Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जर्मनीच्या चॅन्सेलर डॉ. मर्केल यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन


चॅन्सेलर डॉ. मर्केल,

जर्मन प्रतिनिधी मंडळाचे सन्मानीय सदस्य,

मंत्रीमंडळातले माझे सहकारी,

मित्रहो,

नमस्कार

गुटेन टाग

चॅन्सेलर डॉ. मर्केल आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करताना मला आनंद होत आहे. चॅन्सेलर मर्केल यांची केवळ जर्मनी आणि युरोपमध्ये नव्हे तर जगाची दीर्घ काळ सेवा करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये गणना होते. मर्केल या माझ्या आणि भारताच्या स्नेही आहेत याचा मला अभिमान आणि आनंदही आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर या नात्याने गेली दिड दशक त्यांनी भारत-जर्मनी संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. यासाठी मी त्यांचा आभारी आहे. आज मर्केल यांच्या समवेत आंतरसरकारी सल्लामसलतीची पाचवी बैठक झाली. दर दोन वर्षांनी होणाऱ्या अशा बैठकींपैकी मर्केल यांच्या समवेत तीन बैठकांमध्ये सहभागी होण्याची संधी मला लाभली. या आगळ्या यंत्रणेमुळे प्रत्येक क्षेत्रात दोन्ही देशांमधले सहकार्य अधिक दृढ झाले आहे. आज ज्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या त्यातून हे दृढ झालेले सहकार्य प्रतीत होत आहे. भारत आणि जर्मनी यांच्यात प्रत्येक क्षेत्रात विशेष करुन नव्या आणि अद्ययावत तंत्रज्ञानात दूरगामी आणि धोरणात्मक सहकार्य वृद्घींगत होत आहे याचा मला आनंद आहे.

मित्रहो,

2022 मध्ये स्वतंत्र भारताला 75 वर्ष होतील. 2022 पर्यंत नव भारत निर्मितीचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. या बहुआयामी प्रयत्नांमध्ये भारताच्या गरजा आणि आवश्यकतांसाठी जर्मनीच्या तंत्रविषयक क्षमतांचा उपयोग होईल यासाठी आम्ही नव आणि अद्ययावत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता कौशल्य, शिक्षण, सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. ई-मोबॅलिटी, फ्युएल सेल टेक्नॉलॉजी, स्मार्ट सिटीज्‌, किनारी व्यवस्थापन, नद्यांची सफाई आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात सहकार्याच्या नव्या संधी विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या क्षेत्रांमधले आमचे सहकार्य हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठीच्या प्रयत्नात उपयुक्त ठरतील. व्यापार आणि गुंतवणुक क्षेत्रात दोन्ही देशांमधली वाढत्या भागीदारीला अधिक गती देण्यासाठी खाजगी क्षेत्राला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. चॅन्सेलर मर्केन आणि मी दोन्ही देशाच्या काही प्रमुख उद्योग धुरीणांसमवेत चर्चा करणार आहोत. संरक्षण उत्पादन क्षेत्रात उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधल्या संरक्षण कॉरिडॉरमुळे उपलब्ध होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही जर्मनीला आमंत्रित करत आहोत.

मित्रहो,

भारत आणि जर्मनी यांच्यातला विश्वास आणि मैत्रीपूर्ण संबंध हे लोकशाही कायद्याचे राज्य यासारख्या सामाईक मूल्यांवर आधारित आहेत. म्हणूनच जगातल्या गंभीर आव्हानांबाबत दोन्ही देशांच्या दृष्टीकोनात समानता आहे. याबाबत आमच्यामधली विस्तृत चर्चा संध्याकाळीही सुरु राहील. दहशतवादासारख्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य आम्ही अधिक दृढ करणार आहोत. निर्यात नियमन धोरण आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या सदस्यतेसाठी जर्मनीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत. संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अत्यावश्यक सुधारणा लवकरच व्हाव्यात यासाठी आम्ही सहकार्य आणि प्रयत्न जारी ठेवू. भारत-जर्मनी संबंधांचे भविष्य उज्ज्वल आहे. म्हणूनच आपले कुशल नेतृत्व आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या बहुमोल सहकार्यासाठी मी धन्यवाद देतो.

डान्के शोएन

खूप-खूप धन्यवाद.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar