Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी फाळणी वेदना स्मृती दिनी फाळणीचा फटका बसलेल्यांच्या धैर्याचे स्मरण केले


फाळणी वेदना स्मृती दिनी फाळणीने प्रभावित झालेल्या सर्वांच्या धैर्याचे आपण स्मरण करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी नमूद केले की, तो इतिहासातील असा एक क्षण होता ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली, त्याने कुटुंबे विस्थापित झाली, आप्तेष्ट गमावले गेले आणि अतोनात दुःख सोसावे लागले.

त्याचवेळी या परिस्थितीवर मात करून लोकांनी शून्यातून आपले आयुष्य पुन्हा उभे केले, संकटांचे यशात रूपांतर केले आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला मानवी जिद्दीच्या सामर्थ्याचे स्मरण करून देतो, असे त्यांनी नमूद केले. देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आणि ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने एकत्रितपणे काम करण्याचा आपला संकल्प या दिवसामुळे अधिक दृढ होईल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.

त्या भयावह काळातून बाहेर पडून देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व देशवासियांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांनी नमूद केले की, आपल्या धैर्याच्या आणि क्षमतेच्या जोरावर त्यांनी हे दाखवून दिले की प्रतिकूल परिस्थितीतही संकल्प कसे पूर्ण केले जातात. पंतप्रधानांनी सर्वांना सद्भावना आणि एकजुटीची राष्ट्रीय भावना आणखी बळकट करण्याचे आवाहन केले आहे.  

कठोर परिश्रम, उद्यमशीलता आणि समर्पित प्रयत्नांमुळेच विविध कला, विज्ञान, तांत्रिक कौशल्ये, कारागिरी आणि नवोन्मेष बहरतो, आणि यशाचा मार्ग मोकळा होतो, यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले आहे. ते म्हणाले की, यासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहू नये, त्याऐवजी धैर्य, परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, कारण मानवी प्रयत्नच नशीब घडवतात.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील पोस्टच्या मालिकेत लिहिले आहे:

“आज आपण #PartitionHorrorsRemembranceDay पाळत आहोत. आजच्या दिवशी फाळणीचा फटका बसलेल्या त्या सर्वांच्या धैर्याचे आपण स्मरण करतो. इतिहासातील तो एक असा क्षण होता ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली, कुटुंबे विस्थापित झाली, आप्तस्वकीयांना गमवावे लागले आणि अतोनात दुःख सहन करावे लागले.

त्याचवेळी, या परिस्थितीवर मात करून लोकांनी शून्यातून आपले आयुष्य पुन्हा उभे केले, संकटांचे यशात रूपांतर केले आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. त्यांचा जीवनप्रवास आपल्याला मानवी जिद्दीच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो.

हा दिवस आपल्या देशातील सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करो, आणि सर्वांना एकत्र येऊन ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देवो.”

“फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, मी त्या भीषण कालखंडातून बाहेर पडून देशाच्या प्रगतीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्वांना नमन करतो. प्रतिकूल परिस्थितीतही संकल्प कसे पूर्ण केले जातात हे त्यांनी आपल्या धैर्याने आणि सामर्थ्याने दाखवून दिले. चला, सद्भावना आणि एकजुटीची राष्ट्रीय भावना अधिक दृढ करूया.

उद्यमस्य प्रसादेन दृश्यन्ते विविधाः कलाः।
कातरा एव जल्पन्ति यद् भाव्यं तद् भविष्यति॥”

कठोर परिश्रम, उद्यमशीलता आणि समर्पित प्रयत्नांमधूनच कला, विज्ञान, तांत्रिक कौशल्ये, हस्तकला आणि नावोन्मेष यांची भरभराट होते आणि यशाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून, नशिबावर अवलंबून राहू नये, त्याऐवजी धैर्य, परिश्रम आणि अथक प्रयत्नांनी आपल्या ध्येयाच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल करावी, कारण मानवी प्रयत्नच नशीब घडवतात.

***

NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai