Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दलित उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

दलित  उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

दलित  उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

दलित  उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

दलित  उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि मान्यवर,

आपण सर्वांनी उभे राहून मला सन्मानित केले मात्र या सन्मानावर अधिकार असणारी व्यक्ती आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि म्हणूनच आपण जो सन्मान दिलात त्यावर हक्क असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी हा सन्मान मी समर्पित करत आहे.

काही दिवसांपूर्वीच मी “मन की बात” कार्यक्रमात एका गोष्टीचा उल्लेख केला होता. डॉ. बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिली मात्र स्वातंत्र्याच्या 60 वर्षात आपण अधिकारांची जास्त चर्चा करतो, देशात कुठेही बघा अधिकारांचीच चर्चा होत असते या 26 जानेवारीला आपण कर्तव्याबाबत चर्चा का करु नये अशी बाब मी मन की बात मध्ये उपस्थित केली होती. मात्र मी स्वीकार करतो, विनम्रतेने स्वीकार करतो की या सभागृहात उपस्थित लोकांनी केवळ कर्तव्यावर चर्चा नव्‍हे तर कर्तव्य बजावले आहे. अधिकारांबाबत चर्चा करु शकत होते मात्र त्यांनी कर्तव्याचा मार्ग निवडला आणि आज आत्मसन्मानासह आत्मनिर्भर होऊन या सभागृहात आज उपस्थित आहेत. यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचा आत्मा नक्कीच सुखावला असेल. हे सभागृह राजकारणी व्यक्तीनी भरले असते त्यात सर्व अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांनी भरले असते त्यात माझ्यासारखा मागासही असता तरीही बाबासाहेब जेवढे आनंदी झाले नसते तेवढे आज आनंदी असते. कारण बाबासाहेबांनी आपल्याला कोणती शिकवण दिली ? बाबासाहेबांनी जे शिकविले तोच मार्ग आपण निवडला आहे. या सभागृहात असे लोक आहेत जे सरकारच्या तिजोरीत भर घालतात आणि हे लोक आहेत जे लाखो तरुणांना रोजगार पुरवितात. हे असे लोक आहेत जे सरकारच्या तिजोरीत भर घालण्याबरोबरच गरीबांचे पोटही भरतात.

आपल्यात येऊन सर्वांना भेटण्याचे भाग्य मला लाभले. मी मिलिंद आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. येथे जे प्रतिनिधी आले आहेत ते आपल्या खिशातून 1500 रुपये प्रतिनिधी शुल्क भरुन आले असल्याची माहिती मला मिळाली आहे. आणि स्वखर्चाने या हॉटेलात वास्तव्य करत आहेत. देशात कसा जमाना आलाय आपण जाणताच. येण्याबद्दल कोणी विचारले की काय देणार अशी विचारणा होते. आणि म्हणूनच जुना विचार बदलण्यासाठी आम्हाला भाग पडेल. कारण आपण असे करुन दाखविले जे नव्या दृष्टीकोनातून विचार करायला लावेल.

या प्रवासाला दहा वर्ष झाली आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती आपण साजरी करत आहोत हा सुखद योगायोग आहे. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण बाबासाहेबांना आपण जास्त ओळखतो मात्र अर्थतज्ञ म्हणून त्यांची जास्त ओळख झालेली नाही. भारताच्या आर्थिक समस्यांच्या निराकरणाचे सर्व मार्ग आपल्याला बाबासाहेबांच्या विचारात मिळतील.

ज्या रिझर्व बँकेची कल्पना बाबासाहेबांनी केली होती आणि ज्या कारणास्तव रिझर्व बँकेची स्थापना झाली याचा विचार मी करतो त्याचवेळी जेव्हा एखाद्या दलित व्यक्तीला बँकेतून कर्ज घेताना अनेक व्यापांना सामोरे जायला लागते तेव्हा दु:ख होते. ही परिस्थिती बदलायला हवी समाजात एक वर्ग असा आहे ज्या वर्गाला थंडी म्हणजे काय, उकाडा कसा असतो, अनवाणी पायाने चालताना खडे कसे टोचतात याची माहिती नसते. मात्र हे असे लोक आहेत ज्यांनी जीवनात अनेक कष्ट झेलले आहेत, अपमान पचवले आहेत, संकटाचा मुकाबला केला आहे आणि कठीण प्रसंगातून तावून सुलाखून निघत जीवनाला आकार देत आला आहे, याची ताकद केवढी आहे याचा मला अंदाज आहे. लोखंडाला किंमत असतेच पण त्यापेक्षा स्टीलचे मूल्य जास्त असते कारण ते प्रक्रियातून तावून सुलाखून निघते.

आपण सर्व आत्मनिर्भर आणि आत्मभिमानीही आहात. तीन हजारापेक्षा जास्त दलित उद्योजक याचे सदस्य आहेत. पण मी मिलिंदला सांगत होतो समाजात तीन हजारहूनही जास्त झाले आहेत. त्यांच्यापर्यंत आपण कसे पोहोचणार ? त्यांना या प्रवाहात कसे आणणार ? मी मिलिंद असा उल्लेख करतो कारण मी त्याला विद्यार्थी दशेपासून ओळखतो.

कल्पनाताईंच्या नेतृत्वाखाली 300 महिला उद्योजकांचे एक युनिट तयार झाले आहे. मी आता कर्नाटकच्या कन्येचा सन्मान केला आपण पाहिलेच असेल. पर्यावरणावर जे लोक चर्चा करतात, पॅरिसमध्ये मोठे-मोठे समारंभ होतात तर त्यावरचा मार्ग कर्नाटकमधली एक दलित कन्या शोधते. हे आपण लोकांसमोर आणत नाही, रतीभाईना मी ओळखतोच माझ्या भावनगरमधले आहेत. त्यांनी जीवनात कसा मार्ग काढला कशी आगेकूच केली मी जाणतो. समाजात ही शक्ती आहे. काही लोकांना वाटते की हा केवळ आर्थिक आणि व्यावसायिक जगाच्या चर्चेचा विषय आहे मी त्यापासून थोडे दूर जाऊन बोलू इच्छितो. या साऱ्या घटनांचा एक सामाजिक स्तंभ आहे. आणि देशाने याकडे लक्ष द्यावे अशी माझी इच्छा आहे. हे सभागृह अपुरे पडत असल्याचे दुसऱ्या सभागृहात काही जण बसल्याचे मला समजले. सुमारे पावणे चारशे युवक तिथे बसले आहेत त्यांनाही माझा सलाम !

कधी कधी आपण बातम्या ऐकतो की जीवनात नैराश्य आल्याने माणूस विचार करतो की आता जगण्यात काय अर्थ ? माझ्याबरोबर कोणी नाही असा विचार करुन आत्महत्येच्या मार्गावर जातो. चांगल्या घरातले तरुणही कधी कधी या मार्गाला लागतात, ज्यांच्या मनात कधी आत्महत्येचा विचार येत असेल त्यांना मी आग्रहपूर्वक सांगू इच्छितो की त्याआधी एकदा कल्पना सरोज यांना दूरध्वनी करा. फार कमी जणांना माहित असेल की कल्पना यांनी आपले आयुष्य कोठून कोठे नेले. किती संकटे झेलली. जीवन आणि मृत्यु यांच्यापैकी त्यांनी जीवनाचा मार्ग निवडला आणि आज आपल्यासमोर बसल्या आहेत. निराशेच्या वातावरणातही जगण्याची उमेद कोणी देऊ शकत असेल तर हा संपूर्ण समाज देऊ शकतो. ही शक्ती ओळखणे, ती ओळखून देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या दिशेने प्रयत्न करणे. आर्थिक पैलूपेक्षा कधी कधी सामाजिक पैलू ताकदीचे ठरतात. ज्‍या सामाजिक बाबी, शतकानुशतके आपल्याला संकटाकडे घेऊन गेल्‍या त्यांचे रुपांतर संधीत करुन समाजाला या संकटातून बाहेर काढण्याची ताकदही ठरु शकते. अशा शक्तींकडे आपले लक्ष जायला हवे.

सरकारने प्रथमच नवउद्योजकांसाठी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन केला आहे. हा प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आहे. कारण त्यांना उद्योजकता वारसा म्हणून कोठे मिळणार ? त्यांच्या आई-वडिलांनी कदाचित मोलमजुरी करुन आयुष्य कंठले असेल. बँकांना पण माझे सांगणे आहे की तुम्ही ब्राऊन फिल्ड प्रकल्पांना कर्ज दयायला उत्सुक असता, मला, ग्रीन फिल्डला दयायचे आहे. नवी ताकद तिथून येते, नवे लोक तिथून येतात. सरकारची जी प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे त्या अंतर्गत सुमारे 80 लाख लोकांना एक रुपयांची हमी न घेता बँकांनी कर्ज दिले. सुमारे 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिले गेले आणि हे कर्ज घेणारे कोण आहेत ? त्यामध्ये जास्त करुन दलित आहेत, इतर मागासवर्गीय आहे, अनुसूचित जमाती आणि महिला आहेत आणि हे लोक छोटी-छोटी कामे करतात. त्यांना वाटते आपण कामाची व्याप्ती वाढवावी. हे लोक आहेत जे एकाला रोजगार देतात, दोघांना रोजगार देतात तर कोणी तिघांना रोजगार पुरवितात. या देशात असे लोक सुमारे 14 कोटी लोकांना रोजगार देतात, मात्र ते बँकेच्या कक्षेत नव्हतेच. जो 300 लोकांना रोजगार देतो, अद्ययावत कारखाना काढतो तर बँकवाला त्याच्या घरी जायला तयार आहे. मात्र एका गावातले दहा लोक छोटी-छोटी काम करुन 50 लोकांना रोजगार देतात. त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. याच संदर्भात आमचे प्रयत्‍न सुरु आहेत.

आर्थिक सर्वसमावेशकता, देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोजा बनू शकते. यावर देशात कधीकाळी चर्चा झडत असे. माझे विचार वेगळे आहेत. पिरॅमिडचा पाया जितका मजबूत तेवढा पिरॅमिड मजबूत राहील. त्‍यावर जी कोटी कोटी जनता आहे, त्यांची ताकद वाढल्यास, देशाच्या अर्थव्यवस्थेचा ते भाग बनतात जसे मिलिंदने सांगितले की आम्ही रोजगार मिळवणार नाही तर रोजगार निर्माण करणारे बनू इच्छितो. आम्ही भारताच्या ढोबळ देशांतर्गत उत्पादनाचे भागीदार बनू इच्छितो. देशाच्या विकासाच्या प्रवासात खांद्याला खांदा भिडवून पुढे जाऊ इच्छितो. ताकद देशाला पुढे नेते.

सरकारने कौशल्य विकासावर भर दिला आहे. भारतात 65 टक्के जनता 35 पेक्षा कमी वय असलेली आहे. त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद आपल्याला द्यायची आहे. त्यांनी स्वत:बरोबरच आणखी दोन लोकांनाही पुढे न्यावे यासाठी त्यांचा उत्साह वाढवायचा आहे आणि अशी स्थिती निर्माण झाली तर देश आपोआपच पुढे जातो. त्यासाठी नव्या प्रयत्नांची गरज पडत नाही, आणि म्हणूनच या दहा वर्षांच्या प्रवासात आपण जे मिळवले आहे, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन दुप्पट मिळविण्याचा संकल्प आपण करु इच्छितो का ? हे शक्य आहे कारण दिल्लीमध्ये असे सरकार आहे जे आपले सरकार आहे.

मला कोणी समजावण्याची गरज पडत नाही कारण, अपमान काय असतो ते मला माहित आहे. जुन्या काळापासून आम्ही जाणतो. आत्मसन्मानासह पुढे वाटचाल करणे ही या सरकारची जबाबदारी आहे आणि तुम्हा सर्वांचा उत्साह मला नवी ऊर्जा देतो. म्हणूनच तुम्ही याची खात्री बाळगा की दिल्लीत आपला एक मित्र आहे जो ही बाब पुढे नेऊ इच्छितो आणि याबाबतीत मी अधिकारापेक्षा कर्तव्यावर भर देतो कारण हे माझ्या आवडीचे काम आहे कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखविला होता.

बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत, की दलिताच्या जवळ जमिन नाही तो जाणार कोठे ? रोजीरोटीसाठी त्याला औद्योगिकीकरणाद्वारेच संधी मिळेल. देशात औद्योगिकीकरण झाले तर दलितांना रोजगार मिळेल, त्यांच्याकडे तर शेतीही नाही ते कुठे जाणार ? या देशात औद्योगिकरणाचा सर्वात मोठा फायदा होतो तेव्हा वंचिताना रोजगार मिळतो त्यांच्या जीवनात बदल घडतो. बाबासाहेब आंबेडकरांचे हे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे.

बाबासाहेबांनी म्हटले आहे सुशिक्षित व्हा. आम्ही म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओ. शिक्षण बाकी असलेली कोण मुलगी बाकी आहे ? श्रीमंताच्या मुलींचे शिक्षण बाकी आहे ? आमच्याच परिवारातल्या मुली आहेत ज्यांचे शिक्षण बाकी आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिले होते ते आपणा सर्वांनी मिळून पूर्ण करायचे आहे. आणि ते पूर्ण होऊ शकते. आमचे हे दृश्य पाहून अर्थव्यवस्थेवर लिखाण करणाऱ्यांना नव्या दृष्टीकोनातून विचार करुन लिहावे लागेल. ते लिहितीलच असे मी सांगू शकत नाही मात्र लिहावे तर लागेलच. हा बदल आहे. समाजातल्या ज्या घटकांना कधी मान-सन्मान मिळत नव्हता असा घटक आज म्हणतो की मी अशी प्रगती करेन की दुसऱ्या कोणाला सन्मानाने जगण्याची संधी प्राप्त करुन देईल, त्याला रोजगार पुरवेन. हा विचारच शक्ती आहे आणि त्याच्या बळावरच तुम्ही पुढे वाटचाल करत आहात. मी पुन्हा एकवार अनेक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा भरवसा देतो. या खांद्याला खांदा भिडवून एकमेकांच्या साथीने वाटचाल करुया. मला आनंद आहे मिलिंद यांनी आता सांगितले की लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकर जिथे वास्तव्याला होते त्या घरात स्मारक बनविण्यात आले आहे त्याचे सर्वप्रथम श्रेय कोणाला जात असेल तर कल्पनाला कारण हा मुद्दा सर्वात आधी कल्पना यांनी उपस्थित केला होता त्यांनी सांगितले लक्ष दया या घराची विक्री होत आहे. आम्ही जागृत होताच त्यांचा आवाज आमच्या कानावर आला आणि आज ते घर प्रेरणास्रोत बनत आहे. देशाची युवा पिढी लंडनमध्ये जाईल तेव्हा पाहील की या जागेवर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतले आणि हिंदुस्थानला नवे जीवन देण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकवार सांगतो की आपण कर्तव्याचा जो मार्ग निवडला आहे त्याची देशालाही प्रेरणा देत राहा, आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहा. आपणा सर्वांना पुन्हा एकवार धन्यवाद !

N.Chitale/S.Tupe/M.Desai