Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमाला  संबोधित केले; शीख समाज आणि सामाजिक एकतेसाठीच्या उपक्रमांचा केला उल्लेख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमाला संबोधित केले. आदरांजली अर्पण करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज आपण सर्वजण या महत्त्वपूर्ण पुण्यतिथीनिमित्त त्या महान गुरूंचे स्मरण करत आहोत आणि अशा ऐतिहासिक व पवित्र कार्यक्रमाचा भाग होणे ही अत्यंत भाग्याची बाब आहे.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, भारताचा इतिहास शौर्य, सौहार्द आणि सहकार्याचा इतिहास  आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर होत असलेल्या या कार्यक्रमातून आपण त्या महान वारशाचे साक्षीदार बनत आहोत, असे त्यांनी नमूद केले. गुरूंच्या काळात जेव्हा त्यांनी  त्यागाची पराकाष्ठा गाठली , तेव्हा सामाजिक एकतेने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, कारण समाजातील प्रत्येक घटकाने सत्य आणि संस्कृतीसाठी अढळ राहण्याची प्रेरणा त्यांच्याकडून घेतली होती. “श्री गुरु गोबिंद सिंहजी यांच्या ‘गुरु नानक नाम-लेवा संगत’सारख्या परंपरांनी सामाजिक एकतेच्या त्या महान यज्ञात महत्त्वाची भूमिका बजावली,” असे मोदी यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रीय ऐक्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी नमूद केले की, आज देशाला पुन्हा एकदा सामाजिक एकतेची सर्वाधिक गरज आहे आणि ‘संगत’चे हे अद्भुत एकत्रीकरण राष्ट्राला विश्वास देते की गुरू आणि संतांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत.
पंतप्रधानांनी या समागमाला गेल्या वर्षी नागपूर येथे सुरू झालेला आणि ‘तख्त श्री हजूर साहिब, नांदेड’ या ऐतिहासिक भूमीवर अधिक दृढ झालेला एक अखंड प्रवास असे वर्णन केले. “नवी मुंबई येथे हा प्रवास एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला असून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात, हजारो गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पोहोचवला आहे,” असे मोदी यांनी अधोरेखित केले. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांनी महाराष्ट्र शासनाचे विशेष अभिनंदन केले.
अलीकडील स्मरणोत्सवांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे सांगितले आणि केंद्र सरकार गुरू साहिबांशी संबंधित प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग राष्ट्रीय स्तरावर साजरा करत असल्याचे नमूद केले. मोदी यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 400व्या प्रकाश पर्वानिमित्त स्मारक टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी केल्याचा तसेच गुरु नानक देव जी यांच्या 550व्या प्रकाश पर्वाचा उल्लेख केला आणि प्रत्येक प्रसंग पूर्ण भक्तिभावाने साजरा केला जात असल्याचे सांगितले. ‘साहिबजाद्यांच्या’ सन्मानार्थ दरवर्षी ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची नवी राष्ट्रीय परंपरा सुरू केल्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.

पंतप्रधानांनी ‘कर्तारपूर साहिब कॉरिडॉर’ चे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण करणे आणि ‘श्री हेमकुंड साहिब यात्रेसाठी’ नवीन सुविधा निर्माण करणे यासारख्या प्रमुख कामगिरींवर प्रकाश टाकला.”सरकारने शीख संस्था आणि गुरुद्वारांशी संबंधित संस्थांना एफसीआरए अंतर्गत मदत जाहीर केली आहे, तसेच शालेय अभ्यासक्रमात आणि सांस्कृतिक प्रवचनामध्ये शीखांच्या इतिहासाला योग्य स्थान मिळेल याचा निर्वाळा दिला, ज्यामुळे या समुदायाने दशकांपासून ज्या कामांची वाट पाहिली होती ती आता पूर्ण झाली आहेत”, असे मोदी यांनी नमूद केले.
आदर आणि न्यायाप्रती सरकारच्या  वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना, पंतप्रधानांनी 1984 च्या दंगलींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करणे आणि बंद प्रकरणे पुन्हा उघडणे यांचा उल्लेख केला, ज्यामुळे दोषींना शिक्षा झाली.1984 च्या दंगलीतील पीडितांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेल्या अतिरिक्त भरपाईबद्दल आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या त्यासंदर्भातील अधिक सक्रिय भूमिकेबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केले.अफगाणिस्तानातील शीख बांधवांच्या सुरक्षेबाबत आणि ‘गुरु ग्रंथ साहिब’च्या ‘स्वरूप’ (पोथी) परत आणण्याच्या सन्माननीय कामासाठी सरकारच्यावतीने ‘मिशन मोड’ वर झालेल्या कामाविषयी पंतप्रधानांनी यावेळी अधिक माहिती दिली.
“सरकारने अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदूंसाठी नागरिकत्वाचा मार्ग मोकळा केला, छळ झालेल्या निर्वासितांना CAA द्वारे दिलासा दिला आहे आणि जम्मू आणि काश्मीरमधील शीख कुटुंबांसाठी पुनर्वसन पॅकेजेस लागू केले आहेत”, असे  मोदी यांनी अधोरेखित केले.ओसीआय आणि व्हिसा नियम सोपे करण्यात आले आहेत आणि परदेशी शिखांचा प्रवास सुलभपणे होण्यासाठी हजारोंची नावे काळ्या यादीतून काढून टाकण्यात आली आहेत, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की, “शीख समुदायाच्या श्रद्धांचा आदर करणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी नवीन संधी निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आणि सेवेचा विशेषाधिकार दोन्ही मानले जाते”.
साहस आणि सत्याच्या बाजूने उभे राहण्याची भावना आजही तितकीच प्रासंगिक आहे जितकी ती भूतकाळात होती,असे आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सांगितले. जेव्हा नवीन पिढी या मूल्यांशी जोडली जाते, तेव्हा परंपरा ही केवळ स्मृती न राहता भविष्याचा मार्ग बनते”, यावर मोदी यांनी भर दिला. समागमाचा उद्देश केवळ इतिहास लक्षात ठेवणे नाही तर तो आपल्या आचरणात आणून आत्मसात करणे हा आहे”, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. 

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com