Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बांधकाम तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रातील उपकरणांच्या (सीआयई) उत्पादन परिसंस्थेतील संवर्धनासाठीच्या 11,000 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या वित्तीय व्ययासह “बांधकाम तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रातील उपकरणांची (सीआयई) उत्पादन परिसंस्था संवर्धन योजने”ला मंजुरी दिली. सीआयई आणि त्याचे घटक यांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे तसेच देशात एक समर्पित सीआयई चाचणी सुविधा विकसित करणे आणि त्या माध्यमातून स्वावलंबनात वाढ करत भारताला जागतिक सीआयई बाजारपेठेत महत्त्वाचा सदस्य म्हणून स्थापित करणे हे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयातर्फे (एमएचआय) राबवण्यात येणाऱ्या या योजनेचे हेतू आहेत.

चीन आणि अमेरिका यांच्या पाठोपाठ भारतातील सीआयई उद्योग सध्या जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या उद्योगाची बाजारातील उलाढाल 97,500 कोटी रुपये होती. पायाभूत सुविधा (रस्ते आणि बंदरे) तसेच गृहनिर्माण या क्षेत्रांतील गतिमान वृद्धीमुळे हा उद्योग दुपटीहून अधिक वाढून आर्थिक वर्ष 2029-30 पर्यंत या उद्योगाची बाजारातील उलाढाल 2,28,100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

बांधकाम तसेच पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील जलद विकासातून प्रेरणा घेत, शिप-टू-शोअर क्रेन्स, बोगदा खणणारे यंत्र, हायड्रॉलिक एक्सकॅव्हेटर, ऑफ-हायवेज ट्रक्स इत्यादी तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपकरणांच्या उत्पादनाला मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. देशात एक समर्पित सीआयई चाचणी सुविधा स्थापन करण्याची तरतूद देखील या योजनेत करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2026-27पासून आठ वर्षांच्या कालावधीमध्ये लागू होणार असलेल्या या योजनेमध्ये, उत्पादन सुविधा उभारण्यासाठी (आर्थिक वर्ष 2026-27 ते आर्थिक वर्ष 2027-28) या दोन वर्षांचा जडणघडण कालावधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यानंतरची पाच वर्षे (आर्थिक वर्ष 2028-29 ते आर्थिक वर्ष 2032-33) हा अनुदान वितरण कालावधी असेल, तर अंतिम वर्ष (आर्थिक वर्ष 2033-34) हे आर्थिक वर्ष 2032-33 मधील वाढीव विक्रीवर आधारित अनुदानांच्या परतफेडीचे असेल.

सदर योजनेचे दोन घटक असतील:

1.विक्रीशी संलग्न मदत – पात्र सीआयई उपकरणे आणि त्यांचे घटक यांच्या वाढीव विक्री मूल्याच्या आधारावर पुढील दोन संमत श्रेणींमध्ये मदत अनुदान पुरवले जाईल – पात्र ओईएम आणि घटक उत्पादक. पाच वर्षांच्या कालावधीत वाढीव विक्री मूल्याच्या 13% ते 8% या दरम्यान श्रेणीबद्ध मदत अनुदान दर लागू होतील.

2. सीआयई चाचणी सुविधेसाठी अनुदान – समर्पित सीआयई चाचणी सुविधा उभारण्यासाठी, व्यवहार्यता तफावत निधीच्या स्वरुपात, 375 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान 

केंद्र सरकारचा हा उपक्रम म्हणजे बांधकाम आणि पायाभूत सुविधा उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्याच्या तसेच जागतिक बाजारांमध्ये देशाच्या स्पर्धात्मकतेत सुधारणा करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. सीआयईच्या उत्पादनात स्वदेशी क्षमतांची जोपासना करुन ही योजना, पुरवठा साखळीची सुरक्षितता सुनिश्चित करेल, रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करेल आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीला चालना देईल. विकसित भारत @2047 च्या संकल्पनेच्या धर्तीवर तंत्रज्ञानदृष्ट्या स्वावलंबी, जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मक आणि शाश्वत औद्योगिक पाया तयार करण्याच्या सरकारच्या अविचल बांधिलकीचे हे मूर्त रूप आहे.

सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai