणि दुसऱ्या टोकाला युरोपला स्पर्श करता येईल. परंपरागत समुद्री मार्गाशी तुलना करता या कॉरीडॉरद्वारे युरोपसमवेत होणाऱ्या व्यापारासाठीच्या वेळात आणि खर्चात सुमारे 50 टक्के कपात होऊ शकते. पुढे जाऊन भारताने हिंदी महासागर क्षेत्र आणि दक्षिण-पूर्व आशियाच्या सहकार्याने विकसित केलेल्या भू आणि समुद्री मार्गांनाही हा मार्ग जोडता येऊ शकेल.

मान्यवर,

21 व्या शतकात, जगभरात अनेक संधी उपलब्ध आहेत मात्र त्याच्याबरोबरच अनेक आव्हानेही आहेत. विश्व भागीदारीचे आजचे जे स्वरुप आहे त्यामध्ये या शतकासाठी अनुकूल असा दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे, आधीच्या शतकाची मानसिकता बाळगता कामा नये. आज आंतरराष्ट्रीय संबंधाशी जोडले गेलेले शब्द संशय नव्हे तर विश्वास, वर्चस्व नव्हे तर सहकार्य आणि एखाद्याला बाजूला ठेवणे नव्हे तर समावेशकतेवर आधारित आहेत. चाबहार करारालाही याच तत्त्वाचे मार्गदर्शन आहे आणि त्यामागची भावनाही हिच आहे. आपल्या जनतेसाठी हा शांतता आणि समृध्दीचा कॉरीडॉर असेल. आर्थिक विकास आणि सबलीकरणामुळे त्याला नवी गती मिळेल. दुसऱ्याच्या मनात शंकाचे काहूर निर्माण न करता आपली सुरक्षा यामुळे मजबूत होईल आपल्या देशांमध्ये जे काही अडथळे, अडचणी आहेत त्या यामुळे नाहीशा होतील आणि जनसंपर्काच्या नव्या आयामांना प्रोत्साहन मिळेल. मैत्रीपूर्ण आणि निकोप शेजारी निर्माण होण्यासाठी यामुळे मदत मिळेल. आपल्या सर्वांची अशी इच्छाही आहे आणि आपण त्यासाठी पात्रही आहोत.

महामहिम

आपल्या भोवतालच्या जगात मूलभूत बदल घडत आहेत. केवळ व्यापक संपर्काचा अभाव एवढेच आव्हान नाही तर आपल्या राष्ट्रीय विकासालाही त्यामुळे मर्यादा येते. पश्चिम आशियात राजकीय अशांतता आणि आर्थिक दबाव सातत्याने वाढत आहे. आशिया प्रशांत क्षेत्रातली वाढती राजकीय प्रतिस्पर्धा आणि आर्थिक संधी यांच्या मिश्रणामुळे सध्याच्या आशियाई परिस्थितीवर दबाव येत आहे. अनिश्चितता आणि क्षीणपणातून जागतिक अर्थव्यवस्थाही अद्याप पूर्ण सावरलेली नाही. आपली प्रगती आणि भविष्यातल्या समृध्दीला कट्टरपंथी विचारधारा आणि दहशतवादाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर आपले तीन देश सर्वात शक्तीशाली संसाधन म्हणजेच युवाशक्तीने परिपूर्ण आहेत. आपल्या तीनही देशात लोकसंख्येचा 60 टक्के भाग हा 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचा आहे. ही युवाशक्ती आपली राष्ट्रीय आणि प्रादेशिक विकासाची एक संपत्ती आहे. ज्ञान, कौशल्य उदयोग, आणि उद्यमशीलतेच्या मार्गावरुन त्यांनी वाटचाल करावी, ज्यायोगे बंदूक आणि हिंसेच्या मार्गाचे ते बळी ठरु नयेत अशीच आमची इच्छा आहे. चाबहार कराराच्या आर्थिक फलनिष्पत्तीमुळे व्यापार विस्‍तारेल, गुंतवणूक आकर्षित होईल. पायाभूत सुविधा निर्माण होतील, उद्योगांचा विकास साधेल आणि आपल्या युवकांसाठी रोजगारांची निर्मितीही होईल. निर्दोष जनतेची हत्या करणे हा एकमात्र उद्देश ज्यांचा आहे अशा प्रवृत्तीविरोधात आपसातल्या मदतीसाठी उभे राहण्याची आपली क्षमता मजबूत करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल.

या कराराची यशस्विता या क्षेत्रातल्या शांतता आणि स्थैर्यासाठी सकारात्मक ठरेल.

महामहिम,

व्यापार आणि मालाची वाहतूक करण्याचे मार्ग हे आपल्या अधिकाधिक संपर्क साधण्याच्या प्रवासातले केवळ सुरुवातीचे बिंदू आहेत असा माझा दृढ विश्वास आहे. माझ्या दृष्टीकोनातून इराण, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातल्या दळणवळणाच्या पूर्ण विस्तारात याचा समावेश असायला हवा –

संस्कृतीकडून व्यापाराकडे

परंपरेकडून तंत्रज्ञानाकडे

गुंतवणूकीतून माहिती तंत्रज्ञानाकडे

सेवाक्षेत्राकडून धोरणाकडे

जनतेकडून राजनीतीकडे

एका दृष्टीकोनातून ही यासाठीची प्रतिज्ञा आहे –

उत्तम दळणवळण अनिवार्य असल्याची जाणीव

शांतता प्रस्थापित करुन स्थैर्य निर्माण करणे

आर्थिक भरभराटीसाठी बांधणी आणि नव्या व्यापारी संबंधांची स्थापना

कट्टरतावादाला आळा घालणे आणि दहशतवादाची छाया दूर करणे

अडथळे नष्ट करुन लोकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणे

इतिहासात डोकावताना या प्रयत्नांना इतिहास मान्यता तर देईलच आणि इतिहासाची प्रशंसाही या प्रयत्नांना लाभेल. या प्रयत्नांच्या दिशेने महामहिम रोहानी आणि घनी यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल या नेतृत्वाचे मी अभिनंदन करतो. सर्वांचे आभार. अनेक अनेक धन्यवाद.

N.Chitale/B.Gokhale