पीएम्इंडिया
प्रिय बंधू-भगिनींनो,
येथून एक दीड किलोमीटरपर्यंत सर्वत्र डोकी दिसत आहेत. तिथे ऐकू येतंय का ? मी यापूर्वीही दुमका येथे आलो आहे, मात्र हे दृश्य काहीतरी वेगळेच भासत आहे. हा जो माहोल मी पाहत आहे, त्यावरुन हे स्पष्ट होत आहे की, झारखंडने विकासाचा मार्ग पूर्णपणे आत्मसात केला आहे. झारखंडच्या नागरिकांचाही विकासावरील विश्वास पक्का झाला आहे. मी आताच आणखी एका कार्यक्रमाला जाऊन आलो. त्या कार्यक्रमाबाबत मला वाटले की एखाद्या खोलीत 50-100 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असेल. मात्र तिथेही असाच जनसागर लोटला होता. तुम्ही दाखवलेल्या प्रेमासाठी मी मनापासून तुमचे खूप-खूप आभार मानतो, तुमचे अभिनंदन करतो.
आज इथे अनेक योजनांमध्ये माझा हातभार लावण्याची, जनता-जर्नादनाचे आशिर्वाद घेण्याची संधी मला मिळाली. आज 2 ऑक्टोबर आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, देश कुणासाठी चालायला हवा, मला वाटतं महात्मा गांधींपेक्षा मोठं आखणी कोणतेही नाव असू शकत नाही, ज्यांनी गरीबांची सेवा करण्याची प्रेरणा दिली. आणि आज महात्मा गांधींच्या जयंतीदिनी मला येथे गरीब, पीडित, शोषित, वंचित माझे आदिवासी, माझे मागास बंधू-भगिनी, माझ्या गरीब बंधू-भगिनी, त्यांच्या कल्याणासाठी काही योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. कोणी कल्पनाच करु शकणार नाही की इतक्या कमी वेळेत, झारखंड विकासाची नवी उंची गाठू शकेल, कुणीही कल्पना करु शकत नाही. प्रत्येक झारखंडवासियाला अभिमान वाटेल की आताच जागतिक बँकेने झारखंडची कशाप्रकारे प्रशंसा केली. नाहीतर जागतिक बँकेला समजलंच नसतं की झारखंड नावाचे कोणते राज्य देखील आहे आणि तिथे लोक राहतात. एक वेळ अशी होती की, झारखंड सुगम व्यापारामध्ये शेवटच्या क्रमांकावर होता, आणि झारखंडने अशी झेप घेतली, अशी झेप घेतली की आज ते 29 व्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमाकांवर आले आहे. संपूर्ण देशाच्या वतीने मी झारखंडचे मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, त्यांच्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांचे आणि झारखंडच्या जनतेचे कोटी कोटी अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुम्ही अद्भूत कामगिरी केली आहे.
एखादे राज्यसरकार झपाटयाने निर्णय घेऊन एकापाठोपाठ एक पावले उचलून अशाप्रकारे आपली स्थिती मजबूत करेल, बहुधा कोणतेही राज्य विचार करु शकणार नाही, जे झारखंडने करुन दाखवले आणि यासाठी तुम्ही सर्व अभिनंदनासाठी पात्र आहात. आज येथे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, समाजातील अशा लोकांना पैसे दिले जात आहेत, ज्यांनी कधी कल्पनाही केली नसेल की ते कधी सावकाराच्या तावडीतून सुटू शकतील. एखादा ऑटो रिक्शावाला जो भाडयाची ऑटो रिक्शा चालवतो, रोजचे दोनशे रुपये भाडे देतो, त्यांने कधी विचारही केला नसेल की कधी असेही सरकार येईल, जे मला येऊन सांगेल की तुझी स्वत:ची ऑटोरिक्शा घे, आता भाडयाने ऑटो रिक्षा ठेवण्याची आवश्यकता नाही.
आणि आज हे तुमच्यासमोर घडले आहे. आम्ही गेल्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री मुद्रा योजनेची घोषणा केली होती. या देशात छोटे-छोटे लोक, कोणी भाजी विकत असेल, कोणी केश कर्तनालय चालवत असेल, कोणी धोब्याचं दुकान चालवत असेल, कोणी ऑटोरिक्षा चालवत असेल, कोणी कारागिराचे काम करत असेल, कोणी कपडे शिवत असेल, एखादी गरीब विधवा घरी काही ना काही वस्तू बनवून विकत असेल, कुणी आपल्या घरात दोन-चार पाहुण्यांना जेवायला घालून पेइंग गेस्ट प्रमाणे आपला उदर-निर्वाह करत असतील. अगणित कोटयावधी लोक छोटे-छोटे लोक, मात्र त्यांच्याजवळ गरज भासेल तेव्हा पैसे घेण्यासाठी बँकांचे दरवाजे बंद होते. बँकेच्या दारापर्यंत जाण्याचा कधी विचारच केला नव्हता. आम्ही सर्वप्रथम प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून बँकांच्या सहकार्याने—- आणि मी आज भारतातील सर्व बँक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करु इच्छितो, त्यांचेही आभार मानू इच्छितो की त्यांनी गरीबांकडे लक्ष दिले, ते गरीबांसाठी पुढे आले. जनधन खाती उघडली आणि संपूर्ण देशभरातील कोटयावधी लोक ज्यांनी कधी बँकेचा दरवाजा देखील पाहिला नव्हता, त्यांची बँक खाती उघडण्यात आली. आता एक पाऊल आम्ही पुढे टाकले, खाती तर उघडली. आता त्यांचा बँकेतील व्यवहार वाढायला हवा आणि यातूनच प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा जन्म झाला आहे.
तुम्हाला तुमचा उदयोग चालवण्यासाठी बँकेकडून विविध प्रकारचे कर्ज मिळू शकते, पैसे मिळू शकतात. तुम्ही सावकरांकडे गेलात, तर 24 टक्के, 30 टक्के व्याज दयावे लागते, व्याजावर व्याज देखील दयावे लागते, 100 रुपये घेता, तेव्हा 10 रुपये कापून 90 रुपये देतात, 20 रुपये कापून 80 रुपये देतात आणि सामान्य व्यक्ती त्या सावकाराच्या व्याजातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. त्याचे कर्ज वाढतच जाते. या मुद्रा बँक योजनेद्वारा प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेद्वारे अशा लोकांना कर्ज दिले जाईल, जे आपला उद्योग वाढवू इच्छितात, काम पुढे नेऊ इच्छितात. एका जागी दुकान आहे. मुले मोठी झाली, दुसरे दुकान घ्यायचे आहे. एका जागी भाजी विकायला बसणारे आहेत, मात्र वाटतं की ठेला मिळाला लॉरी मिळाली तर फिरुन भाजी विकतील. सायकल मिळाली तर हे काम करु. ज्यांच्या मनात अशी स्वप्न होती, त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि तुम्हाला ऐकून आंनद होईल की हे सर्व सामान्य नागरिक आहेत. जवळजवळ गरीबीचं जिणं जगत आहेत. जर घरी एखादा आजारी पडला, तर औषध आणायला पैसे काढू शकत नाहीत, अशी कुटुंबं आहेत आणि गेल्या काही दिवसांत अंदाजे 42 लाख लोकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ पोचवण्यात आला आहे, सुमारे 26 हाजर कोटी रुपये. जे लोक आम्हाला गरीबांचे विरोधी म्हणतात ना, त्यांना माहित देखील नाही आणि या लोकांना पैसे दिले गेले आणि वैशिष्टये काय ? बँकेतून पैसे घ्यायचे असतील तर हमी हवी, कुणाचं घर हवं, गाडी हवी, त्याबदल्यात मिळत होते. आम्ही म्हटलं, गरीब बिचारा कुठून आणणार आणि घ्यायला गेला तर तो देखील अर्धे पैसे मागेल, मग हा काय करेल ? सरकारने नवे नियम बनवले की गरीबाकडून अशा प्रकारची हमी घेतली जाणार नाही. त्याला एकदा पैसे दिले जातील आणि मला विश्वास आहे की गरीब पै-पै चुकती करतो. कोणतीही गरीब व्यक्ती कधीही बँकेचा पैसा ठेवणार नाही आणि जेव्हा तो कमवेल तेव्हा नक्की पैसे परत करेल. हा माझा गरीबां प्रती विश्वास आहे कारण मी त्यांच्यामध्येच वाढलो आहे. मी त्यांना जवळून पाहिले आहे, मी गरीबांची श्रीमंती पाहिली आहे, गरीबांची इमानदारी पाहिली आहे आणि त्याच इमानदारीच्या विश्वासाने ही प्रधानमंत्री मुद्रा योजना घेऊन आलो आहे. येणाऱ्या दिवसात ही योजना आणखी चालणार आहे, आणि सगळयात आनंदाची गोष्ट, हे जे 42 लाख लोकांना पैसे देण्यात आले आहेत, मी अभिमानाने सांगतो की या 42 लाख लोकांपैकी 20 लाख, हा आकडा छोटा नाही, 20 लाख लोक ज्यांना पैसे मिळाले आहेत, त्या आपल्या माता-भगिनी आहेत, महिलांना मिळाले आहेत. यापेक्षा मोठे महिला सक्षमीकरण कधी होऊ शकत नाही. जर महिलांची आर्थिक स्थिती भक्कम झाली की निर्णय प्रक्रियेत त्या आपोआप भागीदार होतात. मुलगा देखील आईला विचारु लागतो, पती देखील आपल्या पत्नीला विचारु लागतो, घरात तिची एक ताकद उभी राहते आणि आपल्या माता-भगिनींच्या शक्तीचा वापर राष्ट्राच्या विकास यात्रेत त्यांना भागीदार बनवून आणखी मजबूत बनेल, हे काम प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून आले.
यापूर्वी जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेत होतात, त्या दिवसापासून त्याचे व्याज सुरु व्हायचे. समजा तुम्ही 60 हजार रुपये घेतलेत, मात्र पहिल्या महिन्यात मोठया मुश्किलीने 10 हजार रुपये खर्च केलेत, तरीही तुम्हाला 50 हजारावर व्याज दयावे लागत होते आणि कुणालाही याचे काही वाटत नव्हते. वाटायचे 50 हजार रुपये घेतलेत तर मला व्याज दयावेच लागेल. यावेळी आम्ही योजनेत बदल केला. गरीबांच्या भल्यासाठी योजनेला नवीन रुप दिले. आम्ही म्हटले, की या प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे त्यांना एक डेबिट कार्ड दिले जाईल. त्याचे 50 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. जर त्याला आज 50 हजार काढायचे असतील, तर काढू शकतो. मात्र वाटलं की आता 50 हजार रुपयांची आवश्यकता नाही, केवळ पाच हजार रुपये हवेत, तर त्याला पाच हजार घेता येतील आणि व्याज 50 हजारावर नाही तर केवळ पाच हजारांवर लावले जाईल. हे काम आम्ही केले आहे. गरीबाच्या प्रत्येक गोष्टीची दखल या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत घेण्यात आली आहे. आणि मला विश्वास वाटतो की, ज्या गरीबांना हे पैसे मिळत आहेत, ते काम करतीलही आणि आपला उद्योगधंदा वाढवण्यासाठी एखाद्या गरीबाला आपल्याकडे कामाला ठेवतील, नोकरी देतील. गावांमध्ये, छोटया छोटया शहरांमध्ये गरीब युवकांना यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्याची रोजी-रोटी चालणं सुरु होईल. एक अशी अर्थव्यवस्था, जी समाजातील तळागाळातल्या लोकांना शक्तीशाली बनवेल, आणि हे लोक शक्तीशाली झाले, आर्थिकदृष्टया संपन्न झाले, हा पाया मजबूत झाला तर भारताचा आर्थिक विकास वेगाने होईल हा माझा विश्वास आहे.
आज मला येथे गरीब मातांना गॅस सिलिंडर देण्याची संधी मिळाली. जे लोक गरीबांच्या नावावर राजकारण करत राहिले, निवडणुका येताच गरीबांचे गुणगान करतात, गरीब-गरीब अशी माळ जपत राहतात. माझ्या बंधू-भगिनींनो, साठ वर्षे झाली, यांच्या मनात कधी विचार आला नाही की एक गरीब आई आपल्या मुलांना जेऊ घालण्यासाठी कशी रांधत असेल ? ती लाकडे कुठून आणेल, चलू कशी पेटवेल, त्या लहान जागेत किती धूर असेल आणि त्या गरीब मातेची मुले धुरामुळे रडत असतील. जेवणाची शुध्द राहत नाही, ही परिस्थिती मी माझ्या लहानपणी पाहिली आहे आणि आजही मी शेकडो गरीबांना पाहत आहे. लाकडांच्या चुलीवर भाकरी बनवताना ती माता देखील आजारी पडते आणि दुसरीकडे हे गरीबांच्या नावाने मोठमोठया गोष्टी करणारे लोक, ज्यांच्याकडे गाडया आहेत, बंगले आहेत, आनंदाचा खजिना आहे, हे सरकार त्यांच्या घरात चूल पेटती रहावी यासाठी गरीबांच्या खजिन्यातून पैसे घेऊन त्यांना अनुदान देत होती आणि त्या लोकांना देखील गॅस सिलिंडरचे अनुदान घेण्यात काही गैर वाटत नवहते. मी त्यांना विनंती केली. मी म्हटलं भाऊ, तुम्ही आता कमावता, तुम्ही गॅस सिलिंडरवरचे अनुदान सोडू शकत नाही का ? या 150-200-250 रुपयांमध्ये काय ठेवलंय सोडून दया. मी विनंती केली, हसत खेळत विनंती केली होती, कारण मला भीती वाटत होती की माझ्या म्हणण्याचा अर्थ कशाप्रकारे घेतला जाईल. कारण आपला देश असा आहे, कुणाला काही सांगणं म्हणजे मोठा गुन्हा मानला जातो. तरीदेखील मी धाडस दाखवलं, मी एवढंच म्हटलं की मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही गॅस सिलिंडरवरचं अनुदान सोडून दया आणि मी म्हटलं की हे मी यासाठी सांगत नाही की मला सरकारी तिजोरीतील पैसे वाचावायचे आहेत. मी म्हटलं, मी यासाठी म्हणतो कारण मला त्या गरीब मातेला गॅस सिलिंडर दयायचा आहे, जिच्या घरात लाकडाच्या चुलीमुळे डोळे गेले आहेत, मुले रडत आहेत, त्यांचे बालपण रडण्यातच गेले. मला त्यांच्या घरी आनंद आणायचा आहे. हा गॅस सिलिंडर मी त्या गरीबांच्या घरी देऊ इच्छितो, आणि मी या देशातील त्या लाखो कुटुंबाचे अभिनंदन करतो, माझी ही छोटीशी विनंती त्यांनी मनापासून मान्य केली. माझ्या देशातील 31 लाख, हा आकडा छोटा नाही, 31 लाख लोक असे आहे, जे पुढे आले आणि म्हणाले की आम्ही गॅस सिलिंडरवरचे अनुदान सोडून देतो. तुम्ही हे अनुदान दुसऱ्या कुणाला तरी दया. आपल्या देशात घेण्यासाठी तर सर्वजण तयार असतात, मात्र सोडून देणे ही देखील देशाची ताकद आहे. कुणीतरी सागावं, मी सांगून पाहिलं. एक वेळ होती, आज ज्या महापुरुषांची जयंती आहे, लाल बहादूर शास्त्री यांची आज 2 ऑक्टोबर रोजी जयंती आहे, 1965 च्या युध्दाच्या वेळी त्यांनी देशवासियांना आवाहन केले होते की एक आठवडा एक वेळचं जेवण सोडून दया आणि देशाने त्यांचे म्हणणे ऐकलं आणि एक वेळ जेवणं सोडून दिलं मी अशा वृध्दांना ओळखतो, जे लाल बहादूर शास्त्री यांचे आवाहन आज देखील पाळत आहेत, अशा वृध्दांना मी पाहिलं आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटले आणि या देशातील लोकांनी एक आठवडा एक वेळचं जेवण सोडून दिलं. मी आवाहन केलं, लालबहादूर शास्त्री यांचं स्मरण करुन आवाहन केलं, महात्मा गांधींचं स्मरण करुन विनंती केली. आणि मला आनंद होत आहे की देशातील 31 लाख लोकांनी गॅस सिलिंडरवरचे अनुदान सोडून दिलं. आतापर्यंत त्यापैकी 18 लाख गरीब कुटुंबांना गॅस सिलिंडर पुरवण्यात आली आहेत. अन्य सिलिडरचं काम चालू आहे. एवढेच नाही, ज्याने गॅस सिलिंडरवरचं अनुदान सोडलं आहे, त्याला सांगितले जाते की फलाण्या गावातील फलाण्या गरीब कुटुंबाला आता तुमचे गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे, त्यालादेखील आनंद होतो. महाराष्ट्रात राहणारा असेल आणि गोव्यामध्ये एखाद्या गरीबाला जेव्हा तो सिलिंडर मिळतो, त्याला देखील आनंद होतो आणि संपूर्ण व्यवस्था संगणकीकृत करण्यात आली आहे. आगामी दिवसांत आणखी गरीब कुटुंबांना गॅस सिलिंडर देण्यात येतील.
आणि आज मी खासकरुन झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानू इच्छितो. सरकारची, भारत सरकारची एक कंपनी आणि झारखंड दोन्ही सरकारांनी, कारण जेव्हा गॅस सिलिंडर लावला जातो, तेव्हा घरात शेगडी आणावी लागते. त्याचबरोबर आणखी काही लहान मोठी साधनं लागतात. त्याचा खर्च अंदाजे अडीच-पावणे तीन हजार रुपये होतो. मला आनंद आहे की, आज येथे ज्या पाच हजार लोकांना गॅस सिलिंडर दिले जात आहेत, त्यांच्या शेगडीचा खर्च भारत सरकारची कंपनी आणि राज्य सरकार संयुक्तपणे देणार आहेत आणि म्हणूनच त्यांना कोणताही खर्च सोसावा लागणार नाही.
या देशात एक ताकद आहे. ती ताकद ओळखण्याचा मी प्रयत्न केला आहे त्या ताकदीने माझे समर्थन केले आहे, आणि त्यामुळेच आज हे शक्य झाले आहे. देशातील लाखो गरीब कुटुंबांपर्यंत गॅस सिलिंडर पोहचवता आला. लाकडाची चूल जाईल, त्यामुळे आपली जंगलं वाचतील, जंगल वाचली तर पर्यावरण देखील वाचेल आणि जेव्हा पर्यावरणाचे रक्षण होईल तेव्हा सर्वात जास्त आनंद जर कुणाला होईल, तर तो महात्मा गांधींना होईल. कारण पर्यावरणाच्या रक्षणात ते कोणतीही तडजोड करीत नसत. संपूर्ण आयुष्य ते अशाप्रकारे जगले, ज्यात क्षणाक्षणाला पर्यावरणाचे रक्षण व्हायचं. जंगल वाचल्यामुळे महात्मा गांधींना सर्वात जास्त आनंद होईल.
आज इथे आणखी एक महत्त्वपूर्ण काम होत आहे, आणि यासाठी मी सरकारला शुभेच्छा देऊ इच्छितो. येथील संथाल परगण्याची स्वत:ची एक खासियत आहे. ती देशाला माहित असायला हवी. मलुटीचं मंदिर, शतकांपूर्वी टेराकोटाचे काम कशा प्रकारे झाले असेल, कशा प्रकारे रचना केली असेल ? कालौघात सर्व नष्ट झालं, काही वाचलं तर काही खोदकामात सापडलं. आज त्या योजनेचा शुभारंभ होत आहे ज्यात भारत सरकारचं योगदान असेल, राज्य सरकारचं योगदान असेल, आणि एक असं ऐतिहासिक स्थळ पुन्हा पुनरुज्जीवित होईल, पर्यटनाचं क्षेत्र बनेल आणि या परिसरातील युवकांना रोजगाराची संधी मिळेल. इथली कीर्ती पुन्हा पसरु लागेल. प्राचीन इतिहास पुन्हा एकदा आपल्याला गौरव मिळवून देईल. याप्रकारच्या कामाला सुरुवात होणार आहे.
बंधू-भगिनींनो, या तीनही कामांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला सौभाग्यशाली समजतो. आज दोन ऑक्टोबर आहे, महात्मा गांधीजींची जयंती आपण साजरी करत आहात. मी प्रत्येकाला विनती करतो की, तुम्ही खादीची वस्तू खरेदी करा. खादीची विक्री वाढेल, गरीबाच्या घरी सुखाचे दिवस येतील. मला विश्वास आहे की तुम्ही हे काम पुढे न्याल. माझी तुम्हाला विनंती आहे की आज या सभामंडपातून बाहेर पडताना, कुणीही कचरा फेकून जाणार नाही. बाटल्या, प्लॅस्टिक, कागद सर्व बरोबर घेऊन जाल, जाल ना ? जरा सांगा म्हणजे समजेल. कचरा इथेच सोडून तर जाणार नाही ना ? हे पाहा, आपल्याला सवय लावून घ्यावी लागेल. गांधीजींचे स्वप्न पूर्ण करायचं असेल, स्वच्छ भारत बनवायचा असेल, तर आपल्याला ही सवय लावावी लागेल. मी आशा करतो, तुम्ही सर्व जेव्हा येथून जाल, येथील व्यवस्थापकांना देखील विनंती करतो की, येथे कचरा राहता कामा नये. एक असे उदाहरण घालून दया, लोकांना वाटायला हवं कि भारताच्या नागरिकांनी स्वच्छ भारताचे मनावर घेतलं आहे. संकल्प केला आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. खूप-खूप अभिनंदन ! माझ्या संपूर्ण ताकदीनिशी बोला, दोन्ही मुठी बंद करुन संपूर्ण ताकदीने बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय ! खूप खूप आभार !
S. Kane/N.Sapre
The atmosphere here indicates how Jharkhand has come fully on the path of development: PM
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
PM @narendramodi takes note of the progress in Jharkhand, including the much improved 'ease of doing rankings' https://t.co/l8ZqTRNwLA
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
We are empowering people for whom the doors of banks were shut, the people who never imagined they'd be free from clutches of Sahukars: PM
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
Opening the doors of banks was not enough for us. We want the poor to make use of the facilities the banks have to offer: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
If Jan Dhan Yojana opened gates of banks for the poor, MUDRA is about enabling access to credit & other facilities. http://t.co/M0zdGXtrXW
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2015