पीएम्इंडिया
नवी दिल्लीत आयोजित 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांची भेट घेतली. असियानचे (ASEAN) विद्यमान अध्यक्ष या नात्याने ब्रिक्स शिखर परिषदेतील फिलिपिन्सच्या सहभागाचे पंतप्रधानांनी स्वागत केले.
यावेळी दोन्ही नेत्यांनी सर्व क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. यासोबतच संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, अंतराळ, रेल्वे पायाभूत सुविधा, वित्तीय तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष तसेच दोन्ही देशांतील जनतेमधील परस्पर संबंध या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ आणि व्यापक करण्याच्या मुद्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. ऑगस्ट 2025 मध्ये अध्यक्ष मार्कोस यांनी भारताला भेट दिली होती. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये प्रस्थापित झालेल्या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत परस्पर द्विपक्षीय संबंधांना पुढची दिशा देण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. फिलिपिन्सने आपत्ती रोधक पायाभूत सुविधा आघाडीत (CDRI – Coalition for Disaster Resilient Infrastructure) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले.
यावेळी दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांबाबत एकमेकांचे विचार जाणून घेतले. धोरणात्मक भागीदारीशी निगडीत सर्व क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याची वचनबद्धताही दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली.
***
सोनाली काकडे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]