Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ईराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियन यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ईराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियन यांची भेट


नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कझान इथे होत असलेल्या 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने ईराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियन यांची भेट घेतली.

ईराणचे 9 वे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी डॉ. मसूद पेझेश्कियन यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांनी ब्रिक्स कुटुंब समुहात ईराणचे स्वागतही केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या पर्यायांबाबत चर्चा केली. चाबहार बंदराच्या दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी होणे हा द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचेही दोन्ही नेत्यांनी नमूद केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानच्या पुनर्रचना आणि पुनर्विकासासाठी तसेच मध्य आशियासोबतच्या व्यापार आणि आर्थिक संबंधाचा विस्तार करण्याचे महत्त्वही पुन्हा एकदा अधोरेखित केले.

या भेटीत दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि प्रादेशिक घडामोडींबद्दच्या विचारांची देवाणघेवाण केली. या प्रदेशात संघर्ष वाढल्याबद्दल पंतप्रधानांनी गंभीर चिंता व्यक्त केली, तसेच परिस्थिती पूर्वपदावर यावी याबद्दलची भारताची भूमिकाही पुन्हा एकदा मांडली. नागरिकांचे संरक्षण आणि संघर्ष  यावर तोडगा काढण्यासाठी मुत्सद्देगिरीच्या पातळीवर प्रयत्न करण्याची भूमिकाही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.

ब्रिक्स आणि शांघाय सहकार्य संघटनेसह विविध बहुपक्षीय मंचांवर दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य कायम ठेवण्यावरही दोन्ही नेत्यांनी  सहमती व्यक्त केली. यावेळी पंतप्रधानांनी पेझेश्कियन यांना भारताला भेट देण्यासाठी आमंत्रित केले. अध्यक्ष पेझेश्कियन यांनीही या  निमंत्रणाचा स्वीकार केला.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai