Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधे कोलकाता इथल्या 18,700 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधे कोलकाता इथल्या 18,700 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील कोलकाता इथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. यावेळी उपस्थित लोकांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, “आज कोलकात्याच्या या भूमीवरुन पूर्व भारत आणि पश्चिम बंगालसाठी विकासाचा नवा अध्याय लिहीला जात आहे.”

रस्ते, रेल्वे आणि बंदर पायाभूत सुविधांशी संबंधित 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी या कार्यक्रमातून होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल आणि पूर्व भारताच्या विकासाला नवी गती मिळेल, व्यापार उदिमाला चालना मिळेल आणि लाखो लोकांना नव्या संधी मिळाल्यामुळे त्यांचे जगणे सुकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही प्रमुख प्रकल्पांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की खरगपूर-मोरग्राम द्रुतगती मागाचे काम पूर्ण झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील अनेक भागांमधल्या आर्थिक उलाढालींना वेग येईल. दुब्रजपूर बाह्यवळण मार्ग आणि कांग्सबती, शीलबती नद्यांवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलांमुळे संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होईल असे त्यांनी नमूद केले. “या क्रांतिकारी प्रकल्पांसाठी पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पूर्व भारतामधील नागरिकांचे मी अभिनंदन करतो,” असे मोदी म्हणाले.

देशभरात भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे आणि पश्चिम बंगाल या मोहिमेत मागे पडू नये असा सरकारचा ठाम निर्धार आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये रेल्वेसेवांचा वेगाने विस्तार करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमात कलाईकुंड-कनिमाहुली रेल्वेमार्गावरील स्वयंचलित ब्लॉक सिग्नल यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. “या उपक्रमांमुळे गर्दीच्या रेल्वेमार्गांची क्षमता वाढेल, प्रवास सुरक्षित होईल आणि प्रवासाचा वेग तसेच प्रवाशांसाठीच्या सुविधांमध्ये वाढ होईल,” असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी कामाख्यागुडी, अनारा, तमलुक, हल्दिया, बाराभूम आणि सिउरी या सहा स्थानकांचे ‘अमृत भारत स्थानके’ योजनेअंतर्गत अमृत भारत स्थानके म्हणून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. बंगालची महान संस्कृती आता या स्थानकांमधून अधिकच तेजाने झळकत आहे आणि आणखीही अनेक स्थानकांचे पुनर्विकास कार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. पुरुलिया आणि आनंद विहार टर्मिनल दरम्यान एका नवीन एक्स्प्रेस रेल्वे सेवेचा पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. “ही रेल्वे सेवा केवळ पश्चिम बंगालमधीलच नव्हे, तर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील नागरिकांना देखील फायदेशीर ठरेल,” असे मोदी यांनी सांगितले.

आर्थिक प्रगतीला चालना देण्यात रस्ते आणि रेल्वे जोडणीइतकीच बंदरे आणि जलवाहतूक यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असते, यावर पंतप्रधानांनी भर दिला. अनेक दशकांपासून पूर्व भारताच्या या अफाट क्षमतेकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले गेले होते; परंतु आता जलमार्गामुळे व्यापार आणि औद्योगिक प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होत आहेत. याच दिशेने, बंदरांच्या पायाभूत सुविधांशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. कोलकाता आणि हल्दिया ही बंदरे पूर्व भारतातील व्यापाराची प्रमुख केंद्रे म्हणून दीर्घकाळापासून ओळखली जातात हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हल्दिया डॉक कॉम्प्लेक्सचे यांत्रिकीकरण केल्यामुळे मालवाहतुकीच्या कामांना गती मिळेल, बंदराची क्षमता वाढेल आणि व्यापारासाठी नवीन सुविधा उपलब्ध होतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याव्यतिरिक्त, कोलकाता डॉक प्रणालीमधील ‘बॅस्क्युल ब्रिज’चे नूतनीकरण आणि किडरपूर डॉक येथील माल हाताळणी क्षमतेत वाढ करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. असे त्यांनी सांगितले. “हे सर्व प्रकल्प पूर्व भारताची लॉजिस्टिक्स व्यवस्था अधिक बळकट करतील,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

रस्ते, रेल्वे आणि बंदरांशी संबंधित हे नवीन प्रकल्प पश्चिम बंगालसाठी एका आधुनिक भविष्याचा मार्ग प्रशस्त करत आहेत, यावर पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या समारोपात भर दिला. या प्रकल्पांचे फायदे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटनासारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होतील तसेच स्थानिक उद्योग आणि सेवा क्षेत्राला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताला दिशा दाखवण्यात बंगालने बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेची पंतप्रधानांनी आठवण करून देत पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की मजबूत संपर्कप्रणाली आणि आधुनिक पायाभूत सुविधा हेच ‘विकसित बंगाल’चा पाया ठरतील. “भारताला नेहमीच दिशा दाखवणाऱ्या बंगालने, ‘विकसित बंगाल’ बनून पुन्हा एकदा तोच गौरव प्राप्त करावा, हा आमचा संकल्प आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

***

शैलेश पाटील/सुरेखा जोशी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai