Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसाममधल्या गुवाहाटी इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

आसाममधल्या गुवाहाटी इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन


 

मुर मरोमोर गुवाहाटी बाशी राइज, आपुनालोकक मोई मुर, आंतोरिक नमोश्कार जोनाइशु।

आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, इथले  लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, राज्य सरकारचा उपस्थित मंत्री वर्ग, लोकप्रतिनिधी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी देशभरातून जोडले गेलेले आपले सर्व अन्नदाता,चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या माझ्या बंधू-भगिनी, आणि मी पाहत आहे आपले अनेक ज्येष्ठ मुख्यमंत्री देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेले आहेत, सर्वाना माझा नमस्कार.

बंधू आणि भगिनींनो,

नवरात्रापूर्वी,कामाख्या मातेच्या या पवित्र भूमीवर आपणा सर्वांना पाहण्याचे भाग्य मला आज लाभले आहे. कामाख्या मातेच्या आशीर्वादाने, काही वेळापूर्वीच इथे साडेएकोणीस हजार कोटी रूपयांच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले आहे. आसामच्या उर्जा क्षेत्राला आत्मनिर्भर करणाऱ्या प्रकल्पांपासून ते आसाममध्ये येणाऱ्या लोकांच्या सुविधांपर्यंत असे खूप प्रकल्प आसामला प्राप्त झाले आहेत. देशातले शेतकरी आणि आसाममध्ये चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांसाठी आजचा महत्वाचा दिवस आहे. थोड्या वेळापूर्वी संपूर्ण देशात पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत,18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आपल्या कोट्यवधी अन्नदात्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे. याशिवाय आसाममध्ये चहाच्या मळ्याशी संबंधित अनेक कुटुंबांना आज जमिनीचे पट्टे देण्यात आले आहेत. आसामच्या जनतेचे, इथल्या सर्व कुटुंबाचे  आणि देशभरातल्या  शेतकऱ्यांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो.

मित्रहो,

 आज देशभरातले शेतकरी कामाख्या मातेच्या या भूमीशी जोडले गेले आहेत. थोड्या वेळापूर्वी,कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जमा झाल्याचा संदेश, त्यांच्या मोबाईलवर पोहोचला आहे. ही योजना खरोखरच अद्भुत आहे. एका क्लिकवर कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक  खात्यात थेट पैसे जमा होतात. जगातल्या विकसित देशांमध्येही हे शक्य नाही आणि मला परदेशी पाहुणे जेव्हा भेटतात तेव्हा या विषयावर अनेक प्रश्न विचारतात, माहितीसाठी इतके उत्सुक असतात की हे कसे शक्य होत आहे. जगातल्या मोठ्या-मोठ्या देशातल्या मोठ्या-मोठ्या नेत्यांनांही याचे मोठे आश्चर्य वाटते. हे माझे तेच शेतकरी बंधू-भगिनी आहेत ज्यांच्यापैकी बहुतेकांकडे 2014 पूर्वी ना मोबाईल फोन होता, ना बँकेत त्यांचे खाते होते. आज अशा कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत सव्वा चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा झाले आहेत. यामध्ये आसाममधल्या सुमारे 19 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे ज्यांना आतापर्यंत सुमारे आठ हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

मित्रहो,    

मला आठवतेय, जेव्हा पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु झाली तेव्हा अफवा पसरविण्यात, असत्य बोलण्यात माहीर असलेले काँग्रेसवाले सांगत असत की मोदी आज या योजनेद्वारे पैसे देत असले तरी निवडणुकीनंतर हे पैसे परत करावे लागतील, खोटे बोलण्यात हे लोक पुढे आहेत. मात्र सन्मान निधीची ही योजना देशातल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षेचे माध्यम बनली आहे.

मित्रहो,

भाजपा- रालोआ सरकारसाठी, शेतकऱ्यांच्या हितापेक्षा मोठे काही नाही. शेतकऱ्यांना पैसे देण्याची वेळ येत असे तेव्हा कॉंग्रेसवाले टाळाटाळ करत असत. मी आपणाला एक उदाहरण देतो. 2014 पूर्वी केंद्रात 10 वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते. कॉंग्रेस सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना एम एस पी च्या रूपाने साडेसहा लाख कोटी रुपये मिळाले होते, 10  वर्षांमध्ये साडेसहा लाख कोटी रुपये. तर आमच्या सरकारच्या 10 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना एम एस पी च्या रूपाने वीस  लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत.

मित्रहो,

गेल्या 11 वर्षांमध्ये, भाजपा- रालोआ सरकारने देशातल्या शेतकऱ्यांसाठी मजबूत सुरक्षा कवच तयार केले आहे. एम एस पी असो,स्वस्त कर्ज असो,पीक विमा असो,पीएम किसान सन्मान निधी असो,या योजना शेतकऱ्यांसाठी मोठ्या सहाय्यकारक ठरल्या आहेत.इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संकटाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होऊ नये याकडेही आम्ही लक्ष पुरवले आहे. कोरोना आणि त्यानंतर जी युद्ध झाली त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमतीत अनेक पटीने वाढ झाली होती. परदेशी बाजारांमध्ये खते मिळणेही कठीण झाले होते.मात्र केंद्र सरकारने हे संकट रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. युरियाची जी गोणी आंतरराष्ट्रीय बाजारात 3 हजार रुपयांना मिळते, ती आमच्या सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी फक्त 300 रुपयांमध्ये दिली आहे.यावर सरकारने आपल्या तिजोरीतून 12 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे जेणेकरून माझ्या शेतकऱ्यावर याचे ओझे पडू नये.सरकार आपल्या खांद्यावर हे ओझे घेत आहे.

मित्रहो,

गेल्या दशकात भाजपा-रालोआ सरकारने आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणखी एक मोठे काम केले आहे. बाह्य संकटांपासून कृषी क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन दिले आहे. आपण स्वतंत्र भारतात वारंवार पाहिले आहे की जेव्हा जगाच्या इतर भागात युद्धे होतात आणि पुरवठा साखळी विस्कळीत होते तेव्हा आपल्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. कधी खते महाग होतात, तर कधी डिझेल आणि ऊर्जेच्या किमती वाढतात. कारण अनेक दशके काँग्रेस पक्षाने देशाला परदेशांवर अवलंबून ठेवले. यामुळे शेतीचा खर्चही वाढत‌ असे.

मित्रांनो,

शेतकऱ्यांच्या शेतीला नवीन तंत्रज्ञान लाभावे, त्यांना सिंचनाच्या नवीन पद्धतींशी जोडले जावे आणि पिकांना फायदा मिळवून द्यावा, या उद्देशाने आमच्या सरकारने Per Drop More Crop म्हणजेच प्रति थेंब अधिक पीक हे धोरण आणले, शेतकऱ्यांना ठिबक आणि स्प्रिंकलर सारख्या सूक्ष्म सिंचन तंत्रांची उपलब्धता करून दिली. यामुळे सिंचन सुधारले आणि खर्चही कमी झाला. आज सरकार तुमच्या शेतांना सौर पंपांनी जोडण्याचे काम करत आहे आणि आमचा प्रयत्न आहे की तुमचा डिझेलवरील खर्च कमीत कमी व्हावा. केंद्राने आणलेली कुसुम योजना याच कारणासाठी आहे. आज बरेच शेतकरी केवळ सौर पंप बसवून सिंचन करत नाहीत तर त्यापासून वीज निर्मिती करून पैसे कमवत आहेत. आणि म्हणूनच मी म्हणतो, अन्नदात्याने ऊर्जादाता बनले पाहिजे.

मित्रांनो,

खते आणि कीटकनाशकांवरील शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी व्हावे, यादृष्टीने आमचा सतत प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील पाच मोठे खत कारखाने बंद पडले. आम्ही ते खत कारखाने पुन्हा सुरू केले. यासोबतच शेतकऱ्यांना नॅनो युरियाशी जोडण्यासाठी कित्येक कामे केली. आज देशातील शेतकऱ्यांना त्याचे फायदे मिळत आहेत. आता भाजपा-रालोआ सरकार देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित करत आहे. जेव्हा शेतकरी नैसर्गिक शेतीचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करतील तेव्हा माती सुरक्षित राहील आणि आपले अन्नदातेदेखील जागतिक संकटांपासून सुरक्षित राहतील.

मित्रांनो,

एकीकडे, भाजपा-रालोआ सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे आणि देशाला स्वावलंबी बनवत आहे तर आज काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ते कोणत्याही परिस्थितीत देशाशी एकनिष्ठ नाहीत. युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटातही काँग्रेस फक्त अफवा पसरवण्यात आणि प्रचार करण्यात गुंतलेली आहे. आणि मी माझ्या काँग्रेस सहकाऱ्यांना एक गोष्ट करायला सांगू इच्छितो: लाल किल्ल्यावरून पंडित नेहरूंनी 15 ऑगस्ट रोजी केलेले भाषण जरा ऐका. तुम्हाला आश्चर्य वाटेल. 15 ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी लाल किल्ल्यावरून सांगितले की उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधील युद्धामुळे भारतात महागाई वाढत आहे. आता, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया कुठे आहेत आणि नेहरू इथे वाढत्या महागाईबद्दल बोलत होते! आणि आज काँग्रेस सदस्य देशाची दिशाभूल करण्यात व्यग्र आहेत. जागतिक संकटांचा परिणाम जग पाहत आहे.

