पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘7, लोक कल्याण मार्ग’ येथे शांघाय 2026 मधील ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेत सहभागी झालेल्या ‘टीम इंडिया’च्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
या संवादादरम्यान, सहभागींनी स्पर्धेतील आपले अनुभव सांगितले. जागतिक स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करता आले याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान नवीन साधने, सॉफ्टवेअर, तांत्रिक प्रणाली आणि कार्यपद्धतींशी जुळवून घेण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. तसेच, तरुणांना उपयुक्त ठरेल असे कौशल्य विकसित करण्यासाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले.
जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल पंतप्रधानांनी सहभागींचे अभिनंदन केले आणि त्यांना कौशल्य विकासाचे दूत बनण्याचे आवाहन केले. तसेच, शैक्षणिक पदव्यांइतकेच व्यावहारिक कौशल्येही महत्त्वाची असतात यावर भर दिला.
विशिष्ट कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, त्यामुळे तरुणांनी सतत नवीन कौशल्ये आत्मसात करणे, आपल्या विद्यमान क्षमता अद्ययावत करणे आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. त्यांनी सहभागींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या गरजांनुसार कौशल्ये विकसित करण्याचे आणि आपले अनुभव व सूचनांच्या माध्यमातून भारताच्या कौशल्य प्रशिक्षण परिसंस्थेत सुधारणा करण्यात योगदान देण्याचे आवाहन केले. भारताला कुशल मनुष्यबळाचे जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी युवक , सरकार आणि प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वित प्रयत्नांच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
पंतप्रधानांनी कौशल्य विकास घटकासाठी वेगळे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यामागील उद्देश अधोरेखित केला आणि आय आय टी किंवा आय आय एम पेक्षा त्यांचे महत्त्व अजिबात कमी नसल्याचे सांगितले. भारताच्या कौशल्य प्रशिक्षण व्यवस्थेत अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी आपले अनुभव आणि सूचना सरकारला जरूर कळवाव्यात असे त्यांनी आवर्जून सांगितले.
वर्ल्डस्किल्स ही जगातील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा असून यानिमित्तानं सहभागी देशातील आणि भागांतील अनेक युवा व्यावसायिक एकत्र येतात आणि आपल्या व्यावसायिक तसेच तांत्रिक कौशल्यातील नैपुण्य सादर करतात. 48 वी वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 स्पर्धा 22 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान शांघायमधील राष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात आयोजित करण्यात आली होती. 48 व्या वर्ल्डस्किल्स स्पर्धेत, भारतीय संघाने 6 रौप्यपदके आणि 20 ‘मेडल फॉर एक्सलन्स’ पटकावून 10वे स्थान मिळवले. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 70 स्पर्धकांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तुकडीने विविध 63 कौशल्यांमध्ये भाग घेतला.
या संवादात्मक कार्यक्रमाला कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी तसेच केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
***
Neha Kulkarni / Bhakti Sontakke / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Hosted the bright youngsters who took part in the 48th WorldSkills Competition held in Shanghai. Proud of them! https://t.co/5lzQwcer6h
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2026