नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेवा तीर्थ येथे सक्रीय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीला चालना देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या प्रगती या माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान-सक्षम, बहु-पद्धतीय मंचाच्या 55व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी सोडवण्यासाठी तसेच प्रकल्प आणि कल्याणकारी योजना यांच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी हा मंच केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांना एकत्र आणतो.
आजच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी रस्ते, वीज, कोळसा आणि रेल्वे या क्षेत्रांतील 78,000 कोटी रुपये खर्चाच्या पाच महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच त्यांनी अद्ययावत आयटीआय संस्थांच्या माध्यमातून पंतप्रधान कौशल्य आणि रोजगारक्षमता परिवर्तन (पीएम-एसईटीयु) या योजनेच्या अंमलबजावणीसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) परिसंस्थेचा देखील आढावा घेतला.
पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबाचे परिणाम केवळ खर्चवाढीपुरते मर्यादित नसतात; तर त्यामुळे नागरिक, उद्योग आणि अर्थव्यवस्थेला अपेक्षित असलेले लाभ मिळणेही लांबणीवर पडतात, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. जबाबदारी निश्चित करून आणि वास्तववादी कालमर्यादा ठरवून प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आवाहन त्यांनी संबंधित मंत्रालये आणि राज्य सरकारांना केले. प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करतानाच बांधकामाच्या गुणवत्तेचे उच्च निकष राखले गेले पाहिजेत, यावरही त्यांनी भर दिला.
रस्ते प्रकल्पाचा आढावा घेताना पंतप्रधानांनी त्याची अंमलबजावणी वेगाने करण्याचे निर्देश दिले. तसेच, खर्चाच्या आकड्यांपेक्षा प्रत्यक्ष साध्य होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी पुन्हा ठळकपणे मांडली. कोळसा प्रकल्पाचा आढावा घेताना, प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी करण्यासोबतच पुनर्वसन आणि पुनर्स्थापना ही कामेही वेळेत आणि सन्मानपूर्वक केली जावीत, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
वीज प्रकल्पाचा आढावा घेताना पंतप्रधानांनी विकेंद्रित सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी नाविन्यपूर्ण प्रारूपांचा शोध घेण्याची सूचना केली. स्थानिक पातळीवरील ऊर्जा संसाधनांची उपलब्धता आणि मागणी लक्षात घेऊन, शक्य असेल तिथे अशा प्रकल्पांची उभारणी वीज वापराची केंद्रे असलेल्या ठिकाणांजवळ करावी, असे ते म्हणाले. या प्रयत्नांमुळे विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या वीज पुरवठ्याची उपलब्धता वाढवण्यास आणि वीज पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांवरील ताण कमी होण्यास मदत झाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
आयटीआय संस्था आणि पीएम-सेतूच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यांच्या मुख्य सचिवांना आयटीआय संस्थांना अधिक बळ देण्यासाठी तसेच पीएम-सेतू अंतर्गत उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी नेतृत्व करण्याचे आवाहन केले. आयटीआयबरोबर भागीदारी करण्यासाठी, त्यांची गुणवत्ता वाढवण्यात योगदान देण्यासाठी आणि प्रशिक्षण अभ्यासक्रम बदलत्या काळानुसार मनुष्यबळाच्या गरजांशी सुसंगत करण्यासाठी उद्योगांसमोर ही अनुकूल संधी असल्याचे ते म्हणाले. या भागीदारीचे रूपांतर युवा वर्गासाठी उत्तम प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये करण्यासाठी राज्ये, आयटीआय आणि उद्योग यांच्यात चांगले सहकार्य असावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधानांनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (PSUs), भविष्यातील मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन त्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले. तसेच, आवश्यक कौशल्ये असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांची भरती करण्यासाठी संबंधित व्यवसाय अभ्यासक्रम राबवणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांशी (ITIs) अधिक समन्वय साधण्याचेही त्यांनी सुचवले. प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि शिकाऊ उमेदवारीच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून (ITI) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांच्या भरतीवर अधिक भर देण्याचे आवाहनही त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना केले. अशा सहभागामुळे प्रशिक्षणार्थी उमेदवारांना उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल. तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना त्यांच्या कामकाजाच्या गरजांनुसार प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल.
कौशल्य विकासाचे नियोजन औद्योगिक समूह आणि विविध क्षेत्रांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन केले पाहिजे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. प्रत्येक प्रदेशातील विद्यमान उद्योग आणि भविष्यातील गुंतवणुकीशी सुसंगत असे आयटीआयमधील (ITI) व्यवसाय अभ्यासक्रम, त्यांचे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाची क्षमता विकसित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
स्थानिक गरजांनुसार कौशल्य विकास केल्यास तरुणांना त्यांच्या घराजवळच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आयटीआय आणि स्थानिक रोजगारदाते यांच्यातील समन्वय अधिक बळकट केल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतील आणि रोजगारासाठी करावे लागणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. तसेच, तरुणांना आपापल्या प्रदेशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी आयटीआय शिक्षणासाठी, ‘वर्गखोली–उद्योग–करिअर’ (Classroom–Company–Career – 3C) या दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. या दृष्टिकोनात वर्गखोलीतील शिक्षणाची सांगड, उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवाशी घालून विद्यार्थ्यांना रोजगार आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांना उपयुक्त तांत्रिक ज्ञान, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रशिक्षणानंतर रोजगार मिळवण्याचा स्पष्ट मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी आयटीआय आणि उद्योगांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर /संजना चिटणीस/रेश्मा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Projects worth over Rs. 78000 crore reviewed in today’s PRAGATI session. Sectors covered are roads, railways, power and coal. And, there was an extensive review of the ITI ecosystem in India and implementation of PM-SETU. Skill development is among our Top priorities! https://t.co/MTEVe3EFRG
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2026