मित्रांनो,

भाजपा-रालोआ सरकारने आपल्या रिफायनरीज विकसित करण्यासाठी आणि आपली रिफायनरीज क्षमता वाढवण्यासाठी काम केले आहे. आज भारत हा असा देश आहे जो केवळ स्वतःच्याच नव्हे तर जगाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करू शकतो. अलिकडच्या काळात आसाममधील आपल्या रिफायनरीजचाही विस्तार झाला आहे. आसामसह संपूर्ण ईशान्येकडील गॅस पाइपलाइन पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे. नुमालीगड-सिलीगुडी पाइपलाइनचे उन्नतीकरणदेखील पूर्ण झाले आहे. आणि जगातील पहिला सेकंड जनरेशन बायो-इथेनॉल प्लांट देखील आसाममधील गोलाघाट येथे स्थापित करण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांचा संपूर्ण प्रदेशाला मोठा फायदा होईल.

मित्रांनो,

रेल्वेचे परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच आपल्याला परदेशातून कमी तेल आयात करावे लागेल यासाठी गेल्या दशकभरात भरपूर काम झाले आहे. गेल्या दहा वर्षांत, आज देशातील जवळजवळ संपूर्ण रेल्वे नेटवर्क विद्युत मार्गाने जोडले गेले आहे. आणि लवकरच आपण १०० टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य देखील साध्य करणार आहोत. या विद्युतीकरणामुळे, देशात अंदाजे पावणे दोनशे कोटी लिटर डिझेलची बचत होत आहे. आसाममध्येही रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण वेगाने होत आहे. आजही येथे रेल्वेच्या विद्युतीकरणाशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे.

मित्रांनो,

आसाम, अक्षय ऊर्जेशी संबंधित देशाच्या संकल्पसिद्धीमधील मोठी भूमिका देखील बजावत आहे. लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्पाचा फायदा आसाम आणि संपूर्ण ईशान्येला होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आसाममध्ये सुरू झालेले हजारो कोटी रुपयांचे हे प्रकल्प आसाममधील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहेत आणि आसामची समृद्धी वाढवत आहेत.

मित्रांनो,

संवेदनशीलता आणि सुशासन‌ हे भाजपा-रालोआच्या डबल-इंजिन सरकारचे वैशिष्ट्य आहे. देशातील प्रत्येक क्षेत्राचा आणि प्रत्येक वर्गाचा विकास ही आमची प्राथमिकता आहे. याच भावनेने, आज आसामच्या चहाबागांमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी एक मोठा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्यांच्या कठोर परिश्रमाने आसामला जागतिक ओळख प्रस्थापित करून दिली, ज्यांनी पिकविलेल्या चहाचा सुगंध जगभरात भारताचे वैशिष्ट्य बनला आहे, त्यांना आज भाजपा- रालोआ सरकार सन्मानित करत आहे आणि सहाय्यही करत आहे. काँग्रेस सरकारने या सहकाऱ्यांशी सल्लामसलतही केली नाही; त्यांच्याकडे जमिनीची कायदेशीर कागदपत्रेही नव्हती. मी हिमंताजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. तुम्ही या चहा बागायतदार कुटुंबांसाठी खूप चांगले काम केले आहे. आज आसाम सरकार हा ऐतिहासिक अन्याय संपवण्यासाठी काम करत आहे. आता या कुटुंबांकडे स्वतःची जमीन आहे आणि त्यांच्यासाठी कायमस्वरूपी घरांचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा फायदा विशेषतः चहा बागायतदार भगिनींना होईल. चहा बागायतदार कुटुंबांच्या मुलांनीही चांगले शिक्षण घ्यावे आणि प्रगती करावी, अशी माझी इच्छा आहे. आणि भाजप सरकारने यासाठी सर्व सुविधा निर्माण केल्या आहेत. म्हणूनच प्रत्येक चहा बागायतदार म्हणत आहे, “आको एबार, भाजप शोरकर!” आणि माझ्यासाठी, माझ्या चहा बागायतदारांचा सन्मान करणे म्हणजे मी कर्ज फेडत असल्यासारखे आहे. तुम्ही बागांमध्ये काम करत होता, ती चहाची पाने दूर गुजरातमधील माझ्या गावात पोहोचली आणि मी चहा विकून येथे पोहोचलो. आता मला सांगा, जर चहा बागायतदारांचे आशीर्वाद नसते तर मी येथे पोहोचलो असतो का? चहा बागायतदारांचा चहा माझ्याकडे पोहोचला आणि मी आज तुमच्यामध्ये आहे. आणि कामाख्या माता किती दयाळू आहे ते पहा, आज कामाख्या देवी मातेने मला माझ्या चहा बागायतदार बांधवांचे ऋण फेडण्याची संधी दिली आहे.

मित्रहो,

आज, प्रसिद्ध निमाती घाट आणि विश्वनाथ घाट येथे आधुनिक क्रूझ टर्मिनल्सच्या बांधकामाचे काम सुरू झाले आहे. हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नाही; हा प्रकल्प आसाममधील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा देणारा आहे. भाजप सरकारने पर्यटन केवळ प्रेक्षणीय स्थळांपुरते मर्यादित ठेवले नाही, तर त्याकडे रोजगार आणि विकासासाठी एक मोठी संधी म्हणून पाहिले आहे. या दृष्टिकोनातून, ब्रह्मपुत्रा नदीवर जल पर्यटनाची क्षमता वाढवली जात आहे. क्रूझ टर्मिनल्सच्या बांधकामामुळे ब्रह्मपुत्रेवरील क्रूझ व्यवसाय वाढीला लागेल, आणि भारत आणि परदेशातील पर्यटकांना आसाममध्ये पोहोचणे सोपे होईल. क्रूझ पर्यटन वाढत असताना, स्थानिक युवा वर्गासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. कारागीर आणि हस्तकलेत गुंतलेल्यांना एक नवीन बाजारपेठ मिळेल. लहान दुकानदार, खलाशी, हॉटेल व्यावसायिक आणि वाहतूक कामगारांचे उत्पन्न देखील वाढेल. याचा अर्थ असा की आसाममधील पर्यटन आता केवळ प्रेक्षणीय स्थळांपुरते मर्यादित राहिलेले नाही; ते स्थानिक विकास आणि सार्वजनिक समृद्धीचे एक नवीन इंजिन बनत आहे.

मित्रहो,

आज आसाम आपल्या ईशान्येकडील, अष्टलक्ष्मीच्या नवीन भविष्याचा आदर्श ठरते आहे. त्याची प्रगती ईशान्येकडील सर्व राज्यांना नवीन प्रेरणा देत आहे. गेल्या दशकात भाजप-रालोआ सरकारने आसाममध्ये घडवलेल्या परिवर्तनाचा प्रभाव शेजारच्या पश्चिम बंगालमध्येही दिसून येतो आहे. तिथेही लोकांना भाजप-रालोआकडून असेच सुशासन हवे आहे. म्हणूनच, मी आसाममधील प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक कुटुंबाला आवाहन करू इच्छितो की आपण विकसित आसामसाठी एकत्र काम करत राहिले पाहिजे, जेणेकरून आसाम हे देशातील एक आदर्श राज्य म्हणून उदयास येईल. या आग्रहासह, या कार्यक्रमात आमच्यासोबत आलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करू इच्छितो: तुमच्या राज्यांतील उत्पादने येथे विकण्याची व्यवस्था करा. येथे थोडी जागा घ्या आणि जर आसाममधील कोणाला केरळमधून काही हवे असेल तर त्यांनी ते येथे शोधावे; जर कोणाला महाराष्ट्रातून काही हवे असेल तर त्यांनी ते येथे शोधावे; जर कोणाला गुजरातमधून काही हवे असेल तर त्यांनी ते येथे शोधावे; जर कोणाला राजस्थानमधून काही हवे असेल तर त्यांनी ते येथे शोधावे; म्हणजेच, संपूर्ण देशाची एकता दिसून यावी. या मॉलमध्ये भारतातील सर्व राज्यांमधून, आसामच्या प्रत्येक जिल्ह्यातून लोक उपस्थित असले पाहिजेत. एक जिल्हा, एक उत्पादन, म्हणजे जो कोणी एकता मॉलला भेट देईल त्याला तिथे संपूर्ण भारत सापडेल. आणि आसामची भूमी संपूर्ण देशासाठी एक आदर्श निर्माण करेल आणि हे एकता मॉल प्रत्येक राज्यात यशस्वीरित्या बांधले जातील, असा विश्वास मला वाटतो. तुमच्या विकास प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्याशी जोडलेल्या देशभरातील शेतकरी मित्रांचेही मी मनापासून आभार मानतो. काही दिवसांत नवरात्र सुरू होत असताना, कामाख्या मातेचे आशीर्वाद आपल्या सर्व देशवासीयांवर राहोत आणि आपण सर्व आव्हानांवर मात करून नवीन आत्मविश्वास आणि शक्तीने पुढे जाऊ या, अशी प्रार्थना मी कामाख्या मातेला प्रार्थना करतो. माझ्या अनेकानेक शुभेच्छा.

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

वंदे मातरम्!

***

यश राणे / नीलिमा चितळे / नंदिनी मथुरे / माधुरी पांगे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai