Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी केला वाराणसी या आपल्या मतदारसंघाचा दौरा, श्री जगद्‌गुरू विश्वाराध्य गुरूकुलाच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसीला भेट दिली. वाराणसी येथील जंगमवाडी मठात जगद्‌गुरू विश्वाराध्य गुरूकुलाच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘श्री सिद्धांत शिखमणी ग्रंथाच्या’ 19 भाषेतल्या अनुवादाचे प्रकाशन केले. ‘श्री सिद्धांत शिखमणी ग्रंथ’ मोबाईल ॲपचे अनावरण त्यांनी केले. नव्या दशकाच्या प्रारंभी शतक महोत्सव होत असून हा योगायोग आहे आणि हे दशक 21 व्या शतकातील भारताची भूमिका पुन्हा अधोरेखित करेल, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले.

मोबाईल ॲपद्वारे श्री सिद्धांत शिखमणी ग्रंथाच्या डिजिटायझेशनमुळे युवा पिढीसोबतचे दुवे अधिक मजबूत होतील आणि त्यांना प्रेरणाही मिळेल. या मोबाईल ॲपद्वारे ग्रंथाशी संबंधित वार्षिक प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या आयोजनाचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. 19 भाषांमधल्या अनुवादामुळे हा ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.

‘नागरिक म्हणून आपली वर्तणूक भारताचे भविष्य निश्चित करणार आहे, नव्या भारताची दिशा निश्चित करणार आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले. संतांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करून आपल्याला आपल्या जीवनातील आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत आणि राष्ट्रनिर्माणातही पूर्ण सहकार्य द्यायचे आहे.

स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यात आणि स्वच्छतेची मोहीम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात लोकांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. भारतात निर्मित उत्पादने वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. जलजीवन अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

गंगा नदी स्वच्छ करण्यात लक्षणीय सुधारणा झाली असून लोकसहभागातून हे शक्य होऊ शकल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ‘नमामि गंगे’ कार्यक्रमांतर्गत 7000 कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले असून 21,000 कोटी रुपयांच्या योजना प्रगतीपथावर आहेत, असे त्यांनी सांगितले.

सरकारने नुकतीच ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ विश्वस्त मंडळाची घोषणा केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीच्या कार्यावर हे विश्वस्त मंडळ देखरेख ठेवणार आहे. सरकारने विश्वस्त मंडळाकडे 67 एकर जमीन हस्तांतरित केल्याचेही त्यांनी सांगितले.

**********

B.Gokhale/S.Kakade/P.Kor