पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांवरील पराक्रम दिन कार्यक्रमाला संबोधित केले. 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा दिन म्हणजे गौरवशाली तारीख असल्याचे त्यांनी नमूद केले. नेताजींचे शौर्य आणि धाडस आपल्याला प्रेरणा देते आणि आपले मन त्यांच्याबद्दलच्या आदराने भारून जाते असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत पराक्रम दिन हा देशभावनेचा अविभाज्य सोहळा बनला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
23 जानेवारी हा पराक्रम दिन, 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस, 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, 29 जानेवारी रोजी ‘बीटिंग रिट्रीट’ आणि 30 जानेवारी रोजी पूजनीय बापूंची पुण्यतिथी आहे. हा एक योगायोग असून यामुळे प्रजासत्ताकाचा भव्य उत्सव साजरा करण्याची एक नवीन परंपरा निर्माण झाली आहे असे ते म्हणाले. पराक्रम दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना शुभेच्छाही दिल्या.
2026 मध्ये पराक्रम दिनाचा मुख्य सोहळा अंदमान आणि निकोबारमध्ये आयोजित केला जात असल्याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी केला आणि या ठिकाणचे महत्त्व अधोरेखित केले. शौर्य, त्याग आणि धैर्याने ओतप्रोत अंदमान आणि निकोबारचा इतिहास, सेल्युलर जेलमधील वीर सावरकरांसारख्या देशभक्तांच्या कथा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी असलेले या भूमीचे नाते, यामुळे हा सोहळा अधिक विशेष ठरला असल्याचे ते म्हणाले.
स्वातंत्र्याची कल्पना कधीही संपत नाही, या विश्वासाचे प्रतीक अंदमानची भूमी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. येथे अनेक क्रांतिकारकांना अमानुष यातना देण्यात आल्या, अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, परंतु त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याची ज्योत विझण्याऐवजी अधिक प्रखर झाली, असे पंतप्रधान म्हणाले. परिणामी, अंदमान आणि निकोबारची भूमी स्वतंत्र भारताच्या पहिल्या सूर्योदयाची साक्षीदार बनली, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी आठवण करून दिली की, 1947 पूर्वीच 30 डिसेंबर 1943 रोजी, समुद्राच्या लाटांच्या साक्षीने येथे तिरंगा फडकवण्यात आला होता, यांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. 2018 मध्ये, जेव्हा या महान ऐतिहासिक घटनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, तेव्हा 30 डिसेंबर रोजी आपल्याला त्याच ठिकाणी तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला होता, यांचे त्यांनी स्मरण केले. जेव्हा समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रगीत निनादत होते, तेव्हा जोरदार वाऱ्यावर फडफडणारा तिरंगा जणू सांगत होता की स्वातंत्र्यसैनिकांची असंख्य स्वप्ने पूर्ण झाली आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटांचा गौरवशाली इतिहास जपायला हवा होता, परंतु त्यावेळी सत्तेवर आलेल्यांमध्ये असुरक्षिततेची भावना होती, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांना स्वातंत्र्याचे श्रेय केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित ठेवायचे होते आणि या राजकीय स्वार्थापायी देशाच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले गेले, अशी टीका त्यांनी केली. अंदमान आणि निकोबारलाही वसाहतवादी राजवटीच्या ओळखीशी बांधून ठेवण्यात आले होते, स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही येथील बेटे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावांनी ओळखली जात होती, यांची त्यांनी आठवण करून दिली. आपल्या सरकारने इतिहासातील हा अन्याय दूर केला आणि म्हणूनच पोर्ट ब्लेअर आता ‘श्री विजयपुरम’ म्हणून ओळखले जाते, असे त्यांनी सांगितले. हे नाव आपल्याला नेताजींच्या विजयाची आठवण करून देते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे इतर बेटांनाही स्वराज द्वीप, शहीद द्वीप आणि सुभाष द्वीप अशी नावे देण्यात आली, असे ते म्हणाले. 2023 मध्ये अंदमानमधील 21 बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली, याचीही त्यांनी आठवण केली. आज अंदमान आणि निकोबारमध्ये गुलामगिरीशी संबंधित नावे पुसली जात आहेत आणि स्वतंत्र भारताची नवीन नावे आपली ओळख प्रस्थापित करत आहेत, यावर त्यांनी भर दिला.
