पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतराळाबाहेरील जागेचा शांततापूर्ण उद्देशांसाठी वापर करण्यासाठी सहकार्य करण्याबाबत अंतराळ विभाग/भारतीय अंतराळ संशोधन संघटना आणि कुवेत वैज्ञानिक संशोधन संस्था यांच्यातील सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली.
या करारामुळे कुवेत संशोधन संस्थेला भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रहांद्वारे माहितीचा वापर संशोधन प्रकल्पांसाठी करता येईल. तसेच व्यावसायिक तत्त्वावर रिमोट सेन्सिंग आणि दूरसंचार उपग्रहांची निर्मिती आणि प्रक्षेपण करता येईल. या करारामुळे इस्रो आणि कुवेत संशोधन संस्थेच्या सदस्यांचा संयुक्त कृती गट स्थापन केला जाईल, जो या कराराच्या अंमलबजावणीची पध्दत आणि कालमर्यादा यांचा आराखडा तयार करेल.
कुवेत बरोबरच्या या सहकार्यामुळे मानवतेच्या कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या क्षेत्रात संयुक्त उपक्रम विकसित होईल. यामुळे देशाच्या सर्व घटकांना तसेच प्रांतांना लाभ होईल.
या करारामुळे पृथ्वीच्या रिमोट सेन्सिंग क्षेत्रातील नवीन संशोधन शक्यतांची चाचणी, उपग्रह दूरसंचार, दिशादर्शक उपग्रह, अंतराळ विज्ञान यातील संशोधनाला चालना मिळेल.
S.Kane/S.Tupe/M.Desai