Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अर्जेंटिना येथे “शांतीसाठी योग” कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

अर्जेंटिना येथे “शांतीसाठी योग” कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

अर्जेंटिना येथे “शांतीसाठी योग” कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

अर्जेंटिना येथे “शांतीसाठी योग” कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण


अर्जेंटिनाचे  समर्पित योग-साधक,

भारत आणि भारतीय संस्कृती प्रति अपार प्रेम असलेले अर्जेंटिनाचे रहिवासी,

अर्जेंटिनात राहणारे भारतीय बंधू आणि भगिनी,

आर्ट ऑफ लिविंगचे कार्यकर्ता आणि सदस्य,

नमस्कार !

बुएनास तार्दॆर्स. ब्युनोस आयर्स इथे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ बुएनोस. बुएनोस, म्हणजे छान आहे हे स्वाभाविकच आहे. महर्षि पतंजलि यांच्या परंपरेशी जोडलेल्या तुम्हा सर्वांना सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने मी अभिवादन करतो. आर्ट ऑफ लिविंगच्या सदस्यांना आणि तुम्हा सर्वांना या शानदार आयोजनासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. 

मी 24 तासांपेक्षा अधिक वेळेत 15 हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करून काही वेळापूर्वी ब्युनोस आयर्स इथे पोहचलो आहे. मात्र तुम्हा लोकांचा उत्साह आणि प्रेम पाहून मला अजिबात असे वाटत नाही की भारताबाहेर कुठेतरी आहे. इथे अनेकजण अतिशय कौशल्याने आणि आदराने सूर्य नमस्कार करत होते. अर्जेंटिनाच्या या रुपेरी संधिकाळात तुमच्या योगसाधनेने मला ताजेतवाने केले आणि माझ्यात उत्साह भरला. 

मित्रांनो,

आजच्या कार्यक्रमाचे नाव आहे “Yoga For Peace”. योगाभ्यासाच्या कुठल्याही कार्यक्रमाचे यापेक्षा उत्तम नाव शोधणे कठीण आहे. योगमुळे आपल्याला तन आणि मन दोन्हीचे आरोग्य मिळते. योग आपल्या शरीराला शक्ती देते आणि मनाला शांती. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मन शांत असेल तेव्हा कुटुंबात, समाजात, देशात आणि जगात देखील शांतता निर्माण होत असते. आरोग्य, समाधान आणि शांततेसाठी योग ही भारताची जगाला भेट आहे. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन या मूल्यांप्रति अर्जेन्टिनासह संपूर्ण जगाची कटिबद्धता दर्शवते. ‘सर्वे संतु सुखिन:’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या भारतीय दर्शनाची ही व्यवहारी अभिव्यक्ति आहे. मला हे ऐकून आनंद झाला की, या वर्षी ब्युनोस आयर्स इथंही योगदिनानिमित्त 10 हजार लोक सहभागी झाले.

मित्रांनो,

योगचा अर्थच जोडणे हा आहे. तो आपल्याला मनःशांतीशी जोडतो, आनंदाशी जोडतो. आणि आज भारत आणि अर्जेंटिना मधील हजारो किलोमीटर अंतर योग पार करत आहे आणि आपल्या दोन्ही देशांना, आपल्या लोकांना जोडतो आहे. आपल्याला एका आत्मीय संबंधाने बांधत आहे. भारत आणि अर्जन्टीना मधील अंतर 15 हजार किलोमीटर आहे. आपल्या दोन्ही देशांमध्ये दोन विशाल महासागर आणि  महाद्वीप आहेत. दोन्ही देशांच्या वेळेत 8 तास आणि तीस मिनटाचा फरक आहे. म्हणजे आता तुमची संध्याकाळ आहे.  मात्र भारतात लोक ब्रह्म मुहूर्ताची साधना सुरु करणार आहेत.

मात्र तुमच्या योगाभ्यासाने दाखवून दिले आहे की, भारत आणि अर्जेंटीना यांच्यात परस्परांच्या संस्कृतीप्रति आदरभावनेच्या तुलनेत  हजारों किलोमीटरचे अंतर केवळ एक आकडा मात्र आहे.  अर्जेंटिनाला भारताच्या दर्शन, कला, संगीत आणि नृत्यात रुची आहे तर भारतात अर्जंटिनाच्या फ़ुटबाँल स्टार्सचे लाखो चाहते आहेत. मॅराडोनाचे नाव तर आमच्या देशाच्या बोलण्यात आणि म्हणींमध्ये देखील आले आहे.

आता भारतातील एक राज्य ओदिशा इथे हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरु आहे, ज्यामुळे भारतात खूप उत्साहाचे वातावरण आहे. आजच अर्जेंटिनाने हॉकी विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला सामना जिंकला. ही लढत खूप रोमांचक झाली असे मी ऐकले. मी अर्जेंटिनाच्या हॉकी संघाला आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा देतो.

भारत आणि अर्जेंटिनाच्या लोकांची स्वप्ने आणि अपेक्षा समान आहेत. दोन्ही देशांचे संबंध सौहार्दाचे आणि मैत्रीचे आहेत. आपण दोघे विकसनशील आणि लोकशाही देश आहोत आणि आपली समान मूल्ये आहेत. दोघांना जगात एकमेकांची भूमिका आणि प्रभावामुळे मदत होते.

आज भारताचा  मित्र देश अर्जेंटीना G- 20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहे आणि आमच्यासाठी देखील ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या परिषदेत ज्या मुद्द्यांवर चर्चा होईल, उदा. जागतिक अर्थव्यवस्था, शाश्वत विकास, हवामान बदल, फरार आर्थिक गुन्हेगार, वगैरे, याच्याशी केवळ भारत आणि अर्जेंटिनाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे हित जोडलेले आहे.

आपल्या दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्याच्या अमाप संधी आहेत. व्यापार, औषधनिर्माण, तेल आणि वायू, माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ, अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात आपण एकमेकांच्या क्षमतांचा परस्पर लाभ उठवू शकतो.

भारत आणि अर्जेंटीना यांच्यातील सहकार्य  जल, थल आणि नभ प्रत्येक ठिकाणी एक नवीन समान आणि सोनेरी भविष्याची निर्मिती करू शकतो. हे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी तुम्हा सर्वांची  महत्वपूर्ण भूमिका आहे. तुम्ही सर्व भारताचे राष्ट्रदूत आहात . तुमचे योगदान हा तो दुवा आहे जो आपल्या दोन्ही देशांना जोडतो. आज योगामुळे आपण एकत्र आलो आहोत. आपल्यामधील संपर्क,संवाद आणि सहकार्य वाढेल अशा अनेक संधी आपण निर्माण कराव्या अशी माझी इच्छा आहे. भारत आणि अर्जेंटीनाच्या संयुक्त भागीदारीत  विकासाचा वेग आणखी वाढावा. आत्मीयतेचा गोडवा आणखी वाढावा.

मित्रांनो,

अर्जेंटिनातील भारतीय आणि भारताच्या मित्रांना भारताला आणखी विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी मी आमंत्रित करतो. अर्जेन्टिनामध्ये राहणारे तुम्ही सर्व भारतीय जानेवारी महिन्यात काशी इथे होणाऱ्या अनिवासी भारतीय दिन कार्यक्रमासाठी अवश्य या आणि अर्जेंटिनातील आपल्या मित्रांना देखील बरोबर घेऊन या.

त्या दरम्यान  प्रयागराज मध्ये अर्धकुंभ देखील सुरु असेल. ती अद्भुत संधी, भारताची सांस्कृतिक समृद्धी, बदलत्या भारताचे, नवीन भारताचे दर्शन देखील तुम्ही सर्व करू शकाल. तुम्ही मला भारताच्या  योगाभ्यासाबद्दल बोलण्याची संधी दिलीत याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी आर्ट ऑफ लिविंगला त्यांच्या प्रयत्नासाठी आशीर्वाद देतो.

पात्रिसिया सोसा यांचेही आभार मानतो कारण त्यांनी  योगची ही सुरम्य संध्याकाळ अधिक सुरमयी बनवली. तुम्ही असेच योगाशी जोडलेले रहा . योगाने जगाला असेच जोडावे, खुश रहा , शांत राहा, सुखी रहा.

मूचास ग्रासियास.

धन्यवाद।

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar