Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन


भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

आंध्र प्रदेशचे राज्यपाल अब्दुल नझीर जी, गोव्याचे राज्यपाल आणि या भूमीचे सुपुत्र अशोक गजपती राजू जी, मुख्यमंत्री, माझे मित्र चंद्राबाबू नायडू जी, उपमुख्यमंत्री बंधू पवन कल्याण जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, तरुण ऊर्जेने परिपूर्ण असलेले बंधू राममोहन नायडू जी, चंद्रशेखर पेम्मसानी जी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा जी, राज्य सरकारमधील मंत्री बंधू नारा लोकेश जी, उपस्थित इतर लोकप्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो.

अंदरिकी नमस्कारम्!

मित्रांनो,

आजचा दिवस आंध्र प्रदेशच्या विकासासाठी आणि ‘स्वर्ण आंध्र’च्या संकल्पनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज मला एका अत्यंत शुभ प्रसंगी, शुभ महिन्यात उत्तर आंध्रच्या या पवित्र भूमीवर येण्याचे सौभाग्य मिळाले आहे. सर्वप्रथम मी भगवान श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी यांच्या चरणी नतमस्तक होतो. मी श्री-कूर्मनाथ स्वामी आणि माँ पैडितल्ली अम्मवारू यांना नमन करतो.

मित्रांनो,

आज येथे सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ, लोकार्पण आणि भूमिपूजन झाले आहे. विमानतळासोबतच हे प्रकल्प आंध्र प्रदेशच्या रस्ते संपर्क व्यवस्थेशीही संबंधित आहेत. यामध्ये ऊर्जा सुरक्षेशी संबंधित प्रकल्पांचाही समावेश आहे. ही विकासकामे सध्या आंध्र प्रदेश ज्या वेगाने प्रगती करत आहे, त्याचे प्रतीक आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी मी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

आजचा हा सोहळा नवा इतिहास आणि नवे विक्रम घडवण्याचाही आहे. आज एकीकडे विकासाचे नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत, तर त्याचबरोबर धिमसा नृत्याचा सांस्कृतिक विक्रमही रचला गेला आहे. आणि हीच चंद्राबाबूंची विशेषता आहे की त्यांनी दोन क्षितिजांना स्पर्श केला आहे.

एका बाजूला आकाशाला गवसणी घालणाऱ्या विमानतळाची उभारणी आणि दुसऱ्या बाजूला येथील माझ्या आदिवासी भगिनींनी धिमसा नृत्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. चंद्राबाबूंच्या या दूरदृष्टीचे मी विशेष कौतुक करतो.

तेरा हजारांहून अधिक आदिवासी भगिनी आणि मुलींचे सादरीकरण, त्यांचा उत्साह, त्यांची शिस्त आणि आदिवासी संस्कृतीचा अभिमान, हे दृश्य खरोखरच अद्भुत होते. यामध्ये देशाच्या विविधतेची झलकही होती आणि पिढ्यान्‌पिढ्या जतन करून ठेवलेल्या आदिवासी वारशाचेही दर्शन घडले. या सादरीकरणासाठी मी आपणा सर्वांचे आणि विशेषतः माझ्या आदिवासी भगिनी व मुलींचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रांनो,

ही भूमी अल्लुरी सीताराम राजू यांची भूमी आहे. ज्या भूमीवर अल्लुरी सीताराम राजू जी यांनी आदिवासींच्या हितासाठी आपले जीवन समर्पित केले, त्याच भूमीवर आज आंध्र प्रदेशातील एका नव्या विमानतळाची सुरुवात होत आहे. हे विमानतळ आंध्र प्रदेश आणि उत्तर आंध्रच्या विकासाची धावपट्टी आहे. हा आंध्र प्रदेशातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रक्षेपण मंच आहे. आंध्र प्रदेशातील जनतेचे आणि देशवासीयांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रांनो,

पूर्वी जेव्हा विमानतळ बांधले जात होते, तेव्हा विमानतळांना एकाच कुटुंबामधली नावे देण्याची परंपरा होती. आम्ही ही परंपरा बदलली. अयोध्येतील विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव दिले, तर पंजाबमधील विमानतळाला संत रविदास जी यांचे नाव दिले.

आणि मित्रांनो,

केंद्रातील एनडीए सरकारने निर्णय घेतला आहे की, या नव्या विमानतळाचे नाव श्री अल्लुरी सीताराम राजू यांच्या नावावर ठेवण्यात येईल. आंध्र प्रदेशातील जो कोणताही नागरिक या विमानतळावरून प्रवास करेल, तसेच देश-विदेशातील जो कोणी नागरिक या विमानतळावरून प्रवास करेल, त्याला अल्लुरी सीताराम राजू जी यांच्या नावातून जनसेवा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल.

मित्रांनो,

गेल्या 12 वर्षांत देशाच्या विमान वाहतूक क्षेत्राने असाधारण प्रगती केली आहे. 2014 पर्यंत देशात केवळ 74 विमानतळ कार्यरत होते. आज ही संख्या 166 झाली आहे. एक काळ असा होता की हवाई वाहतूक केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती. एनडीए सरकारच्या काळात आज छोट्या शहरांमधील सर्वसामान्य लोकही विमानाने प्रवास करत आहेत.

गेल्या 12 वर्षांत केवळ विमानतळांची संख्याच वाढलेली नाही, तर आपल्या उडान योजनेमुळे आज गरीब कुटुंबातील लोकांनाही विमानप्रवासाची संधी मिळत आहे. या योजनेने गरीबातील गरीब व्यक्तीलाही आपले स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली आहे. यासाठी 29,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मित्रांनो,

विमान वाहतूक क्षेत्रात देशाने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. काही दिवसांपूर्वी काशीमध्ये ज्या स्पोक एअरपोर्ट मॉडेलचा शुभारंभ झाला, तेच मॉडेल आज पंजाबमधील अमृतसरपर्यंत पोहोचले आहे. यामुळे अमृतसर 25 हून अधिक आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी जोडले जाईल. या कामगिरीबद्दल आंध्र प्रदेशच्या या भूमीवरून मी पंजाबच्या जनतेचेही अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आपल्या आंध्र प्रदेशमध्ये नेहमीच विकसित भारताचे विकास इंजिन बनण्याचे सामर्थ्य राहिले आहे. आंध्र प्रदेशच्या विकासासाठी आपले प्रयत्न डबल इंजिनच्या वेगाने पुढे जावेत, यासाठी मी आंध्र प्रदेशच्या जनतेकडे डबल इंजिन सरकारसाठी आशीर्वाद मागितला होता. आणि आज चंद्राबाबू नायडू जी यांच्या नेतृत्वाखाली, पवन कल्याण जी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची संपूर्ण टीम आंध्र प्रदेशसाठी दुप्पट वेगाने काम करत आहे.

मित्रांनो,

आज देशाची नील अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. हा संपूर्ण प्रदेश किनारी अर्थव्यवस्था कॉरिडोर म्हणून विकसित व्हावा, ही आपली संकल्पना आहे. याच उद्दिष्टाने विशाखापट्टणमपासून कृष्णापट्टणमपर्यंत आपल्या जुन्या बंदरांचे आधुनिकीकरण केले जात आहे. याशिवाय, मूलपेटा आणि रामायपट्टणम येथे आपण नवीन बंदरेही उभारत आहोत.

मित्रांनो,

बंदरांच्या विकासाबरोबरच संपूर्ण आंध्र प्रदेशात महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचे जाळे उभारले जात आहे. विशाखापट्टणम-रायपूर द्रुतगती मार्गासारखे प्रकल्प या संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला गती देत आहेत.

मित्रांनो,

हा संपूर्ण प्रदेश देशातील मोठ्या औद्योगिक केंद्रांशी सहजपणे जोडला जावा, यासाठी आज आंध्र प्रदेशात सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू आहे. राज्यातील संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. येथील 70 हून अधिक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरणही केले जात आहे.

मित्रांनो,

आज या प्रदेशाच्या विकासात पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रदेशातील रेल्वे, बंदरे आणि विमानतळांना परस्परांशी जोडले जात आहे. जेव्हा येथे हे आधुनिक लॉजिस्टिक्स नेटवर्क तयार होईल, तेव्हा उद्योगांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल, शेतकऱ्यांना फायदा होईल आणि व्यवसाय सुलभताही वाढेल.

मित्रांनो,

आंध्र प्रदेश हा नेहमीच भविष्याचा विचार करणारा प्रदेश राहिला आहे. सॉफ्टवेअर, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आंध्र प्रदेशच्या युवकांनी संपूर्ण जगात आपली छाप पाडली आहे. म्हणूनच, सरकार येथील प्रतिभेला आंध्र प्रदेशच्या विकासशक्तीशी जोडू इच्छिते. आपल्या प्रतिभावान युवकांच्या कौशल्याचा जास्तीत जास्त लाभ आंध्र प्रदेश आणि देशाला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आता आमचा भर सेमीकंडक्टरसारख्या भविष्यकालीन तंत्रज्ञान उद्योगांवर आहे. विशाखापट्टणममध्ये नव्या सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी हे याच दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे. चंद्राबाबू यांच्या नेतृत्वाखाली आपला आंध्र प्रदेश आता सॉफ्टवेअरसह उत्पादन क्षेत्राचेही केंद्र बनेल. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये भविष्यकालीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि तंत्रज्ञान उद्योगांसाठी नवे वातावरण तयार होईल.

मित्रांनो,

जागतिक अर्थव्यवस्थेत कुठेही, कोणत्याही विकास केंद्राची निर्मिती केवळ एका कारखान्यामुळे होऊ शकत नाही. त्यासाठी संपूर्ण परिसंस्थेची आवश्यकता असते. आज आंध्र प्रदेशमध्ये आपण विकासाची अशीच परिसंस्था तयार करत आहोत. चंद्राबाबू नायडू जी वैयक्तिक पातळीवर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. याचाच परिणाम म्हणून आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या येथे गुंतवणूक करण्यासाठी येऊ इच्छित आहेत.

मित्रांनो,

येथे सेमीकंडक्टरसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटरवरही काम सुरू आहे. गुगलनेही येथे 15 अब्ज डॉलरच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधा संकुलाची घोषणा केली आहे. आणखी अनेक जागतिक कंपन्या येथे नव्या संधी पाहत आहेत. याचा मोठा फायदा आंध्र प्रदेशासोबतच देशातील युवकांना होत आहे.

मित्रांनो,

आंध्र प्रदेशची औद्योगिक विकासाची गाथा केवळ डिजिटल तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही. नक्कापल्ली येथे केंद्र सरकार मोठ्या फार्मा पार्कसाठीही सहकार्य करत आहे. यामुळे आंध्र प्रदेश देशातील एक मोठे फार्मा हब म्हणूनही विकसित होईल. हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही केवळ रायलसीमा प्रदेशात 5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे.

मी आज आंध्र प्रदेशच्या आपणा सर्वांना पुन्हा विश्वास देतो की, या सर्व संभाव्यतांना साकार करण्यासाठी ही डबल इंजिन सरकार दिवस-रात्र कार्यरत राहील.

मित्रांनो,

आज आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येक क्षेत्रात ज्या वेगाने काम सुरू आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, गेल्या 3 दौऱ्यांमध्येच मी येथे 2 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. मला आनंद आहे की आंध्र प्रदेशच्या या विकासयात्रेत ‘उत्तर आंध्र’ देखील अधिक सक्षम होत आहे. आम्ही विशाखापट्टणम आर्थिक प्रदेशाला देशातील एक मोठे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करत आहोत. हा प्रदेश आशियातील प्रमुख आर्थिक केंद्र बनावे, हे आमचे लक्ष्य आहे. विमानतळापासून ते सेमीकंडक्टर युनिटपर्यंतचे प्रकल्प याच अभियानाचा भाग आहेत.

मित्रांनो,

आमच्या सरकारचा मंत्र आहे — गुंतवणुकीतून रोजगारनिर्मिती. म्हणूनच सरकारने स्वतःच्या स्तरावरही गुंतवणूक वाढवली आहे आणि खासगी क्षेत्रालाही गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करत आहोत. तुम्हालाही माहीत आहे की, गुंतवणूक वाढली की उत्पादन वाढते, उत्पादन वाढले की निर्यात वाढते, निर्यात वाढली की रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात आणि रोजगार वाढला की लोकांचे उत्पन्न वाढते. त्यामुळे कुटुंबांचे जीवनमान सुधारते आणि आंध्र प्रदेशमध्ये आपण हेच घडताना पाहत आहोत.

मित्रांनो,

आज येथे ज्या प्रकल्पांचा शुभारंभ झाला आहे आणि ज्यांची पायाभरणी करण्यात आली आहे, ते सर्व प्रकल्प ‘स्वर्ण आंध्र’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पना साकार करण्यासाठी मोठे योगदान देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. चंद्राबाबू जी यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेश विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एक मोठा ऊर्जास्रोत बनत आहे.

या सर्व प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा आंध्र प्रदेशच्या जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

खूप-खूप धन्यवाद!

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

खूप-खूप धन्यवाद!