नेताजी सुभाषचंद्र बोस हे केवळ स्वातंत्र्य लढ्याचे महान नायक नव्हते, तर स्वतंत्र भारताचे दूरदृष्टी असलेले नेतेही होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नेताजींनी अशा राष्ट्राची कल्पना केली होती, जे स्वरूपाने आधुनिक असेल, पण भारताच्या प्राचीन चेतनेशी जोडलेले असेल, असे त्यांनी सांगितले. आजच्या पिढीला नेताजींच्या दृष्टिकोनाची ओळख करून देणे ही आपली जबाबदारी आहे आणि आपले सरकार ही जबाबदारी पार पाडत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दिल्लीतील लाल किल्ल्यावर नेताजींना समर्पित एक संग्रहालय उभारण्यात आले आहे, इंडिया गेटजवळ नेताजींचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये आझाद हिंद सेनेच्या योगदानाचे स्मरण करण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी पुढे सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. त्यांनी आवर्जून नमूद केलं की हे उपक्रम फक्त नेताजींना आदरांजली देण्यासाठी नाहीत, तर आपल्या तरुणांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी कायमची प्रेरणा ठरणारे आहेत. या आदर्शांचा सन्मान करणं आणि त्यातून प्रेरणा घेणं यामुळेच विकसित भारताचा संकल्प अधिक ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरतो, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की कमकुवत देशाला आपली उद्दिष्टं गाठणं अवघड जातं, म्हणूनच नेताजींनी नेहमी मजबूत देशाचं स्वप्न पाहिलं होतं. आज 21व्या शतकात भारतही स्वतःला एक सक्षम आणि ठाम असं राष्ट्र म्हणून उभं करत आहे, असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारताने देशाला इजा करणाऱ्यांच्या घरात घुसून त्यांचा बदला घेतला आणि त्यांचा नाश केला, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. आजचा भारत शक्ती कशी तयार करायची, ती कशी सांभाळायची आणि योग्य वेळी कशी वापरायची हे चांगलं जाणतो, असं पंतप्रधान म्हणाले. नेताजींच्या सशक्त भारताच्या विचारावर चालत देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनतोय, असंही त्यांनी सांगितलं.
पूर्वी भारत परदेशातूनच शस्त्रं आयात करायचा, पण आज भारताची संरक्षण निर्यात 23 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. स्वदेशी ब्रह्मोस आणि इतर क्षेपणास्त्रांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. आत्मनिर्भरतेच्या जोरावर भारत आपली लष्करी ताकद आधुनिक करत आहे, असं ते म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितलं की आज देशातील 1.4 अब्ज लोक विकसित भारताच्या संकल्पासाठी एकत्र काम करत आहेत. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे हा प्रवास अधिक मजबूत झाला आहे आणि स्वदेशी मंत्रामुळे त्याला वेग मिळाला आहे. शेवटी त्यांनी विश्वास व्यक्त केला की पराक्रम दिवसाची प्रेरणा विकसित भारताच्या या प्रवासाला पुढेही बळ देत राहील.
या कार्यक्रमाला अंदमान आणि निकोबारचे उपराज्यपाल निवृत्त ॲडमिरल डी. के. जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर आर. एस. चिकारा आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी तसेच आयएनएचे ज्येष्ठ सदस्य लेफ्टनंट आर. माधवन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
On Parakram Diwas, we salute Netaji Subhas Chandra Bose. His unwavering courage and dedication to India’s freedom continue to inspire countless citizens. https://t.co/5rq9YCWD67
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2026
***
शैलेश पाटील/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
On Parakram Diwas, we salute Netaji Subhas Chandra Bose. His unwavering courage and dedication to India’s freedom continue to inspire countless citizens. https://t.co/5rq9YCWD67
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2026