Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा

अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेवा तीर्थ इथे, अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापकांशी संवाद साधला. 

अवकाश क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या संवादात सहभागी झाले. यात, रॉकेट्स आणि पुनर्वापरयोग्य सेमी-क्रायोजेनिक प्रक्षेपण वाहने, एव्हिऑनिक्स, उपग्रह, अडवान्य प्रॉपल्शन प्रणाली, अवकाश आणि संरक्षणविषयक गुप्तचर प्रणाली, अवकाशातील कचरा हटविणे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्थानिक पातळीवरील हवामान आणि हवामान बदलविषयक माहिती प्रणाली अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या प्रमुखांचा समावेश होता.

त्यांनी यावेळी, भारताच्या खाजगी अंतराळ उद्योग क्षेत्रात झालेली वेगवान प्रगती अधोरेखित केली. तसेच, या क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सूचना दिल्या. देशात स्वदेशी पद्धतीने आवश्यक तंत्रज्ञान आणि क्षमता विकसित करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर वेळ आणि प्रयत्न खर्च केले आहेत,असं या प्रमुखांनी यावेळी सांगितले. तसेच, पंतप्रधानांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सरकारकडून मिळणारे भक्कम पाठबळ आणि या क्षेत्रातील उद्योगांमधे असलेले सहकार्य, अत्यंत महत्वाचे असल्याचं यावेळी प्रमुखांनी सांगितलं. त्यामुळे अवकाश क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या चमूतील सर्व सदस्य दृढनिश्चयाने कार्यरत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांच्या सहभागासाठी खुले करण्यामुळे, या क्षेत्रात अत्यंत उत्साह संचारला आहे, याचे स्मरण करत, यातून अंतराळ उद्योगासाठी अनेक नव्या संधी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

इतकेच नाही, तर भारतातील उदयोन्मुख खासगी अवकाश उद्योगाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा स्वीकार अंगीकार आणि लाभ घेण्यास अनेक परदेशी कंपन्यांनी रुची दाखवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी अवकाश क्षेत्रातील नेतृत्वाचे अभिनंदन करताना, नव्या क्षेत्रात धाडस दाखवून पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. खासगी सहभागासाठी अवकाश क्षेत्र खुले करण्यामागील ज्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला, त्या दृष्टिकोनाला या क्षेत्राने दाखवलेल्या आत्मविश्वासामुळे अधिक बळ मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक देश अवकाश क्षेत्रात गुंतवणूक करू शकत नाहीत किंवा त्यांना या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे जागतिक अवकाश क्षेत्रात भारताचे स्थान वेगाने अधिक मजबूत करण्याची मोठी संधी भारतासमोर असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी अवकाश क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या तंत्रज्ञानाच्या नव्या उपयोजनांचा शोध घेण्यास आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुलभ कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

अवकाश क्षेत्रातील कंपन्यांनी इतर क्षेत्रांमध्ये कार्यरत कंपन्यांसोबत अधिक सहकार्य करण्याची सूचनाही त्यांनी केली. अवकाशातील कचऱ्यावर काम करणाऱ्या कंपन्या आपल्या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी पर्यावरणविषयक संस्थांसोबत सहकार्य करू शकतात. त्याचप्रमाणे, कृषी क्षेत्रासोबत काम करणाऱ्या अवकाश तंत्रज्ञान कंपन्या, कृषी विद्यापीठे आणि विभागांसोबत सहकार्य करून शेतकऱ्यांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि उत्पादनक्षमता वाढवण्यास मदत करू शकतात, असेही पंतप्रधान म्हणाले.

देशात अशी व्यवस्था आणि वातावरण विकसित करायला हवे;  ज्यामध्‍ये , ज्यावेळी जग अंतराळ क्षेत्रातील कशाचाही विचार करेल, त्यावेळी त्याच्या डोळ्यांसमोर सर्वात आधी भारताचे नाव यायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या अंतराळ क्षेत्रात, जागतिक नैपुण्य, कंपन्या आणि गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्वाचे साधन ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.   

त्यांनी अटल टिंकरिंग लॅब्ससोबत अधिक घनिष्ठ सहकार्य करण्याचे आवाहन केले. यामुळे लहान मुलांमध्ये अगदी लहान वयापासूनच अवकाश क्षेत्राबद्दल कुतूहल आणि रुची निर्माण होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

या संवादात अवकाश क्षेत्रात कार्यरत असलेल्या 20 स्टार्टअप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक सहभागी झाले. यामध्ये स्कायरूट एरोस्पेस, अग्निकुल कॉसमॉस, पिक्सेल, ध्रुव स्पेस, गॅलेक्सीआय, पिअरसाइट, बेलाट्रिक्स एरोस्पेस, दिगंतारा, सॅटस्युअर, सुहोरा टेक्नॉलॉजीज, मनस्तु स्पेस, अॅस्ट्रोबेस, टेकमी2स्पेस, व्योमिक, कॉसमोसर्व्ह स्पेस, ऑर्बिटएआयडी एरोस्पेस, स्कायसर्व्ह (हायस्पेस), सेरेंडिपिटी स्पेस, व्हॅसर लॅब्स आणि मिस्टईओ यांचा समावेश होता.

***

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai